मी बनवत असलेल्या दागिन्यांसाठी (पेपर ज्वेलरी) मैत्रीणवर धागा काढायचा कधीपासून मनात होते. त्याला आता मुहूर्त मिळाला. :)
पहिलं थोडेसे माझे पेपरचे प्रयोग आणि पेपर कलाकृती व्यवसाय याबद्दल सांगते.
बेसिकली मी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात काम करणारी त्यामुळे कागद.. पेपर आणि रंग यांच्या मी कायमच प्रेमात. विविध प्रकारचे पेपर्स, त्यांचे पोत (Texture), त्यांचे रंग, डिझाइन्स मनाला नेहमीच भुरळ घालत आलेले. त्यामुळे साधारण ५ वर्षांपूर्वी पेपर क्विलिंग या कलेची ओळख झाली तेव्हा मला तो प्रकार एकूणात फारच आवडला. रंगीबेरंगी पेपर पट्ट्या वापरून किती कायकाय डिझाइन्स बनू शकतात हे बघून मी तर थक्क झाले.
सुरुवातीला पेपर क्विलिंगने ग्रीटिंग कार्डस, एनव्हलप्स, गिफ्ट टॅग्स, टिश्यू होल्डर, पेन होल्डर, फोटो फ्रेम असे छोटे मोठ्ठे बरेच प्रयोग केले. माझ्या ग्राफिक कामात पार्टनर असणारी माझी मैत्रिणही माझ्या क्विलिंगच्या प्रयोगात सोबत होती. हे प्रयोग करत असतानाच पेपर ज्वेलरी डिझाइन्सची अफाट दुनियाही आम्हाला खुणावू लागली.. मग आम्ही पेपर क्विलिंगची काही इअरिंग्ज आणि पेन्ड्टस बनवून पाहिली. ती नातेवाईकांत, मित्र परिवारात पसंतीला आली. शिवाय अजून करून देण्याच्या मागण्याही आल्या. पेपर ज्वेलरी असल्याने ती वॊटरप्रूप करणे आवश्यक होतेच पण ती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित होण्यासाठी आम्ही बरेच R & D केले. आणि त्याला बऱ्यापैकी यश आले.
आतापर्यंतचे क्विलिंगचे प्रयोग केवळ फक्त छंद म्हणून करत होतो. पण यावेळी आम्ही दोघींनी त्याला व्यवसायाचे स्वरूप द्यावे असे ठरवले. मी पूर्वी मेणबत्त्या बनवायची तेव्हा त्यासाठी Lumière नावाचे फेबु पेज बनवले होते, पुढे मेणबत्त्या बनवणे बंद केल्यामुळे ते असेच कोमात गेलेले :ड त्या पेजला पुनरुज्जीवन दिले आणि Lumière आर्ट अँड क्राफ्ट्स अंतर्गत हॅन्डमेड पेपर ज्वेलरी आणि पेपरच्या इतर कलावस्तू यांचा व्यवसाय आम्ही सुरु केला.
ज्वेलरीसाठी लागणारे मेटलचे फायडींग्ज यांना पर्यायच नव्हता पण ज्वेलरी बनवताना जास्तीत जास्त वापर हा पेपरचा राहील, हे आम्ही व्यवसाय सुरु करतानाच पक्के केले. पेपर हे इतके versatile माध्यम आहे की तिथे तुमच्या क्रिएटीव्हीटीचा कस लागतो.
पेपर बीडस, पेपर विव्हिंग, पेपर क्विलिंग, ओरिगामी अश्या वेगवेगळ्या पध्द्तीची पेपर ज्वेलरी आम्ही आतापर्यंत बनवली. ज्वेलरी व्यतिरिक्त क्विलिंग आणि पेपर पासून गिफ़्ट बॉक्सेस, wind chimes, नोट पॅड्स, पेपर बॅग्स, किचेन्स, स्टेशनरी अश्या बऱ्याच वस्तूही बनविल्या.
आम्ही केलेले काही निवडक पेपर प्रॉडक्ट्स आणि ज्वेलरी
१. गिफ़्ट एन्व्हलप्स
२. फोटो फ्रेम्स
३. गिफ़्ट टॅग्स
४.पेपर बॅग्स
५.कीचेन्स
६. स्टेशनरी
६. ईअरिन्ग्ज
७. नेकपीसेस
अधिक डिझाईन्स तुम्ही ह्या माझ्या फेसबुक पेज वर पाहू शकाल.
जेव्हा आम्ही ४ वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा 'पेपर ज्वेलरी' संकल्पनाच खूपजणांसाठी पूर्णत: नवीन होती... शिवाय आर्टीफिशियल ज्वेलरीच्या विविध, प्रचंड डिझाइन्स आणि मागणीपुढे पेपर ज्वेलरीचा व्यवसाय कसा तग धरेल.. टिकेल ही शंका होती. त्यामुळे एकूण व्यवसायाला कसा प्रतिसाद मिळेल ही धाकधूक होतीच. पण आमच्या सुदैवाने आमच्या ह्या कलात्मक सफरीला दाद देणारे, लुमियरच्या वस्तू, ज्वेलरी आवर्जून विकत घेणारे कलाप्रेमी ग्राहक, मित्रमैत्रिणी आम्हाला मिळाल्या... आमच्या व्यवसायाचा मुख्य यूएसपी होता.. आहे तो म्हणजे ज्वेलरी हलकी (lightweight) आहे. ज्यांना ज्वेलरीची आवड आहे पण जड ज्वेलरी वापरायला त्रास होतो त्यांना हा ज्वेलरी प्रकार विशेष भावला.
दरम्यान आम्ही बर्याच प्रदर्शनांतूनही भाग घेतला. ४ वर्षे क्विलिंगचा ध्यास घेतल्यावर गेल्या वर्षी क्विलिंग व्यतिरिक्त पेपरज्वेलरीत अजून काय करता येईल ह्यावर विचार करुन झेंटँगल आणि ग्राफिक डिझाईन आर्टवर्कस करून आर्ट इअरींग्ज करून पाहिले. ह्या प्रयोगावर आम्हीच खूप खुश होतो. आणि अर्थात इतरांकडून ही छान प्रतिसाद मिळाला.
हक्काने मैत्रिणवर शेअर करायला, बस्केने ईतके जिव्हाळ्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलय त्यासाठी तिचे आणि मै टीमचे खूप खूप धन्यवाद !!:)
_________________________________________________________________