तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ६

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग १
https://www.maitrin.com/node/3038

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २
https://www.maitrin.com/node/3051

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३
https://www.maitrin.com/node/3076

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४
https://www.maitrin.com/node/3097

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ५
https://www.maitrin.com/node/3107
————————————————————
पुढे चालू....
————————————————————

रात्री झोपताना निशाच्या डोळ्यासमोरून तो क्षण हटेना. तिने धरून ठेवलेला सिद्धार्थचा हात, त्याचं तिला चिडवून दिलखुलास हसणं. त्या जागी तारे बघतानाची शांतता... सगळं जणू स्वप्न होतं. निशाने घड्याळाकडे नजर टाकली तर बराच उशीर झाला होता. आता झोपायलाच हवं असा विचार करून निशा झोपली.
सकाळी नाश्ता करताना कोणीच भेटलं नाही निशाला. ना सिद्धार्थ , ना राधा आणि सत्यजीतही नाही. नाश्ता आवरून निशा common hall मध्ये अाली. सगळे तिकडेच बसले होते. आजचा दिवस लेह दर्शनात जाणार होता. राधाने सर्वांना प्रोग्रॅम सांगितला. बरोबर एका तासाने सगळे निघणार होते.
आवरून सगळे बाहेर आले. निशाने मस्त पांढरा कुर्ता आणि एक जुन्याकाळी घेतलेला फुलकारी दुपट्टा घेतला होता. आधी तिला अशा गोष्टी जमा करायचा खूप नाद होता. वेगवेगळ्या विणकामाचे दुपट्टे, फिरायला जाईल तिथल्या प्रसिद्ध कारागिरीचे कपडे असा जणू खजिनाच होता निशाकडे. गेल्या काही वर्षात मात्र business attire सोडला तर काहीच खरेदी केली नव्हती निशाने.
सगळे आपापल्या गाड्यांवर बसले. निशा राधाच्या बाईकवर बसायला जाणार इतक्यात सिद्धार्थने तिला हाक मारली.
“निशा, माझ्याबरोबर येतेस?”
निशाला काय उत्तर द्यावं कळेना. एकतर राधा तिच्या समोरच उभी होती. निशा नाही म्हणणार तितक्यात सिद्धार्थच पुढे म्हणाला,
“मी एक detour घेणार आहे. इथे जवळच एक खेडं आहे. तिथे काही लोकल वस्तूंची खरेदी करायचीय मला. तुला काही खरेदी करायची असेल तर चल.”
निशाने राधाकडे बघितलं. राधाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
ती काही बोलणार इतक्यात सिद्धार्थने गाडी स्टार्ट केलीसुद्धा.
“तिच्याकडे काय बघतेयस? ती आई नाहीये तुझी, तिची परवानगी काढून जायला” सिद्धार्थ हसला.
“आणि असाही राधाला ग्रुपलाही सांभाळायचं आहे, हो ना राधा? त्यात ती तुझ्याकडे असं कितीसं लक्ष देणार?” सत्याने सिद्धार्थची री ओढली.
“बाय निशा. भेटू परत आल्यावर” इतकंच म्हणून राधाने तिची धन्नो पिटाळली. सत्याही गेला.
“चला मॅडम, निघायचं का?” सिद्धार्थने विचारलं. निशा मानेनेच हो म्हणून त्याच्या गाडीवर मागे जाऊन बसली.
थोडा वेळ रायडींग करून ते एका खेड्याजवळ पोहोचले. लडाखी पांढरी घरं दिसायला लागली. अगदीच छोटसं गाव होतं ते. सिद्धार्थने एका घराजवळ गाडी थांबवली. निशा आणि सिद्धार्थ आत जाणार इतक्यातच दोन लहान गुटगुटीत मुलं पळतच बाहेर अाली. त्यांनी हसत हसत निशा आणि सिद्धार्थला “जुले” म्हटलं. सिद्धार्थनेही हसून जुले म्हटलं आणि त्यांच्यातल्या एकाला उचलून पाठुंगळी घेतलं.
“निशा, जुले हा लडाखी भाषेतला जणू जादूचा शब्द आहे. त्याचा अर्थ हॅलो, कसे आहात? पासून ते, मी छान आहे, आनंदी आहे पर्यंत काहीही होऊ शकतो. ही पहाडी माणसं खूप प्रेमळ आहेत गं. चेहऱ्यावर हसू आणि जुले म्हणून तुम्ही इथे आरामात राहू शकता.”
निशा हसली. त्या छोट्या गोंडूकडे बघून तिनेही जुले म्हटलं. तो गट्टूही हसला आणि पुन्हा जुले म्हणत सिद्धार्थच्या गळ्यात पडला. सिद्धार्थ आणि निशा आत घरात गेले. घरात काही स्त्रिया बसून विणकाम करत होत्या. त्यातली एक सिद्धार्थला बघून पुढे अली. सिद्धार्थकडे बघून तोंडभर हसली आणि सिद्धार्थने पाठुंगळी घेतलेलं ते गोड बोचकं तिच्या हातात सोपवलं.
तिथे खास लडाखी शाली बनवण्याचं काम चाललं होतं. खूप सुंदर आणि नाजूक होतं ते काम. त्यातली एक सुंदर हलक्या बदामी रंगाची शाल निशाला खूप आवडली. फुलाफुलांचं नाजूक विणकाम होतं तिच्यावर. ती तिची किंमत विचारणार इतक्यातच सिद्धार्थने ती शाल उचलली त्यामुळे निशा मनात थोडी खट्टू झाली. तिच्या नजरेतले भाव सिद्धार्थने तिरक्या नजरेने पाहून घेतले. इतर काही गोष्टींची खरेदी करून ते त्या गावातून निघाले.
“ही माणसे तुझ्या ओळखीची कशी?” निशाने कुतूहलापोटी सिद्धार्थला विचारलं.
“अगं आधी भेटलोय यांना. असंही २ वर्षातून एकदा माझी लेह लडाखची ट्रिप होतेच. बरं ते जाऊदे. आता लेह बघायला जायचंय कि आणखी एका इंटरेस्टिंग जागी जाऊया?” सिद्धार्थने निशाला विचारलं.
“कुठे?” निशाने लेहबद्दल उत्सुकताही नाही दाखवलेली हे लक्षात येऊन सिद्धार्थ हसला.
“चल” म्हणून त्याने तिला गाडीवर बसण्याची खूण केली. नंतर बराच वेळ सलग रायडींग केल्यावर ते एका मोनॅस्टरीजवळ आले. खूप सुंदर दिसत होती ती मोनॅस्टरी त्या राखाडी रंगाच्या landscape वर. मोनॅस्टरी फिरून पाहिल्यावर ते दोघे परतीच्या प्रवासाला निघाले. आता निशाला भुकेनं अगदी कळवळून गेलं होतं. पण सिद्धार्थने मात्र भुकेबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. शेवटी न राहवून निशानेच विचारलं.
“फिरताना तुझी तहानभूक हरपते का रे?”
“हो अगं.. अगदीच खाण्यापिण्याची आठवण होत नाही मला” असं म्हणाल्यावर त्याला जाणवलं की आपण तिलाही खायचं काहीच विचारलेलं नाही.
“I’m so sorry निशा. मी तुला जेवायचं काही विचारलंच नाही गं. संध्याकाळ होत आली. छे! असा कसा विसरलो मी?” सिद्धार्थच्या आवाजात दिलगिरी होती.
सिद्धार्थने लेहच्या दिशेने गाडी पिटाळली. लेहला पोहोचताच ते एका लहानशा हॉटेलमध्ये थांबले. ऑर्डर येताच निशा अक्षरशः जेवणावर तुटून पडली. सिद्धार्थ तिच्याकडेच पाहत होता. पुरेस जेवण पोटात गेल्यावर निशाचं सिद्धार्थकडे लक्ष गेलं.
“ओह... I’m sorry मी सरळ खात सुटले. तू अजून जेवणही सुरु नाही केलंस” त्याच्या रिकाम्या प्लेटकडे बघत निशा म्हणाली.
“असुदे गं. तू जेव. माझं पोट भरलं” सिद्धार्थने म्हटलेलं हे वाक्य समजायला निशाला अंमळ उशीरच लागला. पण जेंव्हा समजलं तेंव्हा मात्र ती सिद्धार्थकडे पाहू शकली नाही. परत येताना दोघेही काहीच बोलत नव्हते.
“निशा” सिद्धार्थने गाडीचा स्पीड थोडा कमी करत तिला हाक मारली.
“ओ रे” निशाच्या तोंडातून पटकन निघून गेलं आणि तिला पुन्हा अवघडल्यासारखं झालं.
सिद्धार्थ गालात हसला आणि म्हणाला, “मगाशी तुला ती बदामी रंगाची शाल आवडली होती ना? मग का घेतली नाहीस?”
“अं.. हो आवडली होती. पण मी पाहिलं की तू ती शाल घेतोयस मग म्हटलं उगाच कशाला म्हणा, तुही कोणासाठी तरी घेत असशील ना.” निशाच्या मनात नाही म्हटलं तरी राधाचा विचार आला.
सिद्धार्थने सरळ गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थांबवली. निशाला उतारायला सांगून तोही उतरला. आपल्या बॅगमधून त्याने ती शाल बाहेर काढली आणि तिच्यासमोर धरत म्हणाला,
“ही घे.. मी तुझ्यासाठीच घेतली होती.”
निशाला काय करावं कळेना. शाल तर तिला आवडली होती, पण असं अचानक त्याने तुझ्यासाठी घेतलीये म्हणणं, मग आपणही लगेच घेणं कसं वाटेल असा विचार तिच्या मनात आला.
सिद्धार्थने तिची चलबिचल ओळखली. त्याने तिचा हात हळुवार आपल्या हातात घेतला आणि ती शाल तिच्या हातात दिली. एकदोन क्षण त्यांची नजरानजर झाली. निशाला जाणवलं, आपल्या दोघांमध्ये काहीतरी बदलतंय. तिने ती शाल छान लपेटून घेतली. पुढचा रस्ता जणू बेधुंदीत असल्यासारखा संपला. हॉटेलवर परत आल्यावर निशा आपल्या रूममध्ये निघाली. आणि चालत चालत अचानक थांबली. तिला असं वाटलं जणू सिद्धार्थ तिला हाक मारतोय आणि ती झटकन मागे वळली.
सिद्धार्थ मागे बाईक थांबवून तिच्याकडेच बघत उभा होता.
“हाक मारलीस?” निशाने विचारलं.
आणि तो मस्त हसला.. म्हणाला.. “हो... मनातल्या मनात..”
क्रमश:

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle