प्रस्तावना
टिमवित असताना आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्यासाठी मी एक कल्पना मांडली होती. डिस्टन्स मोड शिक्षण असल्याने आमचे विद्यार्थी अगदी खेड्यापाड्यात पसरले होते. त्यामुळे त्या त्या गावांचा इतिहास लिहिला जाईल म्हणून "माझे गाव" ही कल्पना मी मांडली. काही कारणांनी ती तिथे प्रत्यक्षात आली नाही. पण ही कल्पना मनात ठाम रुजून राहिली.
मैत्रीण वरतीही अनेक ठिकाणच्या मैत्रिणी जमा झाल्या आहेत. मग ती कल्पना इथे प्रत्यक्षात आली तर? असा विचार मनात आला. इथे तर अनेक जणी छान लिहिणाऱ्याही! ही कल्पना इथे मांडल्यावर अनेक जणींना आवडली होती.पण नंतर राहूनच गेली. आज वेळ काढून ही कल्पना कशी प्रत्यक्षात आणता येईल याचा तपशील लिहून काढला. अजून कोणी काही सुचवलं तर यात बदल, वाढ करता येईल.
लेखाचे सर्वसाधारण स्वरुप असे असावे
माझे गाव : गावाचे नाव
लेखिका : -------
१. अक्षांश रेखांश ( गुगल मॅप लोकेशनही चालेल), तालुका, जिल्हा, राज्य, देश.
२. नैसर्गिक रचना, वैशिष्ट्य : नदी, डोंगर, शेती, पिकं, हवामान,
३. कधी वसलं. कुणी वसवलं.
४. गावाचे इतिहासातले महत्वाच्या घटना. जसं की शिवाजीच्या काळात, पेशवाईत, ब्रिटिश आमदनीत, स्वातंत्र्य लढ्यात, आज
५. काही महत्वाच्या व्यक्ती : राजकारण, समाजकारण, कलाकार, लोककल्याणकारी, लेखक, ...
६. महत्वाच्या वास्तू : राजवाडा, किल्ला, विहिरी, वाडे, धार्मिक वास्तु, मैदान, सभागृह, शैक्षणिक वास्तु, ग्रंथालये, महान व्यक्तींची घरे,...
७. संस्मरणीय घटना : पूर,भूकंप, सभा, संमेलन, निवडणूक, आणिबाणी,...
८. सांस्कृतिक जडणघडण: कोणते सण साजरे होतात, गावाचा एकोपा, सभा, काल आणि आज मधला फरक
९. अजून गावाशी नाळ जोडलेली आहे का? कधी जाता, गावासाठी काय करता, करावेसे वाटते?
१०. तुमचे गावाबद्दलचे मनोगत
------------
ही माहिती कुठे मिळेल?
१. आजीआजोबा, गावातले जुने जाणते सांगू शकतील.
२. चावडी वरती जुनी माहिती मिळेल
३. सरकारी दफ्तर असेल तर तिथे मिळेल.
४. गावासंदर्भात काही पुस्तकं लिहिली गेली असतील त्यातून.
५. लोककथा, काव्य, पोवाडे, कथा, कादंबऱ्या यातूनही मिळू शकेल.
६. वृत्तपत्र
७. गुगल बाबांनाही हाक मारु शकता.
----------
महत्वाचे काही
१. माझे गाव म्हणजे केवळ आपले जन्मगावच पाहिजे असे नाही. तुम्ही जिथे रहात आहात तेही चालेल. किंवा तुम्हाला आवडणारं गावही चालेल. माहिती मात्र नीट मिळवायला हवीत. शक्य त्या त्या मार्गांनी.
२. काढलेले सगळेच मुद्दे कव्हर व्हावेत हा अट्टहास नको. ती फक्त गाईडलाईन आहे. क्रम, अॅडिशन तुम्ही करू शकाल तुमच्या लेखन शैली प्रमाणे. फक्त मुद्यांची नावं लिहिलीत तर वाचकांना सोईचे जाईल.
३. जिथून जिथून माहिती घ्याल, त्या ठिकाण, व्यक्तीची नोंद करून ठेवा. प्रत्यक्ष लिहिताना ही माहिती कुठून बरं घेतली हा प्रश्न पडायला नको.
४. शक्य तर एखादी छोटी वही करा. सोबत ठेवा. अचानक कोणती माहिती समोर आली तर पटकन लिहिता येतं, सोर्सही लिहून ठेवा.
५. शक्य तर जमेल तेव्हढी माहिती आधी गोळा करा. मग पहिले लेखन करा. ते लिहितानाच जमेल तितके तळटिपांचे आकडे आमि तपशील लिहित जा.
ते लिहून पूर्ण झाले की 1-2 दिवस थांबा. पुन्हा नीट वाचा, हव्या त्या दुरुस्त्या करा.
शेवटी तुमचे सोर्सेसची यादीही टाका.
६. एेकीव माहिती आणि कागदपत्रांतून मिळालेली माहिती या दोन्हीत खूप फरक असतो. तेव्हा माहिती देताना ती कोठून मिळाली हे तळटिपांमधे नक्की विशद ( मेंशन) करा.
त्यासाठी त्या त्या माहितीच्या शेवटी कंसात आकडे घालत जा. शेवटी त्या आकड्यांचा तपशील द्या.
उदा. आमचे गाव शिवाजीने वसवले ¹
गावातला प्रमुख वाडा देशमुखांनी बांधला ²
आणिबाणीमधे गावातल्या 25 लोकांना तुरुंगवास घडला ³
लेख संपल्या नंतर तळटिपा:
1. गावी गायला जाणारा पोवाडा
2. आजोबांनी दिलेली माहिती
3. वृत्तपत्रात वाचलेले
असे.
जिथे जिथे शक्य आहे तिथे असे संदर्भ द्या. काही मदत लागली तर जरूर हाक मारा.
चला मग करुन देऊयात आपापल्या गावांची ओळख! या निमित्ताने एक छान संकलनही होईल. आणि पुन्हा एकदा आपली, आपल्या गावाशी नाळ जोडली जाईल!