माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-६ (लीपुलेख पास ते दारचेन)

दिनांक २० जून २०११ (लीपूलेख पास ते तकलाकोट)

6-01.jpg

लिपूलेख खिंडीचा खडतर प्रवास संपवून आम्ही चीनच्या हद्दीत आलो होतो. चीनचे काही लष्करी अधिकारी, हिंदी बोलू शकणारे दोन गाईड व त्यांचे मदतनीस आम्हाला चीनमध्ये घेऊन जायला आणि पहिल्या बॅचला भारताच्या सीमेपर्यंत सोडायला आले होते. पहिल्या आणि आमच्या तिसऱ्या बॅचची देवाणघेवाण करताना त्या अडनेड्या जागी चांगलीच गडबड होत होती. चीनच्या अधिकाऱ्यांकडे हातात धरण्यासारखे ध्वनिवर्धक होते. ह्या लहानश्या गोष्टीमुळे त्यांना सगळ्यांना सूचना देणे फार सोपे होत होते.

यात्रींची देवाणघेवाण पूर्ण झाल्यावर आम्ही चालायला सुरवात केली. दोन देशांमधील सीमारेषा तर मानवनिर्मीत आहे. निसर्गाचे दोन भाग तर असूच शकत नाहीत. त्यामुळे ह्याबाजूलाही तसाच बर्फ, तशाच अवघड पायवाटा होत्या. मनात मात्र आपण आपला देश सोडून परक्या देशात आलो आहोत, ही भावना वारंवार येत होती.

असं थोडा वेळ चालल्यावर चांगलीच खोल दरी आली. ती बघून सगळ्यांच्या उरात धडकी भरली. आधीच कालचे जागरण,लीपूलेखपर्यंतचा सगळ्यात खडतर दमछाक करणारा प्रवास आणि प्रचंड थंडीमुळे सगळे अर्धमेले झाले होते. त्यात ती दरी बघून आणखीनच बेजार झाले. पाय गुढघ्यापर्यंत बर्फात रुतत होते. ज्येष्ठ यात्रींची हालत वाईट झाली होती. त्यांचा सारखा तोल जात होता,पडायची भीती वाटत होती, हातातल्या काठीचा आधार पुरत नव्हता. गेले काही दिवस ज्यांच्या भरवशावर यात्रा नीट झाली ते पोर्टर-पोनीवाले मागे राहिले होते. आमच्यातले तरुण-तंदुरुस्त यात्री सगळ्यांना जमेल ती सगळी मदत करत होते. आताचे गाईड व त्यांचे मदतनीस ह्याच भागातले होते. त्यांना बर्फात चालायची सवय होती. परिस्थिती लक्षात आल्याबरोबर त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हात धरून त्यांना अगदी नीटपणे उतरवायला सुरवात केली. व्यावसायिक सफाईने यात्रींशी गप्पा मारून ते त्यांच्या मनावरचा ताण कमी करत होते.

6-02.jpg

सर्वदूर बर्फ पसरले होते. निळेभोर आकाश, शुभ्र धवल बर्फ आणि लाल, निळे, काळे कपडे घालून त्यावरून धडपडत चालणारे पन्नास यात्री. नजरेत साठवून ठेवावं असच दृश्य होत ते! सगळा प्रदेश निष्पर्ण होता. आजूबाजूला असलेले विस्तीर्ण,तांबूस राखाडी रंगाचे डोंगर लक्ष वेधून घेत होते. काठगोदामला हिमालयातील प्रवास सुरू झाल्यापासून, हिमालयाची वेगवेगळी रूपे दृष्टीस पडत होती. तिबेटमधील लालसर किरमिजी राखाडी रंगाचे उंचच उंच डोंगर हे अजून एक आकर्षक आणि अपरिचित रूप आज दिसत होते.

6-03

मी दोन वर्षांमागे हिमालयात ‘सार पास’ च्या ट्रेकला गेले होते. तिथे बऱ्याच वेळा अशी बर्फाची घसरगुंडी करायला लागते. सुरक्षित उतार दिसल्यावर आम्ही बरेच जण चालणं सोडून बर्फावेरून घसरायला लागलो. मस्त मजा आली. बर्फाचे गोळेही एकमेकांना मारून झाले! दुरूनच यात्रींसाठी असलेल्या जीपगाड्या दिसल्यावर आजची पायपीट संपल्याच जाणवलं. ह्या चार चाकांवर चालणाऱ्या यंत्राशी बऱ्याच दिवसांनी भेट होत होती! आपण पाय न हालवतंसुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, हा चमत्कारच वाटत होता! लगेचच आम्ही आमच्या बसपाशी पोचलो. आमचं मोठं सामान टपावर चढवून त्यावर ताडपत्री आवळली गेली. सगळे जागा पकडून बसले आणि ‘जेकारे वीर बजरंगी, हर हर महादेव, ’ बोलो ‘ॐ नमः शिवाय, ’ ह्या गजरात बसप्रवास सुरू झाला.

माझ्याकडे असलेल्या श्री. मोहन बने ह्याच्या पुस्तका प्रमाणे आणि विदेश मंत्रालयाच्या माहितीपुस्तकाप्रमाणे हा रस्ता अतिशय खराब,हाडं खिळखिळी करणारा होता. मी आणि नंदिनी ह्या अपेक्षेने सीटसमोरची समोरची दांडी घट्ट पकडून बसलो. पण काय आश्चर्य! तसलं काही झालंच नाही! हाडांचाच काय, हातात धरलेला खुळखुळासुद्धा वाजणार नाही, इतका छान गुळगुळीत रस्ता होता. डोंगरदऱ्यांतून थोडा वेळ प्रवास केल्यावर सपाट प्रदेश आला. दूरवर छोटी छोटी कुरणे, शेती आणि घरे-माणसे दिसायला लागली. घरे जुनाट मातीने माखलेली, बसकी पण बंदिस्त वाटत होती. प्रत्येक घराच्या खिडक्या सुशोभित केलेल्या होत्या.

6-04.jpg

थोड्या वेळात चीन सरकारचे कस्टम ऑफिस आले. तिथे आमचे सगळे सामान क्ष-किरण यंत्रातून तपासले गेले. एखाद-दुसऱ्या यात्रीचे सामान बाहेर काढून तपासले गेले. तिथेच सर्व यात्रींची अंगातल्या तापासाठी तपासणी झाली. हे सगळे सोपस्कार उरकेपर्यंत एक एकदम ‘ब्रेकिंग न्यूज’ आली. प्रत्येक बॅचचा चीनचा ‘ग्रुप व्हिसा’ दिल्लीत होतो. त्याची मूळ प्रत एल. ओ. सरांकडे आणि प्रती प्रत्येक यात्रींकडे असतात. आमच्या एल. ओ. सरांकडे ही प्रतच नव्हती!! ते सगळ्यांना त्यांच्या कडची प्रत बघायला सांगत होते. त्यांना वाटत होत की चुकून मूळ प्रत कोणाला दिली गेली आहे की काय? मी आणि नंदिनी फार म्हणजे फार हुशार! आम्ही आमच्या प्रती दिल्लीत जमा केलेल्या सामानात ठेवून दिल्या होत्या. आता काय होणार आम्हाला काळजी वाटायला लागली. नंदिनी तर म्हणाली, ‘ बहुतेक यात्रेच्या इतिहासातली आपली पहिलीच बॅच असणार आहे, की जी बॅच तिबेटमध्ये आली, बारा दिवस तकलाकोटलाच राहून परत गेली. व्हिसा नसल्याने परिक्रमा नाहीच!!’

6-05.jpg

कस्टमचे सोपस्कार झाल्यावर परत बसमध्ये बसून तासभर प्रवास केल्यावर कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून आम्ही तकलाकोटला पोचलो. तकलाकोट हे पश्चिम तिबेटमधील पहिले मोठे शहरवजा गाव आहे. कदाचित भारताच्या सीमेवरचे पहिले मोठे गाव असल्यामुळे असेल पण तिथे सरकारी कचेऱ्या, हॉस्पिटल्स, बँका, पोस्ट ऑफिसच्या मोठ्या आणि आधुनिक इमारती दिसत होत्या. रस्ते अगदी प्रशस्त होते.

6-06.jpg

आमच्या राहण्याच्या जागी बस पोचल्यावर बसमध्ये परत एकदा शंकराचा जोरदार जयजयकार झाला. नबीढांगला अपरात्री सुरू झालेला प्रवास तकलाकोटच्या हॉटेलमध्ये संपला होता. प्रत्येक खोलीत दोन यात्री अशी व्यवस्था होती. मला आणि नंदिनीला एक खोली मिळाली. ती खोली अगदी सुसज्ज होती. टॉयलेट, पलंग सगळं काही होत. आम्ही दोघींनी आमचं सगळं सामान पसरून लवकरच त्या खोलीला धर्मशाळेची कळा आणली! कालपासूनच्या प्रवासाचा शीण आता जाणवत होता. बर्फात, पाण्यात भिजलेले दमट कपडे नको झाले होते. गरम गरम पाण्याने मस्त अंघोळी करून आम्ही ताणून झोपलो.

संध्याकाळी बाहेर चक्कर मारायला म्हणून निघालो तर दारात पोलिसांनी अडवलं. ‘व्हिसाचा प्रश्न सुटल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, ’ असं जरा जोरातच बजावलं. सुदैवाने आतच फोनची सोय होती. तिथेच गुपचूप थोड्या डॉलरचे युआनमध्ये धर्मांतर करून घेतले आणि घरी पोचल्याचा फोन केला.

दिनांक २१ जून २०११ (तकलाकोट मुक्काम)

6-07.jpg

चीनच्या आणि भारताच्या वेळेत अडीच तासांचा फरक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ‘माउंटन लॅग’ मुळे (मग, आम्हाला जेटलॅग कसा येणार ना? ) पहाटेपासून उठून बसले होते. चहाप्रेमी लोक सारखे किचनकडे खेपा मारत होते, पण त्या आघाडीवर अजून शुकशुकाट होता. अश्या अडनेड्या जागी आपली कॉफीची सोय होणार नाही, हे मी गृहीत धरलेलं होतं. चहावाल्यांची पंचाईत बघून मला आसुरी आनंद होत होता!!

6-08.jpg

6-09.jpg

बऱ्याच वेळाने सर्वांना चहा-नाश्ता मिळाला. आम्ही आता फिरायला बाहेर जाऊ शकतो, असं सांगितल्यामुळे सगळ्यांना हुश्श झालं. आमचा हा ग्रुप व्हिसा फक्त परिक्रमा मार्गापुरता मर्यादित असतो त्यामुळे अर्थातच तकलाकोटच्या बाहेर जायला आम्हाला परवानगी नव्हती. आम्ही १०-१२ जण उत्साहाने बाहेर पडलो. तकलाकोटच्या रुंद, प्रशस्त रस्त्यांवरून रमतगमत चालताना मजा येत होती. भाजी बाजार, निरनिराळी दुकान सगळं फिरलो. एका दुकानावर सलमान खानच पोस्टर पाहून सीमापार असलेली बॉलीवूडची ताकद जाणवली! बाकीच्या किरकोळ खरेदीबरोबर मानसचे पवित्र तीर्थ आणण्यासाठी बऱ्याच जणांनी प्लास्टिक कॅन घेतले.

6-10.jpg

6-11.jpg

6-12.jpg

रस्त्याकडेला पूलची टेबल्स ठेवलेली होती. तिथले तिबेटी तरुण कामाचा वेळ दारू पीत, पूल खेळत वाया घालवीत होते. इथे सगळीकडे पाण्याच्या बाटलीपेक्षा बिअरची बाटली स्वस्त होती. तिबेटची संस्कृती नष्ट करण्याचे हे पद्धतशीर प्रयत्न आहेत की काय, अस वाटत होत. मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त, बेकारीमुळे वैफल्यग्रस्त लोकांच्या मनावर ताबा मिळवणे सोपं असणार. तिथे पोस्ट, बँका सगळीकडे चिनी व्यक्तीच कामाला होत्या. त्यांचे कपडे, गणवेश आधुनिक, रुबाबदार होते. तिबेटी लोक मात्र कश्यातरी कपड्यात होते. तिबेटी किंवा चिनी लोकांशी बोलताना ‘दलाई लामा’ ह्या विषयी तिथे चकार शब्द काढू नका, अशी तंबी आम्हाला भारतात दिलेली होती.

