साडी... भारतीय स्त्रीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पुरातन कालापासून हा वस्त्र विशेष आपल्या वैशिष्ट्यांसहित स्त्रीमनात एक खास जागा बनवून आहे. श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटकाळी पुरविलेली कधी न संपणारी साडी असो कि आपल्या त्याच अलौकिक भावाला द्रौपदीने फाडून दिलेली भरजरी पदराची चिंधी असो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस सन्मानाने परत पाठविताना शिवरायांनी तिला दिलेली खणनारळाच्या ओटीसोबतची मानाची साडी असो, पदराने बाळाला पाठीशी बांधून स्वदेश संरक्ष्णार्थ संग्रामात उतरलेल्या झाशीच्या राणीची साडी असो. ... हे नाना रंगांचं, पोतांचं विणलेलं
भरतकामाने सजविलेलं कापड प्रत्येक स्त्रीच्या मर्मबंधातली ठेव असतं. आपल्या संग्रहात असलेल्या अन काही नसलेल्याही साड्यांशी स्त्रीचं एक अतूट नातं निर्माण होतं. ते फक्त जन्मभर टिकतं असं नाही तर आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जातं.
भारतीय स्वातंत्रलढ्यामध्ये, तुरुंगात बद्ध असताना लेकीसाठी हातमागावर साडी विणणारे पंडित नेहरू आठवा, शहरगावी गेल्यावर आठवणीने बहिणीसाठी साडी घेउन येणारा भाऊ लक्षात घ्या किंवा अमेरिकेत जन्मलेल्या नातवासाठी आपल्या मऊ, सुती पातळांच्या छानश्या हात शिवणीच्या गोधड्या बनवून पाठविणारी आधुनिक आजी !! साडी हे आपल्या साठी कधीच नुसतं एक वस्त्रं नसतं ते असतं आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम. एखादी नवपरीणिता पतीबरोबर बाहेर जाताना हलक्या गुलाबी नाहीतर आसमानी रंगाची टिकल्या जडविलेली साडी नेसते, कोणी रूपगर्विता संध्याकाळच्या समारंभात उठून दिसेलशी काळी, सोनेरी काठांची रेशमी साडी नेसते. डोहाळतुलीला गडद हिरव्या रंगाची साडी कौतुकाने नेसविली जाते तर सौभाग्य कांक्षिणीला पिवळी अष्टपुत्री. या मागे नुसतंच तयार होणं, भेटवस्तू देणं नसतं तर एक निश्चित, खोलात जाऊन केलेला विचार असतो. गुलाबी रंग प्रेमाचा द्योतक, आसमानी तरल स्वप्नांचा! सोनेरी काठ मूळचेच सुरेख रूप आणखी खुलवतात. हिरव्या रंगाने निसर्गाच्या सर्जनशीलतेशी सांगड घातली जाते तर पिवळा रंग लग्नात लावल्या जाणार्या हळदीशी सांगड घालतो.
खंडप्राय पसरलेल्या आपल्या भारत देशात माहिती तंत्रज्ञानाचे आगर असलेल्या महानगरांपासून ते शेतीवर उपजीविका करणार्या दुर्गम पहाडी खेड्यापर्यंत सर्वत्र साडी हा वस्त्रप्रकार पाहायला मिळतो. अनेक उत्पन्नगटातल्या, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील व वयोगटातील स्त्रीया आवडीने व सातत्याने साड्या नेसतात. देश जागतिकीकरणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असला तरीही साड्यांची मोहिनी उतरलेली नाही. उलट कालमानाप्रमाणे, राहाणीमानात झालेले बदल सामावून घेऊन हे साडी प्रकरण दिवसेंदिवस अधिकच मोहक व वेधक होत चालले आहे. जागतिक औद्योगिकीकरणानंतर यंत्रमागावर कापड विणले जाऊ लागले. विसाव्या शतकाच्या मध्यावर रेयॉन, नायलॉन, पॉलिएस्टर असे स्वस्त व सुता-रेशमापेक्षा वेगळे गुणधर्म असलेले धागे वापरात येऊ लागले. कापडावर चित्रे छापली जाऊ लागली व अगदी कमी वेळात स्टार्च - इस्त्रीची गरजच न भासणारे, हर तर्हेच्या डिझाइन्स व पॅटर्न्सने नटलेले साड्यांचे गठ्ठे च्या गठ्ठे बाजारपेठेत येऊ लागले. सुरतेच्या स्वस्त आणि मस्त पराग साड्या आठवतच असतील ना ! नाविन्याची जात्याच हौस असलेल्या स्त्रीमनास ह्या नव्या रूपातल्या साड्या पसंत पडल्या नसत्या तरच नवल. घरकाम- नोकरी नाहीतर मजुरी काम, बालसंगोपन अशी अनेक आव्हाने सांभाळणार्या , धावपळीचे, दगदगीचे जीवन जगणार्या महिलांना तर अश्या साड्या वरदानच वाटू लागल्या. हे जरी खरे असले तरीही भारत ज्या साठी प्रसिद्ध आहे ते हातमागावरील वीणकाम अस्तंगत पावलेले नाही. खास प्रसंगांसाठी, खास व्यक्तींसाठी साडी खरेदी करताना प्रथम विचार होतो तो ह्या पारंपारिक विशेषांचा. हातमागांवर विणलेल्या सुती किंवा भरजरी रेशमी साड्या आजही
जनमानसात मानाचे स्थान पटकावून आहेत. याला कारण म्हणजे भारतात असलेले साडीनिर्मितीतले वैविध्य व कौशल्य. उत्तरेतील बनारसी, रेशमी सणंग, पूर्वेकडील कांथाकाम केलेल्या, तनछोई/ ढाकाई किंवा संबळपुरी रेशमी साड्या, पश्चिमेतील पटोला, घरचोला, मध्यभारतातील चंदेरी, महाराष्ट्रातील येवल्याच्या पैठण्या, अन दक्षिणेतील....... थांबा ; अहो दक्षिणेत एक का आहे साडी प्रकार? कितीतर तर्हा आहेत. सर्व एकापेक्षा एक सुरेख आणि लोभस, चला परिचय करून घेऊया साडीच्या ह्या दक्षिणरंगांचा.
महाराष्ट्रातून दख्खनच्या पठारावरून खाली उतरल्यावर आपण दक्षिण भारतात प्रवेश करतो. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व केरळ ह्या भारताच्या दक्षिणेकडील राज्यात साड्यांची आणि एकु़णच वस्त्रप्रावरणांची आश्चर्यकारक विविधता आढळते. दक्षिण भारताची ही सुपीक भूमी अनेक संस्कृतींचे आश्रयस्थान आहे. तेलंगणा- निजामी हैद्राबादकडची गंगा जमनी जीवनशैली, रायलसीमा, तटीय आंध्रप्रदेशातील कडवेपण, तमीळनाडूची शेतीवर आधारित जीवनपद्धती, केरळ मधील बॅकवॉटर्सच्या पाण्यावर जोपासली गेलेली सिरीअन ख्रिश्चन, मोपला मुस्लिम व हिंदू यांची संमिश्र जीवन पद्धती या सर्वांचा परिणाम ह्या प्रदेशातील साड्यांच्या निर्मिती वर, त्यात वापरल्या गेलेल्या चिन्हांवर त्यांच्या रचनेवर झालेला दिसून येतो.
कर्नाटकातील बंगलोर, म्हैसूर, कोलार, तुमकूर व मंड्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर रेशीम उत्पादन होते. हा रेशीम धागा शेजारच्या तामीळनाडू व आंध्रात पाठविला जातो. ह्या राज्यांतील हातमाग विणकरांच्या सहकारी संस्थांना साड्यांच्या रचनेतील नवनव्या पद्धती व ग्राहकांच्या पसंतीच्या ट्रेंडस अवगत असतात. त्या नुसार सुती व रेशमी साड्यांचे उत्पादन होऊन ते चोखंदळ ग्राहकांना सादर केले जाते. उत्तमोत्तम साड्या निर्यात देखील केल्या जातात. तामिळनाडू मध्ये देशाच्या एकूण कच्च्या रेशीमधाग्यापैकी १० % रेशीमधाग्याचे उत्पादन केले जाते. रुंद काठ व काठाच्या विरोधी रंगाचे अंग
ही दक्षिणेतील साड्यांची खासियत. ह्या साड्यांमध्ये विणकाम व रंगकामाच्या विविध तंत्रांचा उपयोग होतो. अगदी बारीक, एक इंच रुंदीच्या काठांच्या साड्यादेखील सप्लिमेंटरी वार्प पॅटर्नचे तंत्र वापरून बनविल्या जातात. दोन्ही प्रकारच्या साड्यांत खालचा काठ संपूर्ण साडीच्या लांबीचा असतो व पदरापर्यंत असतो. कोरनाड किंवा टेंपल साडी ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या रेशमी साड्यांचे काठ भरगच्च रुंद असतात. त्यावर फुले, हत्ती, मोर अश्या शुभ चिन्हांची रचना केलेली असते. मस्टर्ड, विटकरी, राखाडी, ऑफ व्हाइट अश्या रंगात मिळणार्या ह्या साड्या दिसायला साध्या पण उच्च अभिरूची दर्शक असल्याने दक्षिणी स्त्रीयांना फार प्रिय असतात. कोर्नाड साडीच्या काठाला मोक्कू( कळी) पोगुडी( त्रिकोण) पिलाइयार मोक्कू( करवतिचे डिझाइन) अश्या रचना असतात. करवत काठी साडीस करवाई म्हणतात. साड्यांना रंगांप्रमाणे नावे असतात जसे, लाल काठाची अरक्कू व पिवळ्या करवत काठाची पुडापायलम करवाई साडी. ह्या साड्या बहुतांशी कांचीपुरम, सेलम अर्नी, चेन्नै, कुंभकोणम व तंजावूर येथे तयार होतात. यातील मुभागम साडी मध्ये खालचा व वरचा काठ दोन्ही सारख्या रुंदीचे असतात.
चेटटीनाड चिकन, चेट्टियार लोकांच्या भल्या मोठ्या हवेल्या आपणांस माहित असतीलच ब्रम्हदेशात व्यापारासाठी जाणारे, श्रीमंत लोक म्हणजे हे तामिळनाडूतले चेट्टियार. सूत वरेशीम मिसळून विणलेल्या ह्या साड्यांवर पारंपारिक मोटिफ्स असतात. चौकडी, आडवे पट्टे विणकामातच अंतर्भूत असतात.
चेन्नईपासून ७६ कि.मि. दूर असलेले कांचीपुरम हे कांजीवरम रेशमी साड्यांचे जन्म स्थान आहे. इथे मोठ्या प्रमाणावर रेशीमकिड्यांची पैदास होते व त्यांच्यापासून मिळणारा मऊ, चमकदार रेशमी धागा
कांजीवरम साड्यांसाठी वापरला जातो. अनंत रंगांची उधळण, तलम गर्भरेशमी अंग, भरजरी सोनेरी काठ व लखलखते ब्रोकेडचे पदर म्हणजे कांजीवरम साडी. साडी संगीतातील बडा ख्यालच जणू. चांदीच्या धाग्यावर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिन्ग करून ती जर वापरली जाते. एकेक साडी विणायला १५ दिवस ते २ महिनेही लागू शकतात. साड्यांवर मोर, पोपट, हरणे, कमळे बुट्टे, कोयर्या, हंस अशी सुखद चिन्हे विणलेली असतात कुशल कारागीर त्यांत रामायण, महाभारत, भगवतगीतेतील देखावे,
रवीवर्म्याच्या नायिका, पल्लव मंदिरातील मोटिफ्स विणतात. जरीचे चौकोन तसेच आडव्या किंवा उभ्या पट्ट्या असलेल्या खास तामिळ ढंगाच्याही साड्या मिळतात. आजकाल कोरिअन व चिनी रेशमापासून कमी वजनाच्या कांजीवरम साड्याही बनविल्या जातात. चेन्नई मधील टीनगर मध्ये खरेदी केलेल्या हिर्याच्या कुड्या व पनगल पार्क मधील नल्लीज मधून घेतलेली कांजीवरम साडी म्हणजे तमीळ नववधूंचे स्वप्नच असते. त्यात नल्लीज हे मराठी उद्योजक नसल्याने त्यांच्या सर्वत्र
तसेच अगदी आंतरजालावरही शाखा आहेत. याशिवाय धर्मावरम, मदुराई कॉटन साड्या ही प्रसिद्ध आहेत.
कांजीवरम साड्यांमधील एक नवीन प्रकार म्हणजे शॉट सिल्क इफेक्ट्च्या साडया. ह्यात विणताना सोनेरी धाग्याबरोबरच दोन वेगवेगळे रंग एकत्र येतात जसे गुलाबी व किरमिजी. ह्यामुळे फिरत्या रंगाचा एक खानदानी परिणाम साधला जातो.
केरळमधील वैशिष्ट्यपूर्ण सोनेरी काठपदराची व ऑफ व्हाइट रंगाची मस्लिनसुती-रेशमी कलाराकुडी साडी जगभर प्रसिद्ध आहेच. ह्या साडीवर भरपूर सोन्याचे दागिने घातल्या शिवाय केरळी नववधूंचा शृंगार पूर्ण होतच नाही मुळी. मुंडू व नेरियाथु हा त्यातलाच एक रोजच्या वापरातील उपप्रकार. तिरुवनंतपुरम जिल्ह्यात विणल्या जाणार्या बलरामपुरम साडीत काठासाठी खरी जर वापरली जाते. पारंपारिक हातमागावर विणल्या जाणार्या ह्या साडीत तान्याबान्यासाठी १०० काउंटपर्यंतचा धागा वापरला जातो.
कर्नाटकातील म्हैसूर व बंगलोर रेशमी साड्या त्या मानाने अगदी वेगळ्या! तलम वजनाला हलक्या व बारीक काठाच्या. दिवसभर घालून मिरवायला किंवा कार्यालयात एखादी महत्त्वाची मीटिन्ग असल्यास
प्रोफेशनल भारतीय स्त्रीसाठी अगदी योग्य लुक देते ही साडी. कांजीवरम किंवा इकत पोचमपल्ली साड्यांच्या तुलनेत ह्या साड्यांचे रंग नव्या पद्धतीचे व कलर काँबिनेशन्स आधुनिक असतात.
बेळगावची स्पेशालिटी असलेल्या जिजामाता सिल्क साड्या तसेच इरकल प्रकारातील साड्या म्हणजे पारंपारिक काठपदराच्या साड्यांची अगदी चरम सीमा. ह्या साड्यांत वापरलेले अंगाचे/ काठाचे विरोधी रंग तसेच फिरत्या रंगाची रेशमी जादू अगदी मोहिनी घालते. मोकलमुरू रेशमी साडयांवर चौकोनात बसविलेले पारंपारिक मोटिफ्स असतात. पदरावर पक्षी व माश्यांच्या पारंपारिक रचना विणलेल्या असतात.
मंगलगिरी, वेंकटगिरी, गदवाल, नारायणपेट, पोचमपल्ली ह्या नावांमध्ये एक समान धागा आहे कोणता बरे? ही आहेत आमच्या आंध्रप्रदेशातील गावे व प्रत्येक गाव तिथे बनणार्या साडीसाठी प्रसिध्द आहे.
आंध्रप्रदेशातील गरम हवामानात वावरायला अनुकूल अश्या सुती, हलक्या साड्या मंगलगिरी व वेंकटगिरी साडी प्रकारात मोडतात. नाजूक बुट्टे, दोन अडीच इंच उंचीचे काठ व शालीन सौन्दर्याचे प्रतीक असे पदर, सौम्य रंग व भरपूर लांबी रुंदीच्या ह्या साडया सुती तसेच सूत-रेशीम ह्यांच्या मिश्रणातून जन्मास येतात.
आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबाद येथे पुण्याच्या तुळशी बागेसारखा बडीचौडी नामक भाग आहे. निजामी काळापासून हैद्राबादेत स्थायिक झालेल्या मराठी लोकांचे वास्तव्य असलेला हा गजबजलेला भाग आहे.
१९४२ साली श्री. फडके यांनी इथे गजानन क्लॉथ स्टोअर्स नावाचे कपड्याचे दुकान उघडले. हातमागावरील पारंपारिक पद्धतीच्या साड्या, धोतरे, पीतांबर, बायकांनी पूजेत नेसायच्या मढी नामक
रेशमी साडया इथे उपलब्ध असतात. काळाच्या गरजेनुसार ह्या दुकानाचे आता संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. मालाच्या सुलभ वर्गिकरणासाठी बारकोडचा वापर केला जातो. दुकानातील सर्व माल
विणकरांकडूनच मागविला जातो. त्यांच्या दुकानात पाचवारीच नव्हे तर नऊवारी साड्या देखील मिळतात. शहरातील तेलुगु, तामिळ व कन्नडा आणि मराठी समाजात पारंपारिक सणंगासाठी हे दुकान अतिशय विश्वासार्ह आहे. दक्षिणेत लग्नाच्या वेळी वधूने नेसायची लाल काठाची व पांढरी मधुपर्कम साडी खास इथेच मिळते. अगदी नऊवारी सुद्धा. " आमच्याकडील नऊवारी साड्या मंदिरातील देवीच्या मूर्तींना नेसविण्यासाठी खास घेतल्या जातात. देवीला नेसविण्यासाठी कमी लांबी-रुंदीच्या साड्या ऑर्डर देउन मागविल्या जातात. देवीच्या साड्या तीन मीटर लांब व २६ इंच रुंद असतात. त्यांना भरजरी काठ असतात ह्या साड्यांना कल्याणी साडी असे नाव आहे. " असे फड्क्यांच्या स्नुषा सौ. मंजुषा फडके ह्यांनी सांगितले. नारायणपेठ साड्या देखील आम्ही थेट विणकरांकडूनच मागवितो असे त्या म्हणाल्या. विणकरांना मागणी पुरविणे अवघड जात आहे इतकी ह्या हातमागावरील साड्यांची डिमांड आहे. जसजसा भारतीय समाज देशी-परदेशी वसत आहे, तसतसे अश्या साड्यांचे महत्त्वही कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. जपानी पारंपारिक वेष, किमोनो जसा आता रोजच्या वापरातून अस्तंगत होत चालला आहे तसे भारतीय साडीचे नक्कीच होणार नाही. जिथे भारतीय ललना तिथे साडी असणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोचमपल्ली किंवा इकत हे तुलनेने आधुनिक प्रकारचे विणकाम आहे. ह्यांच्या पॅटर्न्स मध्ये व गुजराती पटोला विणकामात साधर्म्य दिसून येते. एनुगा, चिलुका, अन्नू, पूवू हे पॅटर्न्स भौमितिक चौकटीत बसविलेले असतात. विणकर कृत्रीम रासायनिक रंगही सहजगत्या वापरतात त्यामुळे इकत साड्या सर्वत्र
लोकप्रिय आहेत. ह्यामध्ये विणकर वार्प व वेफ्ट धागे एका विशिष्ट चतकोर आकाराच्या वार्पिंग ब्लॉक वर ताणून बसविले जातात. एका ब्लॉक वर ३५ पेग्ज असतात. मग डिझाइनप्रमाणे धाग्यांचे संच बनविले जातात. विणकामाच्या प्रक्रियेत साड्या अनेकवेळा रंगविल्या जातात. हे बांधणीशी जवळीक साधणारे आहे परंतु ह्यात सूत विणायच्या आधीच रंगविले जाते.
गदवाल साडीचा उल्लेख केल्याशिवाय आंध्रप्रदेशातील साड्यांची माहिती अपूर्णच राहील. बंगलोरचे मलबेरी सिल्क चा व सुती धागा यांचे मिश्रण करून ह्या साड्या बनविल्या जातात. खरी जर, सोन्याचे चांदीचे सुरतेवरून आणवलेले धागे वापरून साडीचे अंग व बुट्टे विणले जातात. मोर, रुद्राक्ष व अश्रफी बुट्टे ह्या साड्यांवर प्रामुख्याने आढळतात. अंगात विणलेले रेशमी चौकडे म्हणजे गदवाल साड्यांचे व्यवच्छेदक लक्षण!
कलमकारी ब्लॉक प्रिंटिंग म्हणजे आंध्रातील एक महत्त्वाची कला आहे. हे तंत्र वापरून व नैसर्गिक रंगांचा वापर करून साड्याही बनविल्या जातात. येथील सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे काम करणार्या श्रीमती लक्ष्मीदेवीराज ह्यांच्या संग्रही एक दुर्मीळ निळी कलमकारी साडी आहे जी त्या विशेष प्रसंगी नेसतात.
हे सर्व पारंपारिक साडी प्रकार वापरून केलेल्या डिझाइनर साड्या पण दक्षिणेत मिळतात. हैद्राबादेत कलांजली, माय चॉइस, मीना बझार, नीरूज, रंगोली अश्या ठिकाणी ह्या साड्या घेता येतील.
दक्षिणेत कोठेही गेले तरी समोर येते इडली व सोबत चट्णी- सांबार. तसे कोणतीही साडी म्हटली तरी बरोबरीने त्यावर घालायचे ब्लाउज व परकर ह्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्याशिवाय साडीचा लुक पूर्ण होणारच नाही. डिझाइनर तसेच मॅचिंग ब्लाउज, हरप्रकारचे परकर पुरविणारी बाजारपेठ साड्यांच्या बाजारपेठेच्या आधारानेच उभी असते. हैद्राबाद्च्या बंजारा हिल्स भागात अनघा बुटीक चालविणारी सर्वमंगला ह्यात तज्ञ आहे. तिने डिझाइन केलेले ब्लाउजेस व साड्या ह्या उच्चभ्रू भागात राहणार्या चोखंदळ ललनांना नेहमी पसंत पड्तात. मग कधी येताय दक्षिण भारतात साड्या घ्यायला? हे दक्षिणरंग तुमच्या मनावर मोहिनी घालायला अगदी सज्ज आहेत.
माहेर मे २०११ मध्ये पूर्वप्रकाशित.