ती_आणि-त्या १

ती

पण काय हरकत होती त्यांनी सोहमला दोन तास सांभाळायला. तिची नुसती चिडचिड चालली होती. पॉपकॉर्न फुटावे तशी ती फुटत होती. सोहम च्या जागी निशा ताईंचा अर्णव असता तर त्यांनी दोन तास काय दोन महिने बघून घेतलं असतं. तुझ्या आईला मला कधीच मदत करायची नसते. ही काही आजची पहिली वेळ नाही. लग्न ठरल्यापासून बघते आहे मी. काहीही करताना निशा ताईंना माझ्यापेक्षा चांगलं घेतात त्या. मला काही करायचं झालं की त्या आजारी तरी असतात, किंवा उरकायचं म्हणून उरकतात.
नाही म्हणायला घरात मदत करतात, पण कधी तोंड उघडून कौतुक करायचं नाही की कशाला चांगलं म्हणायचं नाही. बोलणं तर इतकं मोजून मापून जणू काही पैसेच पडणार आहेत दोन शब्द सुनेशी जास्त बोलल्या तर.
हां आता मी काय करावं याबद्दल कधी काही सांगत नाहीत, पैश्याबद्दल तर चुकूनही विचारत नाहीत. पण तरी स्वतःहून कोणती गोष्टही करत नाहीत. आता मी जर त्यांना एखादी साडी आणली, तर लगेच पुढच्या महिन्यात तेवढ्याच किंमतीची साडी मला आणून देतील. आपण सगळे एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यावर जेवणाचं बिल दिलं तर पुढच्या वेळी पुढे होऊन लगेच त्या नाहीतर बाबा बिल देतील. बाबा आपले साधे सरळ आहेत, कधीतरी चुकून ते बिल द्यायला लागले तर याच डोळे मोठे करून बघतील.
आम्ही नवरा बायको कुठेही फिरायला गेलो तरी यांची तक्रार भुणभुण नसते, आता माहेर जवळ आहे त्यामुळे आईकडे जाणे येणे असतेच पण त्यावरून गेल्या दहा वर्षात कधी बोलल्या नाहीत पण सोहमला कधी एक दिवस त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत.
आम्ही ही समजून घेऊन सोहमला शाळेनंतर दोन तास पाळणाघरात ठेवायचं ठरवलं होतं. सगळे नीट चाललं होतं, पण नेमक्या त्या काकू आजारी पडल्या आणि आता काहीतरी वेगळी सोय करावी लागणार हे लक्षात आल्यावर त्यांनी साफ हात वर झटकले. म्हणजे आता मला नोकरी सोडावी लागेल नाहीतर सोहमला आईकडे सोडावं लागेल. तसा तो आधीही आईकडेच असायचा दिवसभर म्हणा.त्यावर आता हा काय म्हणतोय माहित नाही. बरं हा आता दुसरीत आहे, स्वतः सगळं करून घेतो, तसा त्याचा काही त्रास नाही, फक्त त्याच्याशी भरपूर बोलावं लागतं. सतत तो काहीना काही विचारत असतो. पण काय हरकत आहे तुमचाच नातू आहे ना तो.
यांच्यासाठी आम्ही दुसऱ्या शहरात आलेल्या चांगल्या संधी घालवल्या, वेगळे घर घेतलं पण राहायला गेलो नाही. घरात कायम कोणतीही गोष्ट करताना दोघांना विचारात घेऊन मगच निर्णय घेतले, आता आमची ही थोडी गरज त्यांना पूर्ण करता येत नाही का?

त्या

मला खरं तर ही इतकं बोलणारी सून नकोच होती, पण पोराला पसंत पडली आणि आमच्यासाठी पवित्र झाली. कसं काय लोकांना इतकं बोलवतं बाबा मला कधीच कळलं नाही. यांचं तोंड कसं दुखत नाही कधी. ही काय हिचा गोतावळा काय साधी सरळ गोष्ट एका वाक्यात सांगून कधीच संपवणार नाहीत. हे लांबण लावणार त्याला. आता लग्नानंतर आम्ही एकत्र राहणार म्हणजे तिची काहीच हरकत नव्हती त्याला उलट तिला तसेच घर हवं होतं. पण मग मला साधी सरळ हाक मारायची सोडून प्रसादच्या आई असं म्हणायला लागल्यावर मात्र मीच म्हटलं, काकू, मावशी, आत्या, आई सासूबाई अशी काहीही हाक मार.
माझी लेक निशू पण माझ्यासारखीच अबोल, कधी मनातलं काही बोलणार नाही, माझ्यासारखीच असल्यामुळे मला बरोबर तिच्या मनातलं कळायचं. आता ती नोकरी नाही करत, त्यामुळे स्वतःवर खर्च पण नाही करत कधी म्हणून मी कधी तिला जरा काही जास्त घेतलं की लगेच सून बाईंच्या पोटात दुखायला लागायचं. मला हे जसं लक्षात आलं मग आपलं निशाला काहीही द्यायचं असलं की हिच्यासमोर देणंच बंद केलं. तिने आणि तिच्या नवऱ्याने अगदी ठरवून मुलगा मोठाहोईपर्यंत एका तरी पालकाने घरीच थांबायचा निर्णय घेतला, आणि मस्त घरबसल्या शक्य आहे ते ते सगळं करते ती. मुलाला कसं अगदी छान वळण लावलं आहे, अगदी सॉफ्ट आहे, हळू बोलतो, ओरडत नाही, आला की त्याचे पुस्तक घेऊन बसतो, कधीतरी चित्र रंगवत बसतो. काही म्हणून बघावं लागतं नाही त्याच्याकडे. आणि आमचा सोहम म्हणजे बरोबर त्याचं दुसरं टोक आहे. एक मिनिट हा मुलगा एका जागी शांत बसत नाही. नुसता बोलत तरी असतो, नाहीतर काही तरी शंका विचारत असतो. ह्याला हात लावेल, ते पाडून ठेवेल, नुसता गोंधळ असतो हा घरात असला म्हणजे.
आता यांची गरज म्हणून आम्ही दोन तास त्याला सांभाळायचं म्हणे, मुळात आम्हाला ण विचारता त्यांनीच हा निर्णय घेतला. मला पहिले राग त्याचा आला, मग नंतर तिने अर्णव आणि सोहम ची तुलना करायला सुरुवात केली, आता जर मी हिची आणि निशा ची तुलना केली तर आवडणार आहे का हिला. तरी मी काही बोलायला गेले नाही, फक्त साफ सांगितलं आम्हाला जमणार नाही, तुम्ही दुसरी काही तरी सोय बघा. हे म्हणत होते असे एकदम तोडू नकोस, पण माझे म्हणणं आता परत अडकून पडायचं का/ एखाद दिवसाचा प्रश्न असता तर ठीक होतं,पण रोज जमणार नाही बाबा. आमचा फिरायचा ग्रुप मस्त जमलाय सगळं विसरावं लागेल आता.
आज दहा वर्षात मी कधीच ह्यांना काहीच विचारलं नाही, उलट त्या दोघांना तिघांना कायम फिरायला जायला सुचवलं, ते गेले की तेवढंच माझे घर परत मला माझं वाटायचं. हिने घराची शिस्त पूर्ण बदलवली, पण मी काही बोलले नाही, तिचीहौस होऊन जाऊ देत म्हणत गप्प राहिले. घर खर्चात आम्हीही त्यांच्या एवढाच वाटा उचलला, त्यामुळे तर ते दोघं त्यांचं स्वतःच घर घेऊ शकले पण कधी त्याबद्दल काहीच बोलले नाही हे दोघेही. आता जेव्हा केव्हा बाहेर गेलो तर यांच्यावर भार नाही पडू दिला आमचा, एकदा यांनी खर्च केला म्हणाल्यावर पुढच्या वेळी लगेच आम्ही केला.
खरंतर मला किती तरी गोष्टी पटत नाहीत त्यांच्या, सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण नको कशाला म्हणत दर वेळी गप्प बसले, आणि तसेही बोलणे माझ्या स्वभावात नाही. पण यावेळी मात्र राहवलं नाही आन ठाम पणे माझा निर्णय सांगितला. शेवटी सासू म्हणून माझाही मान आहेच ना..!
मानसी होळेहोन्नुर

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle