मायबोलीवत सद्ध्या शतशब्दकथांची लाट आली आहे. एक शशक मीसुद्धा मायबोलीवर लिहिली. तिच इथे प्रकाशित करते आहे.!!
==========================================================================================
खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने तिने तो पुरस्कार स्वीकारला - महिला सशक्तीकरण पुरस्कार. उपेक्षित आणि वंचित महिला, मुलींसाठी तिने केलेल्या कार्याचा हा गौरव होता.
पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात तिने आपल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. भाषणाच्या शेवटी ती म्हणाली "महिलांना सशक्तीकरणाची गरजच नाही. स्त्री हीच एक शक्ती आहे. पण तिने ते ओळखायला हवे. महिलांनी स्वतंत्र विचार करायला, त्याप्रमाणे वागायला शिकले पाहिजे. तेच खरे तिचे सबलीकरण असेल " उपस्थित लोक भारावून गेले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ती घरी आली. लगेच पदर खोचून स्वयंपाकघरात गेली. बाहेरून सासूबाईंचा आवाज आला "साबुदाणा भिजत घातला आहेस ना? उद्या वटपौर्णिमा आहे. उपास करायचा आहे ना!!". तिने मुकाट्याने साबुदाणा भिजत घातला.