दिनांक १२ जून २०११ (दिल्ली मुक्काम)
आज तसा फार गडबडीचा दिवस नव्हता. सकाळी निवांत १० वाजता साऊथ ब्लॉकला विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात कार्यक्रम आणि हाय टी साठी जायचं होतं यात्रेची माहिती, यात्रेत खासकरून तिबेटमध्ये असताना घ्यायची काळजी ह्याची माहिती मिळणार होती. भारतातील यात्रेसाठी २२००० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, इंडेमिनीटी बॉन्ड तसेच इतर कागदपत्रेही द्यायची होती. त्या कार्यक्रमातच नारंग सर सगळ्यांना भेटून ओळखी करून घेणार होते.
हे सगळं झालं, की तिबेटमध्ये गेल्यावर जे विदेशी चलन लागत ते घेण्यासाठी सेंट्रल बँकेत जायचं होतं. मी आणि नंदिनी डॉलर पुण्याहून घेऊन आलो होतो. उद्यापासून प्रवास सुरु करायचा होता. ठराविक वेळेला, ठरलेल्या कार्यक्रमानुसार वागायचं होतं. सगळे खातील, तेच जेवायचं होतं. आजचा दिवस आम्हाला आमचा वेळ घालवायला मिळाला होता. आता अशी संधी यात्रा संपवून परत आल्यानंतरच मिळणार होती. हे लक्षात आल्यावर आम्ही बिलकुल वेळ न दवडता सरोजिनी मार्केटला भटकायला गेलो. उगीच इकडेतिकडे करणे, मनाला येईल ते अबर-चबर खाणे अशी जीवाची दिल्ली केली.
बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे)
संध्याकाळी दिल्ली सरकारतर्फे ‘बिदायी’ कार्यक्रम असतो. भजन, भाषण, पूजा, जेवण असत. त्याच बरोबर दिल्ली सरकारकडून एक भली मोठी सॅक, रेनकोट, पूजा साहित्य, टोपी, ट्रॅक सूट, टॉर्च अस भेट म्हणून देतात. दिल्लीच्या नागरिकांना तर रोख वीस हजार रुपये पण मिळतात. गुजराथ, कर्नाटक, झारखंड अशी काही राज्य पण मदत देतात. महाराष्ट्र सरकार मात्र काही देत नाही.
बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे)
आतापर्यंत निरनिराळ्या व्यक्ती आणि संस्थांकडून भेटवस्तूंचा अक्षरशः वर्षाव चालू होता. वैद्यकीय अहवाल ठेवायला मोठी प्लास्टिक पिशवी, लहान सॅक , कमरेचा पाऊच, पारपत्र जवळ ठेवण्यासाठीचा पाऊच, जमा करायचं सामान ठेवायला पोती, त्यांना गुंडाळायला दोऱ्या, चालताना आधाराला काठ्या, लोकरी मोजे, बिस्किटं !! आधीच्या भव्य सामानाला अतिभव्य रूप येत चाललं होत. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता निघायचं होत. कसबस सामान कोंबलं. बरोबर नेण्याच आणि गुजराथ सदनला जमा करायचं सामान वेगळं करून झोपून गेलो.
दिनांक १३ जून २०११ (दिल्ली ते अल्मोडा)
दिल्लीतील हृद्य निरोप
सकाळी ठरलेल्या वेळेला आम्ही सर्व जण आवरून, सामान जमा करून बाहेर पडलो. बाहेर आलो तर काय, आम्हाला निरोप द्यायला मोठा जमाव जमला होता!! दिल्लीतल्या यात्रींचे कुटुंबीय, कुमाऊँ मंडळाचे लोक, खूप गर्दी होती. सगळे यात्रीन्च्या पाया पडत होते,. हातात खाऊ, पाण्याच्या बाटल्या कोंबत होते, अगदी डोळ्यात पाणी आणून ‘ ठीकसे वापस आना’ असा निरोप देत होते. लोकांच प्रेम, श्रद्धा पाहून सगळ्यांनाच भरून येत होत. समारंभाने हार-तुरे घालून, गंध लावून दिल्लीच्या लोकांनी आम्हाला निरोप दिला. आज आम्हाला दिल्ली ते काठगोदाम असा ३६० की.मी.चा प्रवास वातानुकूलित बसने आणि पुढे अल्मोड्यापर्यंतचा प्रवास साध्या बसने करायचा होता.
इतके दिवस सगळे विखुरलेले असायचे. दिल्ली आणि आसपासची मंडळी वैद्यकीय चाचण्यांसाठी घरून येऊन परत घरी जात होती. कोणी नातेवाईकांकडे राहात होते. आपल्या नातेवाईकांना सोडायला म्हणून आलेले काही जण गुजराथ समाजमध्ये राहात होते. त्यामुळे आपल्या बॅचमध्ये नक्की आहे कोण? हा अंदाज काही येत नव्हता. आता बसमध्ये बसल्यावर आपले सहयात्री कोण आहेत, ते कळायला लागलं. बस निघाल्यानंतर, एल.ओ. सरांनी सगळ्या यात्रींना आपापला परिचय करून द्यायला सांगितला. आमच्या पन्नास जणांच्या बॅचमध्ये ३८ पुरुष आणि १२ बायका होत्या. सर्वात लहान यात्री १८ आणि सर्वात मोठे यात्री ७० वर्षांचे होते. नवरा बायको, आई-मुलगा, भाऊ-भाऊ अश्या जोड्या होत्या.
काठगोदाम येथील स्वागत
दिल्लीत झाला, तसाच कौतुक समारंभ गाझियाबादमध्ये नाश्त्यासाठी थांबलो तिथे, जेवणाला काठगोदाम थांबलो तिथे सगळीकडे झाला. प्रत्येक ठिकाणच आदरातिथ्य, श्रद्धा, यात्रींना सगळ्या प्रकारची मदत करण्याची धडपड बघून भारावून जायला होत होत. अस करत करत रात्री अल्मोड्याला मुक्कामाला पोचलो.
दिनांक १४ जून २०११ (अल्मोडा ते धारचूला)
आज अल्मोडा ते धारचूला असा ११ तासांचा बस प्रवास होता. त्यामुळे लवकरच निघालो. आता हिमालयात आल्याची जाणीव होत होती. रस्ता वळणा-वळणांचा होता. प्रत्येक वळणानंतर नवीन नयनरम्य दृश्य दिसत होत. आमच्या नशिबाने हवा छान होती. मजा येत होती. असा सुंदर प्रवास करत आम्ही पिथोरगढला दुपारच्या जेवणाला पोचलो.
महाराष्ट्रात कैलास-मानस बद्दल फार लोकांना माहिती नाहीये. मी जाण्याचे ठरवल्यावर बऱ्याच जणांनी ‘ म्हणजे अमरनाथ का?’ ‘हे चारधाम जवळ आहे का?’, ‘ तिथे मोठं देऊळ असेल ना?’ वगैरे प्रश्न विचारले होते. इथे उत्तराखंडामध्ये मात्र स्थानिक वर्तमानपत्रातून, निरनिराळ्या वाहिन्यांवरही यात्रेच्या बातम्या येतात.
मिडीयाची गर्दी
पिथोरगढ पासून काही अंतरावर मीरथी येथे भारत सीमा तिबेट पोलीस ह्याच कँप हेडक्वार्टर आहे. ह्या यात्रेची सुरक्षा, वैद्यकीय मदत, काही वाईट परिस्थिती ओढवल्यास तशी मदत ही सगळी जबाबदारी भा.ती.से.पोलीस घेतात. तिथला कौतुक समारंभ सगळ्यात भारी होता. बसमधून उतरल्यावर दोन्ही बाजूंना जवान स्वागताला उभे, नाचणारे लोक, उत्तम अल्पोपाहार, शाळेच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अशी बडदास्त होती.
मीरथी येथील बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे)
तिथल्या कमांडंटसाहेबांनी चीनमध्ये गेल्यावर सुरक्षिततेची कशी काळजी घ्यायची हे सांगितले. तिबेटी भाषेतले रोज लागणारे शब्द असणारी पुस्तिका सर्वांना दिली. पूर्ण बॅचचा एक फोटो काढून त्यांनी आम्हाला निरोप दिला. हे सगळं स्वागत बघून जरा संकोचच वाटत होता. आम्ही काही एवरेस्टवर स्वारी करणार नव्हतो किंवा एखादं युद्धही लढणार नव्हतो. ज्या सैनिकांच आपण स्वागत करायला हवं, ते आमच्या सोयींसाठी केवढीतरी धडपड करत होते. तिथे नागपूरचा एक मराठी जवान भेटला. त्याच्याशी मराठीत गप्पा मारून पुन्हा एकदा तो दमवणारा बसप्रवास सुरू केला.
आता पाऊस सुरू झाला होता. मोबाइलवर गाणी ऐकत पावसाची मजा घेत होतो. घर सोडून आता चार दिवस झाले होते. हा मोबाइलचं शेवटचा दिवस. नंतर जर एस..टी.डी.ची सोय असेल तरच घरी बोलता येणार.
धारचूला गावात संध्याकाळी उशीरा पोचलो. हे गाव नेपाळच्या सीमेवर आहे. काली नदीच्या अल्याड नेपाळ आणि पल्याड भारत. धारचूलाला गेल्यावर दिल्लीत दिलेलं मोठं सामान तीन दिवसांनी मिळाल. पुन्हा सगळ्या खोल्यांमधून सामानाशी झटापट सुरू झाली. आपल्याला पोर्टर तसंच पोनी हवा असेल तर इथे सांगावं लागत. मला मिळालेल्या सल्ल्यानुसार मी दोन्ही करणार होते. ह्यांचे दर तेथील सोसायटी ठरवते. त्यामुळे घासाघीस करायला काही वाव नव्हता!!
ह्या यात्रेत सामानाची पद्धत अशी असते की, वीस किलो सामान वाहून नेण्याची जबाबदारी कुमाऊँ मंडळ घेते. जिथपर्यंत वाहन जाऊ शकत तिथपर्यंत ट्रकने आणि नंतर खेचरांवर लादून सामान नेतात. हे मोठं सामान भिजू नये म्हणून ते तरटाच्या गोण्यांमध्ये घालून, दोरी बांधून, त्यावर आपलं नाव घालून द्यावं लागायचं. आमच्या नंतरच्या बॅचमधल्या एका यात्रीच सामान नदीत पडून हरवलं. पण बाकी यात्रीनी मदत केल्यामुळे त्यांची यात्रा पूर्ण झाली.
पण ह्या सामानाची रोज भेट होण्याची खात्री नसते. त्यामुळे एका लहान सॅक मध्ये थोडे कपडे, थोडा खाऊ,रेनकोट अस सामान ठेवायचं. आपलं पारपत्र, रोख पैसे, डॉलर हे सदैव आपल्या अंगावर वागवायचे. शिवाय कॅमेरा, टोपी इत्यादी असतच. अश्या बऱ्याच लेव्हलच सामान असल्याने पुढे कँप वर एखादी वस्तू आपल्याच सामानात शोधणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखं असायचं. त्यातही साबण शोधताना मेणबत्ती, रुमाल शोधताना पेन असे गमतीदार प्रकार व्हायचे. (पुढे पुढे आपली वस्तू शोधण्यापेक्षा दुसऱ्याची मिळत असेल तर वापरून मोकळे व्हायचो!! ट्रेकमध्ये एक वस्तू सातच काय पण पन्नास लोकही वाटून घेऊ शकतात!!)
आता उद्यापासून खरी खरी यात्रा सुरू होणार. व्होल्व्हो बस, साधी बस, जीप अश्या पायऱ्या उतरत उतरत आता चालायला सुरवात करायची होती. वर्षानुवर्ष मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पण आत्ता मात्र डोक्यात असंख्य शंका आणि प्रश्न होते. हवामान, आपली तब्येत, चालायला जमेल ना, सामानाची गडबड तर नाही ना होणार? बापरे. किती काळज्या, शंका आणि चिंता! पण बसच्या प्रवासाचा एव्हाना खूप कंटाळा आला होता. हात-पाय आंबून गेले होते. उद्यापासून चाललं की मोकळं वाटेल ह्या विचाराने छान वाटत होत. घरी सगळ्यांशी पोटभर गप्पा मारून घेतल्या आणि कैलासाची स्वप्न बघायला लागले!!
दिनांक १५ जून २०११ (धारचूला ते सिरखा)
सकाळी नाश्ता-पाणी उरकून आणि मोबाईल, आंतरजाल, वर्तमानपत्र, टी.व्ही., रेडिओ अशा सगळ्या आधुनिक यंत्राचा पुढच्या २०-२२ दिवसांसाठी निरोप घेऊन निघालो. जीपने साधारण ४० किलोमीटर प्रवास केल्यावर ‘वाहन’ ह्या सोयीलाही रामराम करायचा होता. आता पुढचा प्रवास एक तर चालत किंवा घोड्यावर. शक्यतो घोड्यावर बसायचं नाही, अस ठरवलं तर होत. पण त्या बाबतीत फार हट्ट करायचा नाही, असही ठरवलं होत. शेवटी आपण हाती-पायी धड परत येणं हे सगळ्यात महत्त्वाच. कारण,‘आपण सलामत तो परिक्रमा पचास!!’
हिमालयात दरडी कोसळणे हा रोजचाच खेळ. त्यामुळे यात्रेचा रस्ता ठरवताना पाऊस, रस्त्याची कामे आणि दरडी कोसळल्याने बंद असलेले रस्ते, असा सगळा विचार करून ठरवतात. पहिल्या बॅचचा रस्ता शेवटच्या बॅचपर्यंत बदलला जाऊ शकतो. आमच्या माहिती पुस्तकात दिल्याप्रमाणे आमची पायी वाटचाल पांगूपासून सुरू होणार होती. पण आम्ही सुरवात केली ती नारायण आश्रम येथून. त्यामुळे आमचे चालण्याच अंतर जवळ-जवळ ८-९ किलोमीटरने कमी झालं. वा! सुरवात तर छान झाली!
नारायण आश्रम
धारचूलापासून जीपने प्रवास करून नारायण आश्रमला पोचलो. नारायण आश्रमची उंची समुद्र सपाटी पासून साधारण ९००० फूट आहे. दिल्लीपासूनच नारायण आश्रमच्या सृष्टीसौंदर्याविषयी ऐकले होते. २८ मार्च १९३७ रोजी कर्नाटकातील नारायण स्वामींनी कैलास मानससरोवर यात्रींसाठी एक विश्रांतिस्थळ आणि स्थानिक लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्यासाठी उपक्रम सुरू केले.
आता त्यांचा इस्पितळ, महाविद्यालय, प्राथमिक शाळा असा बराच विस्तार झाला आहे. तिथे गेल्यावर डोळ्यात भरली ती त्यांची शिस्त, व्यवस्था आणि स्वच्छता. जिकडे नजर जाईल तिथे आता हिमशिखरे दिसत होती. पाऊस नव्हता. हवा छान होती. आकाशाची निळाई, शिखरांचा शुभ्रधवल रंग आणि त्या पार्श्वभूमीवर आश्रमातील काळजीपूर्वक जोपासलेली रंगीबेरंगी फुले! वा! तिथे दर्शन घेऊन, आणि त्यांनी दिलेला गरम शिरा आणि चहा हा प्रसाद घेऊन सगळे पुढे निघाले.
इथला अजून रोमांचकारी एक कार्यक्रम बाकी होता. तो म्हणजे आपला पोर्टर व पोनीवाला ह्यांची ओळख करून घेण्याचा! आश्रमातून खाली उतरलो तर पोर्टर, घोडे आणि घोडेवाले ह्यांची ही तुंबळ गर्दी झाली होती. त्यांचा ठेकेदार हजर होता. त्याच्याकडेच आम्ही आदल्या दिवशी धारचुलाला पैसे दिले होते. तो प्रत्येकाला एक-एक पोर्टर आणि पोनीवाला देत होता. मी ह्या आधीही हिमालयात ट्रेक केले आहेत. पण कधी पोर्टर केला नव्हता. बहुतेक ठिकाणचे पोर्टर फक्त आपले सामान नेऊन पुढच्या कँपवर पोचवतात. इथे मात्र पद्धत वेगळी असते. तो पोर्टर पूर्ण वेळ आपल्या बरोबर आणि आपल्या वेगाने चालतो. मला माझ्या अप्रतिम(?) वेगाची नीटच माहिती असल्याने मी ठेकेदाराला तशी कल्पना दिली होती. त्याने सुरेश नावाचा पोर्टर, रमेश नावाचा पोनीवाला (आणि लकी नावाचा घोडा) ह्यांच्याकडे मला सुपूर्त केले.
यात्री आणि पोर्टर-पोनीवाले-पोनी यांची गाठभेट
सुरेशभाईने लगेच माझ्याजवळची छोटी सॅक आपल्या पाठीला लावली आणि शिवशंकराच्या गजरात आम्ही चालायला सुरवात केली. आजचा रस्ता तसा फार लांबचा नव्हता. फक्त ५ किलोमीटर चालायचं होत. पण यात्रेतील ही पहिलीच वाटचाल ( किंवा चालवाट!!) त्यामुळे त्याचा वेगळाच रंग होता. एकत्र सुरवात केली तरी प्रत्येकाच्या वेगाप्रमाणे ग्रुप्स पडत होते. बाकी ट्रेकमध्ये एकटा मेंबर मागेपुढे झाल्यास रस्ता चुकण्याचा संभव असतो. इथे मात्र जवळ-जवळ प्रत्येकाबरोबर पोर्टर असल्याने, ती भीती नव्हती.
माझे यात्रेतील साथीदार - सुरेशभाई, रमेशभाई
यात्रेची सुरवात
हे पोर्टर पोनीवाले लोक अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू असतात. आपण हाशहुश करत कधीतरी यात्रेला जातो. हे लोकं मात्र दर वर्षी ७-८ वेळा तरी हा रस्ता तुडवतात. बॅचेसच वेळापत्रक अस जुळवलेलं असत की पहिली बॅच परिक्रमा संपवून भारतात परत येते तेव्हा तिसरी तिकडे जाते. अश्या एकाआड एक बॅचेस सीमेवर भेटतात. त्यामुळे हे पोर्टर एका बॅचचा यात्री सीमेवर सोडतात आणि दुसऱ्याला परत नारायण आश्रमापर्यंत आणतात. त्याच्या पुढच्या बॅचबरोबर पुन्हा जातात. म्हणजेच १६ बॅचेसपैकी ७ ते ८ बॅचेसबरोबर हे पोर्टर-पोनीवाले हा सगळा प्रवास करतात. हा सगळा भाग, सृष्टीसौंदर्याने समृद्ध आहे. पण उद्योग धंदे नसल्याने फार गरीब आहे. यात्रेच्या काळात इथले लोक कष्ट करून पैसे मिळवतात.
आजच रस्ता तसा सोपा होता. त्यामुळे त्रास वाटत नव्हता. दोन तास चालल्यावर सुरेशभाईने लांबून दिसणारा कुमाऊँ मंडळाचा कँप दाखवला. कँपकडे जाताना सिरखा गाव लागलं. इथल्या सगळ्या घरांना छान कोरीव काम केलेले दरवाजे-खिडक्या असतात. थंडी भरपूर असल्याने सगळ्या बायका लोकरीचे विणकाम करत असतात. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आणि विणकाम मनापासून आवडतं. त्यामुळे बांधकामे आणि विणकाम बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होते. ह्या गावात एस.टी.डी.फोनची सोय होती. मोबाइलच्या प्रसारानंतर खूप दिवसांनी रांग लावून फोन केला. घरी फोन करून खुशाली कळवली. उरलेलं अंतर भराभर कापून सिरखा कँप गाठला. कँपच्या जवळ १९९८ साली झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या यात्रींसाठी एक स्मारक बांधले आहे.
यादगारी
यूथ हॉस्टेलच्या ट्रेकना राहायला तंबू आणि बाकी सोयींसाठी ‘होल वावर इज आवर’ ची सोय असते! इथे मात्र पलंग, गाद्या, बाथरूम, शौचालये सगळी अगदी पंचतारांकित सोय होती. बहुतेक ठिकाणी सहा-सात जणांना मिळून एक खोली असायची. काही कँपवर दहा-बारा जणांचा बंकर असायचा.कँपवर पोचल्यावर सगळेजण आपल्या आपल्या उद्योगांना लागले. बऱ्याच जणांचे अंघोळी, कपडे धुणे हे आवडते छंद होते. आमच्या बरोबरचे तावडे, चित्रकार होते. ते चित्र काढायला लागल्यावर बघायला ही गर्दी झाली.
आमच्या बॅचचे कलाकार श्री. शरद तावडे
मी आणि नंदिनी गप्पा मारणे आणि मजा करणे ह्या महत्त्वाच्या कामाला लागलो. ह्या गप्पात असं लक्षात आलं की ती पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री चंद्रग्रहणही होत. रात्री गजर लावून उठायचं अस पक्कं करून टाकलं.
तेवढ्यात कँप समोर सुरेख बर्फाच्छादित शिखरे दिसायला लागली. मावळणाऱ्या सूर्याची किरणांनी त्या शिखरांना पिवळी-तांबूस झळाळी दिली होती. सगळे भान हरपून ते दृश्य बघत राहिले. ती ‘अन्नपूर्णा रेंज’ आहे, अशी बातमी आली.
ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता उठलो, पण आकाशात ढग होते. त्यामुळे ग्रहण काही दिसू शकल नाही.