लागणारा वेळ: ४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बाकर (सारण) :
- निवडून चिरलेली कोथिंबीर ४ वाट्या
- आलं, लसूण वाटण एक चमचा
- हिरवी मिरची वाटण २ चमचे
- दोन कांदे उभे चिरून खरपूस तळून
- एक वाटी किसलेले सुके खोबरे, भाजून
- तीळ एक चमचा, भाजून
- खसखस एक चमचा, भाजून
- हळद अर्धा चमचा
- तिखट एक चमचा
- मीठ चवीप्रमाणे
- बेसन एक चमचा भाजून
पारीसाठी :
- बेसन दोन वाट्या
- कणीक ४ चमचे
- मीठ चवीपुरते
- तेल एक चमचा
- पाणी आवश्यकते प्रमाणे
तळणासाठी :
- तेल आवश्यकते नुसार
- एक चमचा मैदा पाव वाटी पाण्यात भिजवून
क्रमवार पाककृती:
- सारणाचे सर्व साहित्य एकजिव करावे. हे सारण कोरडेच असल्याने थोडे मोकळे राहते.
- पारीसाठीचे साहित्य एकत्र करून पु-यांसाठी भिजवतो तेव्हढे घट्ट भिजवून घ्या.
- पोळीसाठी घेतो तेव्हढा गोळा घेऊन लाटा. फुलक्यांसाठी लाटतो तेव्हढे पांतळ लाटा. त्याला तेलाचा हात लावा. आता सारण एक यावर पसरा. सारणाचा थर साधारण एक इंच उंचीचा हवा. आता या सर्वाचा सारण दाबत दाबत रोल करा. शक्य तेव्हढा घट्ट रोल करा. धारधार सुरीला तेल लावून या रोलच्या ७-८ वड्या कापून घ्या.
- अशा सर्व वड्या तयार करून घ्या.
- तेल तापवत ठेवा. तेल तापले की या वड्यांना मैदा भिजवलेल्या पाण्याचे एक बोट मोकळ्या बाजूंवर फिरवा. आता आच मंद करून ह्या वड्या खरपूस तळून घ्या.
- ह्या वड्या थंडीत ४-५ दिवसात संपवाव्या लागतात. ( खरं तर इतक्या चटपटीत लागतात की चार दिवस उरतच नाहीत स्मित ) दिवाळीत फराळाचे बरेच गोड होते. त्यावर या बाकर वड्यांचा उपाय जरूर करून बघा.
वाढणी/प्रमाण: ३०-३२ बाकर वड्या होतील.
अधिक टिपा:
तळणाच्या तेलात ब-यापैकी सारण उतरते. त्यामुळे तळणीला तेल घालताना जरा जपून . राहिलेल्या तेलात मसाले भात करावा फर्मास होतो.
माहितीचा स्रोत:
बालपणी शेजारी राहणा-या कामत काकी, अन त्यांच्याकडून शिकलेली आई