कडबोळी: दिवाळी स्पेशल

कडबोळी: दिवाळी स्पेशलkadboli2.jpg
पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी!

साहित्यः

भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे.
kadboli.jpg
कडबोळ्यांसाठी: एक कि. भाजणी, पाऊण लि. पाणी, तेल १५०मिली, ओवा पाव वाटी, तिखट, मीठ, हळद, तेल तळणीसाठी.

कृती:

तांदूळ धुवावेत आणि सावलीत वाळवावेत. धुतलेले तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य भाजून घ्यावे. खूप जास्त भाजू नये. उडीद भाजताना काळजी घ्यावी. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक दळून आणावे.
कडबोळी करायला घेताना एक कि. भाजणी मोजून घ्यावी, पाऊण लि. पाणी गरम करावे. ओवा मिक्सरला जरा फिरवून घ्यावा. पिठात ओवा, तिखट चार चमचे, हळद एक चमचा, मीठ मिसळावे. तेल चांगले गरम करून पिठावर घालावे. गरम पाणी घालावे. सर्व मिश्रण नीट एकत्र करून झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने भाजणी चांगली मळून घ्यावी. मी फूडप्रोसेसरला फिरवून घेते. तयार पिठाचा गोळा घेऊन ताटाच्या पाठच्या बाजूला लांब वळावे. मग चकलीसारखे गुंडाळावे.kadboli 1.jpg
कढईत तेल चांगले तापवावे. तयार कडबोळी मध्यम गॅसवर छान कुरकुरीत तळावीत. लोण्याबरोबर फस्त करावीत. चकली तर वर्षभर असतेच. या दिवाळीला बघा कडबोळी करून!
मी कडबोळ्याच्या भाजणीत अख्खे हरभरे घालत नाही. हरभरे वापरले तर कडबोळी खाल्ल्यावर जळजळ होते, हा माझा अनुभव पण तुम्ही वापरून पहायला हरकत नाही.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle