संपले पुस्तक होते राहिले, शेवटचे एक पान
पडाव होता दूर थोडाच, तुला त्याची आस
झिजलेल्या काळ्या धाग्याची, गळ्यामधे गुंफण
झाली होती भाळावरली, चिरी फिकी पण
पायाखाली रिती थोडी, अजून होती वाट
पायामधे शिल्लक अजून होते, थोडे त्राण
फांदीवर तगून राहिलेली, पिवळी एक शेंग
आलाच होता पडायला, अळूवरचा थेंब
चोचीमधे होता उरला फक्त, शेवटचाच घास
होतच आली होती पूर्ण, फिनिक्साची राख
गळ्यात होते थरथरते, सुंदर एक गान
शेवटचीच होती मैफलीत, भैरवीची तान
शेवटचा अजून चालूच होता, एक श्वास - नि:श्वास
चेह-यावरचा तुझा मुखवटा, उतरला अगदी तेव्हाच