अन तोही दिवस आठवतो
किती चित्र विचित्र घटनांचा दिवस!
दुर्योधनाने आयोजलेला द्युताचा समारोह.
कधी नव्हे ते युधिष्ठिराच्या हातून घडलेला अपराध, द्युताच्या मोहाने केलेला घात. पांडवांचे राज्य, संपत्ती इतकेच नव्हे तर स्वतः पांडव, त्यांची आई कुंती आणि पत्नी द्रौपदी त्याने पणाला लावली. पणाला लावले सारे अन हरला तो.
तो हरला की जगातील चांगुलपणाचा पराभव होता तो? कलियुगाची सुरुवात तर नव्हती ती ?
सभागृहात महामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, अनेक देशोदेशीचे रथी महारथी उपस्थित होते. पण एकालाही द्रौपदीची दया आली नाही, एकही जण दुर्योधनाच्या विरुद्ध तिला मदत करू शकले नाहीत.
अगदी द्रौपदीचे पाचही पती माना खाली घालून तिची विटंबना सहन करत होते. कुंतीने घालून दिलेला नियम, युधिष्ठिराच्या आज्ञे वाचून कोणीही पांडव कोणावरही आक्रमण करू शकणार नाही हा नियम! अन युधिष्ठिर स्वतःच दास बनलेला, तो कोठून आज्ञा देणार ? सारे पांडव त्या क्षणी निष्प्रभ झाले होते.
अन त्या एका क्षणी कृष्णेने मला साद घातली, करुणपणे माझा धावा केला. आता मलाच कृष्णेची मदत करायला जाणे भाग होते. तिची मदतीची हाक, तिची विनवणी मी टाळू शकत नव्हतोच. माझी सखी, कृष्णा आज संकटात होती.
भर दरबारात दु:शासन एकामागून एक वस्त्र ओढत होता तिचे. शेवटी मीच एक एक वस्त्र तिला नेसवत गेलो. पण दु:शासनाची रग जिरत नव्हती. अखेर मी पितांबर नेसवले तिला. अन पितामहांना जाग आली. त्यांनी दु:शासनाला थांबवले. अन्यथा त्याचा अंत तिथेच झाला असता. राजसभेतील सराच प्रकार अतिशय निंदनीय घडलेला. फक्त द्रौपदीची लज्जा काही प्रमाणात तरी राखू शकलो मी एव्हढेच समाधान.
आता रात्री झोपताना सारे आठवतो आहे. जरी मी अनर्थ थोपवला असला तरी मनाला शांतता का नाहीये? काहीतरी चुकलेय असे का वाटतेय?
"राधे? तू ? किती दिवसांनी येते आहेस? ये अशी. बैस. कशी ..."
"माधवा, मी शिळोप्याच्या गप्पा करायला आलेली नाहीये. हे काय करून बसलास तू ?"
"राधे ?"
"तुला समजलही नाही ? तू काय करून बसलास ते? "
"राधे कशा बद्दल बोलते आहेस?"
"आज, आजच्या बद्दल बोलतेय. असा कसा वागू शकलास तू? तू असा कसा वागू शकलास? माझा विश्वासच बसत नाही."
तुझ्या डोळ्यात काय नव्हत? अविश्वास, वेदना, नाराजी, असहायता. आणि ते सारे भरून तुडुंब डबडबलेले डोळे तुझे, मला कसला जाब विचारत होते?
"कृष्ण म्हणवतोस स्वतःला आणि तुझ्या कृष्णेला असं वागवलस?"
"अग मी तर उलट वाचवलं तिला. मदत केली, लज्जा वाचवली तिची..."
"खरच का माधवा?
आठवतं तुला? एकदा भेटायला गेला होतास तिला. अचानक काही लागलं तुला, तुझ्या बोटाला धार लागली रक्ताची. आठवतं ? तुला स्वतःलाही त्या जखमेची कळ कळे पर्यंत कृष्णेने आपल्या पदराचा शेव फाडून तुझी जखम रोधली होती. एकही थंब सांडू दिला नव्हता तिने. आठवत? "
"हो राधे, लख्ख आठवतय मला. अजून जपून ठेवलीय मी ती चिंधी."
"आणि तरीही, तरीही तू तिचा एक एक अपमान होऊ दिलास? राजसभेत पणाला लावलं गेलं तिला, तुला कळलच नाही ? कळलं नाही असं कसं म्हणू? तुला कळत होतं सारच.
दु:शासनाने तिला, रजस्वला तिला फरफटत ओढून आणलं, राजसभेत. ती प्रत्येकाकडे न्याय मागत होती. तुला ऐकू आलच नाही तिचं न्याय मागणं?
न्यायदेवतेची पट्टी सा-यानी; अगदी सा-यांनी बांधली डोळ्यांवर. भीष्म, ध्रुतराष्ट्र, कर्ण, सारे सारे आंधळे झाले, पण माधवा तू ? तू तर सर्वसाक्षी ना? तू का ओढून घेतलीस डोळ्यावर पट्टी.
इतर कोणी फसेल, मी नाही. माधवा
तू जाणून बुजून गप्प राहिलास. कारण असेल; भावी काळातल्या घटनांना बांधील.
पण कृष्णेचा सखा नाहीच राहिलास तू. ना तिचा, ना माझा...
अन जाणतोस तू हे. म्हणूनच मन खातय तुला तुझच."
"अग पण मी प्रयत्न केलाच ना? एका मागून एक वस्त्र नेसवत गेलो ना तिला, अगदी पितांबरही... "
"केलास, हो हो केलास प्रयत्न. पण कधी ?
अरे जिने तुझ्या रक्ताचा एक थेंब सांडू दिला नाही जमिनीवर,तिचे इतके अश्रू कसे सांडू दिलेस राजसभेत? जिने तुला कळ समजण्याआधी तुझी वेदना समजून घेतली, त्या कृष्णेची कळ, वेदना कधी पोहोचली तुझ्या पर्यंत ?
तिने याचना केली, मदतीची भीक मागितली, दयाघना म्हणून साद घातली तेव्हा?
ती मदत होती ? की केवळ तुझ्यातल्या देवत्वाचा तो दिखावा होता माधवा? "
"नाही नाही राधे, मी तिची लज्जा राखण्यासाठीच गेलो होतो..."
"माधवा, अरे लज्जा तिची नाही गेली रे, लज्जा गेली तुझी, सा-या मानव जातीची. तुझ्या देवत्वाचा पुरावा द्यायला गेलास पण तो पुरावा नव्हता रे, तो तुझ्या देवत्वाचा अंत होता.
आता तू उरलास फक्त पूर्णपुरुष - फक्त पूर्णपुरुष! जाते माधवा, हा माझा कृष्ण नव्हे, हा माझा सखा नव्हे... हा माझा कृष्ण नव्हे..."
"सखे थांब, राधे, राधे ... "