सततच्या प्रवासानंतर आता पुढचे सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे रोजची सामान आवराआवरी हा प्रकार नव्हता. हवामानाचा अंदाज बघायचा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाचा बेत करायचा असे ठरले होते. पर्वतशिखरे बघण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल आणि नुसतेच ढग असतील तर काहीच मजा नाही. सकाळी उठून पुन्हा बघितले तेव्हा ठरल्याप्रमाणे शिल्थोर्नला हिरवा झेंडा मिळाला.
शिल्थोर्न (Shilthorn) हे आल्प्समधील २९७० मीटर उंचीवरील शिखर आहे. इथवर जाण्यासाठी रज्जुमार्ग आहे जो चार वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला वरपर्यंत पोहोचवतो. श्टेशेलबेर्ग हे पायथ्याचे गाव आहे जिथून हा रज्जुमार्ग सुरु होतो. श्टेशेलबेर्ग-->गिमेलवाल्ड-->म्युरेन-->बिर्ग--->शिल्थोर्न असा हा प्रवास आहे. (Stechelberg-->Gimmelwald-->Mürren-->Birg-->Shilthorn). एकूण ३०-३२ मिनिटांचा हा प्रवास आहे, ज्यापैकी पहिले दोन टप्पे तसे कमी वेळाचे पण उर्वरीत दोन टप्पे बरेच लांबलचक आहेत. म्युरेन आणि गिमेलवाल्ड ही दोन टुमदार खेडी आहेत. श्टेशेलबेर्ग पासून या दोन गावांपर्यंत पायी चढत येणे सुद्धा सहज शक्य आहे, इथून पुढे शिल्थोर्न पर्यंत देखील प्रशिक्षित गिर्यारोहक गिर्यारोहणाचा आनंद घेतात. बिर्ग आणि शिल्थोर्न या दोन्ही शिखरावरून पलीकडच्या बाजूस असलेली आयगर (Eiger), युंगफ्राऊ (Jungfrau) आणि म्योंश (Mönch) ) ही तीन शिखरे दिसतात आणि अर्थात आजूबाजूचा निसर्ग. शिल्थोर्नवर असलेले पिझ ग्लोरिया (Piz Gloria) हे एक फिरते रेस्टॉरंट आणि काही बाँडपटांचे येथे झालेले चित्रीकरण ही अजून काही आकर्षणे.
श्टेशेलबेर्गला अर्ध्या तासात पोहोचलो. तिकीट काढले आणि पहिला प्रवास सुरु झाला. खालची खेडी, मधूनच वाहणारे झरे, आजूबाजूची हिरवळ सगळेच सुंदर दिसत होते. रज्जुमार्गातील सूचना इंग्रजी आणि जर्मन सोबतच चीनी भाषेतूनही होत्या. बापरे. केवढी सोय सगळ्या पर्यटकांची. पहिल्या दोन ठिकाणी न थांबता सरळ बिर्ग पर्यंत पोहोचलो. किंचित थंडी होती पण सूर्यही मधूनच डोकावत होता. मुख्य म्हणजे आकाश निरभ्र होते. बाहेर आलो तोच या तीन शिखरांचे दर्शन झाले. बर्फ बराच वितळला होता पण म्हणून या पर्वतांचे सौंदर्य काही कमी होत नाही.
डावीकडून - आयगर, म्योंश आणि युंगफ्राऊ
इथे एक स्कायवॉक प्लॅट्फॉर्म बांधला आहे, जो या खालच्या चित्रात डावीकडे दिसतो. खाली जाळी असल्याने पाया खाली पाहिले तर अनेकांना भीतीदायक वाटते. सुरुवातीला जरासे घाबरत आणि मग थोडे निश्चिंतपणे उतरले.
फोटो बिटो काढून झाल्यावर जवळच बांधलेल्या पायऱ्यांवर निवांत बसलो. सकाळी लवकर आल्याने अजून मुख्य पर्यटकांची गर्दी सुरु झाली नव्हती. समोरची तीन शिखरे सूर्यकिरण पडल्यानंतर अजूनच सुंदर दिसत होती. वारा अजिबातच नसल्याने थोडेफार लोक आणि कधीतरी येणारा विमाने किंवा हेलिकॉप्टर यांचाच काय तो आवाज. अनेक लोक पॅराग्लायडींग करण्यात मग्न होते. उन्हाळ्याचे शेवटचे काही दिवस असल्याने अशा प्रकारांसाठी गर्दी होती.
एकीकडे प्लॅट्फॉर्मवर उतरताना अनेक पर्यटक लक्ष वेधून घ्यायचे. एखादे आजोबा अगदी प्रेमाने आपल्या बायकोला "अगं काही होत नाही म्हणत हात धरून घेऊन जायचे". काही लहान मुलांचे बागेत आल्याप्रमाणे इथे जोरजोरात उड्या मारायच्या एवढेच उद्योग करायचे. काहींना आई बाबा किंवा आजी आजोबा "हे बघ, हे आयगर, हे युंगफ्राऊ, ते तिकडून पाचवे ते हे" असे समजावून सांगत होते. त्यांना रस असो अथवा नसो. मधेच एक जपानी ललना तिच्या अतीव नाजूक टाचांच्या बुटांना सावरत सावरत आली आणि दुरूनच हा ओरडू लागली, "ओह माय गॉड, आय कान्त डु धिस..सो स्केअरी..ओ नो...ओ नो..." देश विदेशातल्या लोकांचे अनेक चमत्कारिक नमुने दिसत होते. या सगळ्यांमध्ये खास करमणूक करतात ते म्हणजे चीनी-जपानी लोक. नेमके कोणत्या देशाचे कोण हे कळत नाही पण जास्त चीनी असतात असे एक चीनी सहकर्मचारीच म्हणाला. केवळ इथेच नाही, तर आजवरच्या अनेक सहलींमध्ये यांची काही खास वैशिष्ट्ये दिसतातच. एक असे की यांच्याकडे निकॉन किंवा कॅननचा किमान डीएसएलआर कॅमेरा असतोच असतो. त्याच्या शिवाय मग कितीही अत्याधुनिक आयुधे असू शकतात. यांची झुंबड आली की आपण कुठलेही फोटो काढणे शक्य होत नाही. यांना कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर कधी एकदा मी फोटो काढतोय अशी सदैव घाई असते. ही घाई रोपवेत चढताना, प्रसाधनगृहात, ट्रेनमध्ये चढताना, उतरताना सदासर्वकाळ. बरं मग जाउन तिथे काय आहे वगैरे बघणे हे फार महत्वाचे वाटत नाही बहुधा. मी इथे आलो होतो म्हणत आल्या आल्या दोन चार फोटोंचा क्लिकक्लिकाट, आधी कॅमेर्याने, मग नंतर आयपॅड किंवा टॅबने, मग मोबाईलने, आधी एकट्याचा, मग ग्रुपचा वगैरे वगैरे फोटो सत्र आल्यापासून सुरु होते. आजकाल गेल्या काही दिवसांपासून सेल्फी स्टिक हे उपकरण यात आले आहे. त्यामुळे काही सेल्फीज होतात. पण मग फोटो झाले की लगेच हे सगळे पुढच्या ठिकाणी जायला निघतात. त्यामुळे वेळ जो काय घेतात तो फोटोंचाच. असो. एक श्वान आपल्या मालकासोबत आला, तसे अगदी पिल्लूच. प्लॅट्फॉर्मच्या फक्त एका कोपर्यात लाकडी फळ्या होत्या ज्यावरून साहजिकच खालचे एकदम दिसत नव्हते. त्या फळीवरून जाळीवर एक पाय ठेवायला जायचा, खालचं दिसलं की भीतीने पुन्हा मागे यायचा. गोल चक्कर मारून परत दुसरीकडून प्रयत्न करायचा आणि पठ्ठ्या परत मागे. आम्ही जवळचे सगळेच तल्लीन होऊन त्याच्याकडे बघत होतो. :) अशा अनेक करमणुकी बघत, मधेच गर्दी नसेल तेव्हा फोटो काढत आणि शांतपणे या पर्वतांचे, शिखरांचे रूप अनुभवत बराच वेळ गेल्यानंतर भूक लागली होती, आता वर शिल्थोर्नला जाऊन जेवूयात असा विचार करून उठलो.
शिल्थोर्नला आधी पोटोबा मग फोटोबा असे म्हणत जेवण केले. शाकाहारींसाठी एवढे पर्याय बघून डोळे पाणावले. जेवून बाहेर आलो आणि इथून दिसणारया पर्वतरांगा कॅमेर्यात साठवल्या.
आयगरची उत्तरेकडची भिंत/कडा. याविषयी पुढच्या भागात अधिक माहिती येईलच.
खाली उतरताना परत एकदा बिर्गला थांबलो. सूर्य डोक्यावर आल्याने थंडी पळाली होती आणि गर्दीही कमी झाली होती. पुन्हा एकदा सगळे नजरेत साठवले. येताना मात्र म्युरेन पर्यंत येउन पुढचे म्युरेन ते गिमेलवाल्ड हे अंतर पायी जायचे असे ठरवले. विशेष करून म्युरेन बद्दल बरेच ऐकले होते. पायी फिरताना अजून काही नवीन गोष्टी दिसतात आणि दीड ते दोन तासात उतरणे सहज शक्य होते. या दोन्ही गावांमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. डोंगरावर वसलेली ही खेडी. एका सपाट पृष्ठभागावर असे काहीच नाही. सगळी लाकडी घरे, प्रत्येक घर म्हणजे जणू फुलांचे दुकान होते इतकी सगळीकडे फुले, "इथे रूम भाड्याने मिळेल" अशा पाट्या, लाकडी ओंडक्यापासून केलेले बाक, रेस्टॉरंट्स सगळंच डोळ्याला सुखावणारं. दिशादर्शक पाट्या सगळीकडे असल्याने त्याप्रमाणे खाली उतरायला सुरुवात केली. शिवाय हे असे दिशादर्शक सुद्धा होतेच.
किती फोटो काढू, किती डोळ्यात साठवून घेऊ असे होत होते.
ही अशी चाकं बऱ्याच घरांवर दिसली.
सजवलेली बाग
या फोटोत डावीकडे भाज्या लावलेल्या दिसत आहेत. असे जवळपास प्रत्येक घरात दिसले. भरपूर फुलझाडी, शिवाय खिडक्यांमधून ओसंडून वाहणारी फुले आणि अंगणात लावलेल्या भाज्या. काही घरांमध्ये फक्त लाकूड साठवले आहे असे वाटत होते, जसे की हे किंवा वरचे चाकांच्या फोटोतले.
डोंगरावर वस्ती असल्याने बराचसा रस्ता हा वरच्या दोन फोटोत आहेत तशा पायर्यांवरून होता. गावातल्या लोकांसाठी गाड्या आणण्यास परवानगी आहे पण एकुणात स्विस लोकांचा कल हा अशा ठिकाणी गाड्या आणू नयेत असा आहे. त्यामुळे ते लोकही फार कमी वापर करतात. गावातून बाहेर आल्यावर हा असा रस्ता लागला.
मध्येच गायी, मेंढ्या चरण्यात गुंग होत्या.
पर्यटकांची बहुधा सवय असावी त्यामुळे मस्त पोझ देत मॉडेलिंग.
हे जे लाकडी बांधकाम आहे ती बर्फ कोसळून धोका होऊ नये म्हणून केलेली उपाययोजना आहे.
निसर्गावर, झाडांवर, फुलांवर असलेले स्विस लोकांचे प्रेम याचा उत्तम नमुना म्हणजे अशी जपलेली घरे, बागा आणि खेडी. अत्याधुनिक सुविधा आणि तरीही जुनेपण टिकवून ठेवत जपलेली घरं. प्रेमात पडावीत अशी. हा रस्ता उतरून गिमेलवाल्डहून परत रज्जुमार्गाने पायथ्याशी आलो. दुसऱ्या दिवशी उठून या पर्वतांच्या पलीकडील बाजूवर जायचे होते. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालो. जवळून दिसणारी आयगर ची भिंत आणि असेच डोंगर उतरत केलेला प्रवास, पुढील भागात...
क्रमशः