बरेच दिवस नवर्याबरोबर प्रॅक्टीस केली. पण कुठेतरी काहीतरी चुकत होते. नवर्याला गाड्या प्रचंड आवडतात लहानपणापासून. तो फारच शाळेत वगैरे कार शिकला. (नगरमध्ये कोण बघतंय!) त्यामुळे त्याला, माझ्या डो़क्यात येणारे प्रश्न, अडचणी कळायच्याच नाहीत. गाडी पार्क करताना दोन पांढर्या रेषांमध्ये एका टर्नमध्ये कार बसवणे हे मला जास्तीची टुथपेस्ट परत ट्युबमध्ये ढकलण्यापेक्षाही अवघड वाटायचे. आणि मग एका झटक्यात जमले नाही पार्किंग की तो वैतागायचा. एव्हढे कसे जमत नाही तुला! वगैरे वगैरे..
मग रात्री जेवण झाल्यावर मोकळ्या जागी जाऊन पॅरलल पार्किंगची प्रॅक्टीस करा, रिव्हर्स सरळ रेषेत घ्या, पार्किंग सफाईदारपणे करा वगैरे न संपणारी प्रॅक्टीस चालायची. आधीच देश नवा, इतके रूल्स ते पाळणे प्रचंड गरजेचे!(लग्नाआधीच निनाद स्टॉप साईनला पुर्णपणे थांबला नाही म्हणून त्याला तिकिट मिळाले मग नव्याने ऑनलाईन लेसन्स घेऊन वाईट परीक्षा द्यावी लागली होती, ह्या सर्व सुरस कथा मी इंडीयात बसून याहूच्या मेसेंजरवरून ऐकल्या होत्या!) शिवाय भाषा समजत असूनही अॅक्सेंट कळत नसल्याने येणारे अडाण्यासारखे फिलिंग..प्रत्येक वेळेस लेन बदलताना येणारे टेन्शन्+अॅड्रेनलिन रश. सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे स्पीड. मला एकंदरीत पुण्याच्या ट्रॅफिकची सवय असल्याने स्पीड कधी २० माईल्सच्या पुढे गेला नसेल. पण इथे बर्याचदा ४० माईल्स बेसलाईन आणि ६०-६५ प्रिटी कॉमन. मला जबरा भिती वाटायची. त्यात गिअर वाली गाडी. त्यात उजवा हात. त्यात व्हॅलीचे उंच सखल रस्ते! एकदा चढावर सिग्नल लागला, मग गाडी मागे जातीय की काय, लालचा हिरवा झाल्यावर एकदम पिकअप जमेल का ह्या धांदलीत वर्स्ट नाईटमेअर खरे ठरले! गाडी मागे जायला लागली! असो.. एकंदरीत दिव्य गोंधळ होता आयुष्यात! पण कधीतरी निनादला वाटले की येतीय आता बायकोला कार बरी. मग बिहाईंड द व्हील टेस्टचा मुहूर्त काढला. आमच्या कॅमरिओ गावात डीएमव्ही नव्हते. मग शेजारील थाउजंड ओक्समध्ल्या ठिकाणी अपॉ मिळवली.
तिकडे गेलो आणि हीऽ लाईन! ती लाईन पाहूनच दडपण आले. आख्ख्या आयुष्यात मी डीएम्व्हीच्या लाईनमध्ये जितका वेळ उभी राहीलीय तितक्या वेळात किमान पाच वेबसाईट्स तयार करून होतील माझ्याकडून! :straightface: नंबर आल्यावर डोळे तपासून, इतर काही प्रश्नमंजुषा झाल्यावर गाडीत जाऊन बसायला सांगितले. आणि गाडी एका विशिष्ट रांगेत उभी करायची. तिकडे मग ड्राईव्ह थ्रुसारखे एक एक इन्स्ट्रक्टर येऊन बसणार आणि जाणार परीक्षा घ्यायला. माझा नंबर आला. इन्स्ट्रक्टर एक बाई होती. तिने कमांड्स द्यायच्या की पुढच्या सिग्नलला उजवीकडे वळ, डावीकडे जा, यु टर्न घे, लेन बदल इत्यादी. फेअर इनफ. मी ती सांगेल तशी जात होते. मुळात थाउजंड ओक्स हे अत्यंत नयनरम्य गाव आहे! व्हॅलीमध्ये राहण्याची मजा असते. प्रत्येक टर्नला वेगळे दृश्य दिसते. तसेच नावाप्रमाणे गावात थाउजंडच नाही तर भरपूर ओक्सची झाडं आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटत होते. जरा टेन्शन होतेच अर्थात. एके ठिकाणी, रेसिडेन्शियल कम्युनिटीत नेऊन तिथे योग्य तो वेग कमीजास्त करतीय का, इंटरसेक्शनला दोन्ही दिशेला बघतीय का वगैरे चालू होते. एके ठिकाणी थांबून सरळ रेषेत गाडी बॅक अप करायला सांगितली. ती बहुधा जमली असावी. असं होत होत आम्ही तर जायला लागलो परत डीएम्व्हीच्या दिशेने. आम्ही जेव्हा सकाळी आलो होतो तो रस्ता सरळसोट होता व मला वाटले आपण तिकडेच चाललो आहोत. मात्र तिने झप्पाक्कन ह्या सिग्नलला डावीकडे जा असे सांगितले. झालं! मी जरा गडबडले. तरी गाडी व्यवस्थित वळवली डावीकडे आणि जात होते तेव्हढ्यात ती म्हणाली हा वळ डावीकडे, आणि जा आत! मला तो रस्ता आधी दिसलाच नव्हता (नाहीतर मनाची तयारी केली असती) मी अफाट गडबडले. त्या चिंचोळ्या सिंगल लेन रस्त्यावरून झप्पाक्कन डावीकडे वळताना अंदाज चुकला आणि मी डीएमव्हीत जायच्या फटीपेक्षा गाडी तिरकी घातल्याने ऑनकमिंग ट्रॅफीककडे तोंड करून अवाक होऊन, आता काय करायचे न सुचून एक सेकंद ब्लँक झाले! :hypno: :surprise:
समोरून गाडी येऊन थांबली होती. मग पटकन कार रिव्हर्स करून थोडी मागे, व्हील वळवून डावीकडे असं करत करत आत नेली गाडी आणि तिने सांगितले त्या जागेवर नेऊन पार्क केली. इन्स्ट्रक्टर सावकाश माझ्याकडे वळली आणि म्हणाली.. "You were driving so nicely the whole test! What happened at the last moment? That was a dangerous maneuver. You have not made any other mistakes. But 'That' was the critical error! You have failed the test!"
हातातोंडाशी आलेला घास निघून गेला होता. तिकडे लांब कोपर्यावर निनाद हाताची घडी घालून अँक्शसली काय होतेय त्याची वाट पाहाताना दिसत होता. त्याचे तसे उभे राहणे, हाताची घडी, काळजीचा चेहरा हे चित्र दगडावर कोरावे तसे कोरले गेले आहे! काय करणार, इतक्यांदा पाहिलेय त्याला तसे.
निराश मनाने बाहेर आले. निनादला सांगितले. तो म्हटला डोंट वरी. बहुतेक कोणीच पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होत नाही. मी पण फेल झालो होतो! (आत्ता सांगतोयस होय हे चोरा! :surprise: ) मग आपला नवरा पण पहिली टेस्ट फेल झाला होता म्हणजे आपण ठिकच आहोत असं म्हणत, झाले गेले गंगेला मिळाले म्हणत आम्ही घरी आलो. जी लेखी परीक्षा झाली त्यावर एका परीक्षेला ३ बिहाईंड द व्हील टेस्ट अलाउड असतात. त्यामुळे आता निदान परत लेखी परीक्षा द्यायची नव्हती! आता परत नव्या दमाने प्रॅक्टीस करून टेस्टला जायचे व लायसेन्स घेऊन यायचेच असे ठरवून आम्ही घरी आलो..
-क्रमशः