.हसू होऊनी खळखळते..
आसवातुनी आसुसते..
माझ्यासाठी माझी कविता
अंतरातुनी गहिवरते..
कधी हरवता सूर-ताल-लय
मनात दाटून येता आठव..
जोडून नाते प्राणसखीचे
सार्यातूनच सावरते.
.माझ्यासाठी माझी कविता
नवांकुरासम पालवते..
मी रुप तर ती सावली
मी बोलकी ती अबोली..
शब्दांच्या आडोशांमधुन
अलगद साद तिची घुमते
माझ्यासाठी माझी कविता
कस्तुरीसम दरवळते..
कधी अथांग सागर होऊन
कधी होऊनी इंद्रधनू..
कधी नभीचा मेघ सावळा
कधी तर माझा कल्पतरु!!
माझ्यामधुनी नित्य निरंतर
एकतारीसम रुणझुणते..
माझ्यासाठी माझी कविता
श्यामनिळ्यासम अवतरते..श्यामनिळ्यासम अवतरते...
-कल्याणी भोसेकर