चारचाकी चालवावी...जर्मनीत...!!!

जर्मनी मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि शिकण्याची आणि परीक्षेची पद्धत हे बऱ्याच पाश्चात्य आणि विकसित देशांच्या तुलनेत वेगळं आहे. आज बरेच दिवसांनी ब्लॉगवर पुन्हा या अनुभवाबद्दल...

जर्मनीत आले तेव्हा इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर सगळी भिस्त होती आणि ते सोयीचं होतं. इथे हळूहळू रुळल्यावर आता गाडी घेऊयात हा विचार चालू झाला. पण त्याच्या आधीचा लायसन्सचा टप्पा पार पाडणे हे काम जास्त अवघड होतं. एक म्हणजे वाहन परवान्यासाठी होणारा खर्च हा काहीच्या काही होता/आहे. यात युरो ते रुपये असा हिशोब केल्यामुळे महाग वाटतं असं नाही, अगदी खरोखरीच महाग. आणि शिवाय शिकण्यासाठी ४ ते ६ महिने लागतात कारण -

  • सगळ्यात आधी एक फर्स्ट एड कोर्स. हा कोर्स एक दिवसाचा असतो.
  • त्यासोबत डोळ्यांची तपासणी - तुमचे डोळे गाडी चालवण्यासाठी योग्य आहेत का हे यात तपासले जाते. आधीच चष्मा/लेन्सेस वापरत असाल तर ते लावून ही टेस्ट द्यायची. यात तुम्ही पास झालात तर प्रश्न नाही. आणि समजा नाही झालं, तर मग आधी डोळे एखाद्या डॉक्टर/ऑप्टिशियन कडे जाऊन तपासा, योग्य नंबरचा चष्मा/लेन्सेस लावून परत टेस्ट द्या आणि पास व्हा.
  • जवळच्या/सोयीच्या ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन चौकशी करून तिथे नाव नोंदवा.
  • फर्स्ट एड कोर्स केल्याचा दाखला, डोळे तपासणीचा दाखला आणि ड्रायव्हिंग स्कूल च्या रजिस्ट्रेशनचा कागद घेऊन एका सरकारी ऑफिसात जा आणि तिथे रजिस्टर करा.
  • एकीकडे ड्रायव्हिंग स्कूल मध्ये लेखी परीक्षेचे लेसन्स करा. एकतर सगळं जर्मन मधून. त्यात एकूण २ तासांचे १४ लेसन्स आहेत म्हटल्यावर फार तर ३ आठवडे लागतील असं वाटू शकतं, पण एका आठवड्यात फक्त २ च होतात, म्हणजे यात ७ आठवडे किमान लागणार. शिवाय मध्ये स्प्रिंग, समर, विंटर असे काहीही कारण येऊन ड्रायव्हिंग स्कूलला सुट्ट्या असू शकतात. हे सगळं गृहीत धरून यात बरेचदा १० आठवडे सुद्धा लागू शकतात. (एका व्हॅलेंटाईन डे ला नवरा ड्रायव्हिंग क्लासच्या थेरी लेसनला गेला आणि त्यामुळे मी घरीच स्वयंपाक केला हा एक मुद्दा अजूनही प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला मला हमखास आठवतेच)
  • हे चालू असताना मग साधारण ४ ते ६ आठवड्यात सरकारी ऑफिसकडून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून ड्रायव्हिंगस्कूलला पत्र येतं आणि त्यातून आपण लेखी परीक्षा द्यायला पात्र आहोत हे सांगितलं जातं. मग तुम्हाला साधारण हजार प्रश्नांचा सराव करायचा असतो आणि परीक्षा द्यायची असते. त्यातही प्रत्यक्ष परीक्षेत ३ किंवा ४ उत्तरं चुकण्याची मुभा. नापास झालात तर पुढच्या परीक्षेला जास्त पैसे. परीक्षा मात्र इंग्रजी किंवा इतरही काही भाषांमध्ये देता येते.
  • लेखी परीक्षेची तयारी चालू असतानाच एकीकडे खऱ्या खुऱ्या ड्रायव्हिंगला सुरुवात करायची. त्यात एकूण ४५ मिनिटांची १२ सेशन्स आवश्यक असतात. यात रात्रीचे/अंधारातले, घाटातले, लहान रस्त्यावरचे, हायवेवरचे असे वेग वेगळे प्रकार करावेच लागतात. त्याशिवाय बहुतेक सरावासाठी अजून १० ते १५ सेशन्स लागतातच. (Autobahn म्हणजेच जर्मनीतले हायवे, यावर बऱ्याच ठिकाणी स्पीड लिमिट नाही)
  • हे एवढं सगळं झालं आणि कळीचा मुद्दा म्हणजे, तुमच्या शिक्षकाला आता तुम्ही परीक्षा द्यायला तयार आहात असं वाटलं की मग परीक्षा. आणि मधल्या काळात लेखी परीक्षेत पास झालो आहोत हे गृहीत आहे. त्याची नोंद सरकार दरबारी असते त्यामुळे त्यात काहीही करू शकत नाही. शिवाय जर्मन पद्धतीप्रमाणे बरीच आधी अपॉइंटमेंट घेऊन परीक्षेची तारीख घेणे हे ही महत्वाचे. हे लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही कडे लागू होते)
  • प्रत्यक्ष परीक्षा - यात २५ मिनिटांचे ड्रायव्हिंग, पार्किंग (पार्किंगचेही पॅरलल, परपेंडीक्यूलर आणि त्याचेही काही उप प्रकार ), गाडी ३० च्या स्पीड ला असताना Vollbremsung अर्थात full braking/Emergency ब्रेकींग, म्हणजे पूर्ण जोरात ब्रेक लावून गाडी शक्य तितक्या लवकर (२-३ सेकंद) थांबवणे, ज्यात गाडीची ABS activate झाली पाहिजे. कुठल्याही क्षणी आपत्कालीन परिस्थतीत गाडी नियंत्रणाखाली आणता यायला हवी हा उद्देश. आणि गाडी परीक्षक सांगेल त्या रस्त्याने पूर्ण वळवून परत आणणे. यापैकी तुम्हाला किती आणि काय करायला लावतील हा नशीबाचा भाग, पण एकूण हे सगळं अपेक्षित आहे, आणि बरेचदा यातलं अर्धं तरी करायला लावतातच. आणि अजून तरी इकडे मॅन्युअल गियरच्या गाड्याच बहुतांशी वापरल्या जातात. त्यामुळे ऑटोमॅटिक गियर साठी परीक्षा दिली तर लायसन्स फक्त त्याचं, मग गियर वाल्या गाडीला अडचण नको म्हणून शक्यतोवर मॅन्युअल वर शिकणे आणि लायसन्स मिळवणे सोयीचे.

तर या सगळ्या कठीण प्रकारातून सुमेधचं लायसन्स झालं आणि आमची पहिली गाडीही घरी आली. त्याच्या शेजारी बसून सतत स्पीड कडे लक्ष ठेवणे, नेव्हिगेशन समजून त्याला मदत करणे, ट्रिपला गेलो की फोटो काढणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ट्रॅफिक मध्ये असताना इतर कुठलीही बडबड न करता शांत बसणे ही कामं माझ्याकडे आली. त्या निमित्ताने बरेचसे नियम माहित झाले, काय आणि किती गोष्टी बघाव्या लागतात याचा अंदाज आला. पण माझ्या गाडी शिकण्याला मागच्या वर्षी मुहूर्त लागला.

तर पहिली पायरी म्हणजे फर्स्ट एड कोर्स आणि डोळ्यांची तपासणी. एका शनिवारी दिवसभरात हा कोर्स आणि डोळ्यांची तपासणी पूर्ण झाली. सध्या वापरात असलेल्याच नंबरचा चष्मा किंवा लेन्सेस यापैकी काहीही वापरून गाडी चालवण्यास (खरं तर फक्त शिकण्यास) मी पात्र होते. नशीब एवढंच की त्या कागदावर नंबर येेेत नाही, नाही तर प्रत्येक वेळी नंबर बदलला की ते पण आम्हाला सांगा, पैसे भरून ते सगळं लायसन्स वर अद्ययावत करून घ्या असंही म्हणायला हे कमी करणार नाहीत)

मग कागदपत्रांची सरकारी ऑफिसात देवाणघेवाण झाली. थेरी लेसन्स ही पण एक गंमत होती. बहुतेक सगळे टीनएज मुलं मुली असायचे. त्यात त्यांचे 'ही जागा माझ्या मित्राची' टाईप भांडणं, दंगा मस्ती आणि कधीतरी अगदीच बालिश वागणं हे आता मला अजिबात सवय नसलेलं वातावरण अनुभवत एकीकडे श्रवणभक्ती चालू असायची. पण त्याच वेळी हा माझा 'मी टाईम' होता, दिवसभराच्या आईच्या भूमिकेतून इथे मी विद्यार्थी होते, आणि ते छानही वाटत होतं. रस्त्यावर गाडी चालवतानाचे नियम यात येतातच, पण महत्वाचे म्हणजे गाडी घेताना काय कागदपत्र लागतात, लायसन्स वर असणाऱ्या प्रत्येक लहान सहान गोष्टींचा अर्थ काय इथपासून ते गाडीचा अपघात झाल्यास काय करायचं अशाही अनेक गोष्टी यात शिकवल्या जातात.

मग एकीकडे हळूहळू अभ्यास चालू केला. आता app असल्यामुळे मोबाईल/टॅब/लॅपटॉप कशावरही अभ्यास करणे बरंच सोपं झालंय. आई बाबा आले होते त्यामुळे स्वयंपाक आणि घरातल्या बऱ्याच कामांमधून माझी सुटका झाली होती. 'सारखं काय टॅब घेऊन बसते' असं आईने विचारलं तर माझ्याकडे 'अभ्यास करतेय' असं उत्तर होतं. एकूण १०७६ (काय पण आकडा आहे ;)) प्रश्न होते आणि ४०० पानांचं पुस्तक. (हे प्रश्न सतत अपडेट होत राहतात, नवऱ्याने परीक्षा दिली तेव्हा साधारण ९०० प्रश्न होते, दर काही महिन्यांनी यात बदल होत असतात) पुस्तकात बरीच जास्त माहिती होती, पण परीक्षेच्या दृष्टीने मुख्य हे प्रश्न बघून त्याचा अभ्यास करायचा होता. काही गोष्टी सवयीने मला सोप्या वाटत होत्या पण काही मात्र अचंबित करणाऱ्या होत्या. त्यात काही फॉर्म्युले आहेत हे माहित होतं. गाडीचं ब्रेकिंग डिस्टन्स किती, अजून काय किती हे त्या स्पीड प्रमाणे काढायचं असे काही ते फॉर्म्युले होते. सुमेधने जेव्हा हे सांगितलं तेव्हाच मला प्रश्न पडला होता की, मुळात गाडी चालवताना समजाच काही झालं, तर त्या वेळी माणसाने त्या परिस्थितीत फॉर्म्युले आठवायचे की त्या क्षणी वाटेल त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा? पण तरी रट्टा मारावाच लागला. इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षानंतर आजतागायत मी गाडीच्या तंत्रज्ञानाचा एवढा अभ्यास केला नव्हता. त्यात हे सगळं इंग्रजीतून असलं तरी बरेचदा ते जर्मन भाषांतरीत इंग्रजी समजायचं नाही. कुठल्या रंगात स्पीड लिहिली आहे त्याप्रमाणे नियम वेगळे, दिशादर्शक बाण अलीकडून आहे की पलीकडून त्याप्रमाणे बदलणारे नियम, बस असेल तर काय करायचं, environment friendly गाडी कशी चालवायची, समोरच्याने चुकीची चालवली तरी आपण कसं डोकं शांत ठेवायचं, म्हातारी माणसं, लहान मुलं कशी वागू शकतील यावर डोकं लढवून त्याप्रमाणे गाडी कशी चालवायची, कार सीट चे नियम, ऑटोमॅटिक गाडी असेल तर काय बदल होतात, गाडीला मागे ट्रेलर लावायचा असेल तर काय नियम आहेत, कुठल्या रस्त्यावर कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी किती स्पीड आहे, सिग्नल बंद असताना काय करायचं, जिथे सिग्नल नाहीतच अशा चौकात काय करायचं, बोगद्यात काय नियम पाळायचे, अपघात झालेला दिसला तर काय करायचं, रेल्वे क्रॉसिंग च्या अलीकडे १५ मीटर गाडी पार्क करायची नाही, झेब्रा क्रॉसिंग साठी हेच अंतर १० मीटर आणि अजून काही ठिकाणी हे अंतर ५ मीटर असे प्रत्येक ठिकाणचे वेगळे आकडे लक्षात ठेवायचे, टायर प्रोफाइल म्हणजे काय आणि ती किती असावी, दारू पिऊन गाडी चालवल्यास काय शिक्षा होऊ शकते, उन्हाळा आणि हिवाळ्यात, बर्फात गाडी चालवताना काय फरक पडतो, अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास चालू होता. सगळे मल्टिपल चॉईस पद्धतीचे प्रश्न असतात, त्यातली काही चित्र/व्हिडीओ बघून उत्तरं द्यायची असतात. बरं व्हिडीओ बघताना प्रश्न माहित नसतो, व्हिडीओ तुम्ही ५ वेळा बघू शकता आणि मग प्रश्न कळतो, म्हणजे नेमकी एखादी गोष्ट लक्षात आली नाही तर पुन्हा व्हिडीओ बघण्याचा पर्याय नाही. शेवटी एकदाची परीक्षेला गेले आणि पास झाल्याचं सर्टिफिकेट घेऊन बाहेर आले. एक टप्पा पार पडला होता.

आता एकीकडे प्रत्यक्ष ड्रायव्हिंगलाही सुरुवात केली. पहिल्या दिवशी थॉमस भेटला, औपचारिक ओळख झाली आणि त्याने मग गाडीचे ब्रेक, क्लच, याबद्दल माहिती दिली. मी पूर्वी कधीही चारचाकी किंवा गियर वाली गाडी चालवली नसल्याने सुरुवातीला फक्त स्टीयरिंग व्हील आणि गियर टाकणे एवढं तू कर, पायाच्या ऍक्शन्स मी करतो असे म्हणाला. गाडी पुढे निघाली तेव्हा हे काम किंवा यातलं किमान अर्ध काम मी करते आहे यावर माझाच विश्वास बसत नव्हता. वळवताना गाडी योग्य लेन मध्ये ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत होते, सतत रस्त्यावरच्या हजारो गोष्टींवर लक्ष देत जेव्हा दीड तासाने परत घराजवळ आलो तेव्हा मी दहा तास ड्रायव्हिंग केल्यासारखी थकलेले होते. घरी येऊन आईने मस्त चहा दिला हातात, नंतर मग विचार केला तर पहिला दीड तास तसा ठीक वाटला. पुढच्या वेळी गेले तेव्हा आता पायाच्या ऍक्शन्स पण मलाच करायच्या होत्या. पटकन जमत नव्हतं म्हणून मग त्याने एका मोकळ्या पार्किंगला नेलं, आम्ही तिथे पोचलो तेव्हा इतकं धुकं होतं की मला काहीही दिसत नव्हतं. तो मात्र हे अगदीच नॉर्मल आहे असं वागत होता. हे पुढे अनेक वेळा घडलं, माझ्या प्रॅक्टिस दरम्यान अनेक वेळा धुकं, जोरदार पाऊस, बर्फ अशा सगळ्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी घडल्या, पण त्यामुळे या सगळ्याची थोडी सवयही झाली. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गाडी ७० च्या थोडीच पुढे नेली तेव्हा मला वाटत होतं की मी १५० च्या स्पीड ने चालवते आहे. कमी स्पीड ला उगाच असं वाटायचं की आपण काही झालं तर जरा सावरून घेऊ शकू. पण जेव्हा काही वेळा कमी स्पीड मध्येही उगाच माझं काहीतरी चुकून गाडी बंद पडायची, किंवा काहीतरी विचित्र ठिकाणी जायची तेव्हा समजलं की हेही तेवढंच कठीण आहे. थॉमसच्या अखंड सूचना चालू असायच्या. कधी मी उजवीकडे जाते म्हणून, कधी वळताना दुरून आले म्हणून. कधी मी फार डावीकडून चालवते म्हणून मग हा थांबवून दार उघडून दाखवणार की हे बघ, किती दूर आहेस, हे किती भयंकर आहे आणि यातून अपघात झाला तर काय इथपर्यंत. शिवाय 'तुझ्यासोबत तुझा लहान मुलगा आहे, त्याला तू अशा परिस्थितीत टाकशील का?' हेही. अगदी इमोशनल ब्लॅक मेलिंग. मग हे ऐकून खरंच सृजनला घेऊन मी गाडी चालवू शकेन का यातच मी अडकून पडायचे आणि पुन्हा चुका करायचे. सिग्नल दूरवर दिसला की म्हणायचा 'बघ आता अंदाज घे, आपण जाईपर्यंत हिरवाच असेल की लाल होईल, त्याप्रमाणे गाडीची स्पीड बघ आणि ठरव'. हे काही प्रत्येक वेळी जमायचं नाही, मी स्पीड कमी करायचे, तेवढ्यात तो लालचा हिरवा व्हायचा आणि हे सगळं बघून रिऍक्ट होईपर्यंत गियर न बदलल्यामुळे गाडी बंद पडायची. मग पुन्हा ऐकावं लागायचं. माझं बहुतेक वेळा हायवेला लागताना असं व्हायचं की हमखास इंडिकेटर चालूच राहायचा आणि मग थॉमस पुन्हा बोलायचा. बहुतेक वेळा स्पीड व्यवस्थित असायचा, एखाद्या दिवशी बाकी सगळं चांगलं जमायचं तर मग स्पीड कमी जास्त व्हायची, मग पुन्हा त्यावरून 'इथे बरेचदा कॅमेरा असतो, तिकीट बसलं तर आहेच खर्च' म्हणून शाळा घेतली जायची. कधी ७० च्या स्पीडला असताना ५० ची पाटी दिसायची, मी स्पीड कमी करायचे तर पुन्हा पुढे ७० दिसायचे. मग तो म्हणायचा की 'हो ही ५० ची पाटी मागे काम चालू असताना लावली आहे, ती आता काढायला हवी'. पण मला उगाच तेवढ्या २ मिनिटात चार वेळा स्पीड बघा, गियर बदला प्रकार करावे लागायचे आणि मी नेमकं काहीतरी चुकवायचे. मग इथेही कधीकधी लोक वेळेवर कामं करत नाहीत असं म्हणत स्वतःचं समाधान करवून घ्यायचे. तेव्हा पानगळीचा ऋतू होता, विविधरंगी झाडं फार सुंदर दिसत होती पण ड्रायव्हिंग सीट वर बसून या कशाचाच आस्वाद घेता येत नव्हता, मग अशा वेळी आपण बाजूच्या सीट वर च बरे असं वाटायचं.

एक महत्वाचा मुद्दा असतो पादचारी आणि सायकल वाले. जेव्हा मला वाटायचं की थांबायला हवं, तेव्हा तो म्हणायचा अजून खूप लांब आहेत ते लोक आणि मी नाही थांबले, तर हमखास म्हणायचा की आत्ता परीक्षा असती तर तू नापास झाली असतीस. शिवाय त्या लोकांना मी हाताने 'तुम्ही जा' अशी खूणही करायला हवी, नाहीतर म्हणे त्यांना समजणार कसं कि तू थांबते आहेस? अरे त्यांना मी थांबलेली दिसते ना, पण या कारणावरून काही वेळा नापास सुद्धा करतात असं ऐकलं होतं. काही रस्ते अगदी लहान असतात आणि दोन्ही बाजूला गाड्या पार्क केलेल्या, अशा वेळी समोरून मोठी गाडी आली की काहीच समजायचं नाही. काही ठिकाणी तर एकच गाडी जाईल एवढा रस्ता, मग त्यात आपण थांबायचं, समोरच्या गाडीला जाऊ द्यायचं किंवा तिने आपल्याला जा म्हणून सांगितलं तर त्याकडे लक्ष ठेवून जायचं हे सगळं करताना वाटायचं की, आधी रस्ते मोठे करा नाहीतर हे वन वे तरी करा, पण त्यावर माझा इलाज नसल्याने शेवटी आहे हे असं आहे म्हणून सोडून द्यावं लागतं.

गर्दीच्या वेळी रहदारी मुळे चौकात जर तुम्हाला थांबावं लागणार असेल तर चौक अडवायला नको, अलीकडे थांबायला हवं, हे मी कित्येकदा सुमेध सोबत पाहिलं होतं. पण एकदा प्रत्यक्षात अशी परिस्थिती असताना मी गाडी पुढे नेली, चौकात थांबले आणि मग एका माणसाला बराच वेळ अडकून थांबावं लागलं, मग लगेच त्यावरून भ र पू र काय काय ऐकावं लागलं. पण त्यामुळे हे मी आता परत करणार नाही याची मलाच खात्री झाली.

जिथे सिग्नल नाही अशा चौकातले नियम मला तोंडपाठ होते, त्याप्रमाणे गाडी हळू चालवून उजवीकडून येणार्याकडे लक्ष ठेवून असायचे, पण प्रत्यक्ष गाडी आली तर तिला जाऊ द्यायचं यासाठी मी ब्रेक मारायला हवे, इथे हमखास काहीतरी चुकायचं.

भाषेची एक वेगळीच गंमत होती, त्याचा जर्मन dilect कधी कधी अजिबात समजायचा नाही, त्यात मागच्या १ वर्षात मीही घरी असल्याने रोजचा जर्मन बोलण्याचा सराव नव्हता, त्यामुळे अजूनच गडबड व्हायची. मग 'मला वेगळंच म्हणायचं होतं' हे त्याला समजावून सांगे पर्यंत त्याचे 'हे असं नको ते तसं कर' असं काहीतरी चालू व्हायचं आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहायचा.

सुरुवातीला पार्किंग करताना अंदाज चुकायचे, मग तो म्हणायचा हा आरसा बघ, तो आरसा बघ, त्याच्यामागून बघ, पार्क असिस्टंट बघ, तुझी मूव्हमेंट दिसली पाहिजे, तुझं सतत चारही बाजूने लक्ष पाहिजे. आणि त्याचं म्हणणं असायचं की एकाच फटक्यात तुला हे जमायला हवं. त्यातून परपेंडीक्यूलर पार्किंग ला तो रिव्हर्स पार्किंग करायला सांगायचा. ते अजूनच अवघड वाटायचं. बरं एवढं सगळं करून गाडी पार्क होत नाही तर दुसऱ्या क्षणी तो म्हणायचा चला आता पुढे, पुन्हा वेगळ्या बाजूने वेगळ्या ठिकाणी पार्किंग की पुन्हा चला पुढे. एवढं डोकं मान गरागरा फिरवून गाडी पार्क करायची आणि नंतर मोजून २ सेकंदांची सुद्धा विश्रांती नाही, पण हे असंच परीक्षेत असेल तर सवय असावी म्हणून मीही काही बोलायचे नाही. एक दिवस त्याने मला एका घरासमोर पॅरलल पार्क करायला सांगितली, गेटसमोर वाहने उभी करू नयेत अशी पाटी असताना देखील. हे मुद्दाम मला समजतंय का हे बघायला हा करतोय असं वाटून अत्यंत आत्मविश्वासाने मी त्याला सांगितलं की इथे तर चालत नाही. त्यावर त्याने "हो मला माहित आहे पण आपण खरंच पार्क करून कुठे जाणार नाही आहोत, लगेच निघणार आहोत त्यामुळे चालतं" असं सांगून माझा पोपट केला.

या सगळ्या प्रकारामुळे आपल्याला हे सगळं जमेल की नाही असं वाटत होतं, पण तरीही मी परीक्षेची तारीखही पक्की केली. परीक्षेची त्याने दिलेली तारीख बघता आम्हाला भारतात जाणे कॅन्सल करावे लागेल असे दिसले. पण पुन्हा जमणार नाही, आता एवढी प्रॅक्टिस होते आहे तर लगोलग परीक्षा देऊन टाकावी असा विचार करून शेवटी भारतवारी पुढे ढकलली. आता काही नेहमीच्या बाबी नीट जमत होत्या, प्रत्येक वेळी पार्किंग, ट्रॅफिक याचे टेन्शन येत नव्हते. पण तरी थॉमस सतत नवीन काहीतरी सांगत असायचा. बाकी जमायला लागलं की मग envirnment फ्रेंडली गाडी कशी चालवायची यासाठी सूचना. दोन गोष्टी जमल्या की नेमका पुढे मोठ्ठा ट्रक यायचा किंवा मग खूप ट्रॅफिक लागायचा, मग पुन्हा काहीतरी गडबड व्हायची.

आणि असं होत होत एक दिवस आला आणि मला वाटलं की बास, मी आता गियरची गाडी शिकण्या ऐवजी ऑटोमॅटिक गियर वाल्या गाडीचं लायसन्स करावं म्हणजे मला कदाचित जमेल. अन्यथा गाडी चालवणे हे काही आपल्याला जमणार नाही. रोजच्याच थॉमसच्या सतत रागवण्याचा किंवा त्याच्या सांगण्याच्या पद्धतीचा त्रास होत होता, त्यात त्या दिवशी सलग ३ लेसन्स होते म्हणजे एकूण २. १५ तास, ज्यात एकही ब्रेक मिळाला नव्हता, त्यात घाटाचा, डोंगरातला चढ उताराचा रस्ता होता आणि माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या. थॉमस नेही बरेचदा जरा आगाऊपणा करून ओरडल्यामुळे मानसिक संतुलन अजूनच ढळले होते. त्यामुळे मी सतत घड्याळाकडे बघत आता हे कधी संपणार याच विचारात होते. मुख्य क्लच आणि गियर बदलणे याच बाबतीत मी जास्त चुका करत होते. पार्किंग, नियम पाळणे याबाबतीत मला लवकरच ते जमेल असं वाटत होतं. पण गियर बदलताना चुकीचा पडणे, मग स्पीड एकदम कमी होऊन कधी गाडी बंद पडणे, सिग्नल हिरवा झाला की निघताना क्लच पूर्ण न सोडल्यामुळे गडबड होणे हे खूप जास्त होत होतं आणि त्या दिवशी हे सगळं एकत्रित होऊन मी ऑटोमॅटिक गियर साठी काय करावे लागेल हे विचारूनही घेतले. त्या दिवशी संध्याकाळी सुमेध आल्यावर मग आता गियर नको, ऑटो करते, मला हे जमूच शकत नाही म्हणून वैताग, राग, चिडचिड सगळं एकत्र झालं. मग बरीच चर्चा(?) होऊन शेवटी मी पुन्हा गियरचीच शिकते यावर आले. मग काही ना काही कारणाने पुढच्या प्रॅक्टिस साठी बराच ब्रेक घ्यावा लागला आणि परत प्रॅक्टिस चालू केली आणि पुन्हा हे जमेल असं हळूहळू वाटायला लागलं.

आमच्या घरापासून निघालो की पुढचे २-३ रस्ते हळूहळू माझ्या अगदी सवयीचे झाले होते, तिथे स्पीड, दिशा सगळं माहीत होतं. पण तरीही अगदी शेवट पर्यंत थॉमस त्या सगळी गोष्टी सांगत राहायचा. त्यामुळे वाटायचं की तू सांग बाबा काय करायला हवं, काय चुकतं ते, पण किमान आता ज्या गोष्टी रोज न चुकता जमतात तिथे सांगू नकोस.
शिवाय सगळ्यात महत्वाचं हे, की एखादी गोष्ट जमली तर किंवा स्वतःहून चांगली केली तर त्याबद्दल क धी ही एक शब्द निघाला नाही. कौतुक तर फार दूरची गोष्ट, निदान सुधारणा आहे याची कधीतरी नोंद घेणे, जमेल हळूहळू म्हणून काही प्रोत्साहन सुद्धा नाही. या गोष्टीचा मला भयंकर त्रास व्हायचा, कारण मी कुणाला काही शिकवत असेन तर मी हे नक्की करेन, माझ्या दृष्टीने लहान लहान येणाऱ्या गोष्टींची नोंद ठेवणे, त्या बोलून दाखवणे यातून आपण प्रोत्साहन देतो, कदाचित काही चुका कमी करायला मदत करतो. शिवाय चुकांना जसं कडक शिस्तीने सांगायला हवं तसंच कधीतरी असू दे, होईल, जमेल असंही असावं. पण हा बराचसा व्यक्ती आणि संस्कृती दोन्हीचा फरक आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. साधारण हेच सगळं ओळखीच्या सगळ्या मित्र मैत्रिणींकडून ऐकलं होतं त्यामुळे हे असंच आहे याचा तरी दिलासा होता.

बरेचदा एखादी शेजारची गाडी खूप फास्ट जायची, काही नियम तोडायची, तर अशा वेळी मला वाटायचं की निदान त्याबद्दल थॉमस काहीतरी बोलेल, पण तसं व्हायचं नाही, हा एकदम स्थितप्रज्ञा सारखा शांत असायचा. एकदा न राहवून मीच बोलले की त्या समोरच्याने चुकीच्या पद्धतीने गाडी नेली ना, तर त्यावर "हो, तू तुझी गाडी चालव, कुणी काहीही केलं तरी आपलं लक्ष आपल्याकडे हवं, म्हणजे गरज पडल्यास कंट्रोल करता येईल" वगैरे मलाच ऐकावं लागलं.

Emergency braking शिकणे हे पुन्हा एक प्रकरण होतं. शक्यतोवर अगदी कमी गर्दी असलेल्या रस्त्यावर याची प्रॅक्टिस असायची. थॉमस ने सांगितलं की मग जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवायची हे पहिल्यांदा जमलं पण जरा वेळ लागला. म्हणजे उद्या गाडीसमोर एखादा लहान मुलगा अचानक पणे आला तर मी आवश्यक तेवढ्या वेळात कदाचित त्याला वाचवू शकणार नाही असे थॉमस म्हणाला. तुला माहित आहेच लहान मुलं कशी असतात ते असंही म्हणाला. आता लहान मुलं ही देवाघरची फुलं वगैरे हे सगळं मग माझ्या मनात येणार, मला सृजनचा चेहरा दिसणार हे सगळं त्याने गृहीत धरलं होतं, किंबहुना त्यासाठीच बोलला असावा. पुढच्या वेळी आता इथे आपण टेस्ट करू असं तो म्हणाला आणि मी पुढच्याच क्षणी गाडी थांबवली. आता गाडी बरोबर वेळेत थांबली, पण त्याने मला फक्त टेस्ट करू सांगितले होते, मागच्या पुढच्या गाड्या बघून 'आता थांबव' अशी कमांड दिली नव्हती. म्हणजे उत्तर बरोबर लिहिलं पण उपयोग नाही, पुन्हा लेक्चर ऐकून घेतलं. मग त्यानंतर सगळं बरोबर केलं आणि तो चला म्हणाल्याक्षणी मी निघाले, पण थॉमस म्हणाला की परीक्षेत या क्षणी तू नापास होशील. आता काय चुकलं माझं असा विचार करतानाच तो म्हणाला, "गाडी थांबवली तेव्हा दुसरा गियर होता, आता निघताना पहिला टाकायला हवा हे एक, मागच्या आरशात पाहून कुणी नसल्याची खात्री करायला हवी हे दुसरं आणि इंडिकेटर देऊन मग निघायला हवं हे तिसरं , असं सगळं करणं अपेक्षित आहे, फक्त गाडी थांबवून काही उपयोग नाही. म्हणजे उत्तर बरोबर यायला हवं, ते योग्य ठिकाणी योग्य वेळेत लिहायला हवं आणि पेपर परत देतानाही योग्य पद्धतीने द्यायला हवा, त्यामुळे मग ही चेकलिस्ट पक्की डोक्यात बसली आणि नंतर असा प्रश्न आला नाही.

मग आली खरीखुरी परीक्षा...शेवटच्या दिवशी पर्यंत प्रॅक्टिस चालू होती, माझ्या थोड्याफार चुका, थॉमसच्या सूचना हे सगळं माझ्यासाठी रुटीन झालं होतं. अगदी क्षुल्लक किंवा अतर्क्य कारणाने नापास करण्याबद्दल बरंच ऐकलं होतं त्यामुळे काहीही होऊ शकतं याचा अंदाज होता. त्यात एरवीच मला अगदी साध्या साध्या गोष्टींचं टेन्शन येत असतं. पण शाळा कॉलेजच्या परीक्षेत पण कधी मी नापास होईन वगैरे स्वप्न काही पडल्याचं आठवत नाही, ते यावेळी मात्र अगदी खरं झालं. मुळात यावेळी मी नापास झाले तर काय याच्याएवढंच, नापास झाले तर भारतवारी पण नाही आणि हेही नाही याचं वाईट जास्त वाटलं असतं. मी पास झाले तर मी गाडी कशी चालवेन यापेक्षा, मी नापास झाले तर मला समजावून कसं सांगायचं हा यक्ष प्रश्न सुमेधपुढे होता. अखेर तो दिवस आला, टॅक्सीने जाताना आज पर्यंत एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण ३० च्या झोन मध्ये ती टॅक्सी वाली बाई ४० ने चालवत होती हे त्यावेळी नजरेतून सुटलं नाही. पैसे, कागदपत्र अशा औपचारिक गोष्टी झाल्या, आरसे, सीट सगळं ऍडजस्ट केलं आणि मग आधी त्या परीक्षकाने काही सूचना दिल्या. मग मी रेडी आहे असं सांगितल्यावर तो म्हणाला मला आधी हे सांगा की Warnblinkanlage म्हणजेच hazard lights कुठून चालू करायचे? घरी सृजनला तुझं डोकं कुठे, पाय कुठे हे विचारल्यावर तो जसा अगदी निरागसपणे बोट दाखवून तो सांगतो, तेवढाच निरागस चेहरा ठेवून मी पण हे इथे म्हणून बोट दाखवलं. निदान पहिला प्रश्न हा अगदीच सोप्यातला सोपा आला असं वाटून मी जरा शांत झाले. पुढे काही प्रश्न आला नाही आणि मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया म्हणून मी निघाले. पहिल्या १० मिनिटात बहुतेक ठिकाणी काही चूक न करता आणि सगळे नियम लक्षात ठेवून जात होते. थॉमस आणि तो परीक्षक यांच्या अखंड आणि जगातल्या हजारो विषयांवर गप्पा चालू होत्या. मग पार्किंग पण व्यवस्थित जमलं. एका गावाबाहेरच्या भागात गेलो आणि तिथे बरंच construction चालू होतं आणि नेमका तेव्हाच डोळ्यासमोर सूर्य आला. Blinds खाली करूनही मला काहीही नीट दिसत नव्हतं...त्यामुळे मी गाडी बरीच हळू चालवत होते. मी मुद्दाम सतत एक हात डोळ्यांपुढे ठेवून होते, म्हणजे मला काय प्रॉब्लेम होतोय ते परीक्षकाला समजेल. (असं मला निदान त्या क्षणी वाटत होतं, परीक्षेत एखाद्या वेळी काही येत नसेल तरीही गंभीर चेहऱ्याने मी विचार करून आठवून लिहिते आहे असं दाखवता येतंच) इमर्जन्सी ब्रेकिंगही जमलं. एका ठिकाणी माझ्याकडून नेहमी प्रमाणे इंडिकेटर चालू राहिला आणि परीक्षकाने अगदी निवांत पणे तो बंद करा असं सांगितलं, तो जेवढा शांततेत बोलला, त्यावरून या मुद्द्यावरून तो नापास करणार नाही असं मनापासून वाटलं. परीक्षा संपेपर्यंत घड्याळात बघायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. आता अजून एक पार्किंग सांगायची मी वाट बघत होते पण तोवर आम्ही परीक्षा संपते तिथे आलो होतो. योग्य ठिकाणी गाडी थांबवून पार्क केली. मनातल्या मनात चला आता बहुधा झालं असावं अशी प्रार्थना करत होते. "तुम्ही जरा जास्तच हळू चालवत होतात काही ठिकाणी, इतकं खरंतर नको, पण एकूण अगदीच व्यवस्थित होतं, त्यामुळे लायसन्स देण्यात प्रॉब्लेम नाही" असं तो म्हणाला आणि मला आनंदाने नाचावे वाटू लागले. जगातला परमोच्च आनंद हाच असं त्याक्षणी वाटत होतं. लग्गेच थॉमस म्हणाला "अभिनंदन, पण बघ मी तुला सांगत असतो सतत स्पीड बद्दल तेच महत्वाचं आहे." परीक्षा संपून निकाल लागला तरी याच्या सूचना चालूच होत्या, पण आता मला त्याचा अजिबात त्रास होत नव्हता.

मग सगळ्यांना फोन करून लायसन्स झाले याची जाहिरात करण्यात आली. इतका मोठा टप्पा पार पडला त्यात आई-बाबा आल्यामुळे झालेली मदत, सुमेध ने दाखवलेला पेशन्स आणि थेरी परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळी अजिबात त्रास न दिल्याबद्दल सृजन याना विशेष श्रेय द्यायलाच हवे. जुलै ते डिसेंबर असं जवळजवळ एक पूर्ण सेमिस्टर आणि बहुधा इंजिनियरिंगच्या एका सेमिस्टर पेक्षा बरेच जास्त पैसे भरून अखेर हातात आलेल्या लायसन्सची किंमत फारच जास्त जाणवली. ४ महिन्यात प्रॅक्टिस दरम्यान पेट्रोल भरायला शिकवलं नाही, अंडर ग्राउंड पार्किंग अगदी लहान असतात तिथेही थोडी प्रॅक्टिस करवून घ्यायला हवी, या रस्त्याने हमखास आणतातच असं सांगितलेल्या एकाही रस्त्याने मला परीक्षेत यावं लागलं नाही, उगाच किती घाबरवून ठेवतात अशा टीका टिप्पण्या सुचतातच, पण ते लायसन्स मिळवताना शिकायला मिळालेल्या बऱ्याच गोष्टी त्याहून खूप जास्त महत्वाच्या वाटतात. गाडी चालवणे ही किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव या सगळ्या प्रवासामुळे सतत डोक्यात राहते.

आता स्वतःची गाडी चालवणे हा दुसरा अध्याय चालू झाला. माझे सुमेधला प्रश्न विचारणे, त्याने भरपूर सूचना देणे हे चालू झालं. मी नेमकी काय चुका करते हे तो अगदी अचूक ओळखतो किंवा ते मराठीतून सांगितलेले समजते म्हणून, पण मी ही चक्क सगळं नीट ऐकून घेते. आणि भीतीपोटी का असेना, पण सतत 'हे चांगलं केलं, ते नीट जमलं' म्हणून तो कौतुक करत राहतो. जर्मनीत बऱ्याच ठिकाणी स्त्रियांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागी गाडी लावता येईल अशा लहान सहान गोष्टी पण महत्वाच्या वाटतात. अंधारात गाडीचा लाईट चालू करायचा असतो, आठवणीने गाडी लॉक करायची असते अशा गोष्टी अजून सवय नाहीच्या नावाखाली विसरल्या जातात. मागून मधूनच सृजनचा आरडाओरडा असतो. आता सृजनसाठी ते ४०० पानांचं लेखी परीक्षेचं पुस्तक म्हणजे त्याच्या इतर पुस्तकांसारखंच आहे, त्यात गाड्या, सायकल अशी हजारो चित्र आहेत. त्यात सिग्नलचं चित्र बघून, लाल झाला की थांबायचं आणि हिरवा झाला की पुढे जायचं हे तो प्रत्येक सिग्नलला सांगतो आणि मी आनंदाने हसत गाडी चालवत असते.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle