माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१० (लिपूलेख पास ते गाला)

दिनांक ३ जुलै २०११ (लीपूलेख खिंड ते गुंजी)

10-51.jpg

लीपूलेखची शेवटची चढण कशीबशी चढून मी भारताच्या सीमेत पाय टाकला. सुरेशभाई लगेच धावत पुढे आला. माझ्या पाठीवरची सॅक घेतली, हात धरून जिथे मी नीट उभी राहू शकेन, अश्या जागी थांबवलं. सगळे जवान, अधिकारी, पोर्टर, पोनीवाले हसऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. माझा पोनीवाला येऊन ‘ कैसे हो दिदी, परिक्रमा ठीक रही? ’ अशी चौकशी करून गेला.

पाचव्या बॅचचे यात्री तिबेटमध्ये जाण्यासाठी उभे होते. तिबेटमध्ये जाताना आम्ही ज्या कौतुकाच्या नजरेने पहिल्या बॅचच्या यात्रींकडे बघितलं होत, तसेच हे यात्री आमच्याकडे बघत होते. ‘काही त्रास झाला का, हवा कशी होती?’ अश्या चौकश्या करत होते.

10-52

माझ्या परिचयातले पुण्याचे श्री. व सौ. रायकर ह्या बॅचमध्ये होते. त्या दोघांनी आधीही यात्रा केली होती. यात्रेची तयारी करण्यासाठी त्यांची दोघांचीही खूप मदत झाली होती. आमच्या बॅचेस् लीपूलेखला भेटतील, असं लक्षात आलं होतं. तेव्हाच, इथे भेटल्यावर त्यांनी मला चॉकलेट द्यायचं, असंही ठरलं होतं! त्याप्रमाणे त्यांनी मला चॉकलेट दिलं. त्या आपुलकीने आणि नेहमीच्या परिचयाचे चेहरे बघून मला अगदी भरून आलं. तीन आठवड्यानंतर घरच कोणीतरी भेटल्यासारखं वाटलं.

10-40.jpg

आमच्या आणि पाचव्या बॅचच्या लगेज कमिटीचे लोक सामान मोजून देण्यात गर्क होते. इथेही आसमंतात बर्फाच साम्राज्य होतच. पाचव्या बॅचला धारचूलापासून पुढे नबीढांगपर्यंत पाऊस लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या बॅचच्या लोकांनी एकमेकांना ‘कित्ती बै आपण नशीबवान नै’ अस पटवून दिलं!`

10-34

हा सगळा दंगा आवरल्यावर आणि आमचे पासपोर्ट आमच्या ताब्यात दिल्यावर नारंग सरांनी आम्हाला पुढे निघायला सांगितले. तिबेटमध्ये जाणाऱ्या यात्रींना सुखरूप यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा देऊन आम्ही मार्गक्रमण सुरू केले. माझ्या पाठीवर होती ती सॅक खरंतर जड नव्हती. पण विरळ हवा आणि उभ्या चढणीवर गळ्यातल्या माळेचे, हातातल्या घड्याळाचेसुद्धा ओझं वाटत, तिथे सॅकची काय कथा! ती सॅक सुरेशच्या पाठीवर गेल्यामुळे शरीरावरचं, आणि ‘आता आपण आपल्या देशात आलो’, ह्या विचाराने जीवाला अगदी हलकंहलकं वाटत होत.

हवेत थंडी होती, पण पाऊस नव्हता. वारा मात्र खूपच जोरात वाहत होता. त्या वाऱ्यामुळे माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होत. माझा पोनीवाला सुरेश जवळ येऊन म्हणाला, ’दिदी, अब तो अपने मुलुख मे आ गये, अब क्यू रो रहे हो? ’ मी हसून त्याला म्हटलं, ’नही भाई, हवा जो इतनी जोरसे चल रही है’ तिबेटचे पोनीवाले यात्री खाली पडले, त्यांना दुखापत झाली, तरी पर्वा करत नव्हते, त्यांच्या त्या कोरड्या अनुभवानंतर हा आपुलकीचा अनुभव मनाला फार सुखकारक वाटत होता. ‘थंडी-वाऱ्यासाठी टोपी घाला, कान झाका. ’ असा सल्ला सगळे देत होते. थोडं खाली उतरल्यावर आय. टी. बी. पी. च्या जवानांनी शेकोटी पेटवून वयस्कर यात्रेकरूंमध्ये थोडी धग निर्माण केली.

10-41

२१ जूनच्या रात्री दोन-अडीचला सुमारास आम्ही नबीढांगवरून लीपूकडे रात्रीच्या अंधारात ती जीवघेणी, जवळजवळ तीन हजार फूट आणखी उंचीवर नेणारी चढण चढावयास सुरवात केली होती. दगडगोट्यांच्या, छोट्या-मोठ्या ओहोळातून ठेचा खात, धापा टाकत, अडखळत, पोर्टरचा हात पकडून चालत होतो. हात-पाय थंडीने आखडलेले, डोळ्यावरच्या झोपेने काही सुचत नाही, अशी विचित्र अवस्था होती. किती चालायचं आहे, किती उंचीवर आलोय, काही कल्पना येत नव्हती. साधे गवताचे पातेही नसलेली ती ‘नो मॅन्स लॅण्ड’ कशीतरी पार केली होती. आता खाली नबीढांगकडे उतरताना त्याची कल्पना येत होती. तीव्र उतार असलेली ती काहीशी निसरडी पायवाट सगळे भराभर उतरत होते. तिबेटकडे जाताना अधेमधे मी घोड्यावर बसले होते. आता मात्र उताराचाच रस्ता होता. परतीच्या प्रवासात अजिबात घोड्यावर बसायचं नाही, असा निश्चय केला होता. नाहीतर माझा माझ्या चालण्याच्या शक्तीवरचा विश्वास उडाला असता.

10-33.jpg

आज आम्हाला कालापानी कँपपर्यंत जायचं होत. तिथे यात्रींच्या स्वागतासाठी ‘बडा खाना’ असतो. ती १७ किलोमीटरची वाटचाल आहे. दुसऱ्या दिवशीचा पल्ला लांबचा म्हणजे २७ किलोमीटरचा होता. गुंजी कँपला दुपारचं जेवण करून बुधीपर्यंत पोचायला संध्याकाळ झाली असती. नारंग सरांना उद्याच्या ऐवजी आजच गुंजीला गेलो तर चांगलं होईल असं वाटत होत. हे जुळवून आणायचं, म्हणजे बरीच कसरत होती. सरांनी त्याबद्दलचे प्रयत्न तकलाकोटपासूनच चालू होते. गुंजीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. कालरा अंकलना तिथे उपचार मिळू शकले असते.

10-32.jpg

तासभर चालल्यानंतर वाटेत एका ठिकाणी तीन-चार जवान वाटेत उभे राहून ‘ॐ नमः शिवाय’ चा गजर करत येणाऱ्या यात्रींना पाणी देत होते. लगेच गरमागरम चहाचा ग्लास हातात देत होते. त्यांचे औपचारिक आभार मानले तर त्यांचा त्या अगत्याचा अपमान होईल, अस वाटत. म्हणून त्यांच्या ‘ॐ नमः शिवाय’ला जोरात ‘ॐ नमः शिवाय’ म्हणून आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात नारंग सर आलेच. त्यांनी आजच गुंजीपर्यंत जायचं नक्की झाल्याचसांगितलं. अजून बराच रस्ता बाकी होता. त्या काळजीने आणि ॐ पर्वताचे दर्शन घेण्याच्या ओढीने मी अजून पटापट पाय उचलायला लागले. माझ्यासोबत अक्षरशः सावलीसारखा चालणारा सुरेशभाई, नबीढांग कँप जवळ आल्यावर मात्र पुढे पळत गेला. ॐ पर्वताचे दर्शन होतंय हे बघून पुन्हा मागे येऊन ‘ आरामसे चलो दिदी, बढिया दर्शन हो जायेगा’ अशी बातमी आनंदाने हसत दिली. नबीढांगचा कँप हळूहळू दृष्टिपथात आला.

10-31

कँपच्या अगदी समोर ‘ॐ पर्वत’ दिसत होता. सगळ्या यात्रींचे भान तिकडे बघताना हरपले होते. डोंगरामध्ये अगदी स्पष्ट अशी ॐ ची आकृती दिसत होती. स्पष्ट म्हणजे वरच्या चंद्रबिंदीसकट! असा हा चमत्कार निसर्गात कसा घडला असेल, ह्याचं आजदेखील आश्चर्य वाटत. कँपवरचे लोक आम्हाला जेवून घ्यायचा आग्रह करत होते. तकलाकोटला केलेल्या जुजबी नाश्त्यानंतर पोटात काहीच गेलं नव्हत. साध्या आणि रुचकर जेवणाच्या वासाने भूक जागी झाली. पंधरा दिवसांच्या अंतराने चवीचे जेवण मिळत होते. ताटे हातात घेऊन सगळे समोर ॐ पर्वताकडे बघत जेवले. नबीढांगपासून कालापानी ९ किलोमीटर आणि तिथून गुंजी ९ किलोमीटर आहे. ते सगळं अंतर आजच पार करायचं होत. त्यामुळे एकदा डोळे भरून निसर्गाच्या त्या आविष्काराकडे बघून घेतलं, आणि पुढे निघालो. आजचा बहुतेक सगळा रस्ता उताराचा होता. फारशी चढण नव्हती. त्यामुळे चालताना दम लागला नाही, तरी पाय भरून येत होते. जाताना ह्याच रस्त्यावर आपल्याला किती प्रश्न पडले होते, किती काळजी वाटत होती हे आठवून मनातल्या मनात हसायला येत होत.

10-30.jpg

यात्रेच्या महितीपुस्तकात चालायच्या बुटांचे दोन जोड आणायला सांगितले होते. बूट आपल्या पावलाच्या मापापेक्षा एक माप मोठे आणावे, म्हणजे थंडीत उबेसाठी पायमोजांचे दोन जोड घातले, तरी बूट घालायला त्रास होत नाही, असं पुस्तकात सांगितलं होत. मी जे माझे नेहमीच्या वापराचे बूट जाताना घातले होते, ते जाताना नबीढांगपर्यंत फाटून गेले होते. दुसरे मोठ्या मापाचे बूट आता पायात होते. उतरताना पावलांवर, पायाच्या बोटांवर चांगलंच प्रेशर येत होतं. बूट मोठ्या मापाचे असल्याने पाऊल आतल्या आत सरकत होते. आजच्या पहिल्याच दिवशी उजव्या अंगठ्याच नख काळनिळ झालं होत. पायांना फोड यायला सुरवात झाली होती. तशीच दाटून चालत होते.

10-29

असंच बरंच अंतर चालल्यावर कालापानी कँप दिसायला लागला. कँपवर कालीमातेचे दर्शन घेऊन लगेच पुढे निघायचं, असं ठरलं होतं. सुरेशभाई मला विचारून चहा-पाण्यासाठी कँपच्या आधीच्या टपरीवर थांबला. कँपवर थंडगार सरबताने सगळ्यांचे स्वागत होत होतं. आम्ही तिथे मुक्काम करणार नसल्याने तिथले लोक आमच्यावर जरा नाराज झाले.

10-28

त्या कँपमध्ये एका बंकरमध्ये इमिग्रेशनचे सोपस्कार करायचे असतात, हे मी विसरून गेले होते. माझा पासपोर्ट तर सुरेशजवळचं सॅकमध्येच होता! मी सुरेशची वाट बघत त्या बंकरच्या बाहेर बसून राहिले. सगळेजण मी का थांबले आहे, ते विचारत होते. मी प्रत्येकाला तीच स्टोरी सांगत होते. येणाऱ्या सगळ्या पोर्टरांना सुरेशला पाठवायला सांगत होते, तेवढ्यात स्वतः नारंग सर बाहेर आले. मला पाहून म्हणाले, ’ऐसे क्यू बैठी हो?’ मी पुन्हा माझी ष्टोरी ऐकवली. 'अरे, मेरा भी यही हाल है| सुनोभाई, मॅडमका फॉर्म भरवा लो, बाकी का काम पोर्टर करवायेगा|’ अस म्हणत त्यांनी माझी सुटका केली! आमचे सर म्हणजे एक नंबर होते. कोणत्याही प्रकारचा गोंधळ केला, तरी कंपनी द्यायला सर हजर असायचे. तिथली लिखापढीपूर्ण करून मी आणि सर पुढे सटकलो.

10-27.jpg

कालीमातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर पुढे आमच्यासाठी चहा-बिस्किटे, खीर असा सरंजाम मांडला होता. सगळे त्याच्यावर तुटून पडले! आमचा अल्पोपाहार होईपर्यंत सुरेशभाई पासपोर्टवर शिक्का घेऊन आला. त्या सॅकमध्ये ज्या पिशवीत पासपोर्ट होता, त्यातच माझे उरलेले डॉलर्स पण होते. पण हे पोर्टर इतके प्रामाणिक असतात, की त्याने त्या नोटांना हातही लावला नव्हता. ह्या सगळ्या भानगडीत बराच वेळ मोडला होता. बहुतेक सगळे यात्री चालत किंवा घोड्यावर स्वार होऊन कधीचेच पुढे निघून गेले होते. शेवटच्या ग्रूपचे मेंबर गप्पा मारत, फोटो काढत निवांत चालत होते. मीही त्यांच्याबरोबर चालायला लागले.

10-26

कालापानी ते गुंजीचा रस्ता जीपसारख्या वाहनासाठी बनवला आहे. त्या रस्त्याच्या बाजूने काली नदी वाहताना दिसत होती. आता ही नदी आम्हाला मालपा पार करेपर्यंत सोबत करणार होती. वाहनाचा रस्ता असल्याने फारसे चढ-उतार नव्हते. रुंद रस्त्यावरून गप्पा मारत चालता येत होत. पण सकाळी तकलाकोटपासून सुरू केलेला प्रवास चांगलाच जाणवत होता. कधी एकदा कँपवर पोचतोय अस झालं होत. शेवटी मी गप्पा मारणारा ग्रुप मागे टाकून पुढे सटकले. आता अक्षरशः पावलं मोजून चालत होते. प्रत्येक वळणानंतर ‘आता आलाच कँप’ अस वाटत होत. सुरेशभाईला विचारलं की तो ‘ अभी तो दूर है| तीन किमी चलना है|’ अस सांगून माझा थकवा द्विगुणित करत होता. असं पाय ओढत चालताना तिरंगा फडकताना दिसला! झालं! मला वाटलं आला कँप. पण....., तो कँप सीमा सुरक्षा दल (border security force) चा होता. आणखी एक तास चालल्यावर आमचा आय. टी. बी. पी. चा कँप आला.

दिवसभरात जवळपास २८ किमी चालून पायाचे तुकडे पडले होते. बसण्याची सुद्धा ताकद नव्हती. कँपवर जाऊन लगेच आडवी झाले. तिथल्या माणसाने जागेवरच कॉफी आणली. जवळपास दोन आठवड्यानंतर कॉफी पिऊन अंतरात्मा तृप्त झाला. जरा वेळ आराम केल्यावर मग माणसात आले. घरी फोन करून सगळ्यांशी पोटभर गप्पा मारल्या. चालायची आजिबात शक्ती नव्हती, तरी तिथल्या देवळातल्या भजनाचा मोह आवरला नाही. तशीच खुरडत खुरडत भजनाला जाऊन बसले. तिथल्या त्या शक्तीचा, जोषाच्या वातावरणात सगळा थकवा, वेदना विसरायला झाल्या. कँपवर जेवतानाच डोळे झोपेने मिटत होते. तिथल्या लोकांच्या प्रेमळ आग्रहापोटी चार घास जास्तीचे खाऊन पाच मिनिटाच्या आत सगळे झोपून गेले.

दिनांक ४ जुलै २०११ (गुंजी ते बुधी)

10-25

आमच्या ठरलेल्या कार्यक्रमातले, कालापानी ते गुंजी हे नऊ किलोमीटरचे अंतर आम्ही कालच चालून संपवलं होत. काल चालताना अवस्था वाईट झाली होती. पण आजची चाल त्यामुळे सुखकर वाटत होती. आज गर्ब्यांग,छीयालेखचं पुष्पपठार असा नयनरम्य रस्ता होता. पूर्ण यात्रेच्या मार्गातला हा सगळ्यात सुंदर भाग आहे. गुंजीच्या कँपजवळ भुसभुशीत मातीचे डोंगर आहेत. ते अगदी जपून, पोर्टरचा हात पकडून सगळे उतरत होते. मग कालीनदीचा पूल पार केल्यावर बुधीचा रस्ता सुरू झाला. आता आम्ही १२००० फुटांच्या खाली जात होतो. विरळ हवेमुळे होणारे त्रास होण्याची भीती संपली होती. मोठी झाडे, हिरवळ डोळ्यांना सुखावत होती. निसर्गातला बदल जाणवत होता. लहान झुडपे, रखरखीत डोंगर मागे पडले होते. सगळीकडे हिरवाई होती.

10-24.jpg

सगळ्यांना आता घराची आस लागली होती. परतीच्या प्रवासातला एखादा दिवस कमी करता येईल का, असे सरांचे जोरात प्रयत्न चालू होते. ते जमलं असत, तर आम्ही ९ जुलैच्या ऐवजी ८ जुलैला दिल्लीत पोचलो असतो. त्या त्या कँपवर राहण्याची, शेवटच्या दोन दिवसांच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था होऊ शकली, तरच हे शक्य होत. आता रोज चालताना किती दिवस राहिले आणि किती किलोमीटरची चाल राहिली, हा हिशेब चालू असायचा. हे आणि असे विचार करत आणि सभोवतालचे सृष्टीसौंदर्य डोळ्यात, मनात साठवत मी माझ्या थकलेल्या शरीराला, फोड आलेल्या पायांवर दामटवत होते. ज्या रस्त्याने गेलो, त्याच रस्त्याने परतताना वेगळीच मजा येत होती. फक्त येताना जे उतार भराभर, एका दमात पार केले होते, ते आता कण्हत-कुंथत चढावे लागायचे. आपण नसताना काहीतरी जादू होऊन त्या डोंगरांची उंची वाढली की काय, अशी शंका बऱ्याच वेळा येत होती. आजच्या रस्त्यावर सुरेख हिरवी पठारे, दूरवर दिसणारी नदी अस दृश्य असल्याने चालण्याचे श्रम काहीसे कमी होत होते.

10-23

काही वेळ चालल्यावर एका लहान झोपडीवजा हॉटेलात नाश्त्याची सोय होती. जाताना आम्हाला आवर्जून प्रत्येक जेवणात हिरवी पालेभाजी खाऊ घालायचे. आता मात्र रोज छोले-राजम्याशी गाठ होती. पण आज आमचं नशीब जोरावर होत! त्याच्याकडे समोसे विकायला होते. ते कुस्करून त्यावर गरमागरम छोले, पुदिन्याची चटणी, शेव.... असा अप्रतिम बेत जमला. सुरवातीच्या यात्रींनीच सगळे समोसे संपवून टाकले. उरलेल्या लोकांना फक्त वर्णनच ऐकावं लागलं!!

10-21

10-22

जेवून पुढे निघाल्यावर एक मोठा चढ स्वागताला उभा होता. भरल्या पोटी तो दुप्पट मोठा वाटत होता. बरेच भिडू घोड्यावर स्वार झाले. पण मी निश्चयाने एक एक पाऊल टाकत चढत राहिले. चांगली तासाभराची दमछाक झाल्यावर शिखर गाठलं. आता गर्ब्याल गाव जवळ दिसत होत. त्याआधी पुन्हा एकदा आमचे पासपोर्ट तपासले. अश्या प्रत्येक चौकीवर सगळ्या यात्रींची चहा-पाणी देऊन आस्थेने विचारपूस होते. ‘कुठून आले, परिक्रमा कशी झाली, हवा चांगली होती का? ’ अशी प्रश्नोत्तरे होतात.

10-20

10-19.jpg

गर्ब्याल गावात थोडं थांबून, तिथली ती सुंदर नक्षीकामाची घरे, निरागस पहाडी लोक सगळं एकदा डोळ्यात साठवून घेतलं. हे सगळं पाहताना माझ्या मनात काहीतरी तुटायचं. अजून काही दिवसांनी ही सगळी गंमत संपणार, ही जाणीव मनाला कुरतडायची. असो. जरा वेळाने आम्ही छीयालेखच्या पुष्पपठारावर आलो. जातानापेक्षा आता बऱ्याच प्रकारची फुल उमललेली दिसत होती. निरनिराळ्या रंगांची नुसती उधळण झाली होती. ते बघून डोळे अगदी तृप्त झाले. एका चौकीवर शेवटची पासपोर्ट तपासणी झाली. हसऱ्या-उत्साही जवानांचा निरोप घेऊन पुढे निघालो.

10-18.jpg

10-19.jpg

पठारानंतर खडकाळ आणि लांबलचक उतरण होती. आजही पावसाने कृपा केली होती. नाहीतर पाऊस पडत असताना, ह्या खडकांवरून उतरताना किती दंडवत घातले असते, कोणास ठाऊक. नंदिनी चढण्यात पटाईत, कितीही उंच चढ असला, तरी न थांबता चढायची. उतरताना मात्र आमच्या ह्या ‘घाटाची राणीची’ वाट लागली. माझ्यासारख्या वजनी लोकांना उतरताना गुरुत्वाकर्षणाचा जोरदार फायदा मिळतो! सूपरफास्ट वेगाने खाली! संपूर्ण यात्रेत पहिल्यांदाच तिच्याबरोबरच कँपवर पोचले.

संध्याकाळी चहा पिताना न ठरवताच सगळे बाहेर जमले. गाण्याची मस्त मैफिल जमली. सगळ्या हौशी कलाकारांनी आपापले घसे साफ करून घेतले.

10-17.jpg

दिनांक ५ जुलै २०११ (बुधी ते गाला)

10-16.jpg

पडत्या पावसातच सुरेशभाईच्या सोबतीने चालायला सुरवात केली. ‘आज पाऊस फार आहे. हवा सुधारेल, अशी शक्यता वाटत नाही. अश्या हवेत दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे आज कॅमेरा आत ठेवून द्या. आज फोटो नाही, ’ अशी तंबी त्याने मला कँपवरच दिली होती. इथे ‘सुरेशवाक्यं प्रमाणम्’ मानून, मी अजिबात फोटो काढले नाहीत. काही यात्रींच्या मते, आदल्या दिवशी कँपवर सगळ्यांनी जी नाच-गाणी केली, त्याची शिक्षा म्हणून पाऊस पडत होता. हे लॉजिक अगदीच अशक्य होत! आपल्याला गैरसोयीच्या वेळेला पाऊस पडला की, ’ भगवान नाराज हो गये’ आणि सोयीच्या वेळेला झाला की, ’भोलेबाबाकी कृपा! ’ अरेच्या!

10-15.jpg

सगळे यात्री रेनकोट घालून पावसापासून वाचायचा प्रयत्न करत वाटचाल करत होते. आम्ही ह्याच भागातून काही दिवसांपूर्वी गेलो होतो, तेव्हाच्या आणि आताच्या निसर्गात फरक पडलेला दिसत होता. मध्यंतरीच्या काळात पाऊस भरपूर झाला होता. चालताना एका बाजूला रोरावत वाहणारी काली नदी, कालीच्या पलीकडच्या अंगाला असणाऱ्या नेपाळमधून अक्षरशः थव्याने कोसळणारे दुधाळ धबधबे, उंचचउंच आकाशाच्या पोटात शिरू पाहणारे हिरवेगार डोंगर, अनेक रंगांची बरसात करीत जाणारी विविधरंगी फुले हे पाहताना भान हरपत होत.

10-14.jpg

यात्रेची सहावी बॅच आज आम्हाला भेटली. त्याचं शंकासमाधान करत आणि त्यांच्या सुखरूप यात्रेसाठी शुभेच्छा देत आम्ही चालत होतो. दोन बॅचेसमुळे आजच्या बिकट रस्त्यावर वाढीव वर्दळ होती. आम्ही पन्नास यात्री, आमचे पोर्टर,पोनी-पोनीवाले, सामान वाहणारी खेचरे, असा लवाजमा. उलट्या दिशेने येणाऱ्या बॅचचीही तीच कथा. शिवाय गावकरी, इतर जाणारे-येणारे. त्यामुळे चालताना फार काळजी घ्यावी लागत होती. ‘सावधान, रास्ता खतरनाक है’ अशी लाल अक्षरे जागोजागी दिसत होती.

10-13.jpg

मालपा गावाच्या आधी रस्त्यात अनेक लहान-मोठे धबधबे लागतात. त्याचबरोबर लखनपूर, बिंद्राकोटी, छाता फॉल असे उरात धडकी भरवणारे महाप्रचंड धबधबे लागतात. ह्यांना मराठीतल्या ‘धबधबा’ ह्या शब्दापेक्षा ‘प्रपात’ हा संस्कृत शब्द जास्त शोभून दिसला असता. छाता फॉल म्हणजे एका विस्तीर्ण हिरव्यागार डोंगरातून अनेक ठिकाणी अंगाला हुडहुडी भरवणारे थंड पाणी कोसळत असते. जोरदार वारा असतोच. त्यामुळे छत्री उघडली तर तोल जाऊन कालीच्या प्रवाहात चिरनिद्रा ठरलेली. म्हणून शक्यतो भिंतीला चिकटून, धबधब्यातूनच चालावे लागते. हे संकट कमी म्हणून चव वाढवायला पुढून-मागून घोडे येत होते. सुरेशभाई जर क्षणोक्षणी मदतीला नसता, तर काय झालंअसत, ह्याचा मी विचारही करू शकत नाही.

10-11.jpg

10-12.jpg

ह्या टप्प्यात यात्री विरुद्ध पोनीवाले अशी भांडणे सुरू झाली. दगडी रस्त्यांवरून घोड्यांचे नाला मारलेले पाय घसरतात. त्यात आज पावसाने जोर धरला होता. घोड्यांनी नदीच्या कडेने चालायचं आणि पायी जाणाऱ्यांनी डोंगराच्या कडेने, असं ठरलेलं असत. घोड्यावरचे यात्री थोडे जरी हलले आणि घोडा नदीत पडला तर काय? ह्या भीतीने अवघड वाटेवर पोनीवले यात्रींना खाली उतरायला सांगतात. पण काही यात्री आपण घोडा तेवढ्या दिवसांसाठी विकतच घेतला आहे, अश्या थाटात बोलत होते. काही अपवाद असतीलही, पण साधारणपणे हे सगळे स्थानिक लोक प्रामाणिक, कष्टाळू असतात. ते कळवळून यात्रींना समजावत होते, ’ साब, मुझे भी बच्चे पालने है| घोडा गीर गया, तो मेरा राशनपानीही बंद हो जायेगा|’

10-10.jpg

हे सगळं चालू असताना मालपा गाव आणि आमची दुपारच्या जेवणाची जागा आली. जाडजूड रेनकोट घालूनही मी संपूर्ण भिजले होते. पाण्यातून चालून बूट-मोजे ओलेगच्च झाले होते. जेवणाच्या जागी शेकोटी पेटली होती. त्या धुराच्या वासाने सुद्धा उब वाटत होती. आता पुढे ४४४४ पायऱ्यांची अत्यंत अवघड चढण चढायची होती. त्या भीतीने जेवण थोडक्यात आटपून मी पुढे चालू लागले.

10-9.jpg

मी यात्रेच्या आधी ह्या पायऱ्यांचे वर्णन ऐकले होते. पण ते ‘उतरताना काय वाट लागली’ ह्या प्रकारातलं वर्णन होत. मला कळलं होत की परतीला वेगळा रस्ता असतो. पण दुर्दैवाने तसं काही नव्हत! त्या भयानक पायऱ्या आता चढायच्या होत्या. ज्या ज्या आठवतील त्या देवांची नावे घेऊन मी त्या पायऱ्या चढायला सुरवात केली. ‘कुछ नही दिदी, हौसला रखो| ‘ॐ नमः शिवाय बोलते रहो’ असा धीर सुरेशभाई आणि त्याचे सहकारी देत होते. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून चढत असताना ना पावसाची रिमझीम जाणवत होती, ना आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य लक्ष विचलित करत होते. मन आणि शरीराला संपूर्ण एकाग्र करणे, पायरी नीट चढण्यासाठी आवश्यक होत. चालताना बाकीचे कुठलेही विचार सुचत नव्हते. बरेच यात्री घोड्यावर स्वार होऊन पुढे जात होते.

10-8.jpg

आता काली नदी खोल दरीत चिमुकली दिसत होती. अचानक नेपाळच्या बाजूला मोठा आवाज होऊन दरड कोसळायला लागली. मी स्तिमित होऊन तो प्रकार बघतच राहिले. किती वेगाने आणि केवढे मोठमोठे दगड, माती, झाड सगळं कालीच्या प्रवाहात अदृश्य होत होत.

10-6.jpg

10-7.jpg

मध्ये एक विश्रांतीसाठी बांधलेली जागा आली. पण आता थांबायला नको वाटत होत. तशीच रेटून चालत होते. कितीही दूर असला, तरी शेवट दिसला की दाखवायला सुरेशला सांगून ठेवलं होत. पण रस्ता वळणा-वळणांचा, डोंगरांच्या कडेने जात असल्याने शेवट नजरेत येत नव्हता. अस दोन तास चालल्यावर (मला ती तेवढी वर्ष वाटली होती!!! ) ‘अभी दो टर्नके बाद सिडीया खतम’ हे शुभवर्तमान मिळाल! हा! मी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. आता अजून ट्रेक करायला हरकत नाही!!

10-5.jpg

कुमाऊँ निगमने पायऱ्या संपल्यावर लगेचच चहाची सोय केली होती. आता उंचावर आल्यावर पाऊस ओसरला होता. समोरच्या दरीत लहान लहान वस्त्या दिसत होत्या. शांतपणे बसून मी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला. शरीराचा एक आणि एक स्नायू ठणकत होता. कॉफी पोटात गेल्यावर तरतरी आली. दिवसभर माझ्या चालीने चालून सुरेश कंटाळला असावा. पुढचा रस्ता सोपा-सरळ दिसत होता. तो एका हॉटेलात जेवायला थांबला.

10-04

आता फार तर तासभर चालायचं होत. मी एकटीच चालत होते. चालताना अचानक माझ्या लक्षात आलं, की ह्या स्वप्नवत प्रवासाचा शेवट आता फारच जवळ आला आहे. नारंग सरांच्या प्रयत्नांना यश आलं, तर आम्ही अजून दोन दिवसात दिल्लीत असू. तसा आजचा कँप शेवटचाच. उद्या धारचूलाच्या हॉटेलमध्ये मुक्काम असेल. मग कुठले हे डोंगर आणि दऱ्या, कुठे हा शांत-साधा दिनक्रम! पुन्हा त्या गर्दी, प्रदूषण, घाई-गडबडीच्या, धावणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायला लागणार.

10-03

फार दम लागला नाही, तरी मी पाच-पाच मिनिटानंतर थांबत होते. एखाद्या दगडावर बसून आसपासची शांतता पिऊन घेत होते. सगळं वातावरण नुकताच पाऊस झाल्याने टवटवीत होत, उन्हात दरीतल्या वस्त्या चमकत होत्या. सगळं दृश्य गंभीर स्तब्ध होत. घरी जायचा दिवस जवळ येत होता, त्याचा आनंद तर होता, पण हे सौंदर्य परत कधी बघायला मिळेल कोण जाणे?

10-02

थोड्याच वेळात कँप दिसायला लागला. कँपवर जाऊन पहिल्यांदा कोरडे कपडे घातले. ओल्या बूट-मोज्यांमध्ये पाय पांढरे पडून, सुरकुतले होते. त्यांना थोडा मसाज केला. काही जणांनी सगळे कपडे प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवायची काळजी न घेतल्यामुळे त्यांचं सगळं सामान भिजून गेलं होत. मग काय, उन्हात कपडे वाळवायची एकच धांदल उडाली. नंदिनी, मी आणि असे इतर रिकामटेकडे लोक मजा पाहत होतो. नारंग सरही आमच्यात मजा करत होते. त्या दिवशी चतुर्थी होती. तो ‘चवथीचा चंद्र’ आणि चांदण्याने टिपूर भरलेलं आकाश कितीही वेळ पाहिलं, तरी मन भरत नव्हत. फार उशीर झाला, अशी तंबी मिळाल्यावर जड मनाने आडवे झालो.

10-01

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle