नाडी, त्रिकोण आणि गृहिणीपदावर आफत

गोष्ट काही जगावेगळी नाही. सामान्य, रोजचीच, ‘वरण-भात-भेंडीची भाजी’ टायपातली. आपल्या आजूबाजूला सहज दिसणाऱ्या खूप विरोधाभासी गोष्टींतून साकारलेली. मधल्या काही पिढ्या नाही का, एका विशिष्ट पद्धतीने मोठ्या झाल्या. मुली भरपूर शिकल्या, स्वतंत्र झाल्या आणि बरोबरीने ‘संसाराला चांगल्या अन कामाला वाघ’ अशाही वाढवल्या गेल्या. त्यातून कधी गोंधळल्या, कधी बाहेर पडल्या तर कधी गोंधळ वाढवत गेल्या. प्रत्येक कृतीमागे दोन-तीन प्रकारचे परस्पर विरोधी, उपरोधपूर्ण विचार छळत गेले त्यांना. त्यातून कधी वैताग वाढला तर कधी नर्मविनोदी घटना तयार झाल्या. अशा विविध ठिकाणी, विविध वेळी घडलेल्या आणि स्थळ-काळानुरूपदेखील विशेष न बदललेल्या छोट्या छोट्या गोष्टींतून माझी नायिका जन्माला आलीय. तिच्या ‘background’ ला सतत काही ना काही आवाज येतच असतात. कधी तिला तिच्या मोकळेपणाची, स्वातंत्र्याची जाणीव करून देतात तर कधी विलक्षण अपराधीपणाचीसुद्धा. अशा या गोंधळात चाचपडणारी, एरवी खमकी असली तरी छोट्या छोट्या गोष्टींत गोंधळून जाणारी ही माझी नायिका. गरजेनुसार, संधीनुसार स्वतःच्या भूमिकांचा समतोल साधणारी. त्या नायिकेच्याच शब्दात सांगायचं तर, “अशी खूप झाडं आहेतच की आजूबाजूला जी छान उन-पाणी-खतावर पोसून मोठ्ठी झालीत पण घराच्या बागेत अस्ताव्यस्त दिसू नयेत म्हणून वेळोवेळी फांद्या छाटून घेऊन सुबकही राहत गेलीत”
-------------------------------------------------------------------------------------------------

नाडी, त्रिकोण आणि गृहिणीपदावर आफत

गृहकृत्यदक्ष आदर्श नारीचा आजचा दिवस जरा आरामातच गेला होता. अंगात ताप होता म्हणून दिवस लोळूनच काढला होता. म्हणजे काही ताप असतानाच आराम करायला मिळतो असं नाही, नवरा चांगलाय तिचा. एरवी वेळी अवेळी आराम करत झोपा काढल्या तरी काही म्हणत नाही बिचारा. पण आज ताप असल्याने हक्काचं कारण होतंच जवळ. असं सकाळी उशिरापर्यंत, पुन्हा दुपारच्या (आयत्या) जेवणानंतर, पुन्हा संध्याकाळच्या चहानंतर लोळत पडलेलं आज चालेल गं, असं तिने (पक्षी: गृहकृत्यदक्ष आदर्श पण स्वतंत्र नारीने) स्वतःला (पक्षी: स्वतंत्र तरी गृहकृत्यदक्ष आदर्शपणाच्या घोळात पाय अडकलेल्या नारीला) समजावलं होतं. तसं ते ‘गृहकृत्यदक्ष.....’ हे काही तिचं खरं नाव नाही, तिचं छानसं रुबाबदार बंगाली नाव तिला तिच्या आईने दिलेलं. पुढे योगायोगाने एका बंगाल्याच्याच प्रेमात पडून तोच तिचा नवरा झाला. हा तसा तिच्या आयुष्यातला “हौ एक्साईटिंग ना” म्हणण्याजोगा योगायोग होता काही काळ. मग लग्न जुनं झालं. असो. तर हां, तशी ती कमावती, बऱ्यापैकी डायनामिक वगैरे, बरीच वर्षं होस्टेलमध्ये राहून स्मार्ट-बिर्ट झालेली. म्हणून बरीच स्वतंत्र सुद्धा. पण शेवटी कसं, “तुम्ही कितीही कलेक्टर का होईनाss, तुम्हाला खानसामा का मिळेनाssss... त्याने भाजी आमटी नीट केलीय की नाही हे कळायला स्वतःलाहि हे सगळं यायलाच लागतं नाs” म्हणून घरातली सग्गळी सग्गळी कामं येणारी (शेवटच्या अक्षरांचे आssकार कमी जास्त केलेले असून ते स्थळ-काळ-पिढ्या-विचार इत्यादींतला सूक्ष्म फरक दर्शवतात हे एव्हाना आजच्या काळातल्या चाणाक्ष, बहुआयामी, व्यासंगी बायांना कळलं असेलच... मsssग हल्लीच्या काळात असं स्मार्ट असावंच लागतं बाईsss). तरी तिच्या वयात तिच्या आईने केलं तसं भरतकाम-वीणकाम (तेही नोकरी सांभाळून) नाहीच येत तिला. आणि नेमकं ते तिच्या सासूबाईंना खूप छान येतं. म्हणजे तशी काही पूर्ण ‘गृहकृत्यदक्ष.....’ मटेरीअल नाहीच्चे ती.

तर अशा ‘कॅटेगरीतल्या’ बायांचं आजारपण जसं असू शकतं तसं होतं आज तिचंही. जास्तीची झोप, घरात नवऱ्याची मदत, आज त्याचा घरातला वावर, काळजीने कपाळावर हात ठेऊन बघणं हे अर्धवट झोपेत जाणवून छानही वाटत होतं... त्यातून परत बिजनेस पार्टनरसुद्धा नवराच (पुन्हा “हौ एक्साईटिंग ना”) त्यामुळे काम नं करूनही एक दिवस सूट मिळू शकत होती. (तसा तो चांगलाय बिचारा. ऑफिस १० चं असलं तरी घरात कचरेवाला आणि धोबी येऊन गेल्यानंतर ११ वाजेपर्यंत ऑफिसला जायची मुभा तिला आहेच की, आता अजून किती हवं या पोरींना??) असा आरामात दिवस गेल्यावर संध्याकाळी बॉम्ब पडला. हलक्या हाताने दंडावर थोपटून नवऱ्याने उठवलं आणि सांगितलं की तो अमका तमका मित्र येतोय... रात्री इथेच राहील.. त्याच्याकडे लाईट नाहीयेत आज. आता मोठ्या शहरांच्या उपनगरांमध्ये अजूनही अशा गोष्टी होतात.. पण नेमकं आजच?? म्हणजे घरात पसारा, tv टेबलवर धूळ, घरात फक्त लाल भोपळा उरलेला, कपडे अस्ताव्यस्त (ती आजारी नाही का आज??) आणि त्यात पाहुणे???? तिच्या आदर्श गृहिणीपदावर खतरा मंडराने लगा एकदमच !! तरफडत उठायच्याही आधी अजून झोपही पूर्ण उघडलेली नसताना आठवले ते अस्ताव्यस्त वाळत घातलेले कपडे.... सलवारची लटकणारी ती नाडी जी तिच्या नजरेला सलवार वाळत घालतानाहि छळत होती...ते टोकाला टोक न जुळवता घाईघाईत वाळत घातलेले पंचे आणि कुडते.. (नाही म्हणजे, एरवी नसतं असं, आज जराss).. जीवाच्या आकांताने ती नवऱ्याला म्हणाली, “अरे मेरी च-ब पडी है बाथरूम में” तो गोंधळून तसाच उभा राहिला. त्याला वाटलं ताप हिच्या डोक्यात गेला की काय! तोवर आगामी संकटाची चाहूल लागून हिची झोप उडालीच होती, लक्षात आलं की याला च-ब कुठलं माहित असायला!! तो खास तिच्या घरातल्या बायकांचा शब्द. असं उघड उघड चड्डी-ब्रेसिअर म्हणायचं असत का? कुण्णाला कळायला नको म्हणून ‘च-ब’. एकदा अर्धवट वयात चड्डी-ब्रेसिअर असं म्हणाल्यावर आजी खेकसली होती, “काय रावणासारखं चड्डी-ब्रेसिअर म्हणता गं?? आतले कपडे तरी म्हणा.” तेव्हा विचारलंही होतं की रावणाला ब्रेसिअर कशी माहित असणार, आजी? (बाकी, सगळ्यांसमोर पादणं, मोठ्यांदा ढेकर देणं, स्लीवलेस घातल्यावर हात वर करून काखा दिसू देणं हे सगळं ‘रावणासारखं’ असायचं तेव्हा. थोडक्यात ‘चांगल्या गुणी’ मुलींनी करू नये अशा सगळ्या गोष्टी रावण करत असणार अशी तिची समजूत होती बराच काळ) पण आता ती स्वतः गृहिणी झाली आहे ना!! मग असले उद्धट प्रश्न नाही विचारायचे हे तिला कळतं. आता साधारणतः सगळ्याच बायका च-ब घालत असल्या तरी आपण घालतो हे ठसठशीत पुराव्यानिशी का कळू द्या ना त्या मित्राला? म्हणून उठली... एक दोरी रिकामी करताना background ला विविध बायकांच्या आवाजांच्या मिश्रणातून एक वाक्य कानावर पडलंच ,”ह्हो, आजारी ना.. म्हणून कालचे वाळलेले कपडे अजून दोरीवरून उतरवले नव्हते, भारी कौतुक मेलं तापाचं” त्याकडे दुर्लक्ष करून कपडे पुन्हा अरेंज करायला घेतले. घाईघाईने बाथरूममधल्या च-ब आणून दोरीवर घातल्या. त्यातही वर बघताना चक्कर येत होती तरी धडपडून सगळे ‘त्रिकोण’ एका दिशेत ‘नीट झाकले जातील’ अशा पद्धतीने वळत घातले.(आजारी असलं म्हणून काय, ‘शील-रक्षणासाठी’ सावध असायलाच हवं).सलवार खस्सकन ओढून सप्पकन त्यातली नाडी खेचली. अर्धवट ओली नाडी बाहेर यायला त्रास द्यायला लागली तेव्हा मनातल्या मनात ‘व्यवस्थित’पणाच्या ज्या कल्पनांची गुटी वाढत्या वयात तिला पाजली गेली होती त्यावर एक क्षण दात-ओठ खाल्ले. लहानपणी पडायचा प्रश्न की, काय बिघडलं ब्वा नाडी लोंबत राहिली तरी? पण मग कळलं की अशा गोष्टींतून घरातली बाई किती व्यवस्थित आहे ते कळत, म्हणून अशा नाड्या लोंबू द्यायच्या नाहीत, ‘त्रिकोण’ नीट झाकायचे, वगैरे. आणि आता तर तिच्या घराची आदर्श सम्राद्नी तीच नाही का? म्हणजे मग हे लक्षात ठेवायलाच हवं. एव्हाना नाडी निघाली होती. मग ते कपडे ठीकठाक वळत घातले, पुढच्या दोरीवर गाऊन चांगला पसरवून घातला. तिचा आवेश पाहून एव्हाना नवऱ्याने समजूत करून घेतली होती की ती बरी झाली आहे त्यामुळे चहा तीच करेल. त्याला वस्सकन एकदा आजारपणाची जाणीव करून देऊन ती पुन्हा बेडरूममध्ये वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायला गेली. नवरा मुकाट्याने चहाचं आधण ठेवायला गेला. तेवढ्यात आलाच तो मित्र (तरी tv टेबल पुसायचं राहिलंच). आता त्याला भेटायला हवंच ना. तेवढ्यात नेमकी शी लागली. आता काय हा आचरटपणा!! घरात पाहुणे असताना गृहिणीला शी लागावी?? बरं एरवी सासरी, माहेरी किंवा ज्या दूरदेशातल्या छोट्याशा गावातलं घर सोडून ती इथे आली होती तिथली घरं मोठी मोठी आहेत, होती... तुम्ही संडासात जा की अजून कुठे, बाहेर पत्ता म्हणून लागायचा नाही. इथे एवढंसं नकट घर. सगळी चाहूल सगळ्यांना लागणार. आता काय, शी च आहे, सगळ्यांनाच लागते, असं म्हणून गेली एकदाची दामटून. बसल्या बसल्या ‘घरात मोरी अन मुतायची चोरी’ ही म्हण आठवून हसूच आलं. शब्दशः प्रत्यय. हसू फिस्सकन बाहेर पडणार तेवढ्यात स्वतःला सावरलं. एकतर घरात पाहुणा असताना अवेळी गृहिणी संडासात, त्यात अजून फिस्सकन हसण्याचा आवाज. कुणाला काही भलतं वाटलं तर? बरं दिसेल का? झालं एकदाचं शेवटी. बाहेर येऊन त्याला हाय हेल्लो म्हटलं. चेहरा तेलकट (वेळेत धुवायचा राहिला नेमका) अन उतरलेला दिसत असल्याने त्याच्या लक्षात आलंच की तिला बरं नाहीये. तू झोप म्हणाला. ती आत वळत असताना म्हणाला, “ चांगलं असत असं कधीतरी आजारी पडणं, कंपल्सरी आराम मिळतो, काsssय? ह्य:ह्य:ह्य:” भला आहे बिचारा!!
-------------------------------------------------------------------------------------------------

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle