आगंतुक

तुझं माझं नातं म्हणजे love hate relationship

तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम.....इतकं की त्यामुळे माझं अस्तित्व आलं धोक्यात.

माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल दुस्वास.. तुझ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त

आणि का नसावा ?? मला न विचारता आलास माझ्या आयुष्यात

आणि तेही चोर पावलांनी, माझ्याही नकळत.

किती सुखात होते मी....

प्रेमळ नवरा, गुणी मुली.....सगळं कसं अगदी आखीव रेखीव...

तुझ्यासाठी कुठेच जागा नव्हती - अगदी तसूभरही.. आणि तुझी गरज तर त्याहून नव्हती.

पण तरी तू आलास ....माझ्यावर नसलेला तुझा हक्क गाजवायला

काय वाटलं तुला..मी तुझा निर्बंध स्वैराचार कबूल करीन ? न बोलता, काहीही प्रतिकार न करता तुला शरण जाईन ???

इथेच तर चुकलास तू! मला ओळखलंच नाहीस नीट...तुझ्या मस्तवाल मनमानी पुढे मी हार मानीन असं गृहीत धरलंस !! खूप मोट्ठी गफलत झाली तुझ्याकडून... चुकीचं सावज हेरलंस ...

पण जे झालं ते एका अर्थी बरंच झालं....आपल्या दोघांच्या दृष्टींनी...आपल्याला दोघांना आपापली पायरी समजली..

खास करून तुला....स्वतः ला 'अजेय' मानतोस ना तू... तुझा हा अहंकार किती व्यर्थ आहे याची उपरती झाली तुला !

आणि मला.... मला पण बरंच काही मिळालं.

तुझ्यामुळे मला माझीच नव्यानी ओळख झाली

माझ्यातल्या त्रुटी समजल्या पण त्याचबरोबर माझी ताकद, हिम्मत देखील नव्यानी सापडली.

स्वतःवर आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकवलंस तू मला.

देवावरचा माझा विश्वास अजूनच दृढ केलास. त्या अदृश्य शक्तीचं कायम माझ्या बरोबर असणं मला पदोपदी लक्षात आणून दिलंस तू....

माणुसकीवरचा, नात्यांवरचा माझा भरवसा व्यर्थ नाहीये हे दाखवून दिलंस.

स्वतःच्या दुःखांचं अवडंबर न करता दुसऱ्याला सुख देणारी माणसं भेटली मला ...

तुझ्यामुळेच तर झालं हे सगळं.. हे आणि असंच अजून बरंच काही....सगळं सगळं तुझ्यामुळे..

खरंच त्यासाठी मी जन्मभर ऋणी राहीन तुझी!

हां हां !!!लगेच हुरळून नको जाऊ.

तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आलेलं वादळ विसरलास? त्या वादळी झंझावातात , त्या वणव्यात माझ्याबरोबर च माझी जवळची माणसंही होरपळून निघाली होती.

त्या जखमा भरून निघाल्या हळूहळू ..पण त्यांचे व्रण मात्र आयुष्यभर सगळ्यांना तुझी आठवण करून देत राहतील. आणि त्यासाठी तुला माफी नाही..

म्हणूनच मी तुझा दुस्वास केला .. आयुष्यभर करत राहीन.

माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या आगंतुकाला स्थान नव्हतं..कधीच नसेल..आणि म्हणूनच तुला अक्षरशः हाताला धरून खेचत घेऊन गेले बाहेर...माझ्या आयुष्यातून, माझ्या शरीरातून!

हो, म्हणूनच म्हणते, माझ्याशी पंगा घेऊन फसलास तू! हरलास या लढाईत....आता तुझ्याबद्दल बोलताना लोक म्हणतात, "बिच्चारा कॅन्सर ! प्रियानी हरवलं त्याला!!"

पण माझी लढाई अजूनही चालू आहे...तुझ्याच विरुद्ध..

प्रत्यक्ष लढाईत तुला नेस्तनाबूत करण्यात यशस्वी झाले .. आता गनिमी कावा खेळणार आहे तुझ्याशी...आणि तोही खुलेआम!

अजूनही बऱ्याच जणांना तू आपल्या जाळ्यात ओढलं आहेस, ओढतो आहेस , जाणून आहे मी!

आता त्यांना सांगणार आहे मी...तुझ्यावर विजय मिळवायचं गुपित!

लवकरच निघून जा कुठेतरी लांब...खोल खाईत, किंवा भूमिगत हो ..कायमचा

कारण आता तुझ्या विरुद्ध लढणाऱ्यांची फौज उभी राहतीये.....आणि तुझा कायमचा बिमोड केल्याशिवाय थांबणार नाहीत हे लढवय्ये!!!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle