बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग ३)

*बिच्चारा कॅन्सर......आणि मी*
(भाग ३)
बाराव्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर ला मी माझं ब्लड सँम्पल देऊन परत येत होते. वाऱ्यामुळे केसांची एक बट सारखी डोळ्यांवर येत होती. तिला मागे सारायला म्हणून हातात धरली तर ती बट एकदम माझ्या हातात निघून आली. 'केस गळणं' सुरू झालं होतं. मनात पहिला विचार आला माझ्या मुलींचा - त्यांना काय वाटेल? नक्कीच दोघी घाबरतील. त्यामुळे त्यांना सांगतानाच असं सांगायला पाहिजे की त्या दोघी हे सगळं पॉझिटीव्हली घेतील. घरी गेल्यावर त्यांना दोघींना जवळ घेऊन समजावलं," डॉक्टर अंकल म्हणाले की जेव्हा या औषधाचा परिणाम सुरू होईल तेव्हा तुमचे केस गळायला लागतील. पण सगळं औषध शरीरातून बाहेर गेल्यावर पुन्हा सगळे केस येतील. त्यामुळे जेव्हा माझे केस गळायला लागतील ना तेव्हा आपण सेलिब्रेट करायचं. कारण त्याचा अर्थ असा की मी लवकरच पूर्णपणे बरी होणार आहे." दोघींनाही ते पटलं. त्यामुळे माझ्या केसगळतीला त्या निष्पाप जीवांनी  अगदी  आनंदानी स्वीकारलं. माझी एक मोठी काळजी दूर झाली.

पण मला माझ्या या नवीन रूपाची , rather, केस नसल्यामुळे माझ्या झालेल्या 'अवरूपाची' जाणीव करून देणारे लोक ही भेटले मला. एका ओळखीच्या बाईंना माझ्या या 'अशा' दिसण्यामुळे माझी खूपच काळजी (?) वाटत होती ! त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ," किती छान होते ग तुझे केस! पण आता हे काय होऊन बसलं!! तुला स्वप्नातही नसेल ना वाटलं की स्वतःचं असं रूप ही बघायला लागेल म्हणून?"

त्यांचं हे मानभावी बोलणं ऐकून मनात आलं -'असे हितचिंतक (का अहितचिंतक ? ) friends असतील तर शत्रुची गरजच नाहिए'

मी त्यांच्याच टोन मधे त्यांना सुनावलं -" अहो, आजकाल या 'अशा' लुकसाठी बायका पार्लर मधे जाऊन पैसे खर्च करतात. पण बघा ना, मला मात्र एकही पैसा खर्च नाही करावा लागला. उलट, या केसगळती मुळे हेअरकट आणि आयब्रो थ्रेडिंगचे पैसे पण वाचतायत.." माझं हे असं उत्तर त्यांना अपेक्षित नसावं.. एवढंसं तोंड करून निघून गेल्या.

अजून एका सिनिअर सिटीझन काकांना वेगळीच शंका होती.. मला म्हणाले," जर तुझे गेलेले केस कधीच परत नाही आले तर? मग कसं मँनेज करशील गं? " माझ्या मनात आलं त्यांना सांगावं," तुमच्या डोक्यावरचे ही तर कायमचेच गेलेत ना! आता जे काही होईल ते आपल्या दोघांचंही सारखंच होईल." माझ्या ओठावर फुटणारं मिस्कील हसू कसंबसं दाबत मी त्यांना म्हणाले," केसांच्या बदल्यात जर मला आयुष्य मिळत असेल तर मी जन्मभर अशी राहायला तयार आहे." माझं हे लॉजिक त्यांना पटलं असावं.. कारण नंतर कधीच त्यांनी तो विषय नाही काढला.

आता मला माझ्या दुसऱ्या केमो साइकल चे वेध लागले होते. पहिल्या केमोनंतर बरोब्बर एकवीस दिवसांनी म्हणजे ७ डिसेंबर ला माझी दुसरी केमो झाली. पण पहिल्या वेळी मला फारसा त्रास झाला नव्हता त्यामुळे यावेळी मला अँडमिट होण्याची गरज नव्हती. मी सकाळी हॉस्पिटलमधे गेले दिवसभर माझी केमो साइकल झाली आणि संध्याकाळी मी घरी परत आले.

देवदयेनी मला आत्तापर्यंत तरी केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स इतरांच्या तुलनेत कमी जाणवत होते. Nausea आणि लॉस ऑफ अँपेटाइट हे दोन मुख्य त्रास वगळता माझी अवस्था ठीकठाकच होती. पण अशक्तपणा खूप होता. एकेकाळी ट्रेकिंग आणि एन. सी.सी ची ड्रिल करणारी मी... आता दहा पावलं चालल्यानंतर मला दम लागत होता.पण मनात एक विश्वास होता की हे सगळं तात्पुरतं आहे. एकदा का माझी ट्रीटमेंट संपली की मी परत पूर्वीसारखी होईन.पण मुलींची मानसिक आणि भावनिक ओढाताण होताना बघून कधीकधी डोळे भरून यायचे.

त्या दोघींच्या मनःस्थितीची मला पूर्ण कल्पना होती. माझ्या बरोबरच त्यांच्याही आयुष्यात सगळी उलथापालथ झाली होती. आई आजारी, बाबा पण दुसऱ्या गावाला. माझ्या बहिणीचं घर त्यांच्या साठी नवीन नव्हतं. आम्ही जेव्हाही पुण्याला जायचो तेव्हा तिच्याच घरी राहायचो. तिच्या मुलीचं आणि या दोघींचंही चांगलं मेतकुट जमायचं.

पण या वेळची परिस्थिती वेगळी होती. सुरुवातीचे काही दिवस दोघीही खूप खुश होत्या. रोजची शाळेची कटकट, अभ्यास हे काही नव्हतं ना! पण मग हळूहळू they both started missing their normal routine. कधीतरी अचानक मला विचारायच्या,"आई, आपण परत आपल्या घरी  कधी जाणार?"

अशा situations मधे 'मी मी' म्हणणाऱे so called matured लोक देखील  हतबल झाल्याचं बघितलं होतं मी. पण माझ्या दोघी मुली या बाबतीत खूपच शूरवीर ठरल्या. माझी शारीरिक अवस्था आणि त्यामुळे मला होणारा त्रास त्यांना दिसत होता. आणि म्हणूनच 'आपल्यामुळे आईला अजून त्रास होणार नाही' याची खबरदारी त्या दोघीही घेत होत्या. येणाऱ्या प्रत्येक situation ला त्या त्यांच्या परीनी handle करत होत्या. त्या दोघीच एकमेकींची support system बनल्या होत्या. परिस्थितीनी त्यांना अचानक त्यांच्या वयापेक्षा खूप खूप mature बनवलं. माझी मोठी मुलगी ऐश्वर्या तिच्याही नकळत स्रुष्टी ची आई झाली. आणि स्रुष्टी नी देखील त्यांचं हे 'आई-बहिणीचं' दुहेरी नातं अगदी सहजपणे स्वीकारलं. कितीतरी वेळा त्यांच्या समोरच्या अवघड situations ना त्यांनी दोघींनीच handle केलं...परस्पर ! आईला त्रास नको व्हायला म्हणून. ऐश्वर्या कुठेही असली तरी तिचं स्रुष्टी वर आणि माझ्यावरही कायम लक्ष असायचं. In fact, ती कधीच आम्हाला दोघींना नजरेआड नाही होऊ द्यायची. मला जर कधी चालताना आधाराची गरज भासली तर पुढच्या क्षणी ती माझ्या शेजारी असायची... माझा हात धरून हळूहळू घेऊन जायची मला. कसं कोण जाणे, पण तिला न सांगताच सगळं कळायचं.. जर कधी त्यांना दोघींना एखाद्याचं वागणं पटलं नाही किंवा जर कधी त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना एखादी गोष्ट करायला लागली तरी त्यांनी कधीच माझ्याकडे तक्रार नाही केली. कारण अशावेळी  ऐश्वर्या स्रुष्टी ला समजवायची.. "आपण जर असं सारखं आईकडे तक्रार करत बसलो तर मग इतरांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आणि आपली आई सध्या आजारी आहे ना, मग आपल्यामुळे आपल्या आईला त्रास होईल असं आपण काही नाही करायचं, ओके!" इतक्या लहान वयात इतका समजूतदारपणा!!! अशा वेळी  माझा उर अभिमानानी भरून यायचा.

मला हे सगळं दिसत होतं, कळत होतं. आणि म्हणूनच मी त्यांच्याशी बोलताना, वागताना शक्य तेवढं नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळी केमो साइकल पूर्ण झाल्यावर माझ्या हातांवर सूज आलेली असायची. आणि  त्यामुळे अगदी साधी, सोपी वाटणारी कामं पण माझ्या साठी खूप अवघड झाली होती. उदाहरणच द्यायचं झालं तर रोज दोघी मुलींच्या केसांच्या वेण्या घालणं हे देखील एक दिव्य कर्म होतं माझ्या द्रुष्टीनी! पण तरीही मी मुद्दाम रोज हळूहळू का होईना पण स्वतः च त्यांची सगळी कामं करत होते... exactly the same way as I used to do it earlier. .. at least तसा प्रयत्न तरी करत होते. यामागे एकच विचार होता की 'मुलींना असं वाटावं की आपली आई आजारी नाहीए '

मार्च महिन्यात ऐश्वर्याचा वाढदिवस होता. आणि माझी मनापासून इच्छा होती की दर वर्षाप्रमाणे या वर्षीही तो दिवस साजरा करावा. म्हणून मग आम्ही त्याप्रमाणे सगळी तयारी सुरू केली. Guest list, return gifts, birthday cake,party menu.... सगळं ठरलं. मी तिला विचारलं ," तुला काय गिफ्ट हवंय बेटु?" त्यावर ती म्हणाली," आई, मला दुसरं काही गिफ्ट नकोय पण त्या दिवशी सगळा स्वैपाक तू स्वतः करू शकशील का गं? खूप दिवस झाले तुझ्या हातचं खाऊन..."  तिचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. वाटलं,' किती साध्या सरळ अपेक्षा आहेत हिच्या ! अगदी निरागस...तिच्या मनासारख्या "

मग काय, तिच्या वाढदिवसाचा सगळा स्वैपाक मी स्वतः बनवला. आत्ता विचार केला तर वाटतं ' त्यात काय विशेष?' पण माझ्या तेव्हाच्या परिस्थिती मधे माझ्या साठी ते एका mission सारखंच होतं. पण जेव्हा दोघी मुलींना अगदी आवडीनी खाताना, पोटभर जेवताना पाहिलं ना, तेव्हा मला आलेला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.आणि बऱ्याच दिवसांनी मीही पोटभर जेवले.

ऐश्वर्या प्रमाणेच स्रुष्टी सुद्धा तिच्या परीनी पूर्ण प्रयत्न करत होती. तिच्या वयाच्या हिशोबानी पाहिलं तर तिनी खूपच bravely सगळं handle केलं होतं. पण वरवर शांत वाटणाऱ्या तिच्या मनात किती मोठं वादळ चालू होतं याची कुणालाच कल्पना नव्हती... अगदी मला सुद्धा! पण जेव्हा मला ते समजलं त्या क्षणी मी मुळापासून हादरले.

एका दुपारची गोष्ट- बराच वेळ झाला, स्रुष्टी कुठे दिसली नाही म्हणून मी तिला शोधत होते. खूप हाका मारल्या पण तिचा कुठेच पत्ता नाही. घरभर शोधलं. शेवटी ती सापडली... एका पडद्यामागे, भिंतीकडे तोंड करून उभी होती. मला वाटलं, 'लपून बसलीए' ... पण जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ती पडद्यामागे लपून रडत होती. मला पाहिल्यावर तिनी एकदम मला मिठी मारली आणि रडत रडत विचारलं ,"आई, तू माझ्या आधी नाही ना  गं जाणार देवाकडे?" तिचा हा प्रश्न ऐकून मी सुन्न झाले. काय बोलावं काही सुचेना.. काय उत्तर देणार होते मी तिच्या या प्रश्नाचं !!! "हो"  म्हटलं तर तिच्या बालमनावर त्याचा काय आणि कसा परिणाम होईल? तसंही त्या मनःस्थितीत तिला हे उत्तर नकोच होतं.

पण "नाही" म्हणायला माझी जीभ धजत नव्हती. कारण त्या "नाही" या उत्तरातून जो अर्थ निघत होता, तो माझ्यातल्या 'आई'ला मान्य नव्हता. मी काहीच न बोलता तिला घट्ट जवळ घेतलं आणि तिला मोकळेपणी रडू दिलं. पण तिच्या समोर मला मात्र माझ्या अश्रूंना बांध घालणं आवश्यक होतं. कारण तिनी जर मला रडताना पाहिलं असतं तर कदाचित तिची भीती अजूनच वाढली असती. थोड्यावेळानी ती शांत झाली आणि खेळायला पळाली. आणि मी माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण या सगळ्या प्रसंगामुळे  माझ्या मनात मात्र जी खळबळ माजली होती, ती काही केल्या शांत होईना.

तिच्या त्या एका प्रश्नानी मी एकदम भूतकाळात गेले...आमच्या घरात  माझ्या दिवंगत आईचा फोटो दोघी मुलींनी नेहमीच बघितला आहे आणि त्याविषयी बऱ्याच वेळा आमचं बोलणंही होतं. In fact स्रुष्टीच्या बालमनात कुठेतरी असा विचार रुजला होता की 'आई आधी देवाकडे जाते'. And since she did not understand the implications of it, she was okay with the thought. In fact, ती ३-४ वर्षांची असताना एकदा मला म्हणाली होती," आई, मला तुझी पर्स खूप आवडते, तू जेव्हा देवाकडे जाशील ना तेव्हा ती पर्स मला देऊन जा हं!" इतकं नाँर्मल होतं तिच्यासाठी हे 'आईचं देवाकडे जाणं.' .. .असं असताना तिच्या मनात हा प्रश्न यावा? याचा अर्थ, आता तिच्या मनात या विचारामुळे भीती निर्माण झाली होती. कदाचित तिला त्याचा खरा अर्थ लक्षात आला होता का? पण या सगळ्याचा तिच्या अजाण मनावर काय परिणाम होईल? विचार करून करून  डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली.

माझी मुलींबद्दलची काळजी जेव्हा मी नितिन ला सांगितली तेव्हा तो म्हणाला,"तू च नेहमी म्हणतेस ना की प्रत्येक वाईटातून काहीतरी चांगलं घडत असतं! कदाचित या अनुभवानंतर त्या दोघी पण मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनतील.' मलाही त्याचं म्हणणं पटलं आणि मी माझ्या मनाची समजूत काढली.

माझी तिसरी केमो होती २८ डिसेंबर ला.त्यानंतर एक CT Scan आणि CA125 ही ब्लड टेस्ट करणे आवश्यक होते. कारण ह्या टेस्ट्स च्या रिपोर्ट्स वरून पुढे ऑपरेशन ची तारीख ठरणार होती. पण माझी एकंदर प्रगती बघून डॉक्टर्सना खात्री होती की रिपोर्ट्स फेव्हरेबल असतील, म्हणून त्यांनी २० जानेवारी २००६ ही सर्जरीची तारीख ठरवली. पण फायनल निर्णय टेस्ट रिपोर्ट्स बघूनच होणार होता. तेव्हा मग मी विचार केला की एकदा माझं ऑपरेशन झाल्यानंतर माझी शारीरिक अवस्था कशी असेल, मला रिकव्हर व्हायला किती दिवस लागतील हे आत्ता सांगणं कठीण आहे ;त्यामुळे काही महत्वाची कामं मला ऑपरेशन च्या आधीच करणं आवश्यक होतं. आणि ती कामं म्हणजे जोधपूरला जाऊन आमचं घर रिकामं करून पुन्हा ऑथॉरिटीज् ना सुपुर्त करणं आणि मुलींच्या शाळेत जाऊन त्यांच्या प्रिन्सिपॉल ला भेटून मुलींच्या ट्रान्स्फर सर्टीफिकेट बद्दल बोलणं.

आणि अजून एक महत्त्वाचं काम होतं. दोघी मुलींना( आणि खरं सांगायचं तर मलाही ) मोगाला नितिन कडे जायचं होतं. नितिन ला सारखी सुट्टी घेणं शक्य नव्हतं आणि मुलींना न्यू ईयर त्यांच्या बाबांबरोबर साजरं करायचं होतं. पण माझं कारण थोडं वेगळं होतं. मला मनातून नितिन ची खूप काळजी वाटत होती. कारण पुण्यामधे मी आणि दोघी मुली  कायम एकमेकीं बरोबर होतो.... एकत्र ! पण नितिन मात्र मोगा मधे एकटाच होता. युनिट मधले बाकी ऑफिसर्स आणि त्यांच्या फँमिलीज् होत्या म्हणा तिथे. पण नितिन तिथला सिनियर मोस्ट ऑफीसर असल्यामुळे इतर ज्युनियर ऑफिसर्स बरोबर त्याचं नातं थोडं फॉर्मल च होतं. म्हणतात ना.. It's always lonely at the top.नितिनचं ही तसंच काहीसं झालं होतं. त्यामुळे त्याच्या मनातले विचार, आमच्या बद्दल वाटणारी काळजी, टेन्शन या सगळ्याचा त्याला किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणूनच मी शक्यतो त्याच्याशी फोनवर प्रत्यक्ष न बोलता मेसेज पाठवायचे. कारण मला वाटायचं की फोनवर माझा आवाज जर त्यानी ऐकला तर त्याला लगेच माझ्या तब्बेती बद्दल कळेल. माझा खोल गेलेला आवाज, बोलताना मला लागणारा दम .. हे सगळं त्याला कळलं तर तो अजून काळजी करत बसेल आणि या सगळ्या घुसमटीचा त्याच्या तब्बेतीवर परिणाम होईल.

मी मुलींना पण सांगितलं होतं की ' बाबांशी बोलताना त्यांना सगळ्या छान छान गोष्टी सांगायच्या. तुम्ही काय काय करता, कशी मजा करता ते सांगायचं. म्हणजे त्यांना पण बरं वाटेल.' पण एकदा दुपारी अचानकघ त्याचा फोन आला. तो मला म्हणाला," All of a sudden तुमची तिघींची  आठवण आली, तुमचा आवाज ऐकावासा वाटला, म्हणून फोन केला. Just wanted to tell you that I love you all!!"  He has always been 'a man of few words'. जेव्हा मनातल्या भावना व्यक्त करायची वेळ येते तेव्हा तो सगळं बोलून जाहीर करण्याऐवजी तेच सगळं त्याच्या actions मधून समोरच्या व्यक्ती पर्यंत पोचवतो. So I could well imagine the emotional turmoil that he must be going through to say such a thing. त्या दिवशी आम्ही तिघींनी त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या. मुलींची किलबिल ऐकून त्यालाही बरं वाटलं.

पण माझी काळजी मात्र वाढली आणि म्हणून मी प्रत्यक्ष मोगाला जाऊन त्याला भेटायचं ठरवलं.

सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही एक प्लॅन ठरवला-मी माझी तिसरी केमो मोगाला जाउन तिकडच्या हॉस्पिटलमधे घ्यायचं ठरवलं. पण मोगा हे एक छोटं मिलिटरी स्टेशन असल्यामुळे तिथे मिलिटरी हॉस्पिटल नव्हतं. पण  मोगाहून साधारण एक तासाच्या अंतरावर असणार्या फिरोजपूरला मिलिटरी हॉस्पिटल होतं. मग आम्ही पुण्याच्या डॉक्टर्सशी आणि फिरोजपूर हॉस्पिटल मधल्या डॉक्टर्सशी सविस्तर बोलून असं ठरवलं की माझी तिसरी केमो फिरोजपूरला घ्यायची.

ठरल्याप्रमाणे आम्ही तिघी १९ डिसेंबर ला पुण्याहून निघालो आणि २१ डिसेंबर ला मोगाला पोचलो. २८ डिसेंबर ला फिरोजपूरच्या हॉस्पिटलमधे माझी तिसरी केमो निर्विघ्नपणे पार पडली.

नितिन जी युनिट कमांड करत होता ती एक 'pure Sikh regiment ' होती. म्हणजे त्या युनिट मधले सगळे जवान 'सिख' धर्माचे होते, त्यामुळे युनिट मधे एक गुरुद्वारा होता. मी मोगाहून निघायच्या आधी त्या गुरुद्वारा मधे 'पाठ' (पूजा) आयोजित केले होते. मी तिथे गेले असताना तिथले बाबाजी (गुरू द्वारा मधले पुजारी) माझी विचारपूस करत होते. बोलता बोलता त्यांच्याही नकळत म्हणून गेले.. " मेमसाब, आपके उपर तो वाहेगुरू की क्रुपा है। वरना इस बीमारी से बचना नामुमकी़न है। मेरी भाभी इसी के कारण खतम हो गयी और अब उसके बच्चे दूसरोंके भरोसे बडे हो रहे  हैं। " त्यांचं बोलणं मी अजिबात मनावर घेतलं नाही. खरं सांगायचं तर आत्तापर्यंत मला लोकांच्या अशा विचित्र बोलण्याची सवय झाली होती. मी त्यांना म्हणाले," आप रोज़ मेरे लिए वाहेगुरू से प्रार्थना किजिए। फिर मुझे कुछ नहीं होगा।"

आम्ही चौघांनी मिळून ठरल्याप्रमाणे नवीन वर्षाचं एकत्र स्वागत केलं. आणि मग ४ जानेवारीला मी आणि मुली मोगाहून जोधपूरला गेलो.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle