गावा कडे परसात लिंबाची पानं पडली होती. तिथेच माती पाण्यात भिजून मस्त जाळी पडली होती त्यांना. सहज उचलावं म्हणून वाकले तर सगळी कडे गोगलगाईची रुपेरी नक्षी! त्या वरून सुचलेली कविता . पहिल्यांदाच मुक्तछंद आणि उत्स्फूर्त न लिहीता ठरवून लिहीतेय!
झाडा माजी गळे पान
त्याला कसे देहभान
कुठे जायाचे गळोन
फरफट ओढवून
पाया झाडाशी पडेल
मातीमोल आकळेल
एक एक कण त्याचा
सुटासुटासा झडेल
रंग हिरवासा उडे
लेई मातीचे रुपडे
जसा तो ही क्षीण होई
रेष रेष सुटी दिसे
मोक्षप्राप्ती आता होणे
पान झाले जीर्ण जुने
तोच गतकाळ हसे
पाना वर सरपटे
त्याचे रूप ते ओंगळ
मन म्हणे दूर पळ
कसे जडत्व गळेल
मोक्षवाट सापडेल
झाड पाही हे वरोनी
म्हणे पाना स्थीर होई
असो कितीही ओंगळ
होवो कितिही विटाळ
कर्मफळ कवटाळ
आला चालोनी तो काळ
कसा चिकट ओंगळ
जसा येई तसा जाय
करी मोकळी ओंजळ
स्थीर करी चित्तवृत्ती
पान शांतवले गात्री
लेई रूपेरीश्या खुणा
जशा चांदणल्या रात्री