कोक अ व्हॅ (Coq au vin)

कोक अ व्हॅ ही मूळची फ्रेंच रेसिपी. माझ्या कुकरी शोज बघण्याच्या व्यसनापायी अशा अनेक रेसिपी माहित होत असतात. त्यातून जेम्स मार्टिन सारखा देखणा शेफ असला तर ओहो, रेसिपी बघायलाच हवी :ड ह्या रेसिपीचे अनेक व्हर्जन्स नेटवर सापडतील,आयना गार्टनच्या रेसिपीत वाईनऐवजी कोन्याक/ ब्रँडी वापरायची आहे. मी मात्र जेम्सने सांगितल्याप्रमाणे रेड वाईनच वापरली आहे.

साहित्यः-
१. १ चिकन
२. २ टेस्पू. बटर
३. छोटे सांबार कांदे ८-१०, मोठे कांदे असल्यास २ कांदे १/४ भागात कापून
४. ३ मोठ्या लसूण पाकळ्या
५. बेकन, बारीक कापून घेऊन, २ मोठे चमचे भरून (मी खात नसल्याने वापरले नव्हते :) )
६. बटण मशरूम्स - छोटे असल्यास ८-१०, मोठे असल्यास १/२ भाग करून, ८-१० तुकडे असतील एव्हढे
७. ५०० मिली रेड वाईन ( मी जरा कमी वापरली)
८. १ कप चिकन स्टॉक
९. बाल्सामिक व्हिनेगर २ टेस्पू.
१०. पार्सली आणि थाईम, २-३ काड्या.
११. मीठ आणि मिरेपूड चवीनुसार.

कृती:-
१. एक जाड बुडाचे भांडे घेऊन त्यात बटर घालून छोटे कांदे, लसूण आणि बेकन घालून परतावे. थाईम घालावे.
२. मशरूम्स घालून, मग रेड वाईन, चिकन स्टॉक आणि व्हिनेगर घालावे.
३. चिकन पिसेस घालून एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर गॅस बारीक करून, पातेल्यावर झाकण ठेवून २५ मिनिटे उकळावे. चिकन शिजले आहे ह्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक वाटल्यास अजून शिजवावे.
४. चिकन बाहेर काढून घ्यावे आणि गॅस मोठा करून पातेल्यात उरलेला सॉस ५-७ मिनिटे उकळावा. काही शेफ्स ह्यात बटर /बटरमध्ये भाजलेला मैदा घालतात. ज्यामुळे सॉसला घट्टपणा येतो.
५. आता चिकन परत पातेल्यात घालून त्यात मीठ, मिरेपूड आणि पार्सली घाला.
६. थिक क्र्स्टवाला ब्रेड अथवा राईस बरोबर सर्व्ह करा. सोबत रेड वाईनचा ग्लास असेल तर मस्तच :)

ता.क:- माझ्या कोक अ व्हॅ रंग जरा लाईट होता, म्हणून नंतर मी मूळ कृतीनुसार ५०० मिली रेड वाईन घालायला सुरूवात केली. अर्थात कोन्याक / ब्रॅंडी वापरल्यास रंगात थोडा फरक पडतोच.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle