रविवारची आळसावलेली दुपार. सहज काहीतरी वाचत पडले असतां कानावर एक आवाज आला. "ए धारवालाSSSSS कैची, छुरी धाSSSSSर". एखादा परिचित सुगंध अनेक वर्षांनी अनुभवास आला की कसं मन लगेचच दुडदुडत तितकी वर्ष मागे त्या सुगंधाच्या आठवणींपाशी झेपावतं अन तिथेच रेंगाळतं तसंच झालं काहीसं. सायकलवर विराजमान झालेला आणि सायकलच्या हँडलवरील पिशवीत काही सुर्या, चाकू,इतर साधनसामुग्री खोवलेला संसार सावरत साद घालणारा हा धारवाला मला कैक वर्षं मागे घेऊन गेला....आठवणींच्या रम्य प्रदेशात बागडायला.
माझं बालपण फ्लॅट संस्कृतीत जरी गेलं असलं तरी माझ्या आई-बाबांची पिढी त्यांच्या तरुणपणी चाळीतून फ्लॅट्मध्ये रहावयास आलेली. त्यामुळे हे संक्रमण त्या काळच्या फ्लॅट संस्कॄतीत जाणवायचं. म्हणजे चाळीसारखे सताड दरवाजे सतत उघडे नसले तरी शेजार-पाजारच्या माणसांत घरोबा होता. एकत्र खेळणं- बागडणं होतं. मुख्य म्हणजे रहिवासी सोसायट्या सुरक्षेच्या कचाट्यात सापडायच्या आधीचा हा काळ अन म्हणूनच फेरीवाल्यांचा मुक्त वावर, सुळसुळाटच म्हणुयात.
आमची कॉलनी तर स्वदेशी मिल या कापड गिरणीच्या बर्यापैकी जवळ नि म्हणून या गिरणीत वाजणार्या भोंग्यांच्या आवाजावर दिनक्रम ठरलेला. माणसं आपापली घड्याळंही या भोंग्यांनुसार सेट करायची. याच भोंग्यांच्या वेळेनुसार, वेळेचं गणित जुळवणारे असे कैक फेरीवाले किंवा तत्सम सेवा देणारे कॉलनीत नित्यनेमाने हजेरी लावत असत. दुपारची शाळा असल्यामुळे ही सगळी मजा मला दररोज अनुभवता येत होती.नऊचा भोंगा वाजला की गॄहिणींची लगबग वाढायची. आता केव्हाही डबेवाला डबा घ्यायला हजर होईल. या डबेवाल्यापासून जी सुरुवात होई ती रात्री साडेअकराच्या सुमारास "कुल्फिय्ये" म्हणत डोक्यावरील लाल वस्त्राच्छादित, कुपी ठेवलेली टोपली सावरत आलेल्या कुल्फीवाल्याने ही दिवसभराची वर्दळ शमत असे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आतुरतेने या शेवटच्या फेरीवाल्याच्या वाटेकडे डोळे लावून, पेंगुळलेल्या नजरेनं आम्ही जागत असू. त्याची ‘कुल्फिय्ये’ अशी पहिली हाक यायचाच अवकाश दहा-पाच पोरांची “ए कुल्फिवाला इथे इथे दुर्सया माळ्यावर” अशी त्याला आधी कोण बोलावतंय याची शर्यत चालू होई. मग तो वर येई, बाबा अलगद त्याच्या टोपलीला आधार देऊन ती उतरवून घेत..तो ते लाल कापड दूर करुन आतमध्ये ठेवलेले पत्र्याचे कुल्फीचे मोल्ड्स बाहेर काढत असे. मलई, पिस्ता आणि सिझनमध्ये आंबा इतकेच फ्लेवर्स. ते मोल्डस हातांमध्ये काही वेळा फिरवून हाताच्या उष्णतेने आतली कुल्फी सैल झाली की ती एका पानावर काढून त्याचे लहान-लहान तुकडे करुन तो देत असे. दिवसभर खेळून, मस्ती करुन शिणलेला जीव त्या कुल्फीने थंडावला की झोपायचा मार्ग मोकळा.हा कुल्फीवाला ३ फेर्या मारत असे आमच्या कॉलनीत. एकदा संध्याकाळी सहाच्या सुमारास मुले खाली खेळत असतांना, मग रात्री नऊ- साडेनऊला आणि शेवटची खेप साडेअकराची. कित्येक वर्ष तोच कुल्फीवाला, त्याच चवीचे ३ फ्लेवर्स आणि हो तेच ते लाल कापड. त्या लाल रंगाच्या शेडमध्येही इतक्या वर्षांत फरक नाही पडला.
सकाळी साधारण दहाच्या सुमारास एक हातगाडी ढकलत भाजीवाला येत असे. तो आपल्या गाडीवर असलेल्या सार्या भाज्यांची नावं ओरडून सांगे आणि सर्वांत शेवटी “लिंबूSSSSS खल्लाSSSSस” अशी आरोळी देई. जे विकायला आणलंय त्याची ओरडून जाहिरात करणं समजू शकतो पण जे संपलेलं आहे ते का सांगावं ओरडून? आणि नेहमी आमच्या कॉलनीत येताना त्याची लिंबंच कशी काय संपत असत या कोड्याचं उत्तर आम्हा मुलांना कधीच मिळालं नाही. त्याचं नाव "लिंबू खल्लास" ठेवलं होतं आम्ही.
या भाजीवाल्यानंतरचा नंबर एका खाशा फेरीवाल्याचा, नाही वालीचा. राजे रजवाडे येताना कसे त्यांचे भालदार चोपदार आधी पुढे चालत येऊन मग महाराजांची स्वारी येई अगदी त्याच थाटात तिचं आगमन होई. पाच-सहा मांजरी म्याव-म्याव करीत गलका करु लागल्या की समजावं त्यांच्या मागून 'सोनु कोळीण' येतेय. बहुतांश बिर्हाडं ही मासेखाऊ. कॉलनीपासून पाच मिनिटे चालून गेल्यावर भला मोठा मासळी बाजार होता. तरी या सोनु कोळणीची आतुरतेने वाट बघितली जाई. सोनुकडे जर मनाजोगे मासे नाही मिळाले एखाद दिवशी तर बायका नाईलाजाने पिशव्या घेऊन बाजारात जायला बाहेर पडत.
सोनुला हाक मारुन कधी बोलवावं लागलंच नाही. तिची गिर्हाईकं ठरलेली. तसंच कोणाचा सोमवार-गुरुवार असतो हेदेखील माहीत. त्यानुसार ती ते घर टाळून पुढे जाई. ठरलेल्या घरासमोर ती आधी पसरणार... ती स्वतः तिची टोपली, कोयता आजुबाजुला पायात येणार्या, आशाळभूतपणे पाहणार्या मांजरी या पसार्यात आधी ती पहिल्या घरात हक्काने ‘चा’ मागून घेणार. तिच्या नावाला साजेसा नखशिखांत सोन्याने मढलेला पेहराव आजही डोळ्यांसमोर येतो. कानाच्या पाळ्या ओघळलेल्या त्यात जाडजुड सोन्याच्या रिंगा.... रिंगा? छे, त्या दागिन्याचा अपमानच होईल रिंगा म्हटलं तर कैद्यांच्या पायात बेड्या असतात तशाच लहान आकारातल्या बेड्याच जणू. पाच पदरी मंगळसूत्र, हातभर हिरव्या बांगड्या नि मध्येमध्ये सोन्याच्या जाड विशिष्ट डिझाईनच्या पाटलीसदृश्य बांगड्या. कायम हे एव्हढं सोनं अंगावर लेणं कसं झेपायचं देव जाणे. आंबाड्यावर फुलांची वेणी, साडी मात्र साधी, कोळणी नेसतात तशी काष्टी. ख्याली खुशाली विचारत, सांगत खड्या सुरात स्वतःचं मार्केटींग स्कील दाखवणार. “हलवा बघ आदी, मंगे बोल"असं दरडावणार. “पैसं मागलं म्या तुज्याकडे? तू खाव आज प्राय करुन आन उद्या सांग मले”.बायकाही तिच्या वरताण बार्गेनिंग करण्यात पटाईत. “किती महाग देतेस तू सोनु? शी: आता कध्धीच नाही घेणार तुझ्याकडून”, म्हणत परत दुसर्या दिवशी तिचीच वाट बघत. सोनु पण “नको घेऊ ना म्या मागं लागलूय तुज्या?” म्हणत तोडीस तोड उत्तर देऊन मोकळी. ही संवादांची जुगलबंदी ऐकण्यात भारी करमणूक होई आमची. हो नाही करता करता सोनुची कोयत्याला धार करणं आणि मासा कापणं ही कामं चालू असत. मध्येच कधीतरी वरच्या मजल्यावरच्या काकी हातात भांडं घेऊन मासे घ्यायला एक जिना उतरुन खाली येत. मग एकत्र घासाघीस सुरु. माशाच्या पोटातील न खाण्याजोगे अवयव कधी तरी डो़कं शेपटी यांची मांजरींना मेजवानी होई. ताज्या मासळीवर पोसलेल्या या सगळ्या मनीमाऊ मस्त गलेलठ्ठ होत्या. सोनुचा जवळजवळ सगळा माल आमच्या कॉलनीत - ५ बिल्डींग्समध्ये फिरुन संपत असे.
वाफेभरला कालवण भात खाऊन आम्हा मुलांची रवानगी शाळेत झाली की दुपारचा शांत निवांत वेळ गॄहिणींचा. त्या वेळी सुद्धा ठराविक फेरीवाले हजेरी लावून जात. गोधड्या घालणार्या बायका, 'कल्हई' असं ओरडत येणारा कल्हईवाला, ' पाट्याला टाकीSSSय्या' असं काहीसं बोलणार्या पाट्याला टाकी लावणार्या बायका, स्वतः काही न बोलता फक्त 'टर्रटर्र' असा आपल्या आयुधाचा आवाज करणारा कापूस पिंजुन देणारा, या व्यतिरिक्त धार्मिक बुरखा पांघरुन येणारे कडकलक्ष्मी, नंदीबैल, सहा पायांच्या गायीला घेऊन येणारे, वासुदेव "दे दान सुटे गिरान" करत ओरडणार्या बायका, अवसवाल्या, कवड्यांच्या माळा घालून घुमणार्या जोगवा मागणार्या बायका, असे नैमित्तिक फेरीवालेही होतेच. किती नावं घ्यावी? शालेय इतिहासाच्या पुस्तकात संत मंडळींवरील धड्यांत वाचून आपलं अर्धवट ज्ञान पाजळणार्या आमच्या बालसुलभ मनात तेव्हा असा विचार तरळून जाई की आपलं सारं जीवन ईश्वरी कार्यासाठी समर्पित करणारे ज्ञानोबा , तुकोबाराय यांच्या अंगात कधी त्यांचं आराध्य दैवत -विठुमाऊली आल्यामुळे ते घुमले नाहीत. मग या उवा-लिखांमुळे केसांच्या जटा झालेल्या जोगतिणींच्याच कसे काय बुवा देवी अंगात येते? पण कधी असा प्रश्न मुखावाटे विचारला गेलाच नाही मोठ्यांना.
याशिवाय दिवसातून ३- ४. वेळा येणारे भंगारवाले, बैलगाडीवरुन येणार्या तांदुळ विकणार्या बायका, सुया, दोरे विकणार्या, दुपारी चहाच्या वेळेस हमखास येणारा मोठ्या डमरुवर टोपली ठेवणारा ‘चटपटा भेळवाला’, हॉर्न वाजवणारा इडलीवाला, खारी, नानकटाई, फरसाणवाला असे किती तरी जण येत जात असत. चिंध्या गोळा करणारे आजोबाही हजेरी लावत.
कधीतरी क्वचित एखाद्या अनोळख्या फेरीवाल्याकडून फसवले गेल्याचे किस्सेही घडले होते कॉलनीत. त्यामुळे जे नियमित येतात ते आपले फेरीवाले आणि त्यांच्याशीच फक्त व्यवहार करायचा, असा अलिखित नियम होता.
हे फेरीवाल्यांच्या बाबतीतलं ‘आपलेपणही’ जगावेगळं होतं. त्याचा एक किस्सा आठवतोय. १९९२ च्या डिसेंबरचा महिना. रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद टिपेला पोहोचला होता. त्या सुमारास आमच्या भागातही २ धर्मांत कैक दंगेधोपे झाले. एक वयोवॄद्ध मुस्लिम अंडीवाले चाचा नियमितपणे अंडी विकण्यास येत. त्यांच्या हिंदू वस्तीच्या मध्यभागी असलेल्या घराचे रक्षण त्या वेळी आमच्या कॉलनीतील लोकांनी पुढाकार घेऊन केले होते. "यह चाचा हमारे है”, असं आर्जवाने सांगत. असं हे जाती-धर्माला भेदून गेलेलं आपलेपण, केवळ फेरीवाला आणि गिर्हाईक या व्यापारी नात्यातूनच उगम पावलेलं पण कायम टिकलेलं.
या सार्या आठवणी मनात दाटून आल्या असता सहजच वाटलं यांपैकी किती फेरीवाले आज तग धरुन राहिलेत? रहिवासी सोसायट्यांचे आपापले सुरक्षाविषयक नियम असल्याने कित्येकांना मज्जाव असतो ही गोष्टच वेगळी. पण तरीही कल्हईवाले, पाट्याला टाकी लावणारे, कापूस पिंजून देणारे हे तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रगतीच्या लाटेत वाहून गेले तर जोगतिणी, कडकलक्ष्मी, नंदीबैल वगैरे भटक्या जमाती शिक्षण मिळाल्यामुळे स्थिरावल्या. प्रगतीची चाकं फिरु लागली की किती जणांचं कल्याण होतं नाही का? खरंच होतं का पण नक्की कल्याण? कोण जाणे? की आपला पिढीजात धंदा बसला त्यामुळे आणि इतर कशात जम बसवता न आल्यामुळे अशा कुटुंबांची अधिक वाताहात झाली असेल? यावर कितीही उहापोह केला तरी हे स्वीकारणेच भाग आहे प्रत्येकाला, त्याशिवाय गत्यंतरच नाहीये. येत्या काही वर्षांतच ए.आय., आय.ओ.टी. सारख्या क्षेत्रांतील प्रगतीमुळे कोणी सांगावं आपल्यालाही ' रिप्लेसमेंट' मिळेल आणि आपणही असेच भिरकावले दिले जाऊ का? एकदम धस्स झाले काळजात या विचाराने. अगदी लगेच नाही पण कालांतराने हे होणार आहे हे गॄहीत धरुन पुढची कार्यवाही ठरवणे उचित, नाही का?
जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटतेय की भोवती बाळगोपाळांचा मेळा जमवणार्या या फेरीवाल्यांनी आपल्या हॄदयाचा एक कप्पा त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी व्यापून ठेवलाय हे अगदी खरं.
तुम्हा मैत्रिणींच्या आठवणीतही असतीलच असे काही फेरीवाले, तर मग त्याबद्दल तुम्हीही अवश्य लिहाच.