एका तपापुर्वी लिहिलेली माझी ही कविता इथे आणतेय. सध्या अप्रकाशित केलेल्या माझ्या जुन्या ब्लॉगवर होती आणि ऑर्कूटच्या जमान्यात मराठी कवितांच्या फोरम मधेही टाकली होती.
परवा बोलता बोलता एका मैत्रीणीने हिची आठवण काढली म्हणून शोधून वाचली..
तो पाऊस,
जेव्हा मला भेटला होता ना
तेव्हां तो वेडाही नव्हता
आणि माझाही नव्हता...
तो एक
ढगांच्या गडगडाटा शिवाय,
आणि भेदरवणा-या वा-याशिवाय,
कोसळणारा एक साधा सरळ
पाऊस होता.
एकदा त्याने मला भिजवायचं ठरवलं
मग मी सुद्धा भिजायचं नक्की केलं
तशी छ्त्री होती ना सोबतीला
पण तीचा कधी उपयोग होतो का?
मग तो पाऊस आधी वेडा झाला
कारण तो थांबण विसरला
आणि मग तो माझा झाला
कारण मी मलाचं विसरुन भिजतं राहिले
भेटायचयं का तुम्हाला त्याला?
कधी आलात तर
त्याच्या साठीचं बांधलेल्या
माझ्या मनाच्या चंद्रमोळी घरात
बरसताना दिसेल तुम्हाला
माझा वेडा पाऊस!
-विभावरी थिटे