लीपूलेखची शेवटची चढण कशीबशी चढून मी भारताच्या सीमेत पाय टाकला. सुरेशभाई लगेच धावत पुढे आला. माझ्या पाठीवरची सॅक घेतली, हात धरून जिथे मी नीट उभी राहू शकेन, अश्या जागी थांबवलं. सगळे जवान, अधिकारी, पोर्टर, पोनीवाले हसऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. माझा पोनीवाला येऊन ‘ कैसे हो दिदी, परिक्रमा ठीक रही? ’ अशी चौकशी करून गेला.