आमच्याकडे पास्ता म्हणजे जीव की प्राण असल्याने पास्त्याच्या जितक्या रेसिपीज असतील त्या सर्व वापरून होतात आणि त्यातून फेवरीट्स ठरतात. ही रेसिपी मायबोलीवरील मैत्रिणीने दिली होती, मी त्यात थोडा बदल करून बनवते. सर्व तयारी आधी करून ठेवता येत असल्याने पाहुणे येणार असल्यास किंवा वीकडे डिनरचे काम सोपे होते.
साहित्यः-
१. पास्ता शेल्स - आवश्यकतेनुसार, साईझ मोठा असल्याने खूप जास्त लागत नाहीत असा स्वानुभव आहे.
२. रिकोटा चीज १/२ डबा, १२५ ग्रॅम
३. पालक २५० ग्रॅम ( ताजा अथवा डीप फ्रोझन)
४. १ कांदा अथवा शॅलट, छोटे असल्यास २
५. लसूण पाकळी किसून, छोट्या असल्यास ३ मोठी असल्यास १
६. ईटालियन हर्ब्स मिक्स (ड्राईड) :- थाईम, ओरेगॅनो, बेसिल, मार्जोराम, रोझमेरी.
७. मीठ चवीनुसार
८. ऑप्शनल जायफळ - बरीक किसून /४२ टि. स्पून.
मारिनारा सॉससाठी-
१. टोमॅटो प्युरी अथवा फ्रेश टोमॅटो प्युरी करून १ कप.
२. साखर आणि मीठ चवीनुसार
३. लसूण १ पाकळी
४. ईटालियन हर्ब मिक्स १ टि.स्पून.
५. तेल - १ टे.स्पून
६. ऑप्शनल- मी हा सॉस नेहमी करून ठेवत असल्याने एकाच चवीचा कंटाळा येतो म्हणून कांदा /झुकिनी/ सिमला मिरची/ मशरूम्स आणि कांदा बारीक चिरून वापरत असते. अर्थात नुसते टोमॅटो वापरून सुद्धा हा सॉस छानच लागतो.
कृती:-
१. शेल पास्ता पॅकवरील सूचनांनुसार भरपूर पाण्यात मीठ घालून al dente शिजवून घ्यावेत. अति शिजवू नयेत.
२. तेल गरम करून त्यात कांदा शिजेपर्यंत परतावा अगदी ब्राऊन होऊ देऊ नये, पारदर्शक झाला की त्यात लसूण घालावी. ती शिजली की मग पालक घालून शिजवून घ्यावे. पालक अति शिजवू नये, त्याचा हिरवा रंग खराब होतो. नंतर हर्ब्स घालावेत.
३. गॅस बंद करून वरील मिश्रण जरा कोमट झाले की मग त्यात रिकोटा घालावे.
४. मीठ आणि जायफळ घालावे.
५. पास्ता थंड झाल्यावर सावकाश रिकोटा मिश्रण त्यात भरून ठेवावे.
६. मारिनारा सॉस बनवण्यासाठी पातेल्यात थोडे तेल गरम करून त्यात लसूण बारीक चिरून अथवा किसून घालावी.
७. काही भाज्या घालणार असल्यास त्या घालून परतून घ्याव्यात. मग टोमॅटो प्युरी घालावी.
८. हर्ब्स घालून मीठ चवीनुसार घालावे.
९. १/२ कप पाणी ह्या मिश्रणात घालून पातेल्यावर झाकण ठेवून अॅटलिस्ट १/२ तास बारीक गॅसवर हे मिश्रण उकळू द्यावे.
१०. थंड झाल्यावर सर्व्हिंग बोलमध्ये तळाशी हे मिश्रण पसरून त्यावर रिकोटा भरलेले पास्ता सर्व्ह करावेत.
११. हवे असल्यास वरून पार्मेझान चीज किसून घालावे. पार्मेझान न घालतासुद्धा डिश छानच लागते.
१२. मूळ कृतीत व्हाईट सॉस बनवून तो पसरवायचा आहे. पण मला स्वतःला मारिनारा सॉस आवडत असल्याने मी त्यात बदल केला आहे.
१३. ही डिश थंड सुद्धा छान लागते.