6-13.jpg

बराच वेळ फिरून, फोटो काढून, भरपूर खिदळून आम्ही जेवायच्या वेळेला परत आलो. बघतो तर काय, सगळ्या यात्रींनी आज स्वयंपाकघर ताब्यात घेतलं होत. भारतात आधी कुमाउँ निगमच्या लोकांनी आणि नंतर आय. टी. बी. पी. वाल्यांनी आमचे जेवणाचे फारच लाड केले होते. चीनमध्ये इतकी खातिरदारी कोण करणार? तकलाकोटला निदान चीन सरकारची मंडळी जेवण-खाण पुरवतात. पुढे परिक्रमा मार्गात यात्रींना आपली सोय करावी लागते. भारतात असताना सगळीकडे यात्रींना कांदा-लसूण नसलेलं जेवण देतात. इथे आमच्यासाठी जरी शाकाहारी बेत असला, तरी एरवी किचन चिन्यांच्या ताब्यात होत, तेव्हा ते काय काय शिजवत असतील कोण जाणे? जेवण देत होते तेसुद्धा भात, सूप, न्युडल्स अस. ज्यांनी कधीच चायनीज जेवणाची चव घेतली नव्हती, त्या लोकांची फारच पंचाईत होत होती. किचनमधली स्वच्छताही अशीतशीच होती. आमच्यातल्या कट्टर शाकाहारी लोकांना काही ते सहन होईना. त्यांनी चक्क भाजी, भात, पोळ्या करायचा बेत केला होता. सगळे मिळून काम करत होतो, त्यामुळे हसतखेळत स्वैपाक तयार झाला. नंतर जेवायलाही मजा आली.

6-14.jpg

6-15.jpg

6-16.jpg

6-17.jpg

परिक्रमेतील व्यवस्थेसाठी चीन सरकार ७५० अमेरिकन डॉलर्स घेते. त्यांचे ते देणे दिले. परिक्रमांसाठी पोर्टर, पोनीवाला आणि वरखर्चाला लागणारे यूआन घेण्याचे काम केले. पुढच्या कँपवर पूर्ण बॅचची राहण्याची सोय होऊ शकत नाही. मग मोठ्या बॅचेस् दोन ग्रुपमध्ये विभागतात. आता सगळ्या बॅचची छान एकी झाली होती. ताटातूट नको होती. नारंग सरांच्या मध्यस्तीने आणि ५० जणांचीच बॅच असल्याने, सगळ्या ग्रुपने एकत्र परिक्रमा करायच्या ठरल्या. त्या आनंदात विश्रांतीचा दिवस संपला.

दिनांक २२ जून २०११ (तकलाकोट ते दारचेन)

सकाळी सगळे लवकर उठून नाश्ता आटोपून वेळेवर बसमध्ये जाऊन बसले. आयुष्यात कधीतरीच येणाऱ्या अनुभवाला आपण सामोरे जाणार आहोत, ही उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्यांनाच हुरहूर लागली होती. कैलासाची परिक्रमा कशी होईल? पुढचा प्रवास झेपेल का? डोल्मापासची १९,५०० फुटांची चढण आपण पार करू शकू ना? विरळ हवेचा त्रास होऊन काही वाईट परिस्थिती उद्भवली तर? असे असंख्य विचार मनात येत होते.

बसच्या खिडकीतून सगळे बाहेर बघत होते. तिथले ते काहीसे उजाड पण अत्यंत सुंदर दृश्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून घेत होते. तेवढ्यात बाहेर गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा, खूप उंचच उंच शुभ्रधवल पर्वत सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकताना दिसला. तो गुर्लामांधाता पर्वत असल्याचे आमचा गाईड टेम्पाने सांगितले. तिबेटी राजा मांधाता ह्याने मानससरोवराच्या काठाशी शंकराची अत्यंत खडतर तपश्चर्या केली, म्हणून त्या पर्वताला गुर्लामांधाता पर्वत म्हणतात, असे कळले. हा पर्वत २५००० फूट उंच आहे.

6-18.jpg

हे अवर्णनीय दृश्य डोळ्यासमोरून हालत नाही, तोच दूर क्षितिजापर्यंत पसरलेला निळ्याशार पाण्याचा प्रचंड जलाशय दिसू लागला. आधी आम्हाला वाटलं की हेच ‘मानस सरोवर’, पण हा होता राक्षसताल! बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या नीलमण्यासारखा चमकणारा राक्षसताल अप्रतिम सुंदर दिसत होता. हा प्रचंड तलाव रावणाच्या हृदयापासून झाला अस म्हणतात. ह्याचे पाणी मानससरोवरापेक्षा थंड आहे. म्हणून ह्याला ‘रावणहृदय’ आणि ‘अनुतप्त’ अशीही नाव आहेत. राक्षसतालचे पाणी विषारी आहे,असा समज आहे. त्यामुळे इथले पाणी पीत नाहीत किंवा इथे स्नानाची प्रथा नाही. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे हे पाणी मानसिक रोगांवर उपयोगी असते. राक्षसतालच्या काठावर आणि इतर अनेक ठिकाणी दगडांवर दगड ठेवून घर बांधलेली दिसतात. इथे असं घर बांधलं तर आपलंही घर होतं असं समजतात.

6-19.jpg

6-20.jpg

राक्षसतालच्या काठाशी त्या नितांत सुंदर पाण्याकडे बघत शांत बसून राहावेसे वाटत होते. पण आमचे गाईड घाई करायला लागल्यावर बसमध्ये बसलो. कैलास पर्वताचे दर्शन अजून झाले नव्हते. अनुभवी यात्रींनी आम्हाला कैलासाची दिशा दाखवली. सगळे नजर ताणून तिकडे बघत होते. पण अजून ढगांचा पडदा होता. आमच्या सुदैवाने हळूहळू तो पडदा हालला! काही वेळातच कैलास पर्वताचे सुरेख दर्शन होऊ लागले! माझा तर डोळ्यांवर विश्वास बसेना. ह्याच कैलास पर्वताचे कितीतरी फोटो, व्हिडिओ मी बघितले होते. यात्रेवरची जी पुस्तकं मिळतील ती हपापल्यासारखी वाचली होती. तो कैलास पर्वत मी खरंच बघत होते?

6-21.jpg

सर्व यात्रींनी मनापासून हात जोडले. पहिल्याच दिवशी उत्तम दर्शन झाल्यामुळे आता परिक्रमाही नीट होईल अशी उभारी वाटू लागली.

राक्षसताल आणि कैलास पर्वताच्या दर्शनाची धुंदी उतरण्याआधीच आम्ही मानस सरोवराजवळ पोचलो. बरेचसे यात्री लगेचच स्नानाला पाण्यात उतरले. तिथे कपडे बदलण्याची काहीच सोय नव्हती. पुढे परिक्रमेत तीन-चार दिवस मानसच्या काठाशी राहायचं होतच. तेव्हा करू अंघोळ, असा विचार करून मी आणि नंदिनी काठाकाठाने फिरू लागलो. नितांत सुंदर सरोवर आणि निरव शांतता.

6-22.jpg

मानस सरोवर समुद्रसपाटीपासून १५००० फूट उंचीवर आहे. हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे गोड्या पाण्याचे हे सरोवर, हिंदूंचे तसेच तिबेटी लोकांचे पवित्र तीर्थस्थान आहे. ह्यात अंघोळ केल्याने गेल्या १०० जन्मांची पापे नष्ट होतात व माणूस जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमधून मुक्त होतो, असे समजले जाते. हे सगळं खरं असलं, तरी चिनी लोकांसाठी मात्र हे फक्त एक सहलीचे ठिकाण असावे,ह्याचा पुरावा काठावर पडलेल्या बिअरच्या बाटल्यांच्या ढिगावरून मिळत होता.

6-23.jpg

6-24.jpg

सर्वांची स्नान-पूजा आटोपल्यावर आम्ही सगळे दारचेनच्या रस्त्याला लागलो आणि थोड्या वेळात तिथे पोचलोही. तकलाकोटचा कँप तर छान होता. दारचेनचा तेवढा छान नाही, पण फार वाईटही नव्हता. एकेका खोलीत तीन-चार यात्रींची सोय सगळ्यांनी समजुतीने करून घेतली. राहण्याची जागा नवीन बांधलेली दिसत होती. प्लास्टरचा ओला वास येत होता. नेपाळमार्गे किंवा भारतातून, कुठूनही यात्रेसाठी आलात, तरी दारचेनपासूनचा पुढचा रस्ता एकच असतो. त्यामुळे यात्रींच्या नव्या हंगामाआधी बांधकाम भराभर संपवलेलं दिसत होत. कुठल्याही प्रकारच नुकसान झाल्यास भरून द्यावं लागेल, अशी सज्जड तंबी मिळाली होती. एका यात्रींनी त्यांची खिडकी ‘युवानं’ मध्ये फोडल्यामुळे, चीनमध्ये काचांचा व कामगारांचा खर्च किती आहे, हे सगळ्यांना नीट आणि सुस्पष्ट कळलं! बाकी कोणी नंतर खिडक्यांना हात लावायचीही हिंमत केली नाही.

6-25.jpg

बाहेर फोन करायला गेलो, तर काय! बाहेर तिबेटी तुळशीबाग भरली होती. बऱ्याच तिबेटी बायका आपल्या पारंपरिक वेषात आल्या होत्या. सगळ्यांजवळ मण्यांच्या माळा, चाकू आणि इतर तिबेटी वस्तू होत्या. भाषेचा मोठा प्रश्न होता. पण सगळ्यांकडे कॅलक्युलेटर होते. त्यावर ती अक्का लिहायची ‘१००’, लोक लगेच ‘३०’ पुन्हा अक्का ‘९५’! शेवटी सौदा ५० युआनवर तुटायचा!

6-26.jpg

दिल्लीत यात्रींच्या वेगवेगळ्या समित्या करतात. त्यात किचन कमिटी, लगेज कमिटी, हिशेब कमिटी असे प्रकार होते. लगेज कमिटीवाले सामानाचे नग मोजून देतात आणि घेतात. सगळ्यांकडून काही रक्कम सामायिक खर्चासाठी घेतली होती. त्यात भाज्या फळांची खरेदी, स्वैपाकी इत्यादींचे पगार, व्यवस्थेतील लोकांची बक्षिसी व्हायची. ते हिशेब ठेवायचं काम, हिशेब कमिटीकडे होत. किचन कमिटीवाले स्वैपाकाला लागणारा शिधा काढून देण्याचं काम करतात. मी, नंदिनी ‘उनाडक्या कमिटीत’ होतो. एकट्या आलेल्या बायकांना कुठलंही काम सांगणं, पब्लिकला आवडत नव्हत! उत्तम! आम्ही उनाडक्या करायला मोकळ्या!

6-27.jpg

ह्या कँप पासून जेवणाची व्यवस्था यात्रींना आपली आपण करावी लागते. त्या साठी लागणारा कोरडा शिधा , दिल्लीतल्या काही स्वयंसेवी संस्था नाममात्र किमतीला देतात. भाजी वगैरे तकलाकोटला खरेदी केली होती. दोन नेपाळी स्वैपाकी आणि दोन मदतनीस बरोबर घेतले होते. पहिल्याच दिवसापासून आमच्या स्वैपाक्याने आपले रंग दाखवायला सुरवात केली. पुढे तकलाकोटला परत येईपर्यंत त्याने कधी हळद जास्त, कधी तिखट जास्त. रोज वेगळी चव! आजची कल्पना तो उद्याला वापरत नसे. एकूण सगळ्या अवधीतल्या त्याच्या स्वैपाकाची बेरीज केली तर स्वैपाक उत्तम होता. पण रोजचा स्वैपाक ‘कभी जादा, कभी कम’ ह्या तत्त्वावर असायचा.

6-28.jpg

6-29.jpg

आमच्या खोल्यांना पडदे नव्हते. अमावास्या जवळ येत होती. रात्री खिडकीतून बाहेर बघितलं की अक्षरशः आभाळात चांदण्याचा सडा पडल्यासारखा वाटत होता. इतकी स्वच्छ हवा, निरभ्र आकाश आणि सुरेख चांदणं! हात लांबवला तरी चांदण्या हाताला येतील अस वाटत होत. आम्ही कितीतरी उशीरापर्यंत भान हरपून ते दृश्य पाहत होतो! पुण्याहून निघाल्यापासून आतापर्यंतचे वाटणारा एकटेपणा,मुलाला सोडून आल्याची बोच सगळं सगळं ह्या चांदण्याचा शांत प्रकाशात पार विरघळून गेलं!!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle