निशा सकाळी उठली तेंव्हा तिला खूप मस्त वाटत होतं. अगदी गुरगुटून झोपली होती ती रात्री. आई उशापाशी बसून तिच्या केसांमधून हात फिरवत होती. आई जवळ असण्याचं सुख अनुभवत कधी झोप लागली हे निशाला कळलंच नाही. आज काय बरं करूया असा विचार करतानाच आई आली.
“ निशा, जरा दिवाळीची खरेदी करूया का आज?” आईने विचारलं.
“हो जाऊया की. काय काय आणायचंय?” निशा आईबरोबर फिरायला जायला नेहमीच तयार असायची.
“काही विशेष नाही. नेहमीचीच दिवाळीची खरेदी. आणि तुझ्यासाठी एक छान साडी पण घेऊया”
“साडी? आई, ड्रेस घेऊया. साडी मी कधी नेसणार आहे? उगाच पडून राहील ती इथे” निशाचा सूर नाही कडे झुकतोय असं वाटल्यावर आई म्हणाली,
“अगं बाळा, असावी एखादी सुंदर साडी. आता तुला साडी नेसायचीही सवय व्हायला हवी. मी तर म्हणतेय २-३ साड्या घे. इथे आहेस तोपर्यंत रोज नेसून बघत जा”
“आई... कमाल आहे तुझी. रोज साडी नेसू? मी इथे तुझ्याबरोबर निवांत राहायला आलेय. उगाच काहीतरी नवीन काढू नको.”
“निशा.. माझ्या किती मनात होतं तुला साडीत बघायचं. पण आता काय,तुझ्या मनातच नाहीये तर जाऊदे” आईने डोळे पुसले.
“माते, एव्हढा ड्रामा नको गं... येते तुझ्याबरोबर. घेऊया साडी आणि तुला नेसूनही दाखवेन. खुश?” निशा खिदळली. आईला आनंद देण्यासाठी आपण काहीही करू शकतो, मग साडी क्या चीज है असा विचार करत निशा तिच्यासोबत बाहेर पडली. निशाने एक सुंदर हलकीशी गुलाबी छटा असलेली नाजूक काठांची साडी निवडली. तिने ती drape करून दाखवताच तिची आई बघतच राहिली तिच्याकडे.
“आई काय हे? डोळ्यात पाणी का तुझ्या? हे असं करणार असलीस तर घेणार नाही हां साडी मी” निशा आईला जवळ घेत म्हणाली.
“नाही ग बायो. नाही पाणी काढत डोळ्यातून. मोठी झाली माझी पोर. आता एकदा तुझं लग्न झालं कि मी त्याच्याकडे जायला मोकळी” आईने तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हटलं.
“C’mon आई. पुन्हा तोच विषय. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही” निशा पुन्हा तशीच हट्टी.
“तसं नसतं बाळा. आम्ही दोघांनी तुझ्या लग्नाची किती स्वप्नं बघितली होती. आज तुझे बाबा असते तर...” आईने पुन्हा डोळ्यांना पदर लावला.
निशा पण बाबांच्या आठवणीने दुःखी झाली पण लगेच तिने आईला सावरलं.
“चल आता. झालं ना तुझ्या मनासारखं? घेतली मी साडी. आता खादाडी करायला जाऊया. जाम भूक लागलीय.” असा म्हणून निशाने तिला दुकानाबाहेर नेलं. दुपारी यथेच्छ जेवून पुण्याच्या पेठा पालथ्या घालून मायलेकी दमून संध्याकाळी घरी परतल्या. आई निशाला आवडतो तसा मस्त आल्याचा चहा करायला स्वयंपाकघरात गेली आणि निशा फ्रेश होऊन सोफ्यावर बसते ना बसतेच तोच घरातला फोन वाजला.
“हॅलो”
“हाय.. निशा?” कोणीतरी मुलगी बोलत होती.
“हो बोलतेय. आपण कोण?”
“हाय निशा... मी राधा बोलतेय. ओळखलंस?” पलीकडून त्या मुलीने सांगितलं.
“हाय... राधा! हो ओळखलं. कशी आहेस? तुला हा नंबर कुठून मिळाला?” निशाला आश्चर्य वाटलं.
“अगं ती एक स्टोरीच आहे. कशी आहेस?“
“मी छान आहे. भारतात आलेय सध्या” निशाने सांगितलं.
“काय सांगतेस? ग्रेट! मग उद्या तुला वेळ
आहे का? असेल तर उद्या भेटूया का? मी वेळ आणि पत्ता पाठवते. जमेल तुला?” राधाने विचारलं.
“उद्या? भेटूया की” असं सांगून निशाने फोन ठेवला.
राधाचा फोन? तोही इतक्या दिवसांनी? तिला आठवलं Uk ला गेल्यावर काही काळ त्यांचे फोन व्हायचे एकमेकींना पण परत निशानेच स्वतःला कामात इतकं बुडवून घेतलं कि त्यांचा संपर्क तुटला. आज इतक्या दिवसांनी तिला कशी काय आपली आठवण आली? निशाला काही कळेना. असुदे उद्या विचारू तिला असं म्हणत निशाने तो विषय सोडून दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी निशा तयार झाली आणि राधाला भेटायला निघाली. राधाने एका कॅफेचा पत्ता दिला होता. निशा तिथे पोहोचली आणि हरखूनच गेली. खूप सुंदर होता तो कॅफे. प्रवास हि एकच थीम ठरवून सगळी सजावट केली गेली होती. आणि भिंतींवरचे फोटोज तर अप्रतिम होते. काही भारतातले तर काही भारताबाहेरचे. निशाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. राधा आलीच.
“हाय निशा” राधाने येतानाच निशाकडे पाहत म्हटलं.
“हाय राधा” निशा हसत उठली.
राधाने येऊन सरळ निशाला मिठीच मारली.
“कशी आहेस गं? कित्ती दिवसांनी भेटतोय आपण? पत्ता कुठाय तुझा? काही दिवस contact होता आपला तू UK ला गेल्यावर. मग कुठे गायब झालीस?” राधाने एका दमात सगळे प्रश्न विचारले.
“अगं हो! किती प्रश्न विचारशील? I’m sorry राधा. मी तुझ्याशी contact ठेवला नाही. नंबर बदलला आणि त्यानंतर मीच तुला कळवायचा आळस केला. Sorry... पण तुझ्याकडे कसा आला माझा नंबर?”
“असुदे गं. Sorry काय त्यात? तुला ते गोखले काका माहित आहेत का? आमच्या शेजारीच राहतात ते. मागे एकदा त्यांच्या घरी गेले होते तर कुठल्यातरी निशाबद्दल चर्चा चालली होती. फोटो पहिला तर तू! मग त्यांच्याकडूनच घेतला नंबर.” राधाने सांगितलं.
ओह्ह! म्हणजे हिलाही मातेचे प्रताप कळले असणार. माझं लग्न ठरवायचं चाललंय हेही. निशा मनातच बोलत होती.
“काय गं? कसल्या विचारात हरवलीस? काय मग मॅडम? ठरतंय कि काय लग्न?” राधाने विचारलं.
“नाही गं. मला नाही करायचं लग्न इतक्यात. ते जाऊदे. हि जागा खूप छान आहे गं” निशाने विषय बदलला.
“हो. मला खूप आवडत इथे यायला. इनफॅक्ट माझ्या एका मित्राचाच आहे हा कॅफे. ट्रॅव्हल थिम हीसुद्धा त्याचीच कन्सेप्ट.”
“मस्तय...आणि काय? काय करतेस हल्ली?” निशाने राधाला विचारलं.
“मी दुसरं काय करणार? भटकंती! सध्या तर एका ट्रॅव्हल कंपनीसाठी काम करतेय. ग्रुप टूर लीडर म्हणून. बरं झालं आज भेटलो. आम्ही customised tours पण arrange करतो. Rather २ दिवसांनी चाललेय एका ग्रुप ला घेऊन लेह लडाख ला.”
“Wow! That’s amazing” निशाला खूप कौतुक वाटलं राधाचं. तिने तिची आवड नुसती जोपासलीच नव्हती तर त्याला आता कामाचंही स्वरूप दिलं होतं.
निशाला तिचं भटकायचं वेड आठवलं. मग इकडंतिकडच्या गप्पा मारून कॉफी घेऊन त्या दोघी निघाल्या. घरी येताना निशा विचार करत होती. आपण राधासारखा निर्णय घेतला असता का? बाबा असते तर घेतलाही असता, पण आता ते शक्य नाही.
निशा घरी आली तर आई तिची वाटच पहात बसली होती. निशाने आईला राधाच्या भेटीबद्दल सांगितलं. आईने तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता अचूक टिपली.
“निशा, एक सांगू तुला?” आईने विचारलं.
“हो सांग की.”
“तू जा त्या राधाबरोबर ट्रिपला” आई शांतपणे म्हणाली.
आता अवाक व्हायची पाळी निशाची होती.
आईला कसं काय समजलं आपण त्या ट्रिपचा विचार करतोय?
“आई?!” निशा आईकडे बघत होती.
“बाळा, तुला काय वाटतं? मला तुझ्या मनातलं कळत नाही? का स्वतःला असं कोंडून घेतलयस तू? माझी ती हसरी खेळकर निशा मला परत हवीय. तुझे बाबा गेल्यावर मी तुझा आधार व्हायला हवं होतं, पण मीच कोसळले. आणि तू माझा आधार झालीस. तू जणू त्यांची जागाच घेतलीस निशा. पण बाळा, तुझं स्वतःचंही आयुष्य आहे. अजून तू लहान आहेस, पुढे आयुष्यभर जबाबदाऱ्या निभवायला वेळ आहे निशू, पण हा वेळ परत येणार नाही. घरच्या आणि माझ्यासाठी तू स्वतःच मन का मारावंस? मला आणि तुझ्या बाबांनाही ते आवडणार नाही. मला माहित आहे तू स्वतःला खूप बदलंवलस गेल्या काही वर्षात, पण मी आता ठरवलय निशू, तुला तुझ्या हक्काचा प्रत्येक आनंद मिळालाच पाहिजे. फोन लाव राधाला आणि सांग तू येतेयस तिच्याबरोबर ट्रिपला. निशा अवाक होऊन पहातच राहिली. बाबा असतानाची आई जणू ती पुन्हा पाहत होती. तशीच खंबीर आणि तितकीच मायाळू. निशा हसून आईच्या कुशीत शिरली. निशाने राधाला फोन करून ट्रिप जॉईन करण्याबद्दल विचारलं. राधाही खुश झाली ते ऐकून, पण आता काही लास्ट मिनिट formalities कराव्या लागतील म्हणून तिने निशाला थोड्या वेळाने फोन करते म्हणून सांगितलं.
आई आणि निशा बोलत बसल्या. निशा आज मनमोकळं बोलत होती आईशी. जणू ती पुन्हा तीच बडबडी हसरी मुलगी झाली होती. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं निशाला असं मनापासून हसताना आणि बोलताना बघून. थोड्याच वेळात राधाचा फोन आला. त्या ट्रॅव्हल ग्रुपमध्ये निशा येऊ शकते असा राधाने सांगताच निशाला खूप बरं वाटलं. निशाने बुकिंग्सचे पैसे राधाला ट्रान्सफर केले. दुसरा दिवस आवराआवरी आणि पॅकिंगमध्ये गेला. आणि ट्रिपचा दिवस उजाडला. निशा लवकर उठून आवरून निघाली. आईने नेहमीप्रमाणे बऱ्याच सूचना देऊन तिला हसून बाय केलं. राधाला भेटून त्या दोघी निघाल्या. पुणे श्रीनगर व्हाया दिल्ली फ्लाईट होती. श्रीनगर वरून रॉयल एन्फिल्ड्स् घेऊन सगळा ग्रुप पुढे जाणार होता. राधा स्वतः उत्तम rider होती. तिच्या राॅयल एनफिल्ड ची राधा अगदी जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी काळजी घ्यायची. इतकंच काय तर तिने तिचं नावही ठेवल होतं, “धन्नो”!
श्रीनगरला उतरल्यावर राधा आणि निशा meeting पॉईंट ला पोहोचल्या. एकेक ग्रुप मेंबर्स येत होते. निशाच्या कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट सुरु झाला होता.
“Hello guys! I think सगळे आलेत. आणि मला वाटत सगळ्यांना मराठी कळतं सो आपण मराठीतच बोलू” असं म्हणून राधाने बोलायला सुरुवात केली.
ट्रिपबद्दल सगळ्या महत्वाच्या सूचना, आपण तिथे कसं थांबणार आहोत, रायडिंगबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी, जर गाडीचा ब्रेकडाउन झाला तर काय करावं लागेल, ग्रुपपासून एकटे पडला तर कॉन्टॅक्ट कसा करायचा कारण मोबाईलला असलेली कमी रेंज हे सगळं राधाने सांगितलं.
“Ok then. आपण आता निघू. तुम्ही सगळे पुढे व्हा. I will catch you guys in 10-15 minutes” असं म्हणून तिने सगळ्यांना पुढे जायला सांगितलं.
राधाची नजर सारखी घड्याळाकडे जात होती.
“राधा, काय झालं? निघायचं ना?” निशाने विचारलं.
“हो गं. निघायचं तर आहे पण” राधा असं म्हणेपर्यंत हॉर्नचा आवाज ऐकू आला.
दोघींनी मागे वळून पाहिलं. आणि निशा डोळे विस्फारून पाहतच राहिली. तो सिद्धार्थ होता. रॉयल एनफिल्डवर बसून त्या दोघींकडे हसून बघत होता.
“आलात? या! आता काय आरती करू तुझी? हि काय वेळ आहे का रे यायची” राधा त्याच्याकडे जात म्हणाली.
“Cmon राधा. तुला माहिती आहे, मला ते वेळेवर यायचं जमत नाही पहाटे पहाटे.” सिद्धार्थ हसला.
“पहाटे? अरे माणसा, शुद्धीवर आहेस का? दुपार झालीये. रात्री धडपडत फिरत बसला असशील कुठेतरी नेहमीसारखा. मग कशाला उठशील?” राधा म्हणाली.
“You know me so well राधा. पण रात्री जग जसं असतं ना शांत तसं सकाळी बघता येत नाही गं” सिद्धार्थच्या डोळ्यात तिच्याविषयी कौतुक होतं.
“हो मुसाफिरा. I agree. आता निघायचं का” असं म्हणून राधा गाडीकडे आली आणि तिला आठवलं आपल्याबरोबर निशा पण आहे.
“ओह्ह... सॉरी. अरे तुझी ओळख करूनच द्यायची राहिली. सिद्धार्थ हि निशा. माझी जुनी मैत्रीण आणि निशा, हा सिद्धार्थ. मेरा दोस्त.”
“हाय” सिद्धार्थने हात पुढे केला.
“राधा... आम्ही भेटलोय एकमेकांना आधी. कशी आहेस निशा?” सिद्धार्थने विचारलं.
“काय तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? चलो मग माझी काळजीच मिटली यार. निशा या ग्रुपमध्ये बाकी कोणालाच ओळखत नाही रे मला सोडून. मला तेच tension आलं होतं, मी ग्रुपकडे लक्ष देताना हिला कसा वेळ देऊ शकणार. अर्थात ती फारशी ग्रुप पर्सन नाही म्हणा. तिला एकटीने फिरायला आवडतं. Am I right निशा?” राधाने विचारलं.
निशाने हसून मान डोलावली.
“हाय सिद्धार्थ.” एव्हढंच बोलू शकली निशा. तिला एकतर सिद्धार्थ आपल्यासमोर उभा आहे आणि आता पुढचे २ आठवडे आपल्यासोबत असणार आहे हेच पटत नव्हतं. तिने अविश्वासाने त्याच्याकडे पुन्हा बघितलं.
“तुझ्या डोळ्यांनी तुला धोका नाही दिलेला निशा. मीच आहे तो.” आणि सिद्धार्थने पुन्हा तिचा चेहरा वाचला होता. निशा ओशाळली. राधा आणि ती राधाच्या गाडीवरून आणि सिद्धार्थ त्याच्या गाडीवरून निघाले.
क्रमश:
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle