दिनांक १६ जून २०११ (सिरखा ते गाला)
यात्रेतलं रोजच वेळापत्रक साधारण सारखंच असायचं. आम्ही सकाळी ५.०० ला उठायचो. लगेच चहा / कॉफी. प्रातर्विधी उरकून ६.०० ला नाश्ता. त्याबरोबर बोर्नविटा. तोपर्यंत पोर्टर यायला लागायचे. सामान त्यांच्याकडे सोपवून चालायला सुरवात. कँपवर पोचल्या पोचल्या स्वागताला सरबत किंवा ताक! मग जेवण. जर चालण्याच अंतर जास्त असेल तर रस्त्यात एखाद्या ठिकाणी जेवायची सोय केलेली असायची. दुपारी पुन्हा चहा/ कॉफी. संध्याकाळी सूप. रात्री ७ वाजता जेवण आणि झोप.
यात्रेत सगळीकडे कांदा-लसूण विरहित जेवण देतात. प्रत्येक जेवणात हिरव्या पालेभाज्या असतातच. रात्री झोपण्याआधी त्या कँपचे व्यवस्थापक ‘सबने खाना खा लिया? कोई भूखा-प्यासा तो नही है? बीना खाना खाये मत सोना.’ अशी चौकशी करून जायचे. इतकी काळजी घेतल्यामुळे आपण कोणीतरी विशेष व्यक्ती झालो आहोत अस वाटायचं!
बहुतेक सगळ्या कँपवर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. सकाळी /संध्याकाळी थोडा थोडा वेळ दिवे चालवतात. तसेच फोन किंवा कॅमेऱ्याच्या बॅटरी चार्ज करताकँ येतात. हिमालयात जसा दिवस चढेल तशी हवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत पुढच्या पपर्यंत पोचणे उत्तम असते. प्रत्येक बॅचच्या एल.ओ.ना सेंटेलाईट फोन दिलेला असतो. ते रोज बॅचची खबरबात दिल्लीला पोचवतात. तिथे आम्ही दिलेल्या इ-मेल आय.डी. वर ही ‘ताजा खबर’ पोचते. ही छान सोय होती. घरी नवऱ्याला रोजच्या रोज हवामानापासून, कधी निघालो, कधी पोचलो सगळी बातमी असायची. आय.टी.बी.पी. वाले तर फोटो पण वेबसाइटवर टाकतात.
सिरखाला मिळालेल्या माहितीनुसार आजचा रस्ता १४ किलोमीटरचा आणि कालच्यापेक्षा थोडा अवघड होता. रुंगलिंग टॉपची अतिशय खडकाळ अरुंद पायवाट चालायची होती. सगळ्या यात्रींचा ‘ओम नमः शिवाय’चा जप चालू होता.कँप सोडल्यावर थोडा वेळ उतार होता. काही यात्री चालत तर काही घोड्यावर स्वार झाले होते. सामुरे गावाजवळ आमचा नाश्ता झाला. इथे आल्यापासून छोले किंवा राजमा आणि पुरी असा नाश्ता बऱ्याच वेळा असायचा. रोज उठून पुऱ्या खायची सवय नसलेल्यांना जरा वैताग यायचा. पण काही इलाज नव्हता.
सामुरे गावापासून चढण सुरू झाली. गर्द वनराईतून, छोट्या छोट्या झऱ्यातून, चिखलातून चालताना थंडी कुठच्या कुठे पळून गेली. तास-दीड तास चढून गेल्यावर रुंगलिंग टॉप आला. पायवाटेच्या दोन्ही बाजूला अक्रोडाची उंच झाडे होती. अक्रोडाच्या झाडांवर लहान लहान फळ लागली होती. सुरेशभाईच्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या बॅचेसना अक्रोड खायला मिळतात. पण तेव्हा पावसाचा त्रास होतो असही ऐकलं होत. त्यामुळे ‘पावसाच्या त्रासापेक्षा अक्रोड विकत घेऊ’ अशी चर्चा अक्रोडाच्याच सावलीत केली!
आता पुढे होती ती पाय दुखावणारी सरळ उताराची वाट. पाऊस पडून निसरड्या झालेल्या वाटेवरून तोल सांभाळत चालणे म्हणजे कसरत होती. अर्थात सुरेशभाई हात पकडायला होताच. हे लोक आपली इतकी सेवा करतात की त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चिखलाच्या रस्त्यावरसुद्धा ते स्वतः चिखलातून चालतात आणि यात्रींना चांगल्या रस्त्यातून चालवतात. सगळा उतार संपल्यावर सिमखोला नदीजवळ आलो. ह्या भागात अजून मोसमी पाऊस सुरू झाला नव्हता. नदीला अगदी थोडेसेच पाणी होते. त्यामुळे फार त्रास न होता नदी पार केली.
ह्या भागात बिच्छूघास नावाचे झुडूप असते. दिसायला अगदी नाजूक आणि सुंदर. हात लागला की मात्र विंचू चावावा तश्या झिणझिण्या येऊन वेदना होतात. रस्त्यात कुठल्याही अनोळखी झाडांना हात लावू नका, हे आम्हाला खूपवेळा सांगितलं होत. पण आमच्यापैकी एकाचा हात त्या झाडाला चुकून लागला. मग कैलास जीवन पासून ते खोबरेल तेलापर्यंत सगळे उपचार झाले. पण दोनेक तासांनीच त्याच्या वेदना कमी झाल्या.
दिल्ली सोडल्यापासून लेकाशी बोलणं झालं नव्हत. तो पावणेबाराला शाळेत जातो. त्या आधी फोन पर्यंत पोचता यावं म्हणून अधेमधे न रेंगाळता सरळ गाला कँपला पोचलो. पण....... तिथला फोन बंदच होता! घर सोडून आता आठवडा झाला होता. आई-बाबा, नवरा ह्यांची आठवण येत होतीच. पण सगळ्यात जास्त मुलाची येत होती. त्याच्या वयाचे मुलगे बघितले की फारच जाणवायचं. पण आता त्याच्याशी बोलण्यासाठी अजून एक दिवस वाटबघायला लागणार होती.
आता चालता चालता हळूहळू सहयात्रींची ओळख होऊ लागली होती. प्रत्येकाची पार्श्वभूमी, स्वभाव, विचार करायची पद्धत, यात्रेला येण्याचा उद्देश, सगळंच वेगळं. एका अर्थाने हे महिनाभर ‘बिग बॉस’ च्या घरात राहण्यासारखं होत. काही जण अगदी जेवणाच्या रांगेतही ढकला-ढकली करत होते. ह्या उलट काही जण चालताना कोणी दमलं तर धीर देऊन, थोडं बोलून पुढे जायचे. सुरवातीला सगळे आपल्या प्रांतातल्या, आपली भाषा बोलणाऱ्या लोकांबरोबर असायचे. हळूहळू ही प्रांतांची, भाषांची बंधने ढिली होत होती. एकदा कँपवर पोचल्यावर दुसरी काही करमणूक नसायची. त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारणे, उद्याच्या मार्गाबद्दल चर्चा करणे हा एकच वेळ घालवायचा मार्ग होता.
जे यात्री आधी ही यात्रा करून आलेले असतात. त्यांना अशा वेळेला खूप महत्त्व मिळत. आमच्यातले दोन-तीन जण असे अनुभवी होते. गुजराथचा परेशभाई तर आठव्यांदा आला होता. एक मध्य प्रदेशचे अशोकजी ह्या आधी ९८ साली जाऊन आलेले होते. त्यामुळे सगळे त्यांना दुसऱ्या दिवशीच्या रस्त्याबद्दल विचारायला जायचे. ते जी माहिती द्यायचे, त्याची सुरवात नेहमी ‘ सुनो, मै जब ९८ में यात्राके लियेआया था..........’ अशी व्हायची. शेवट ‘ कैसे गये थे, कुछ याद नहीं आ राहा’ असाही व्हायचा!! गुजराथ समाज मध्ये माझी आल्या आल्या ह्यांच्याशी आणि नंदिनीशी ओळख झाली होती. थोडी ओळख झाल्यावर त्यांनी मला ‘ देखो, प्लीज मुझे अंकल मत कहना’ अशी मजेदार विनंती केली. माझ्या डोळ्यासमोर अनेक हेयर डायच्या जाहिराती आल्या.(खरंतर त्यांना केसच नव्हते. त्यामुळे हेयर डायचाही तसा काही उपयोग झाला नसता!!)
मग मी त्यांना ‘नंदिनीके अंकल’ म्हणायला सुरवात केली. सगळ्या बॅचमध्ये हे नाव आणि त्याच कारण पसरल्यावर ते असले वैतागले की बस रे बस. ‘अब फिरसे नंदिनीके अंकल बोला तो एक चाटा पडेगा.’ पण सगळ्यांच्या हातात हे कोलीतच पडलं होत. पूर्ण यात्रा संपेपर्यंत सगळे त्यांना ‘नंदिनीके अंकल’ असच म्हणायचे!!
कँपवर रोज संध्याकाळी भजन व्हायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मार्गाबद्दल सूचनाही मिळायच्या. आमचे एल.ओ. नारंग सर चालताना, जेवताना सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायचे. हळूहळू त्यांच्यासकट सगळ्या पन्नास लोकांची नाळ जुळत होती. चेष्टामस्करी बरोबर एकमेकांना मानसिक धीर देणे, मदत करणे हे सगळं एका कुटुंबासारखं चालू झालं होत.
दिनांक १७ जून २०११ (गाला ते बुधी)
आजचा टप्पा जवळजवळ १९ किलोमीटरचा आणि चांगलाच खडतर होता. जे लोक हिमालयात ट्रेकिंग करून आले आहेत, त्यांना माहिती असेलच की, ट्रेकिंगचे आणि शहरातले किलोमीटर वेगवेगळे असतात!! तिथले १९ किलोमीटर संपता संपत नाहीत!
१९९८ च्या आधी मालपा इथेही कँप असायचा, पण १९९८ च्या दुर्घटनेनंतर तिथे कँप नसतो. त्यामुळे चालायला जास्त अंतर आहे. माहिती पुस्तका नुसार हे अंतर चालायला ७ ते १२ तास लागू शकतात. आजचा टप्पा झाला की तुमची यात्रा झालीच अस समजतात. आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या सूचनांमध्ये सगळ्यात जास्त सूचना ह्याच मार्गाबद्दल होत्या.
रस्त्याच्या अवघडपणाची एवढी प्रसिद्धी ऐकल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होतं. सकाळची प्रार्थना जोरात झाली. गालाचा कँप सोडल्यावर पहिले ७ ते ८ किलोमीटर फार अवघड आहेत. कँपनंतर एक किलोमीटर साधासरळ रस्ता आहे. मग सुरू होते टी ४४४४ पायऱ्यांची अत्यंत अवघड उतरंड!! ४४४४ पायऱ्या? ऐकूनच पाय थरथरत होते. त्यातून डोंगरात उभ्या-आडव्या कशाही बसवलेल्या त्या वेड्यावाकड्या पायऱ्या, त्यात भर म्हणूनझऱ्यांचं पाणी वाहत होत, उजव्या हाताला खोल दरीत सुसाट वाहणारी काली नदी, कठडे इतके कुचकामी की चुकूनही कठडा पकडू नका अस आम्हाला सांगितलं होत.
चालत असतानाच घोडे, खेचर वर-खाली करत होते. तरी आमच्या आमच्या नशिबाने आणि परमेश्वराच्या कृपेने पाऊस नव्हता. नाहीतर अश्या अडचणीच्या रस्त्यावर आणखीन वरून पाऊस आल्यावर काय होत असेल ह्याची कल्पनाच भयंकर होती. सगळं वातावरण भीती वाटेल असच होत. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून उतरत प्रवास चालू होता. एक पाऊल जरी इकडे-तिकडे पडलं तरी कपाळमोक्ष ठरलेला आणि खालून रौद्ररूप धारण करून वाहणाऱ्या कालीच्या उदरात यात्रा समाप्त!
हा सगळा रस्ता, सुरेशभाईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. खूप काळजीपूर्वक आणि सावकाश चालत तो कठीण रस्ता पार केला. हातातल्या काठीने तो मी कुठे पाय ठेवायचा, ते दाखवायचा. बरोबर तसंच चालल्यामुळे कुठेही न घसरता, धडपडता मी नीटपणे चालू शकले. सगळ्या पायऱ्या उतरून झाल्यावर लखनपूर इथे नाश्त्याची सोय केली होती. एक-एक यात्री येऊन थोडं थांबून, पोटपाणी उरकून पुढच्या रस्त्याला लागत होते. पुढे रस्ता तसा सोपा होता. पण अरुंद होता. डोंगरात बांधलेला रस्ता असल्याने बऱ्याच ठिकाणी उंची कमी होती. काली नदी आता अगदी जवळ होती. कालीच्या प्रवाहाचा ध्रोन्कार ऐकू येत होता. त्या आवाजात एकमेकांशी बोलणंही कठीण होत.
मागच्या वर्षी एक महाराष्ट्रातले यात्री परिक्रमा संपवून परत येत होते. तेव्हा फोटो काढण्यासाठी नदीच्या बाजूला उभे राहिले, आणि सामान वाहून नेणाऱ्या खेचराने त्यांना धक्का दिला. ह्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण कालीच्या प्रवाहामुळे त्यांचा मृतदेहसुद्धा हाती लागला नाही. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल देव जाणे.
ह्या प्रसंगामुळे आम्हाला वारंवार ‘डोंगराच्या बाजूला थांबा, नदीच्या कडेला उभे राहू नका.’ अस बजावलं होत. मला फोटो काढावेसे वाटले तर सुरेशभाई मला डोंगराला पाठ टेकून उभं राहायला लावायचा. ह्या रस्त्यावर स्थानिक लोक तसेच मिलिटरीचे जवान ये-जा करत असतात. सगळे जण ‘ओम नमा शिवाय’ च्या गजराने आमचा उत्साह वाढवत होते. रस्त्यातल्या घोडे, खेचरांकडे सुरेश बारीक लक्ष ठेवून होता. फार अरुंद वाट असेल तर तो त्याच्या स्थानिक भाषेत बोलून त्यांना थांबवायचा, हातातल्या काठीने त्यांना बाजूला करायचा.
काही अंतर चालून गेल्यावर जरा बरा रस्ता आला. एक लाकडी पूल पार केल्यावर आम्ही मालपाला पोचलो. भारत सरकार आणि १९९८ च्या दुर्घटनेत मरण पावलेल्या यात्रींचे नातेवाईक ह्यांनी मिळून तिथे एक शंकराचे मंदिरबांधले आहे. तिथे नतमस्तक होऊन आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पुढे वाटचाल सुरू केली.
रस्त्यात लमारी ह्या छोट्या गावात आय.टी.बी.पी.चा कँप आहे. तिथे चहा आणि चिप्सने स्वागत झाले. महत्त्वाचे म्हणजे इथे फोनची सोय होती. सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली. आम्ही आजच्या दिवसाबद्दल जे एकाला होत, ते त्या ४४४४ पायऱ्या आणि मालपापर्यंतचा अवघड रस्ता ह्याबद्दलच. त्यामुळे मालपा आल्यावर वाटलं की झालं आता. पण पुढे जवळ जवळ ८ किमी अंतर बाकी होत. ते चालण्याची मानसिक तयारीच नव्हती. आता ते सगळे चढ-उतार प्रचंड वाटायला लागले. अंतर संपता संपेना. देवाच नाव घेत मी एक एक पाऊल टाकत होते. जवळच्या बाटलीतलं पाणी पीत, सुका मेवा खात चालत होते. आजचा रस्ता म्हणजे हिंदीत ‘ नानी याद आई’ म्हणतात तसा होता. पाय ओढत चालल्यावर बऱ्याच वेळाने कँप दिसायला लागला!! एक पूल पार करून शेवटचा अर्ध्या किलोमीटरचा चढ चढून कशीबशी कँपवर पोचले. पण सगळं अंतर चालत पार केल्याच समाधान वाटत होत.
सर्व यात्रींची अवस्था अशीच झाली होती. सगळे प्रचंड थकल्यामुळे रात्री भजन म्हणायला कोणाच्या अंगात त्राण नव्हत. जेवून सगळे गुडुप झाले.
दिनांक १७ जून २०११ (बुधी ते गुंजी)
आज गुंजीपर्यंत पोचलं की उद्या आराम! गुंजी समुद्रसपाटीपासून साधारण १२००० फुटांवर आहे. इथपासून पुढे विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. ह्या कँपपर्यंत सगळी व्यवस्था कुमाऊ निगम विकास मंडळ करते. गुंजीपासून पुढे आय.टी.बी.पी. व्यवस्था करते. त्यांची इथे परत एकदा मेडिकल होते. विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी इथे दोन रात्री थांबवतात.
पण ह्या सगळ्यासाठी १९ किलोमीटर चालायचं होत!
सकाळी निघाल्यावर पहिल्या तीन-चार किलोमीटर मध्येच ९५०० फुटांपासून १२००० फुटांपर्यंतची छीयालेखची चढण होती. मला निघायला जरा उशीर झाला होता. आज पोनीवाला रमेश मागेच लागला. ‘दीदी, घोडेपे बैठं जाइये. नहींतो बहोत पिच्छे रहोगे’ असा आग्रह झाला. शेवटी मी माझा चालण्याचा पण सोडून त्याच्या ‘लकी’वर स्वार झाले. ‘लक्की एक्सप्रेस’ मुळे भरभर वर पोचले. घोड्यावर बसायचे एक तंत्र असते. ते तंत्र समजून घेईपर्यंत चढण संपली. आता आमच्या बॅचमधल्या बायकांमधली अजिबात घोड्यावर न बसलेली अशी नंदिनीच होती! ती रोज हेवा वाटण्यासारख्या वेगाने चढत होती.
छीयालेख घाटी आणि त्याचा अपूर्व सौंदर्याने नटलेला परिसर पाहून मन मोहरत होते. हा परिसर ‘फुलोंकी घाटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. उंचच उंच पाईन वृक्ष आणि रंगीबेरंगी असंख्य फुलांनी फुललेला घाटीचा सपाट प्रदेश आतापर्यंतची दमछाक विसरायला लावत होता. हिरव्यागार मखमली गवताच्या गालिच्यावर सुंदर रंगीबेरंगी फुले आणि त्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबांवरून परावर्तित होणारी पावसाची किरणे... सगळा प्रदेश देहभान विसरायला लावणारा होता.
ही सुरेख वाट संपल्यावर आय.टी.बी.पी. ची पहिली चौकी आली. चहा-बिस्किटे देऊन जवानांनी आमचे स्वागत केले. पारपत्र तपासणी झाल्यावर व जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद केल्यावर आम्हाला पुढे गर्ब्याल गावाकडे जायची परवानगी मिळाली.
सुंदर नक्षीकाम केलेल्या घरांनी नटलेले हे एक टुमदार पण दुर्दैवी गाव आहे. गर्ब्याल गावाला पूर्वी ‘छोटा विलायत’ म्हणत असत. सन १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी गर्ब्याल ही मोठी बाजारपेठ होती. युद्धानंतर तसेच तिबेट चीनच्या ताब्यात गेल्यावर व्यापारी हालचालींवर निर्बंध आले. इथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. अजून दुर्दैव म्हणजे पृथ्वीच्या पोटातील घडामोडींमुळे आणि प्रचंड वृक्षतोडीमुळे इथल्या निसर्गाचे संपूर्ण संतुलन पार बिघडून गेले. इथली जमीन खचू लागली. सुंदर कलाकुसर असलेली घरे चक्क जमिनीत गाडली जाऊ लागली. जिवाच्या भितीने गाव रिकामे झाले. आताही काही माणसे तिथे राहतात, पण बरीच घरे रिकामी, उदासवाणी वाटली.
इथल्या सगळ्या गावांमधून जाताना सर्व स्थानिक लोक हात जोडून ‘ओम नमा शिवाय’ म्हणून स्वागत करायचे. कुठून आले वगैरे चौकशी व्हायची. चहाचा आग्रह व्हायचा. मी अजिबातच चहा पीत नसल्याने सगळ्यांना नाराजकरावं लागायचं.
गोड, गोंडस छोटी मुले आपल्या बोबड्या भाषेत ‘ओम नमा शिवाय’ म्हणून हक्काने गोळ्या-चॉकलेट मागायची. ही कल्पना आधीच असल्याने मी रोज खिशात गोळ्यांची पिशवी ठेवायचे. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून छान वाटायचं!
गर्ब्याल गावानंतर दोन-अडीच तास चालल्यावर गुंजी कँप दिसायला लागला. आय.टी.बी.पी.चा कँप असल्याने तिरंगा झेंडा डौलात फडकत होता. कँप खूप आधी दिसायला लागतो, पण नदीच्या पलीकडच्या काठाला! ‘ मेरा कँप हैउसपार, मै इसपार, ओ मेरे सुरेशभैय्या ले चल पार, ले चल पार’ अस म्हणावंसं वाटत होत!! एकदा कँप दिसायला लागला की चलण्याच मीटर संपतच. पुढची वाट चालायला नको वाटते.
पण चालल्याशिवाय गत्यंतर नव्हते. बराच वेळ पाय ओढल्यावर एकदाचा तो नदीवरचा पूल आला. पुन्हा अर्धा तास चालल्यावर आधी पोचलेल्या यात्रींची ‘ओम नमः शिवाय’ ही आरोळी ऐकून जीवात जीव आला. कँपवर सरबत पिऊन ताजेतवाने झाल्यावर गुंजी कँपचा परिसर दिसायला लागला. सगळ्या बाजूंनी उंचच उंच निरनिराळ्या रंगांचे डोंगर दिसत होते. कधी पिवळे-शेंदरी, कधी कोंकणातल्या जांभ्या दगडासारखे, कधी चमकदार शिसवी तर कधी राजस्थानातल्या सारखा दिसणारा संगमरवरी. निसर्गाने रंगांची अगदी मुक्त उधळण केली होती.आमच्या बरोबरचे चित्रकार तावडे ह्यांना किती निसर्गचित्र काढू अस होत होत!
सगळ्या कँपवर बायका आणि पुरुषांची राहण्याची वेगवेगळी सोय असते. एका कुटुंबातून आलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. कितीही वेगवेगळं ठेवायचं ठरवलं तरी काही सामायिक सामान असतच. मग त्या लोकांच्या सारख्या फेऱ्या सुरू व्हायच्या. काही पतीसेवापरायण बायका सगळी सेवा करायच्या. आमच्या बरोबरची गुजराथची पायल नवऱ्याला अगदी पेस्ट लावून ब्रश हातात द्यायची. सकाळ झाली की तिचा नवरा संकेतभाई ‘ पायल, जरा ब्रश आपोतो’ करत दारात हजर!! एकदा हे लक्षात आल्यावर, तो दिसला की मी आणि नंदिनीच ‘पायल, जरा ब्रश आपो तो’ अस ओरडायला लागलो!!
जवळच्या आय.टी.बी.पी. कँप मध्ये एक छोटंसं देऊळ होत. रोज संध्याकाळी तिथे भजन होत. आम्ही सर्व यात्री मिळून तिथे गेलो. सर्व जवान स्त्रिया व पुरुष मिळून अगदी जोषपूर्ण भजन म्हणत होती. पेटी, ढोलकी, खंजिरी आणि सगळ्यांचे टीपेला भिडलेले सूर!! यात्रीनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून बरीच भजन म्हटली. त्या तरतरीत, उत्साही ,चुस्त जवानांची ऊर्जा आपल्याला मिळाली आहे अस वाटत होत.
दुसऱ्या दिवशी विश्रांती आणि मेडिकल होती. विरळ हवेमुळे बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. थोडी विश्रांती झाल्यावर आमच्या बॅचमधले डॉ.शहा सगळ्यांचा रक्तदाब तपासून गेले. सगळे एकदम ओ.के!
आता उद्या काय होतंय, ही थोडी काळजी होतीच. पण दिल्लीतल्या मेडिकलमध्ये नापास होऊन परत जाण्यापेक्षा मला गुंजीतून परत जायला चाललं असत. अल्मोड्यापासून गूंजीपर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता. नाहीतरी विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा वारकऱ्यांचा सहवास आणि पंढरपूर पर्यंतचा प्रवास लोभसवाणा असतो, नाही का?