काही काही पदार्थ पाहिले तरी ते करणारं माणूस आधी समोर येतं... तसा हा प्रसादाचा शिरा! लग्नाआधी पूजेसाठी करताना आमच्या घरी सोवळ्यात करायचा आणि तोही नऊवारी नेसून त्यामुळे मी त्या प्रांतात गेलेच नाही. लग्न झाल्यावर पूजेचा प्रसाद करणं हा एक सोहळा असतो हे मी सासुबाईंची तयारी पाहून अनुभवलं. त्याची तयारी त्या आदल्या दिवशीच करतात. सव्वा किलो रवा मोजून घ्यायचा, तो मंद आचेवर तांबूस भाजायचा. बेदाणे काड्या काढून ठेवायचे. काजूगर सोलून पाकळ्या करून ठेवायच्या. बदाम काप करून ठेवायचे. सव्वा की साखर, सव्वा की साजूक तूप वेगवेगळ्या डब्यात मोजून तयार ठेवायचं. सकाळी आंघोळ करून आल्यावर खाली शेगडी घेऊन त्यावर भली मोठी कढई ठेवायची... बसायला तसाच ऐसपैस चौरंग! रव्याच्या तिप्पट दूध पाणी घ्यायचं. दूध तापवून झालं की दोन भाग साय न काढता दूध आणि एक भाग पाणी एका बाजूला गरम करायचं. दुसऱ्या बाजूला कढईत सगळं तूप घेऊन त्यात भाजलेला रवा परत परतायला ठेवायचा. सव्वा केळं काप करून या रव्यावर तुपात तळायचे. बेदाणे पाण्यात धुवून तेही तुपात घालायचे. काजूगर, बदाम काप सगळेच पाठोपाठ तुपात पोहायला लागायचे. आता त्यात चिमूटभर मीठ घालायचं. आणि गॅस मंद ठेवून तयार दूध पाणी सावकाश ओतायचं.. हे करताना रवा फसफसू लागतो... अंगावर उडू शकतो. आता साखर मिसळायची. वेलची पावडर सढळहस्ते मिसळून नीट खालपासून हलवायचा, दुधात खलून केशर काड्या शिऱ्यात मिसळायच्या. आता झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि झाकण काढून तूप सुटेपर्यंत मंद गॅसवर परतत रहायचं! असा काही मस्त सुगंध पसरतो घरभर...अहाहा! हे सगळं त्या इतकं तन्मयतेने करत असतात की ती गोडी शिऱ्यात उतरतेच!
अजूनही मी कितीही पदार्थ बनवत असले तरीही प्रसादाचा शिरा मी केलेला नाही. वयाच्या ७४व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने त्या प्रसाद करतात. आज नवरात्रातल्या नैवेद्यासाठी त्यांची कॉपी करायचा मी केलेला छोटासा प्रयत्न... तूप जरा कमीच झालंय माझं... कोकणस्थीपणा आडवा येतो दुसरं काय?
आम्ही चौघी: तिघी जावा नि सासुबाई
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle