हा दिवस सगळ्यात लांबच्या प्रवासाचा होता. सकाळी लवकरच हॉटेल मध्येच नाश्ता करून बाहेर पडलो. आम्ही गाडीत सामान ठेवत असतानाच एक आजोबा या घाटातून सायकलने वर जात होते. युरोपात सायकल तशी काही नवीन नाही. रोज ऑफिसला २०-२२ किमी सायकलने येणारे अनेक लोक आहेत. पण या इतक्या उंच चढावरून सत्तरीच्या आसपासचे आजोबा सायकलने जात होते. कमाल. हॅट्स ऑफ एवढे दोनच शब्द आले मनात. त्यांना हसून हात दाखवला आणि गाडीत बसलो.
आधल्या दिवशीच्याच उम्ब्रेल पास या घाटातून पुढे अजून वर जायचे होते. थोडी धडकी भरली होतीच. गणपती बाप्पाला, गजानन महाराजांना नि अजून आठवतील त्या सगळ्यांना साद घातली आणि निघालो. अफाट पर्वत आणि दऱ्या, मधेच एखादा छोटासा तलाव, १८० च्या कोनात वळणारी आणि चढत जाणारी वळणे आणि सोबतीला गाणी. हा तेवढा प्रसिद्ध पास नसल्याने तशी गर्दी कमी होती पण सायकलस्वार, बाईकर्स आणि काही गाड्या अधूनमधून दिसत होत्या. या भागात झाडी फारशी नव्हती. काही ठिकाणी इथे धबधबे असावेत असा अंदाज येत होता पण उन्हाळ्याचा शेवट असल्याने कदाचित पाणी फारसे नव्हते.
इथे स्विस आणि इटली या देशांची इथे सीमा आहे. इथून इटलीत प्रवेश!
हा पास संपत असतानाच दूरवर ही शिखरे दिसू लागली.
उम्ब्रेल पास - शेवट आणि स्टेलव्हिओ पास - सुरु
इथे एखाद्या फाट्यावर असतात तशी काही दुकाने होती, सुवेनिअर विकायला अनेक लोक होते, काही टपरीवजा हॉटेल्स, गाडीवरचे खाद्यपदार्थ विक्रेते, काही मोठी रेस्टॉरंट्स आणि तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या. काही लोक त्यांच्या गाड्या इथे पार्क करून सायकलने पुढे जाण्याच्या किंवा ट्रेकिंगच्या तयारीत होते.
एकूण २२ किलोमीटरचा हा रस्ता २७५८ मीटर उंचीपर्यंत पोहोचवतो. १८२० ते १८२५ या पाच वर्षात हा बांधला गेला. कार्लो दोनेगानी असे या रस्त्याच्या कामातल्या मुख्य अभियंत्याचे नाव होते. या पासचे मुख्य वैशिष्ट्य असे की यात एकूण ४८ हेअरपिन टर्न्स आहेत जे जगभरातील ड्रायव्हर्स, सायकलस्वार, बाइकर्स यांच्यासाठी आव्हानात्मक पण अविस्मरणीय म्हणून ओळखले जातात. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, रोड शोज इत्यादीसाठी हा प्रसिद्ध आहे. जगातील काही खास रस्त्यांमध्ये आवर्जून नाव घेतला जाणारा असा हा स्टेलव्हिओ पास.
आम्ही चालत चालत पुढे जिथून खालचा हा पास दिसतो त्या ठिकाणी गेलो.
धडकी भरवणारा रस्ता. जेवढे फोटोत दिसताहेत त्यात फक्त सुरुवातीचे काहीच आहेत. पुढे असेच २-३ मोठे डोंगर उतरत ४८ पूर्ण होतात. या प्रवासादरम्यान व्हिडीओ घेण्याचे केविलवाणे प्रयत्न निष्फळ ठरले.
कॉफी घेऊन मग गाडीने निघालो. गाडीने उतरतोय म्हणून जरी आम्ही टेंभा मिरवित असतानाच आम्हाला लाजवणारे अनेक अफाट लोक इथे होते जे सायकलने किंवा काही पायी चढत येत होते. चालत येणार्यांकडे पायात स्केटसदृश काहीतरी आणि हातात स्टिक्स होत्या ज्याच्या आधारे ते चढत होते.
तरुण, वयस्कर, बाइक्स वाले, अगदी जुन्या जुन्या खास जपलेल्या गाड्या ते फरारी, पोर्शे, लाम्बोर्गीनी सारख्या अत्याधुनिक स्पोर्ट्स कार पर्यंत सगळ्यांनाच या पास ने भुरळ घातलेली दिसत होती. अजून एक विशेष आवडले ते हे, की या सगळ्यात महिलांची उपस्थिती सुद्धा तेवढीच होती. अगदी षोडशवर्षीय तरुणींपासून तर साठीच्या आज्यांपर्यंत अनेक जणी दिसल्या. :)
चार तीन दोन एक करत उतरलो एकदाचे खाली. डोकं अजूनही गरगरतय असं वाटत होतं. शेवटच्या ठिकाणी दिसलेली काही घरं आणि हॉटेल्स आणि गाड्या.
कितीतरी वेळाने हा असा सरळसोट रस्ता बघून हायसे वाटले अगदी.
पुन्हा इटलीतून स्विस मध्ये प्रवेश झाला. आजूबाजूच्या शेतात गायी चरताना दिसल्या, त्यांच्या गळ्यातील घंटांचे आवाज दूरवर येत होते. स्विसमध्ये आलोय याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.
ऑफेन पास आणि फ्ल्युएला पास हे दोन पुढचे पासेस परत असेच पर्वत रांगांमधून जात होते. प्रत्येक ठिकाणी पर्वतांवरील खडक, माती, रंग यातला बदल दिसत होता. फ्ल्युएला पास मध्ये एका ठिकाणी बरीच गर्दी दिसली आणि चार पाच छोटी तळी होती. भूक लागली होती. इथेच थांबून सोबत आणलेला डबा काढला. दगडांच्या टेबल खुर्चीवर बसून खाल्ला आणि पुढे मार्गस्थ झालो.
स्विस लोकांचे झेंड्याचे प्रेम ठिकठीकाणी दिसून येते. अगदी सायकलपासून तर अशा एकाकी जागी ते सगळीकडे झेंडे रोवतात.
हा रस्ता दावोस (Davos) या प्रसिद्ध गावातून जात होता. इथे थांबण्या इतका वेळ नसल्याने फक्त गाडीतूनच काही देखावे टिपले.
झुरीच लेक, लुत्सेर्न लेक असे काही मोठे तर अनेक छोटे तलाव आणि त्यातील निळे पाणी सतत लक्ष वेधून घेत होते. बराच वेळ एक नदी एका बाजूने वाहात होती. बोगदे तर संपता संपत नव्हते. एक झाला की दुसरा सुरु. काही अगदी अर्धा किलोमीटरचे तर काही अक्खा पर्वत वरपासून तर खालपर्यंत उतरणारे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा रस्ता असला तरीही आता प्रवासाचा कंटाळा येऊ लागला होता. अर्थात मध्ये काही ठिकाणी थांबायचा मोह आवरत नव्हता.
अखेरीस ६:३० च्या आसपास विल्डर्सविलला पोहोचलो. गावातून दुरून युंगफ्राऊ, आयगर आणि म्योंख ही तीन शिखरे दिसत होती. गल्ल्या इतक्या छोट्या होत्या की फक्त एक गाडी जाऊ शकेल. थोड्या शोधाशोधीनंतर हे घर सापडलं आणि बघूनच प्रवासाचा थकवा निदान थोडा वेळ तरी दूर गेला.
या गावात फेरफटका मारताना दिसलेल्या काही गोष्टींविषयी, तेथील काही अनुभवांवर नंतरच्या भागात लिहीनच. एका आजीने दार उघडले. तिच्या मुलीचे हे घर होते पण त्यांचे कुटुंब बाहेरगावी गेल्याने ती थांबली होती. तिने खोली दाखवली. सामान टाकले. फ्रेश झालो आणि खाण्यापिण्याची बॅग उघडून फक्कड चहा केला. सुखद पण खूप थकवणारा प्रवास होता. त्यामुळे झोपेची नितांत गरज होती. हवामानाचा अंदाज बघता दुसऱ्या दिवशी आमच्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यास हरकत नव्हती, पिट्झ ग्लोरिया आणि परिसर लवकरच…
क्रमशः