तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग १
https://www.maitrin.com/node/3038
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २
https://www.maitrin.com/node/3051
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३
https://www.maitrin.com/node/3076
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४
https://www.maitrin.com/node/3097
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ५
https://www.maitrin.com/node/3107
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ६
https://www.maitrin.com/node/3166
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ७
https://www.maitrin.com/node/3185
————————————————————
पुढे चालू
————————————————————
निशा जराशी घाबरलीच. मगाशी सिद्धार्थने त्याच्यात आणि राधाच्यात तसं काही नाहीये असं सांगितलं होतं पण राधा अजूनही घुश्श्यातच दिसत होती.
“निशा हे बघ, मी आणि सिद्धार्थ...” राधा बोलायला सुरुवात करतच होती इतक्यात तिथे सत्या आला.
“हाय निशा, हाय राधा” सत्याने जणू ओळखलं होतं राधा आता निशाशी काय बोलणार आहे ते.
“सत्यजित मला जरा निशाशी बोलायचंय, do you mind?” राधाने रागातच विचारलं.
“मुळीच नाही. पण आत्ता मलाही तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. निशा....”सत्या म्हणाला.
“ओह्ह.. बाय..” असं म्हणून निशा अक्षरशः तिथून सटकलीच. सत्या आला त्याचं निशाला खरंतर बरंच वाटलं होतं. राधा काय म्हणेल आणि काय नाही याची काळजी कारण्यापेक्षाही तिच्यासमोर दुसरी खूप महत्वाची गोष्ट होती, सिद्धार्थने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. खूप थंडी होती, निशा परत टेंटमध्ये जाऊन आणखी गरम कपडे घ्यायला लागली. अचानक तिच्या हातात आली ती सिद्धार्थने दिलेली ती बदामी रंगाची लडाखी शाल. तिने ती छान लपेटून घेतली आणि बाहेर आली. बाहेर ग्रुपमधल्या लोकांनी शेकोटी पेटवली होती आणि सगळे तिच्याभोवती बसले होते. निशा त्यांच्यापासून जरा दूर उभी राहिली त्या सरोवराकडे बघत. तिच्याही नकळत त्या घोळक्यात सिद्धार्थ आहे का हे तिने पाहून घेतलं. सिद्धार्थच्या भोवती सगळे जमले होते आणि तो कुठलातरी किस्सा रंगवून सांगत होता. सगळ्यांचा हसण्याचा आवाज निशाच्या कानावर येत होता. निशा आणखी थोडी पुढे चालत गेली. सिद्धार्थच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? त्याने जर उद्या विचारलं तर? आता उत्तर देईपर्यंत त्याच्याशी बोलायचं का नाही? जर आपलं उत्तर हो असेल तर त्याचं आणि आपलं नातं कसं असेल? मुळात आपलं उत्तर काय आहे? निशाला असंख्य प्रश्न पडले होते. त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं तिने ठरवलं. मुळात आपलं उत्तर काय आहे आणि का?
सिद्धार्थ तिला फ्लाइटमध्ये भेटला तेंव्हा त्याच्याबद्दलचं तिचं मत आणि आत्ताचं तिचं मत यात बराच फरक होता. आत्ता त्याने केलेली प्रत्येक गोष्ट, बोललेलं प्रत्येक वाक्य जणू तिच्या मनात साठवलं जायचं. का होतंय असं?
“तू प्रेमात पडलीयेस निशा. तू हे जेव्हढ्या लवकर मान्य करशील तितकं तुला आणि त्यालाही छान वाटेल. त्याचा मोकळा स्वभाव, त्याच सहज मैत्रीचा हात पुढे करणं, मैत्री जपणं तुला आवडलंय.” निशाच्या मनानेच जणू तिला ग्वाही दिली.
“काय गं? इथे एकटीच का उभी आहेस?” निशाने मागे वळून पाहिलं, तो सिद्धार्थ होता.
निशा काहीच बोलली नाही. तो पुढे आला आणि तिच्या सोबत येऊन उभा राहिला.
“काय झालं निशा? कसला विचार करतेयस?” सिद्धार्थने जणू त्याला काही माहीतच नसावं असा आव आणून विचारलं. त्याच्या नजरेत खट्याळपणा स्पष्ट दिसत होता.
“काही नाही रे. कोणीतरी मला एक प्रश्न विचारलाय. त्याचंच उत्तर शोधतेय” निशानेही त्याला तसंच उत्तर द्यायचं ठरवलं.
“ओह्ह.. असं आहे का? काय प्रश्न आहे बाय द वे?” त्याचं असं वेड पांघरून पेडगावला जाणं निशाला आवडलं, ती खुद्कन हसली.
“प्रश्न नाही रे सांगू शकत, थोडा personal आहे” निशाने चक्क त्याला उडवून लावलं.
“बरं प्रश्न जाऊदे. उत्तर काय आहे ते तर सांगशील?” सिद्धार्थने पुन्हा तिला टोकलं.
“हेच की माझं तुझ्यावर...” निशाला अचानक जाणवलं की आपण त्यालाच सांगतोय आणि तिने वाक्य तोडलं.
“बोल ना... प्लिज...” सिद्धार्थच्या डोळ्यात आर्जव होतं. जणू तो या वाक्याची कित्येक जन्म वाट बघत होता.
निशाने उत्तरादाखल काही न बोलता मान फिरवली.
“निशा.. तुला हवं तेंव्हा उत्तर दे.. फक्त एक गोष्ट पुन्हा सांगायची होती तुला. इकडे बघशील?” सिद्धार्थने विचारलं.
निशा हळूच मागे वळली.
“माझ्याकडे बघ ना” ती नजर चोरतेय हे लक्षात आलं सिद्धार्थच्या.
निशाने त्याच्याकडे बघितल्यावर सिद्धार्थ म्हणाला,
“I love you निशा. या जगात इतर कुठल्याच गोष्टीची मी जितकी वाट पहिली नाही तितकी तुझ्या उत्तराची बघतोय. तू माझ्यासाठी ती गोष्ट बनलीयेस, जिच्यामुळे आणि जिच्यासाठी मी जगतोय. You are my World “ आणि निशा बघतच राहिली त्याच्याकडे. त्याच्या नजरेत एक सच्चेपणा होता. निशाला तो भावला. ती काहीतरी बोलणार इतक्यात सिद्धार्थला ग्रुपमधल्या कोणीतरी हाक मारली. सिद्धार्थला तिकडे जावं लागलं. निशा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. त्याने आपल्यापासून दूर जाऊ नये असं प्रकर्षाने वाटलं तिला आणि तिने स्वतःशीच ते वाक्य पहिल्यांदा उच्चारलं, “I love you Siddharth“ आणि धडधडत्या हृदयाने ती टेन्टमध्ये परतली. उद्या आपलं उत्तर सिद्धार्थला सांगायचं असं ठरवून ती झोपणार इतक्यात टेन्टबाहेर कोणाची तरी चाहूल लागली.
“कोण आहे?” निशाने विचारलं.
आणि राधा आत आली.
“हाय राधा” निशा नकळत बेडवर बसलेली ती उठून उभी राहिली.
“हाय निशा. मला तुझ्याशी बोलायचंय. बैस ना” असं म्हणून राधाने तिला बसायची खूण केली.
“निशा मला तुला एकच सांगायचं होत. प्लिज सिद्धार्थपासून लांब राहा. तुला जर असं वाटत असेल कि तो तुला फ्लाईटमध्ये भेटला आणि तेंव्हापासून तो तुला ओळखतो आणि तेंव्हापासून त्याला तू आवडतेस वगैरे तर तू चुकते आहेस.”
“राधा... असं का म्हणते आहेस? मला काही कळलं नाही” निशाला काही समजत नव्हतं.
“हे बघ मी सगळं काही तुला सांगत बसणार नाही. पण तुला ती राजस्थान ट्रिप आठवतेय का? त्या ट्रीपपासून तो तुझ्या मागे आहे. तुला त्याचा स्वभाव कितपत माहित आहे मला माहित नाही, पण मी त्याला गेली कित्येक वर्षे ओळखते. आणि त्यावरूनच मी तुला सांगतेय, त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाहीये.” राधाने एका दमात सांगून टाकलं.
तिचे शब्द निशाला खूप लागले. मागे आहे? म्हणजे? त्याच्या जवळच्या मैत्रिणीने असं म्हणावं? नाही. नाही! सिद्धार्थ असा नाहीये. त्याच्या डोळ्यात पाहिलंय मी माझ्याबद्दलचं प्रेम. निशाला राधाचं बोलणं खरं वाटेना.
“राधा प्लिज असं बोलू नको. तो तुला सर्वात चांगली मैत्रीण मानतो आणि तू त्याच्याबद्दल असं बोलावंस? मला नाही पटत त्याचा स्वभाव असा काही असेल असं” निशाच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
आता मात्र राधाला कळलं कि ही आपलं बोलणं मान्य करणार नाही.
“निशा.. तुला माझं बोलणं पटत नसेल पण हेच खरं आहे. आणि असंही तुला जरी त्याच्याबद्दल काही वाटत असेल तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तो माझा आहे आणि नेहमी माझाच राहील. त्यामुळे शहाणी असशील तर समजून घेशील मला काय म्हणायचंय ते” असं म्हणून राधा तिथून गेलीसुद्धा.
आणि निशा? निशा जणू blank झाली होती. काय घडलं नुकतंच? राधा, सिद्धार्थची जिवलग मैत्रीण, ती असं म्हणते कि तो माझा आहे? आणि माझाच राहील? म्हणजे? म्हणजे जरी सिद्धार्थ तिच्याकडे मैत्रीण म्हणून बघत असला तरी ती त्याच्याकडे फक्त मित्र म्हणून निश्चितच पाहत नाही. तिच्या मनात त्याच्याबरोबरच नातं वेगळं आहे. मी खरंच त्या दोघांच्या मध्ये येतेय का? न जाणो सिद्धार्थला तिचं प्रेम आजपर्यंत जाणवलंच नसेल आणि त्यामुळे त्याने मला असं विचारलं असेल का? निशाच्या डोक्याचा रात्रभर विचार करून भुगा झाला. सकाळी तिने सिद्धार्थशीच बोलायचं ठरवलं. सिद्धार्थच्या टेन्टपाशी आल्यावर अचानक राधा टेन्टमधून बाहेर आली. “हाय निशा. Good morning. किती मस्त झोप लागली काल सिद्धार्थच्या टेंटमध्ये” असं म्हणून राधा बाहेर गेली. आणि निशा कोसळलीच जणू. राधाने काल तिला त्या दोघीनी टेन्ट शेअर नको करायला म्हणून सांगितलं होतं आणि आत्ता ती सिद्धार्थच्या टेन्टमधून बाहेर आली होती. म्हणजे... निशा जवळजवळ धावतच तिच्या टेंटमध्ये परत आली. तिला कशातच काही अर्थ नाही असं वाटत होतं. असं कसं होऊ शकतं? आयुष्यात पहिल्यांदाच तिला कोणाबद्दल तरी असं काही वाटलं होतं. आणि त्याचा शेवट असा व्हावा? सुरु होण्याआधीच? निशाचे डोळे झरायचे थांबेनात. आज ग्रुपमधले काहीजण परत पुण्याला निघणार होते. निशा तडक त्यांच्याबरोबर परत निघाली.
इकडे सत्या आणि सिद्धार्थ राईडवरून परत आले तोपर्यंत दुपार झाली होती. जेवताना सिद्धार्थने निशाला शोधलं पण ती काही त्याला दिसली नाही. टेंटमध्ये असेल म्हणून त्याने झटपट जेवण उरकलं. आज काहीही झालं तरी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं निशाकडून. तो निशाच्या टेंटमध्ये आला.
“निशा.... निशा...” त्याने हाका मारल्या पण ऐकायला निशा होती कुठे तिथे?
“ती सकाळीच परत गेली पुण्याला” राधाने आत येत सिद्धार्थला सांगितलं.
आणि सिद्धार्थ मटकन खालीच बसला. निशा पुण्याला गेली? म्हणजे? मला काही न सांगता? का? म्हणजे तिचं उत्तर नाही समजायचं का मी? का निशा? इतकी कठोर शिक्षा का? मला साधं तोंडावर उत्तर देण्याचीही तसदी न घेता का निघून गेलीस? सिद्धार्थच्या डोळ्यात खळकन पाणी आलं.
“सिद्ध्या, प्लिज.. मी आधीही तुला म्हटलं होतं, त्या पोरीसाठी वेळ वाया घालवू नकोस म्हणून. पण तू माझं ऐकलं नाहीस.” राधाच्या चेहऱ्यावर विजयी हसू होतं. सिद्धार्थला रागच आला राधाचा.
“राधा प्लिज मला एकटं सोड” असं म्हणून सिद्धार्थ बाहेर आला. आणि बाईक काढून सुसाट वेगाने लेहच्या दिशेने गेला देखील.
लेहला आल्यावरच सिद्धार्थ थांबला. आजची राईड त्याची आजवरची सर्वात वाईट राईड होती. निशाचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता. सत्या आणि राधाही ग्रुपमधल्या इतर लोकांसोबत लेहला परतले होते. दोन दिवस असेच गेले. सिद्धार्थ सर्वांमध्ये असूनही नसल्यासारखा होता. राधाने त्याच्याशी बोलायचा हरप्रकारे प्रयत्न करून पाहिला पण सिद्धार्थला कोणाशीच बोलायचं नव्हतं.
ग्रुप निघून गेला. त्यांच्यासोबत राधा दिल्लीपर्यंत गेली. सिद्धार्थ सकाळपासून आपल्या रूममधून बाहेरही पडला नव्हता.
“सिद्धार्थ, येऊ का?” असं म्हणत सत्याने त्याच्या रूमचं दार उघडलं.
“ये” म्हणत सिद्धार्थ उठला.
“काय झालाय सिद्धार्थ? Are you ok?” सत्याला जरा अंदाज आला होता कि हे निशाशी निगडित आहे.
सिद्धार्थने त्याला सगळं सांगितलं.
“मला काही कळत नाहीये सत्या. काय करू मी? Face to face बोलण्याच्या पण लायकीचा वाटलो नाही का रे मी तिला? सरळ निघून गेली? काहीच न सांगता?” सिद्धार्थ दुखावला होता.
“सिद्धार्थ... मला काहीतरी वेगळं वाटतंय” सत्याच्या मनात राधाचा विचार आला. काल त्याने राधाला निशाकडे जाताना पाहिलं होतं. त्याचं या सगळ्याशी काहीतरी connection आहे असं त्याला राहून राहून वाटत होतं.
“मला थोडा वेळ दे सिद्धार्थ. सगळं ठीक होईल आणि मी एका गोष्टीची तुला खात्री देऊ शकतो कि निशा स्वतःच्या मनाने इथून गेलेली नाही. तू एक काम कर. तू आजच पुण्याला नीघ. मी दोन दिवसात तुला पुण्यात भेटतो”
सिद्धार्थचा सत्यावर विश्वास होता. असंही सिध्दार्थलाही मनात कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. ते दोघेही निघाले.
दिवसभराच्या प्रवासानंतर सत्या दिल्लीला पोहोचला. राधाला फोन करून तो तडक तिला भेटायला गेला.
“काय झालं सत्यजित? तू असा अचानक? सिद्ध्या कुठाय?” राधाने त्याला विचारलं.
“तो पुण्याला गेला. मलाच तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी इथे आलोय” सत्याने सांगितलं.
“काय बोलायचंय?” राधा सावध झाली. सत्याला नक्कीच काहीतरी शंका आली असणार.
“राधा, तू निशाला काय म्हणालीस म्हणून ती तडकाफडकी निघून गेली?” सत्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
“मी? मी कशाला काय म्हणू? तिची तीच निघून गेलीय. ती काय लहान आहे का माझं ऐकायला?” राधाने शक्य तोवर विषय टाळायचं ठरवलं.
“ओह्ह... खरंच! तू कशाला काय म्हणशील? आपण कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुला आणि सिद्धार्थला ओळखतो राधा. तुम्ही दोघे बेस्ट friends आहात, पण माझी आणि सिद्धार्थचीही मैत्री तितकीच जुनी आहे हे माहित आहे ना तुला?” सत्या न थांबता बोलत होता.
“अरे पण मी काय केलंय?” राधा वरमली.
“मी सांगतो ना तू काय केलयस. सिद्धार्थला दुसऱ्या कुठल्याही मुलीशी बोलून न देणारी तू, तुला कसं सहन होईल तो कोणाच्या तरी प्रेमात पडलेला? तू काल तिला सांगितलं असशील कि तुझं सिद्धार्थवर प्रेम आहे आणि तिने निघून जावं? I’m I right or am I right?” आणि राधा त्याच्याकडे पाहतच राहिली.
“कोणी बोलणारं नाही म्हणून नेहमी आपलंच खरं करायचं. बरं नाही हे राधा. तू सिद्धार्थला मैत्रीत गुदमरवते आहेस. त्याच्यासाठी असलेली निखळ मैत्री म्हणजे खरंतर त्याच्यावरचं बंधन आहे हे त्याला कळत नाहीये. इतकी स्वार्थी कशी काय होऊ शकतेस तू? निशाला त्याच्या आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्वाचं स्थान मिळेल म्हणून खोटं बोललीस?”
“सत्यजित... मी..” राधाने मध्ये बोलायचा प्रयत्न केला पण सत्याने तिला बोलूच दिलं नाही.
“माझं बोलणं अजून संपलेलं नाही राधा. मी जे म्हणतोय ते बरोबर आहे ना? तुला काय वाटलं तू जे सांगितलंस ते सिद्धार्थला कळल्यावर तुमची मैत्री तशीच राहील? त्याला हे अजिबात सहन होणार नाही.”
“सत्यजित I’m sorry, मी.. मला सिद्ध्याला दुखवायचं नव्हतं. तो माझ्याशी बोलतही नाहीये. मला फक्त माझा सर्वात जवळचा मित्र गमवायचा नव्हता.” राधाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने मान खाली घातली. “मी लहान असल्यापासूनच एकुलती एक असल्यामुळे नेहमीच एकटी राहिलेय रे.. नंतरही माझे कोणी मित्रमैत्रिणी नव्हते. तुला तर माहीतच आहे. सिद्ध्या एकमेव असा माणूस आहे ज्याने मला नेहमीच समजावून घेतलंय. तोच जर माझ्या आयुष्यात नसेल तर माझ कसं होणार? हा विचारच मला स्वस्थ बसू देत नव्हता. निशाच्या मनातही सिद्ध्याबद्दल feelings आहेत हे मला कधीच कळलं होतं पण मीच स्वतःला समजावू शकले नाही. मी काय करू? मला पुन्हा एकटं नाही पडायचं रे...” राधा आता कुठल्याही क्षणी रडेल असं वाटत होतं.
“ओह माय गॉड, tough queen राधा चक्क चक्क रडतेय? हे आणि केव्हापासून? आणि तुला काय गरज आहे कोणाची. तू किती इंडिपेंडंट आहेस! कितीतरी मुली तुझ्याकडे आयडॉल म्हणून बघत असतील. आणि ढग्गे, तुझं लक्ष कुठे असतं? तुझ्या आजूबाजूला कित्येक जण आहेत जे तुझ्या एका शब्दाखातर काय हवं ते करायला तयार होतील” सत्याने तिचा मूड हलका करण्याचा प्रयत्न केला.
“सत्यजित मला नाही वाटत रे आता सिद्ध्या परत माझ्याशी बोलेल. मी काय केलंय हे त्याला आज ना उद्या कळेलच. मी असं कसं काय वागू शकते? मला काहीच नकोय. मी उद्या घरी चाललेय कायमची.” राधा अजूनही त्याच विचारात अडकली होती.
“राधा प्लिज.. तुला जर तुझी चूक कळली असेल तर तू त्या दोघांची माफीही मागू शकतेस. हा पण option आहे असं तुला नाही का वाटत?”
“मला खूप guilty वाटतंय सत्यजित. मी माझ्याच मित्राला इतका त्रास दिला. मी.. मी जातेय...” असं म्हणून
राधा उठली. सरळ बाहेर येऊन तिने बाईक काढली. सत्या तिच्या मागून धावतच आला. त्याने तिच्या बाईकची किल्ली काढून घेतली.
“सत्यजित माझ्या बाईकची किल्ली दे” राधा चिडलीच सत्यावर.
“नाही देणार.” सत्याही अडून बसला होता.
“मी खूप वाईट आहे रे. मी सिद्ध्याला त्रास दिला. निशालाही.. मी कोणाची मैत्रीण बनण्याच्या लायकीची नाही. कोणाला माझी काही गरज नाही. मी असले नसले तरी कोणाला काय फरक पडणार आहे? प्लिज मला जाऊदे” राधा बेभान होऊन बोलत होती.
“कशावरून कोणाला फरक पडणार नाही? स्वतःच्या मनाने सगळं ठरवायचं. दुसऱ्याचा मनाचा करतेस का गं कधी विचार? फरक पडणार नाही म्हणे” सत्याही कावला.
“नाहीच पडणार. कोणाला काय पडलंय राधा नावाची कोणी मुलगी जगली का मेली ते” राधा आता काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. तिने किल्ली सत्याच्या हातातून घ्यायचा प्रयत्न केला पण सत्याने मूठ इतकी घट्ट धरली होती कि तिला किल्ली घेता आली नाही.
सत्याला कळेना अशी कशी हि मुलगी? आपण हिच्या खिजगिणतीतही नाही आहोत का? ज्या दिवसापासून ती सिद्धार्थला ओळखते त्या दिवसापासून मलाही ओळखते. पण हिला कधी आपलं मन कळलंच नाही. तिच्यासाठी सिद्धार्थच नेहमी मित्र राहिला. मग मी कोण आहे? मी का बरोबर आहे हिच्या? असं एकदाही हिला वाटू नये?
सत्याने तिच्या दोन्ही खांद्यांना धरलं आणि तिला गदागदा हलवत तो जवळजवळ ओरडलाच
“मला पडतो फरक. का माहित नाही पण पडतो. तू असण्याचा.”
“का? तुला फरक पडायचं कारणच काय” राधाही हट्टाला पेटली होती.
“कारण I love you, you इडियट!” सत्याच्या तोंडातून खरं गेलंच शेवटी. सत्या तिच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला.
राधा बघतच राहिली सत्याकडे. तिला कळतच नव्हतं.. सत्या? सत्याचं आपल्यावर प्रेम आहे? तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसेना.
क्रमश: