दिनांक ९ जून २०११
मला जाताना प्रवासाच्या अनुभवांबद्दल जशी उत्सुकता वाटत होती, तशीच उत्सुकता आपले सहयात्री कोण-कोण असतील ह्याचीही वाटत होती. एकतर मी मुळात देवधर्म, यात्रा, पुण्य कमावणे वगैरे पंथातली नाही. पण सिंहगड चढणाऱ्या लोकांच्या गप्पा जशा ट्रेकिंग संदर्भातल्या असतात, तशा यात्रेला गेल्यावर देवदेव-यात्रा ह्याबद्दल गप्पा होणार, हे स्वाभाविकच होतं. पण आपल्याबरोबरचे सगळेच लोक अगदी किरकोळ गोष्टीचा संबंधही जर ‘भोले बाबाकी कृपा’ ला लावणारे असतील तर काही खरं नाही, अशी भीती वाटत होती. एक जरी मैत्रीण मनासारखी मिळाली तरी सगळ्या प्रवासात मजा येईल. तसं झालं तर काय मजा येईल! असा विचार आणि नाही मिळाली, तर एक महिना कसा रेटायचा? असे परस्परविरोधी विचार मी पुणे - दिल्ली प्रवासात. ही मुख्य आणि इतर लहान-मोठ्या असंख्य काळज्या आणि समजा कैलास-मानसच्या ऐवजी परस्पर दक्षिण-उत्तर ध्रुवाची सहल करावी लागली तरी पुरेल इतके समान घेऊन मी दिल्लीत पाय ठेवला.
विदेश मंत्रालयाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे यात्रींची राहण्याची सोय दिल्लीत, सिव्हिल लाइन्स येथील गुजराथ समाज सदन येथे केली होती. मी विमानाने दिल्लीत आणि टॅक्सीने राहण्याच्या जागी पोचले. गुजराथ समाज सदन म्हणजे भलामोठा पसारा आहे. दिल्ली आणि परिसरात फिरायला येणारे बरेच गुजराथी लोक इथे राहतात. गुजराथ समाज सदनात अक्षरशः उघड्यावर झोपणे ते वातानुकूलित खोल्यांपर्यंत व्हरायटी आहे. कैलास यात्रींची सोय सुदैवाने वातानुकूलित डॉर्मिटरीमध्ये होती. कारण पुण्याच्या पावसाळी हवेनंतर दिल्लीचा कडकडीत उन्हाळा भाजत होता. डॉर्मिटरीमध्ये पोचून स्थिरस्थावर झाले.
गुजराथ समाजमधील डॉर्मीटरी (फोटो क्रेडीट श्री. शरद तावडे)
एकापाठोपाठ एक यात्री येऊन धडकत होते. मेडिकलसाठी दिल्ली किंवा जवळपास राहणारे लोक परस्पर येऊ शकतात. बाहेरगावच्या लोकांना मात्र आदल्या दिवशीच पोचावं लागतं. महाराष्ट्र, गुजराथ, झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल सगळीकडची मंडळी येत होती. महाराष्ट्राचे एकूण ११ लोक होते. आजची ब्रेकिंग न्यूज एक फार आनंदाची गोष्ट होती. मला लगेचच एक छानशी मैत्रीण मिळाली. 'भगवान देता है, तो छप्पर फाड के' ह्याचा अनुभव आला. पुण्याची, आर्किटेक्ट, एकटी आलेली!!! मी खूश! आता आपला प्रवास मस्त होणार ह्याची खात्री वाटायला लागली. थोड्या थोड्या ओळखी झाल्यावर सगळ्यांच्या बोलण्यात ही मेडिकल परीक्षा आपण पास होऊ का? ही काळजी व्यक्त होत होती.
चर्चा आणि सल्लामसलत! (फोटो क्रेडीट श्री.शरद तावडे)
गुजराथ सदनात पोचल्यापासून जो भेटेल तो एकमेकांना ‘ॐ नमः शिवाय’ म्हणत होतं. रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे ‘नमस्ते’, ‘गुड मॉर्निंग, थॅन्क यू , सॉरी’ हे शब्द खालसा करून सगळीकडे, सगळ्यासाठी ‘ॐ नमः शिवाय’!! सुरवातीला असं म्हणायला जरा संकोच वाटत होता. चुकून जरी थॅन्क यू, सॉरी म्हटलं, की समोरून 'अरे बेहेनजी, अब थॅन्क यू, सॉरी छोडीये. बस ‘ॐ नमः शिवाय’ कहिये' असं उत्तर यायचंच. मग मीसुद्धा ती सवय लावून घेतली. एक महिन्यात ती सवय अगदी हाडीमाशी भिनली. पुण्यात आल्यावरही सुरवातीला आपण रिक्षावाले, भाजीवाले सगळ्यांना सवयीने आपण दोन्ही हात जोडून 'ॐ नमः शिवाय' म्हणणार, अशी भीती वाटायची! अजूनही यात्रींपैकी कोणी भेटलं किंवा फोन आला, तर 'ॐ नमः शिवाय' म्हटलं जातच.
ह्या यात्रेसाठी अगदी कडक वैद्यकीय परीक्षा घेतात. भारतात असेपर्यंत वैद्यकीय मदत नीटपणे मिळते. सुरवातीला कुमाऊँ मंडळ विकास निगम आणि नंतर भारत सीमा तिबेट पोलीस हे व्यवस्थित मदत करतात. प्रत्येक कँपवर डॉक्टर असतात. प्रश्न असतो तो तिबेटामध्ये गेल्यावर. तिथे चीन सरकार कुठलीही वैद्यकीय मदत देत नाही. ह्या यात्रेत समुद्रसपाटीपासून १८६०० फूट इतकी उंची गाठायची असल्याने हृदय, फुफ्फुसे तेवढा ताण घेऊ शकतील का, हे काटेकोरपणे तपासले जाते. त्याचबरोबर हिमोग्लोबिन, लघवी, रक्त, छातीची क्ष किरण तपासणी, स्ट्रेस टेस्ट, पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा तपासण्या केल्या जातात. ह्यात पास होणाऱ्या यात्रीनाच पुढे जायची परवानगी मिळते. (यात्रेतल्या ‘गुंजी’ ह्या कॅम्पवर पुन्हा तपासणी होते. तेथूनही परत पाठवू शकतात.)
मी आधी म्हटल्याप्रमाणे भारत सरकार दरवर्षी सोळा बॅचेस यात्रेला पाठवते. प्रत्येक बॅच साठ लोकांची असते. प्रत्येक बॅचंबरोबर एक लायझन ऑफिसर असतात. हे ऑफिसर भारत सरकारचे अंडर सेक्रेटरी किंवा त्यावरील पदांवर काम करणारे असतात. हे सर किंवा मॅडम त्या-त्या ग्रुपचे नेतृत्व करतात तसंच ते भारत सरकारचे प्रतिनिधीत्वही करतात. ग्रुपमध्ये शिस्त ठेवणे, सर्वांची काळजी घेणे, काही बरी-वाईट परिस्थिती उद्भवल्यास त्या वेळेला परिस्थिती पाहून योग्य असे निर्णय घेणे अश्या भरगच्च जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात.
एख्याद्या यात्रीचे वर्तन योग्य नसल्यास ते त्याला परतही पाठवू शकतात. आमच्या बॅचचे एल.ओ. कोण असतील ह्याची खूप उत्सुकता होती. मेडिकलच्या वेळेला ते भेटतीलच, असे लोकांचे म्हणणे होते. आलेल्यांपैकी कोण पुढे जाणार आणि कोण घरी? ही एक काळजी होती. मला माझे हिमोग्लोबिनचे आणि वजनाचे आकडे डोळ्यासमोर आले की पोटात गोळा येत होता. दुसऱ्या दिवशी ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती.
दिनांक १० जून २०११
एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा गुजराथ सदनला पोचलात की प्रत्येक गोष्टीची सोय कुमाऊँ मंडळवाले करतात. जेवण, चहा-पाणी, राहणे, वैद्यकीय तपासणीसाठी जाता-येता बसची सोय सगळं. अनेक स्वयंसेवी संस्थादेखील यात्रींची उत्तम सोय व्हावी म्हणून प्रचंड काम करतात. आम्ही सर्व लोक तयार होऊन, न खाता-पिता (मेडिकलमुळे) दिल्ली हार्ट लंग इंस्टिट्यूटला पोचलो. त्या सगळ्या तपासण्यांसाठीची रक्कम आणि चीनच्या व्हिसासाठी पारपत्र असे जमा करून घेतल्यावर तपासण्यांची फैर सुरु झाली. निरनिराळ्या तपासण्यांसाठी फिरताना सहयात्रींची ओळखही होत होती. आमच्या बॅचमध्येच दोन डॉक्टर आहेत अस कळल्यावर बरं वाटलं.
अजिबात हिंदी-इंग्रजी न येणारी काही गुजराथी मंडळी होती, तर केरळचे एक डॉक्टर फक्त इंग्रजी येणारे होते! अश्या सगळ्या जनतेची मोट आमचे एल.ओ. बांधणार होते. एक महिना हेच मित्र-मैत्रिणी, हेच कुटुंब.
एक-एक करून सगळ्या तपासण्या संपल्या. नंतर त्या हॉस्पिटलच्या प्रेक्षकगृहामध्ये सगळ्यांना बसवून ‘यात्रा आणि त्या दरम्यान घेण्याची काळजी’ अशी माहिती देण्यात आली. आपण समुद्रसपाटीपासून जसे वर वर जातो, तशी ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचा आपल्या मेंदूवर, डोळ्यांवर, पचनसंस्थेवर, स्वभावावर सगळ्यावरच परिणाम होऊ शकतो. हाय अल्टीट्यूड सिकनेसच्या ,अक्युट आय माउंटन सिकनेस, हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडीमा आणि हाय अल्टीट्यूड प्लमनरी एडीमा अश्या पायऱ्या असतात. ह्यात मृत्यूही ओढवू शकतो.
यात्रेत घ्यायच्या काळजीची माहिती
ही सर्व माहिती प्रथमच मिळत असल्याने सगळे जण मन लावून ऐकत होते. नंतर तिबेटमध्ये पोचेपर्यंत इतक्यावेळा ही माहिती दिली गेली, की ते सगळं पाठ झालं. सुरवातीला ऐकताना खूप भीती वाटली होती. नंतर काही वाटेनास झालं. प्रथमच विमान प्रवास करताना नाही का, पट्टा असा बांधा आणि ऑक्सिजन मास्क तसा लावा, वगैरे माहिती मनापासून ऐकली जाते. सरावलेले प्रवासी तिकडे बघतही नाहीत. तसंच हे झालं.
आमचे एल.ओ. श्री.मनमीतसिंग नारंग हे गृह खात्यात काम करणारे आय.पी.एस. ऑफिसर आहेत असे कळले. ते मेडिकल दरम्यान काही जणांना भेटून गेले. पण माझी भेट होऊ शकली नाही.
माझा एक शाळेतला मित्र दिल्लीत राहतो. संध्याकाळी त्याच्याबरोबर फिरून, गप्पा मारून मस्त मजा केली. शाळेतल्या दिवसांच्या आठवणी काढून भरपूर हसलो, खिदळलो. मेडिकलच सगळं दडपण निघून गेलं. आता दुसऱ्या दिवशी भारत सीमा तिबेट पुलीसच्या इस्पितळात मी यात्रेला जाणार की परत घरी, हा निर्णय होणार होता.
दिनांक ११ जून २०११
आम्ही सर्व लोक तयार होऊन, आणि आज व्यवस्थित नाश्ता-पाणी करून भारतीय तिबेट सेना पोलीस हॉस्पिटला पोचलो. आज सगळेजण ‘किस्मत का फैसला’ मोड मध्ये होते. एव्हाना माझी आणि नंदिनीची (पुण्याची मैत्रीण) मस्त मैत्री झाली होती. तेवढे सूर बॅचमधल्या कोणाशी जुळतील अस वाटत नव्हत. दोघीतल्या एकीला जर परत जायला लागलं तर दुसरीची फारच पंचाईत होणार होती. कारण बाकीच्या सगळ्याच बायका नवऱ्याबरोबर आल्या होत्या. दोघींना जायला मिळावं नाहीतर दोघींना परत तरी पाठवावं अस वाटत होत. नेहमीप्रमाणे तिथेही यात्रेत घेण्याची काळजी, पाळावयाची शिस्त, नियम, हवामान ह्या विषयांवर माहिती दिली.
नंतर एकेकाला बोलावून फैसला सुरु झाला. आम्ही सगळे मिळून ६२ लोक होतो. प्रत्येकाला बोलावून त्यांचे सर्व रिपोर्ट्स तीन डॉक्टर मिळून बघत होते. आपण जास्त उंचीवर जाऊ, तसा बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीच जास्त रक्तदाब असलेल्यांना परत-परत तपासत होते. निरनिराळ्या कारणांमुळे एकूण दहा लोक नापास झाले. दोन लोक काठावर पास, किंवा नापास होते. दुर्दैवाने त्यात नंदिनी होती. तिचा इ.सी.जी. नीट नव्हता, अस डॉक्टरांच म्हणणं होत. पण हे सांगणाऱ्या डॉक्टर मॅडम चक्क प्रसुतीतज्ञ होत्या! हृदयविकार तज्ज्ञ नव्हत्याच! मग त्यांनी नंदिनी आणि अजून एकीला जवळच्या बात्रा हॉस्पिटलमध्ये जाऊन परत इ.सी.जी. काढायला सांगितला. त्या दुसऱ्या यात्रीचा नवरा स्वतः डॉक्टर होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काहीही प्रश्न नव्हता. बात्रा हॉस्पिटलमधल्या हृदयविकार तज्ज्ञाने पुन्हा तपासणी करून कुठलीही अडचण नसल्याचं लिहून दिलं. पुन्हा आमची वरात भा.ति.से.हॉस्पिटलला आली. अशी सगळी सव्यापसव्य करून दोघींनाही परवानगी मिळाली! हुश्श!
गुजरात सदनामध्ये संमिश्र वातावरण होत. नवरा-बायकोच्या जोडीतील कुठे नवरा तर कुठे बायको नापास झाली होती. त्यांची रडारड, समजावणे चालू होते. मला आणि नंदिनीला मात्र आता गुंजीपर्यंत नक्की जाणार ही खात्री वाटायला लागली. ह्याच खुशीत झोपून गेलो.