वाडा (कथा): भाग ३

तेव्हढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. बस एक आचका देत थांबली. पाठोपाठ कंडक्टरचा आवाज "चाफे फाटा". चला सुमीतराव "मिशन देसाई वाडा कॉलिंग.... यो..."

सुमीत आपली सॅक सावरत बसमधून उतरला. रस्ता क्रॉस करुन गावाकडे चालू लागला. इतक्या तासांचा प्रवास करुन आला असूनही शीण जाणवत नव्हता त्याला, उलट छान प्रसन्न वाटत होते. लहानपणीच्या ओळखीच्या खूणा त्याला दिसत होत्या. बरंच काही तसंच होतं. फार बदल झाले नव्हते गावात गेल्या पाच-सहा वर्षांत. काही मिनिटे चालून गेल्यावर तो थबकला एक क्षणभर. डाव्या अंगाला देसाई वाडा नजरेस पडला. एक अनामिक अशी भितीची लहर अंगातून चमकून गेली, पण क्षणभरच. लगेच सावरले त्याने स्वतःला. मुद्दाम चालण्याची गती अगदी मंद करीत तो रमत गमत वाडा निरखू लागला. वाडा तसाच उदास, भकास, केविलवाणा भासत होता.अंगण होते की नाही असा संशय यावा इतकी झुडपं वाड्याभोवती वाढली होती. वाड्याच्या आत आणि बाहेर कुठेही कोणाचाही मागमूस त्याला लागला नाही, कसलीही हालचाल जाणवली नाही. भुताला बहुदा समजले असावे की मी येतोय त्यांचा खात्मा करायला आणि आधीच पसार झाले ते, स्वतःशीच मिश्किलपणे हसत तो पुढे जाऊ लागला. वळणावरचा मारुतीचा पार लागला.तिथून मागे वळून परत एकदा त्याने वाड्यावर नजर टाकली आणि झपाझप पावले टाकीत चालू लागला.

दिवेलागणीच्या सुमारास सुमीत गावात पोहोचला. आत्या मंदीराच्या गाभार्‍यात दिवा लावत होती. मंदिरातला तो शांत नितळ प्रकाश, उदबत्तीचा मंद सुवास, मूर्तीवरची ताजी फुलं सगळं कसं प्रसन्न वातावरण होतं.आत्या वळली नि समोर सुमीतला पाहताच धावतच सामोरी आली त्याच्या स्वागताला. तोच हसतमुख, शांत चेहरा, पांढरी सुती साडी, डोळ्यांखाली काळी वर्तुळे. "ये ये सुम्या, ये, कसा झाला प्रवास?" अशी त्याची विचारपूस करत आत्याने त्याचे स्वागत केले. चहापाणी झालं, ख्याली खुशाली विचारुन , सांगून झाली. सुमीत जरा गावात पाय मोकळे करुन येतो असे म्हणत घराबाहेर पडला.

गावात भटकत असतांना सुमीतला जाणवले की गावात फारसे बदल झालेले नाहीत. ठराविक पठडीतलं आयुष्य जगणारी ही माणसं, म्हणूनच कोणतेही बदल चटकन स्वीकारणार नाहीत. आपल्याला आपले काम फार निगुतीने करावे लागेल. लहानपणापासूनच सुमीतला रहस्य,गूढ कथा वाचायला त्यावर आधारीत सिनेमे बघायला भारी आवडत असे. त्यातील रहस्याची उकल हिरोने कशी केली ? काय काय शक्यता विचारात घेतल्या यावर तो नेहमी विचार करत असे. हेच कारण असावं देसाई वाडा त्याला आकर्षित करीत होता स्वतःबद्दलचे गूढ सोडवायला. त्या रहस्य कथांत लिहिल्याप्रमाणे ती जी घटना घडली असते त्या वेळची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती यांचे बारकाईने निरीक्षण, विचार करणे आवश्यक असते. सुमीत त्याबद्दलच विचार करीत चालत होता.अचानक एक युवक त्याला सामोरा आला आणि त्याच्याकडे रोखून बघू लागला. "ए तू, तू सुम्या का? वहिनीसाहेबांचा गोव्याचा भाचा?" सुमीतने रोखून पाहिले "अरे मुकुंदा?" होकारार्थी मान डोलवत त्याने स्वतःची ओळख पटवली आणि दुसर्‍याच क्षणी कडकडून सुमीतला मिठी मारली.

मुकुंद म्हणजे गावच्या पाटलांचा मुलगा, साधारण सुमीतच्याच वयाचा. सुमीत सुट्टीत इथे आला की दोघे एकत्र खेळायचे. दोघांची छान गट्टी होती. मुकुंदाने आय टी आयचा इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला होता. आजुबाजुच्या गावांतून त्याला लहान मोठी कामे मिळत असत.

मुकुंदा इथे गावातच राहतोय हे समजतांच सुमीतला अर्धा गड जिंकल्यागत झाले. एकतर तो त्याचा खास बालमित्र होता आणि दुसरे असे की त्याचे वडील गावचे पाटील होते. उद्या देसाई वाड्याबाबतीत काही कमी जास्त झालं तर गावकर्‍यांचा विरोध मॅनेज करायला असा पॉवरफुल माणूस आपल्या बाजूने असणं ही जमेची बाजूच होती.

मुकुंदाला उद्या निवांत भेटून बोलुयात असे सांगून सुमीत घरी आला. आत्याने त्याच्यासाठी बांगड्याचं कालवण आणि तांदळाची भाकरी असा फक्कड बेत केला होता. सुमीत मजबूत जेवला. आत्याही प्रेमाने आग्रह करकरुन वाढत होती त्याला. जेवणं आटोपल्यावर सुमीतने असेच आडून आडून विचारले की आत्या तू इथेच राहतेस का गं? वाड्यात जात नाहीस?" आत्या म्हणाली"काही काम असेल तर तिथे जाऊन येते.पण रहाते इथेच". "का गं? तो एव्हढा मोठा वडीलोपार्जित वाडा आहे ना रिकामा?" सुमीत चाचपणी करीत होता. "हम्म, नाही रहावंसं वाटत तिथे" आत्याने उदास स्वरात उत्तर दिलं. "आणि तुझ्या वाड्यात? गावाबाहेरच्या?" हे आत्याने ऐकलं मात्र तिची चर्याच बदलली. डोळे पाण्याने डबडबले. सुमीतला कसनुसं झालं. उगाच आत्याला दुखावलं असं वाटू लागलं. त्याने झटकन विषय बदलला आणि वातावरण हलकं केलं. एकुणात आत्याने बरंच काही मनात दडवून ठेवलं होतं तर,ज्यावरची खपली सुमीतच्या बोलण्याने निघाली होती.

आत्याच्या घरात झोपण्याच्या आग्रहाला न जुमानता सुमीत रात्री मंदीराच्या अंगणात पथारी टाकून झोपला. प्रवासामुळे थकला असल्यामुळे पडताक्षणीच त्याला गाढ झोप लागली. सकाळी जाग आली ती एका सुगंधाने, मंदीरात लावलेल्या उदबत्तीचा मंद सुवास होता तो. आत्याची पुजा सुरु होती तर. सुमीत उठला. पटापट स्वतःचे आवरुन आला. आत्याने त्याची फर्माईश म्हणून तांदळाच्या पीठाचे घावणे आणि ओल्या नारळाची चटणी बनवली होती. पोटभर नाश्ता करुन आणि तॄप्तीचे ढेकर देत सुमीत म्हणाला, "आत्या, काल मुकुंदा भेटला होता गावात पाटील काकांचा. त्याने घरी बोलावलेय. त्याच्याकडे जाऊन येतो हं". आत्या "बरं" म्हणाली.

मुकुंदाच्या घरी जाताच पाटील काका आणि काकींनी त्याची अगत्याने विचारपूस केली. इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्या. जरा वेळाने मुकुंदाला बाहेर जाऊन येऊ म्हणत सुमीतने त्यांच्या घरातून कल्टी घेतली. दोघे फिरत फिरत लहानपणीच्या आठवणी काढत समुद्रकिनारी पोचले. या निवांत ठिकाणी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून सुमीतने त्याला इथे येण्याचे त्याचे प्रयोजन सांगितले. मुकुंदाचे याबद्द्लचे मत अजमावून पाहिले. मुकुंदाने गावातल्या लोकांचे मन वळवणे शक्य नाही हे ठामपणे सांगितले. हा असा सुरुवातीलाच मुकुंदाने नन्नाचा पाढा वाचल्यावर सुमीत उखडलाच. "अरे पण प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? आपण जाऊ की घराघरात आणि लोकांना आपली भुमिका समजावून सांगू". मुकुंद मात्र स्वतःच्या मतावर ठाम होता. आपल्या वयाच्या मुलाने अशी सपशेल हार मानलेली पाहून सुमीतच्या अंगाचा तिळपापड होत होता. "मग बसा असेच वर्षानुवर्ष भुताखेतांच्या सावटाखाली. लोक चंद्रावर, मंगळावर पाऊल ठेवतायत आणि इथे आपण देसाई वाड्याला निष्कारण गेली दहा-बारा वर्ष टाळं ठोकून आपला पराक्रम मिरवतोय. तिथे घरात ती आत्या वाड्याचं नाव घेताच मुळूमुळू रडत इमोशनल ड्रामा करतेय आणि इथे तू सेफ गेम खेळू पाहतोस. चल यार सोड, मी जातो परत उद्याच्या एस टीने घरी. या गावचं काही होणार नाही च्यामारी."

सुमीत तिरीमिरीत ऊठून जाऊ लागला. मुकुंदाने त्याला बळेच थांबवले. “अरे ऐक मित्रा. हे असं काही व्हावं असं मलाही वाटतं रे. बाबा तर बोलायचे इतकी मोक्याच्या जागी प्रॉपर्टी आहे , तिथे हॉटेल टाकलं तर काय झ्याक चालेल. कोकण टूरिझम डेव्हलप करायला सरकार कर्ज पण देतंय हल्ली कमी व्याजानं”. मुकुंदा नकळत बोलून गेला आणि सुमीत चपापलाच. "काय? काय बोललास तू वाड्याला हॉटेलमध्ये कन्व्हर्ट करायचं असं पाटील काका म्हणत होते?" मुकुंदाने जीभच चावली पटकन., "न..न.. नाही म्हणजे तुझ्या आत्याकडून, थोरल्या मालकांकडून रीतसर विकत घेऊन, कागद्पत्र बनवूनच रे, असाच थोडंच?" मुकुंदा कसंनुसं हसत म्हणाला. "पण ते तसं होईलंसं वाटत नाही. मी एक काम करतो. रात्री बाबांशी बोलून त्यांना तुझा मनसुबा सांगतो. काये ना? आपल्याला कोणा मोठ्या जाणत्या माणसाचा पाठिंबा असंलेला चांगला नाही का?" "हम्म" सुमीत म्हणाला. उद्या वडीलांशी या विषयावर सविस्तर बोलून काय ते सांगतो असं मुकुंदाने सांगितलं आणि दोघं घरी परतले.

सुमीतच्या डोक्यातून मात्र मुकुंदाच्या तोंडून सुटून गेलेलं वाड्याचं हॉटेल बनवणं हे काही केल्या जात नव्हतं. गेली कित्येक वर्षं मुकुंदाचे वडीलच गावचे पाटील होते. थोरले जमीनदार गाव सोडून गेल्यावर त्यांचाच एकछत्री अंमल होता गावावर. आजही आहेच.चांगलेच होते तसे ते. आत्याशीही फार आदराने वागत दोघं पती-पत्नी. पण हे असं हॉटेल चालू करण्याचं काय त्यांच्या मनात असावं? हाच हेतू आणि कारस्थान नाहीये ना या सगळ्यामागे? आधी धाकट्या जमीनदाराचा काटा काढला, थोरले मालक आपोआप मार्गातून दूर झाले. राहता राहिली आत्या. तिला घाबरवून इथून घालवून दिले की.......

सर्रकन काटा आला सुमीतच्या अंगावर. आपण इथे येण्यामागचं कारण मुकुंदाला सांगून चूक तर नाही ना केली? आपला बालमित्र आहे तो हे मान्य पण मध्ये काही वर्षांची गॅप पडलीये, या कालावधीत काय काय घडून गेलंय कोणास ठाऊक. पाटील काकाही बोलायला बरे आहेत, पण कुणाच्या मनाचा थांग लागतो का कधी? आपल्याला पाटीलकाकांच्या प्लॅनची टीप मिळालीये हे कळलं तर हे प्रकरण आपल्या अंगाशीही येऊ शकतं. काय करावं? सोडून द्यावा का हा नाद? उद्या मुकुंदाला न भेटताच तडक गोवा गाठावा झालं. आपण बरं नि आपलं घर बरं. गेला खड्ड्यात साला देसाई वाडा.उलटसुलट विचारांनी सुमीत भंजाळला.

घरी पोचला तो तर अस्वस्थच होता. आत्या आईचा फोन येऊन गेल्याबद्दल काही बाही बोलत होती, त्याचे लक्षच नव्हते. आत्याने निरखून पाहिलं एकदा त्याला आणि विचारलं "काय झालं रे सुम्या? कुठे होतास? गावाबाहेर वाड्यापाशी नव्हता ना रे गेलास? " “नाही गं आत्या, तिथे नव्हतो गेलो मी, विश्वास ठेव जरा", सुमीत खेकसला.

तो दिवस असा बेचैनीतच गेला. रात्री सुमीतला धड झोपही लागली नाही.आत्याच्या खोलीतून उदबत्तीचा सुगंध येत होता, आत्या ही जागीच आहे तर. जप करत असतांना ती ही अदबत्ती लावत असे. सुमीतने शांतपणे विचार केला की उद्या मुकुंद काय म्हणतोय हे तरी पाहू. जर काकांच्या मनात काही वेडंवाकडं असेल तर ते आपल्याला या बाबतीत काही करु देणारच नाहीत. पण जर त्यांनी मदत करायची तयारी दाखवली तर बघुयात की पुढे जाऊन. जरा सावध रहावं लागेल एव्हढंच. वाटल्यास गोव्याहून आपल्या एका मित्राला मदतीसाठी बोलावून घ्यावं. रिस्क तर होतीच. पण
सुमीतला असं अॅडव्हेंचर करायला लहानपणापासून भारी आवडायचं. रहस्य कथांतल्या हिरोसारखं आणि बॉलीवूडमधल्या अक्षय कुमारसारखं, स्वतःचे स्टंटस स्वतःच करायला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच मुकुंदा थडकला. त्याला आलेला पाहतांच सुमीत त्याला घेऊन घराबाहेर आला. आत्याला या सार्‍या प्रकाराची ताकासतूर खबर लागू द्यायची नाही हे आधी मुकुंदाला निक्षून सांगितलं त्याने." हं बोल आता, का आला होतास?" सुमीतने विचारणा केली. "बाबांशी बोललो रात्री, त्यांनी तुला भेटायला बोलावलंय आमच्या वाड्यावर". मुकुंद म्हणाला. "तू हो पुढे मी आलोच" म्हणत सुमीत घरात गेला. आत्याला फक्त चक्कर मारुन येतो सांगून निघाला.

पाटील काका सुमीतची वाटच बघत होते. तो आल्यावर लगेच त्याला घेऊन ते आणि मुकुंदा आतल्या खोलीत आले. दार लावून घेतलं. "इथे कसं निवांत बोलता येईल आपल्याला" म्हणत काकांनी थेट विषयालाच हात घातला. "तुम्ही लोक कसे वहिनीसाहेबांच्या भावकीतले. तूच असं ठरवतोयस हे ब्येसच की.आम्ही काय हो उपरे, आम्ही काही करायला जावं तर आमचाच संशय यायचा म्हणून आम्ही आपलं गप होतो इतकी वर्षं. आता काय करायचंय बोल तू."

"काका", सुमीत बोलू लागला. त्या वाड्यात जायचे, सगळं काही आलबेल आहे हे पहायचे आणि गावकर्‍यांना तशी हमी द्यायची की आम्ही वाड्यात जाऊन आलो. तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. लगेच नाही पणा थोड्या दिवसांनी लोकांचा विश्वास बसू लागेल आणि मग हे वाड्याबद्दल जे नाही नाही ते बोललं जातं ते सारं आपोआप थांबेल. मग बघू पुढे आत्या काय म्हणतेय ते".

"ह्म्म" पाटील काका विचाराधीन झाले. मी तुम्हा दोघांबरोबर आहे. पण जे कराल ते सावधपणे आणि या कानाचं त्या कानाला कळणार नाही असं. आधीच जर ही बातमी फुटली तर लोक विरोध करतील. मी सांगतो ऐका. संध्याकाळी साधारण साडेसातला शेवटची एस टी येते. त्यावेळी थोडी वर्दळ असते त्या बाजूला. ती वेळ एकदा गेली की कोणी फिरकत नाही तिथे. त्यानंतर तुम्ही जा बघा.” अगदीच कुणी पाहिलं तर मी आहेच सावरुन घ्यायला. मात्र पहिल्याच वेळेला जास्त वेळ नको. लवकर परत या.

सुमीतला पटलं त्यांचं बोलणं. वाड्याची चावी थोरल्या मालकांकडेच असते. त्यामुळे आत शिरायचं तर नवी चावी बनवून घेणं हे पहिलं काम होतं. आता चावीवाल्याला इथे आणायचं तर तो तयार व्हायला हवा आणि त्याचं तोंड बंद ठेवायला हवं. आता काय करावं? मुकुंदा म्हणाला, "आधी आपण दोघं बाहेरुन अंदाज तर घेऊ मग बघू." ठरलं तर आज संध्याकाळीच शेवटची एस टी निघून गेली की वाड्याकडे कूच करायचं.

क्रमशः

भाग ४

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle