मी सध्या आय एफ़ करतीये...
ते काय असतं..?
का..?
पण कशासाठी..? म्हणजे कशासाठी..?
पण तुला काय गरज आहे..?
चांगली बारीक झालीयेस आता.. शाळेत असताना खुप जाड होतीस..
तरीच एवढी खराब झालीये तब्येत.. शाळेत असताना जरा चांगली दिसायचीस..
शुगर नॉर्मल आहे म्हणालीस ना.. मग कशाला..? सगळं खावं.. नाही म्हणू नये..
२०० वगैरे चालते की.. काही होत नाही..
आमची बघ.. कायम ३०० ३५० असते.. पण खायचं सगळं.. आजच गोडाचा शिरा केला होता..
आम्हाला लागतचं गं.. आमच्यात गोडाशिवाय जेवण म्हणजे नाहीच.. ह्यांना तर आजिबात नाही..
कसा पितेस बिन साखरेचा चहा..? किती घाण लागत असेल..?
थोडी साखर गरजेची असते शरीराला..
सरबतातली साखर चालते.. हो ना..? मी वाचलंय एका मासिकात..
कसं काय जमतं..? आम्हाला शक्यच नाही.. खायचं गं थोडं..
खरं मला पण काही तरी सुरु करायचंय.. पण जमत नाही.. भुक सहन होत नाही.. तु थोडी कॉफ़ी तरी घे..
हे चुरमुरे घे एकदम हलके.. हे कलींगड नुसतं पाणी..
ती फेमस अबक म्हणाली दर दोन तासांनी खावं.. तु तर १६ तास खात नाहीस.. हे चुकीचं आहे..
ती फेमस अबक सांगते सगळं खावं.. काही होत नाही.. थोडी बर्फ़ी टाक तोंडात.. साखर अगदी कमी घातलीये..
चक्कर येऊन पडशील हा..
शुगर लो होत नाही..? बरंय बाई..
आज अमक्याचा बडॆ आहे.. केक तरी खावाच लागेल..
अगं इतकी वर्ष पुण्यात आहोत आणि आज भेटतोय.. पोहे तरी करतेच..
अगं माहेरवाशी्ण ना तु..? काही डाएट बिएट नाही चालणार हा..
आज्जींसाठी घे थोडं.. त्यांना वाईट वाटॆल..
तुला पार्टी आहे माहिती होतं ना.. डाएट कोक तरी घे.. बरं स्टार्टर्स तरी..
तु खाणार नसलीस तरी कॉंट्री द्यावी लागणार हा तुला...
मागच्या वेळेस दोन दोन तासांची नाटकं होती.. आता सोळा तास.. वर हे नको ते नको आहेच.. (हे नुसतं नजरेनं)
स्वयंपाकघराचा नुसता दवाखाना करुन टाकलाय..
या वयात (माझं वय २५ वर्ष नाही.. ३० ही नाही.. ३५ ही नाही.. त्यापेक्षाही जास्तच आहे.. ) तर या वयात दगड खाल्ला तरी पचला पाहिजे..
त्या लेकीला (वय वर्ष १३..) तरी खाऊ दे जे खायचं ते.. (म्हणजे बिस्कीट ,स्वीट, चिप्स वगैरे. )
काय नवीन नवीन नाटकं.. आमच्यावेळी असं काही नव्हतं.. काकांना आहे म्हणा शुगर..
एखादं दिवशी डाएट मोड्लं म्हणून काही म्हणजे म्हणजे काही बिघडत नाही..
मग घरच्यांना खायला घालतेस का त्यांना पण.. ? हॅ हॅ हॅ..
तेरा इमोशनल अत्याचार..
खाऊ घालण्यातलं लोकांचं प्रेम मी समजु शकते आणि त्यासाठी थॅंक्यू.. पण मला नकोय.. प्लीज..