पासवर्ड

पासवर्ड

सकाळपासून माझी चिडचिड चिडचिड झाली होती. गेल्या महिन्यात एकतर ‘वॅलेंटाईन डे’ला साधा एक व्हॉट्स ॲप मेसेजही नव्हता पाठवला हेमंतने. म्हणे हि कसली फॅडं सगळं जग करतं म्हणून काहीही काय करायचं आपणही? बाकी सगळं तर जगरहाटी म्हणत सणवारतिथकुळधर्म सगळी लोकं करतात तस्सच करायच. काय होतं केलं तर. काय अंगाला भोकं तर नाही पडत म्हणत मला न पटणाऱ्या गोष्टीही परंपरा म्हणून करायला भाग पाडायच पण वॅलेंटाईन मात्र फॅड म्हणत विसरायचं. मग आजचा दिवस लक्षात असण्याचा काहीच संबंध नाही. तरी मी आडून आडून आठवण करुन दिली होती काल. पण उपयोग शून्य. शेवटी आज सकाळी मीच सांगून टाकलं ‘आज आपल्या साखरपुड्याला ७ वर्ष होतील’

त्यावर फक्तं "हो? तुला काय वाट्टेल ते डिटेल्स लक्षात रहातात हा" म्हणत माझ्या रोमॅन्टिक मूडला टाचणी लावून सगळी हवा फुस्स करुन झाली होती.

मग मी हि कुकरच्या शिट्टीबरोबर माझा आवाज वाढवत ऐकवलं "तुझा ना आता पाsर नवरा झालाय. वॅलेंटाईन डे वगैरे मोठ्या गोष्टी तर राहूच दे, तू पूर्वीसारखी छोटी छोटी सर्प्राईझेस पण द्यायला विसरलायस." यावर पण, “ए तुझा वाढदिवस आणि तुझा लग्नाचा वाढदिवस अजूनपर्यंत एकदाही विसरलो नाहीये हा मी” असं उत्तर मिळालं.
“माझ्या लग्नाचा वाढदिवस? अरे माणसा किमान आपल्या तरी म्हण” माझा पारा आता फुटायच्या बेतात होता.

यावर फक्त दोन्ही कान पकडत सॉरीची खूण आली.

तुझ्याशी ना आता बोलण्यातच काही अर्थ नाही. त्या रेश्माचा नवरा बघा प्रपोज डे पण न विसरता साजरा करतो. आणि त्या हेमाचा पण बघ ती कुठून बाहेरगावी गेली असेल तर तिच्या यायच्यावेळेला स्पेशल डिश करुन तिची वाट बघतो. एव्हढच कशाला तुझ्या मोठ्या भावाकडेच बघ, फॅमिली गॅदरिंगमधे वहिनींसाठी किती मस्त रोमॅन्टिक गाणं गायलं दादांनी. याला म्हणतात रोमॅन्टिक वागणं. नाहीतर तू. आतातर मितांषच्या जन्मापासून तू मला मेधा म्हणणच सोडून दिलयस तर तुला तू लाडाने काय म्हणायचास हे कुठलंं आठवायला! मला तर वाटतं आता आई बाबा हाक मारता मारता आपल्यातलं रोमॅन्टिक कपल संपून पालक मोडच रहाणार आहे लवकरच.

माझं ताडताड बोलून एकदाच पित्त सगळ बाहेर पडल्यावर मग माझ लक्ष हेमंतकडे गेलं. तो शांतपणे माझ्यासाठी कोकम सरबत करत होता. माझ्या हातात ग्लास देत म्हणे "घे पित्त झाल कि डोकं सटकत तुझं"

“या असल्या उपायांनी मी विरघळणार नाही आता”, ग्लास हातात घेत मी ऐकवल्यावर समोरुन फक्तं एक स्माईल आली.

बरं जरा फ्री असशील तर माझं जिमेल ॲक्सेस कर प्लीज आणि त्या म्युच्युअल फन्डवाल्या राजीवचा काही इमेल आलाय का बघ. जरा अर्जंट आहे. या स्टॅन्डबाय फोनचा तसा काही उपयोग नाही. लॅपटॉप ऑफीसमधे ठेवलाय. तुझ्याच फोनवर चेक कर. मी बाहेर जाऊन येतोय. होपफुली माझा फोन रिकव्हर झाला असेल, मितांशला घेऊन येताना फोनपण घेऊन येईन.

त्याने माझ्याकडून ग्लास घेऊन विसळून ठेवता ठेवता ऐकवलं आणि चप्पल सरकवून बाहेरही पडला.

जिमेल ॲक्सेस कर म्हणे पण पासवर्ड नको? मला माझे पासवर्ड लक्षात रहायची मारामार याचा कुठून लक्षात असायला. तेव्हढ्यात परत लॅचचा आवाज आला म्हणून दारात बघितलं तर अर्धवट दारातून हेमंतचा आवाज.. "पासवर्ड एसएमएस केलाय जिमेल बघून ठेव" आणि परत लॅच लागल्याचा आवाज

काही होऊ शकत नाही या माणसाच या जन्मात. सिनेमात बघतो तस इतरांच्या नवऱ्यांचे रोमॅन्टिक किस्से ऐकायचे आणि पदरी पडला अनरोमॅन्टिक नवरा म्हणत जिमेल चेक करुन म्युच्युअल फन्डच इमेल डाऊनलोड करायच म्हणत पासवर्ड बघायला एसएमएस ओपन केला. समोर दिसणाऱ्या पासवर्डने मात्र मी पुरती विरघळले. एक क्षण जिमेल चेक करायचय हेच विसरले आणि परत परत पासवर्ड वाचत राहिले ‘मिष्टी०५१०’

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle