केबीनचं दार उघडलं तर समोर तीच.. परवा 'पाहिलेली' आणि 'आवडलेली' मुलगी!
आता हिच्याशी चर्चा कशी करणार? तीदेखिल आपल्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टबद्दल?
म्हणजे, तिच्या ज्ञानाबद्दल काही शंकाच नव्हती. त्याला स्वतःचीच खात्री वाटेनाशी झाली होती.
ती दिसायला स्मार्ट होती. त्याहीपेक्षा तिच्या प्रत्येक कृतीतून, हालचालीतून आत्मविश्वास झळकत होता. तिचं राहणं, वागणं, बोलणं सगळंच कसं लयबद्ध होतं. तिचा अंदाजच न्यारा होता.
ती त्याला बघून गोड आश्वासक हसली. तो गोंधळलेलाच होता.
"बँकेकडून तू येणार आहेस हे मला माहिती नव्हतं."
"पण मला गेल्याच आठवड्यात आजच्या मिटिंगचे सगळे डिटेल्स मिळाले होते" पुन्हा गोडसं हसत ती म्हणाली.
ओह्ह! म्हणजे मला परवा भेटली तेव्हा हीला माहिती होतं तर.. पठ्ठीने अंदाजही लागू दिला नाही अजिबात.
पुढची पंधरा मिनिटं त्याची स्वतःला सावरण्यातच गेली. आपलं प्रेझेंटेशन नीट असेल ना? काही राहिलं तर नाही ना? शर्ट बाहेर आलाय का? कॉफी पिताना आवाज होतोय का?
ती मात्र शांत होती. तिचा अंदाजच येत नव्हता.
नंतरचे तीन तास केबीनमधे तो, ती आणि त्याचं प्रोजेक्ट एवढेच होते. दोघेही आपापल्या व्यवसायात तरबेज होते. तो सांगत होता, ती ऐकत होती. ती प्रश्न विचारत होती, तो उत्तरं देत होता. मिटिंग संपली तेव्हा साडेतीन तास उलटून गेले होते. तो थकला होता. ती विचारमग्न होती. नोट्स काढत होती.
"मी फायनल प्रेझेंटेशनची तारीख कळवते." छानसं हसत ती म्हणाली, "बोर्डाचा निर्णय शेवटचा."
श्या! काही अंदाजच लागू देत नाही यार ही.
"संध्याकाळी भेटशील? कॉफी प्यायला जाऊया?"
त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं.
"प्रोजेक्टसंदर्भात की परवाच्या...?" त्याला अंदाजच आला नाही.
"माझ्याकडून काही पॉझिटिव्ह असेल तर पुढची कॉफी माझ्याकडून असं मी 'परवा' म्हटलं नाही का तुला?"
तिच्या गोड मिश्किल हास्यात त्याचे सगळे प्रश्नच सुटले.