(पूर्वप्रकाशित)
'वनराई कॉलनी' म्हणजे साधारण पंचवीसेक टुमदार, बंगलीवजा घरांची वसाहत. शहराच्या धकाधकीपासून दूर,शांत, निवांत जागेत, डेरेदार झाडाझुडपांच्या सान्निध्यात पहुडलेली. प्रत्येक बंगला हा दुसर्या बंगल्यापासून बराच लांब आणि दोन बंगल्यांमध्ये छोटेखानी बाग. या कॉलनीत घर विकत घेतलेली सारी मंडळी इतरत्रच वास्तव्यास होती. इथला बंगला म्हणजे 'सेकंड होम' इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं. त्यामुळे बहुतेक घरे रिकामी, बंदच असत. केवळ लागून सुट्ट्या आल्या की मंडळी या दूरच्या 'दुसर्या घरात' वास्तव्यास येत असत. तितकेच दिवस काय तो या वनराई कॉलनीत माणसांचा वावर. इतर दिवशी वनराई कॉलनी शांत, निवांत, सुस्तावलेलीच.
त्या दिवशी मात्र काही वेगळेच घडले. सकाळीच शहरातून सामानाचा टेम्पो आला होता. एका बंगल्यासमोर दोन -तीन कामगार भराभर सामान उतरवून घेत होते. एक चाळिशीचा पुरुष उभा राहून देखरेख करत होता. आजुबाजुच्या बागांमध्ये झाडापानांची मशागत करणारे माळीबुवा हे बघून चमकले. सामानाचा टेंपो आला, याचा अर्थ कायम वास्तव्यासाठी कुणीतरी येणार. केवळ २-३ दिवसांसाठी राहून निघून जाणार नाही. म्हणजेच आपल्या बायकोला या घरी काम मिळू शकतं. या विचारानेच माळीबुवा हरखले.हात-पाय धुवून लगबगीने त्या गॄहस्थापाशी येत विचारपूस करु लागले, "कुठून आलासा पावनं? ". "मुंबई" असं तुटक उत्तर आलं. "मुळे कुठे भेटतील?" त्या मनुष्याने विचारणा केली. "म्या घिउन येतू की मुलेभाऊला हिथं" असं बोलत माळीबुवा तिथून निघून गेले. काही वेळातच परत आले एका इसमास घेऊन. "नमस्कार, मी मुळे", "नमस्कार, मी डॉ. शेखर बर्वे आपण फोनवर बोललो होतो.मीच हा बंगला जोगळेकरांकडून घेतलाय.","हो, हो, तुम्ही येणार असल्याची कल्पना जोगळेकरांनी दिली होती", कसा झाला प्रवास?मुळे म्हणाले. "छान".बस्स इतकंच तुटकसं उत्तर, पुढे काहीच नाही."मी जवळच राहतो. सकाळी दोन तास नि संध्याकाळी दोन तास इथल्या ऑफिसात येऊन बसतो. काही लागलं तर कळवा". “बरं” म्हणत डॉ. शेखरने मुळ्यांचा निरोप घेतला. शेखर बंगल्याचे दार उघडत असतांना माळीबुवा मात्र तिथेच घुटमळत विचारते झाले, "डाग्दर हायसा?" "हो”. "कंचं?" माळेबुवांचा पुढचा प्रश्न तयारच होता. इरिटेट झालेल्या शेखरने “शोध लावणारा" म्हणत आत शिरत दार बंद केलेही. माळीबुवा गोंधळून "शोध लावणारा डाग्दर?" असं पुटपुटत राहिले.
मूव्हर्स अँड पॅकर्सच्या माणसांनी काही तासांतच भराभर सामान लावून दिले आणि पैसे घेऊन ते चालू पडले. शेखर एकटाच सारं घर न्याहाळत फिरत होता. पायांसोबत त्याचे विचारचक्रही फिरत होते. इतक्या दिवसांची इच्छा आज पुरी झाली. हे असंच घर हवं होतं मला. शांत. आजुबाजूला माणसांची गर्दी नाही. कुणाचा त्रास नाही. इथे निवांतपणे मनाजोगं काम करता येईल. गरज असेल, मिटींग वगैरेसाठीच फक्त ऑफिसात जायचं, नाहीतर इथे बसूनच रिसर्चचं काम करायचं असा चंगच बांधला त्याने.सहजच बोलता बोलता त्या दिवशी ऑफिसात विनयला म्हटलं होतं मला अशी अशी जागा हवीये आणि त्याचे काका काकुही हा बंगला विकण्याच्या प्रयत्नातच होते. काय झटपट डील फायनल केलं आणि आठवड्याभरात आपण आलोही इथे रहायला. अचानक भूक लागल्याची जाणीव शेखरला झाली नि त्या जाणीवेबरोबरच मेधाची आठवणही झाली. मेधा.... ती होईल का इथे अॅडजेस्ट? की जड जाईल तिला? कुणास ठाऊक. त्याने ब्रेड काढला, झटपट सँडविचेस बनवून खाल्ली. सोबत कडक कॉफी, मस्त तरतरी आली त्याला. कॉफी पिता पिता आपली स्टडी रूम तो लावू लागला, पुस्तके, शोध निबंध, लॅपटॉप, स्कॅनर सारं आपापल्या जागी विराजमान होत होतं.
आता थोडा वेळ काही काम करावं म्हणून लॅपटॉप चालू करणार तोच त्याचा मोबाईल वाजू लागला.आईचा फोन... कट करुन टाकला शेखरने नि सोबत मेसेज ही केला आय अॅम इन अ मीटींग, विल् कॉल यू लेटर....आईशी आत्ता काही बोलण्याचा मूडही नव्हता त्याचा. लहानपणापासून शिक्षणासाठी म्हणून घरापासून लांब राहिलेल्या शेखरला म्हणूनच एकटं रहायची सवय होती. हा एकटेपणाच त्याचा सोबती होता. त्यामुळे शेखर एकलकोंडाच होत गेला. माणसांची गजबज, वर्दळ त्याला कोलाहल वाटे. असह्य होई त्याला सारं. आईला भेटायला गेल्यावरही तो लगेच तिथून पळ काढत असे. तो, त्याचा अभ्यास, काम बस्स हेच विश्व होतं त्याचं. आईचं 'लग्न कर' हे पालुपद चालू झालं की तो म्हणूनच उखडत असे. असं चार-चौघांसारखं लग्न करुन संसार थाटणे, मुलाबाळांत रमणे हा पिंडच नव्हता त्याचा.
लहानपणापासून काँप्युटरवर गेम्स खेळणं ही शेखरची आवड, जी पुढे वाढतच गेली. इतकी की सॉफ्टवेअर इंजिनियर हेच कार्यक्षेत्र त्याने मनाशी आधीपासून निश्चित केलं होतं. इंजिनिअरिंग झाल्यावर अमेरिकेत पोस्ट ग्रॅजुएशन, एम. एस. ,पी. एच डी असे एकापाठोपाठ एक पल्ले तो गाठत गेला. लट्ठ पगाराच्या बर्याच ऑफर्स येत होत्या पण त्याचा मूळ पिंड मात्र रिसर्चचा. त्याने सादर केलेल्या शोधनिबंधाला मान्यता मिळून पी एच डी ही पदवी मिळाल्यानंतरही आपल्या क्षेत्रात अजुन काय प्रगती करता येईल यावर सतत विचार करणं, त्यानुसार वेगवेगळे प्रयोग करत राहणं त्याच्या आवडीचं. एका अमेरिकन सॉफ्ट्वेअर कंपनीने त्याला रिसर्च सायंटीस्ट म्हणून घेतलं आणि आपल्या मनाजोगं रिसर्चचं काम करायला मिळणार म्हणून शेखर हरखला. ट्रेनिंग पूर्ण करुन तो त्या कंपनीच्या मुंबईस्थित शाखेशी संलग्न झाला, जिथे त्याला रिसर्च करण्याची मुभा होती. संगणकाच्या वापरामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या. संगणकीय प्रणालीचाच आपण आणखी कसा नि कुठे वापर करुन जीवन अधिकाधिक सुलभ करु शकतो यावर त्याचे सतत चिंतन सुरु असे. त्यानिमित्ताने त्याने इतरही बर्याच विज्ञान शाखांचा अभ्यास सुरु केला. अनेक प्रयोग केले. काही एकट्याने, काही सहकार्यांसोबत. या सार्या अभ्यासासाठी, विविध प्रयोगांसाठी त्याला शांत जागाच हवी होती, जिथे काम करताना कोणाचा व्यत्यय येणार नाही आणि या बंगल्याच्या रुपाने त्याला अशी मोक्याची जागा मिळाली होती. कंपनीने 'वर्क फ्रॉम होम' चा पर्याय दिलाच होता. त्यामुळे इथे कसं त्याला तासंतास स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करता येणार होतं. कुणाशी ओळखदेख नाही की गप्पिष्ठ स्वभाव नाही. तो बरा नि त्याचं काम बरं.
नाही म्हणायला... आता त्याच्या आयुष्यात मेधा आली होती. तिचा सहवास मात्र त्याला मनापासून आवडत होता. आईला सांगावं का मेधाबद्दल? अनेकदा त्याच्या मनात हा विचार येई. पण नको. आत्ताच कशाला? अजून आपल्याला तरी मेधाबद्दल कुठे पूर्ण खात्री आहे? आईला एव्हढ्यातच काही कळायला नकोच. अजुन बर्याच गोष्टी पक्क्या व्हायच्या बाकी आहेत. त्याने मनाशी ठरवून टाकले मेधाला या समाजात मान मिळवून देण, तिचं असं एक स्थान मिळवून देणं हा जणू काही शेखरने घेतलेला ध्यास होता. त्याच्या जीवनाची जणू तिच इतिकर्तव्यता होती. पण हे सारं उचित वेळ येईल तेव्हाच. तोपर्यंत मात्र त्याला मेधाला कुणासमोर आणायचं नव्हतं.......
हेच सर्वांत प्रमुख कारण होतं या आडजागी रहायला येण्यामागे. इथे मेधाला कुणी पाहू शकणार नव्हतं.
मेधाला हे घर सवयीचे व्हावे म्हणून बरेच काही बदल करावे लागणार होते शेखरला. लागलाच तो कामाला. अनेक तास अव्याहतपणे काम केलं शेखरने, बरेच फेरफार केले. आता उद्या सकाळी मेधासाठी आवश्यक अशा काही लहान सहान गोष्टींची खरेदी करायची आणि तिला इथे घेऊन यायचं, असं मनाशी पक्कं करत तो उठला. बरीच रात्र झाली होती. दुपारी केलेली सँडविचेस उरली होती. ती खाऊन शेखर झोपायला गेला. पलंगावर पाठ टेकताच त्याला झोप लागली.
सकाळी जाग आली तेव्हा सात वाजून गेले होते. तयार होऊन शेखर बाहेर पडला. काल सामानाच्या टेंपोसह आल्यामुळे गाडी त्याने ऑफिसच्या पार्कींग लॉट्मध्येच ठेवली होती.खरेदी आटोपून शेखर ऑफिसात गेला. काही सुचना सहकार्यांना देऊन निघाला नव्या घरी जायला, मेधाला बरोबर घेऊनच. ठरल्याप्रमाणे ती त्याची वाटच बघत ऑफिसात थांबली होती.
घरी पोहोचताच त्याने मेधाला सगळे घर दाखवले. जुजबी सुचना दिल्या आणि स्वतःच्या स्टडीमध्ये जाऊन बसला. काही वेळातच मेधा त्याच्यापाशी येऊन ,”जेवायला काय हवं?” याची विचारपूस करु लागली. शेखरने प्रसन्नपणे हसत तिला जेवणाचा मेन्यू सांगितला. “बरं”, म्हणत मेधा किचनच्या दिशेने गेलीही आणि स्वयंपाकाची पूर्वतयारी करु लागली. या नव़ख्या ठिकाणी तिला असे सहजतेने वावरतांना पाहून शेखर मनोमन सुखावला.
"टींग टाँग" दारावरची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकताच मेधा गर्र्कन वळली व मुख्य दरवाजापाशी जाऊ लगली. शेखरने तिला केवळ नजरेच्या इशार्यानेच थोपवले. आतमध्येच राहण्याची खूण केली नि तो दरवाजा उघडण्यास वळला. समोर ते कालचेच माळीबुवा होते आणि त्यांच्यासोबत एक स्त्री - बायको असावी त्यांची.
शेखरने त्रासिक सुरात “काय हवंय?” असं विचारताच माळीबुवा म्हणाले "नाय म्हनलं येकटं राहतायसा, साफसफाईला, जेवनखान बनवायला मदत हवी असंल तर ही माझी कारभारीन हाये, तिला घियुनच आलूया." "नाही, नको आहे मला कुणाची मदत. मी स्वतः करेन, धन्यवाद" असे म्हणत शेखरने दार लावूनही घेतलं. निराश होत माळीबुवा आपल्या पत्नीसह आल्या पावली माघारी फिरले.
“तू हो म्होरं म्या काम आटपून येतो घरला”, म्हणत माळीबुवा आजुबाजुच्या बंगल्यांच्या आवारातले तण काढू लागले. सहज त्यांची नजर शेखरच्या बंगल्याकडे गेली आणि थबकलेच ते. किचनमध्ये कुणीसं वावरत असल्याचं जाणवलं त्यांना. डॉक्टर स्वतःच काम करतायत असं वाटून माळीबुवा पुढे जाणार इतक्यात..... पलिकडच्या स्टडीरूममध्ये लॅपटॉपसमोर काम करत बसलेले डॉक्टर माळीबुवांच्या दॄष्टीस पडले. आ? मग ह्ये कोन म्हनायचं? बरंच अंतर मध्ये असल्यामुळे चेहरा नीटसा दिसत नव्हता. डाग्दर सायबांची बायकू का काय म्हणायची? पण मुलेभाऊ तर म्हनलं होतं येकलंच हायती. मग कोन म्हनायचं ह्ये? कायतरी गडबड हाय खरी.
माळीबुवांनी लागलीच कॉलनीच्या ऑफिसात जात मुळ्यांना घडला वॄत्तांत कथन केला. हे ऐकुन मुळे देखील गोंधळले. “मी बघतो काय करायचं ते”, असं म्हणत त्यांनी माळी बुवांना घरी जाण्यास सांगितले.
दुसर्या दिवशी साधारण अकराच्या सुमारास मुळे डॉ. शेखरच्या बंगल्यावर थडकले. होऊ घातलेल्या सभेचं डॉक्टरांना निमंत्रण देणं हे निमित्त घेऊन. त्यांचा खरा उद्देश माळीबुवांनी पुरवलेल्या माहितीची सत्यासत्यता जोखणे हाच होता. शेखरकडून मिळालेल्या सुचनांचं तंतोतंत पालन करणारी मेधा - बेल वाजताच दरवाजा उघडण्यास न जाता आतल्या खोलीत जाऊन बसली. ती आत निघून गेल्याची खात्री करुनच शेखरने दरवाजा उघडला. "येऊ का आत?" असं विचारत उत्तराची वाटदेखील न पाहता मुळे आत घुसलेच. त्यांना खर्याखोट्याची शहानिशा करण्यासाठी आत येऊन काही काळ तेथे थांबणे जरुरी होते. त्यांच्या या अशा आत घुसण्याने शेखर अस्वस्थ. "काय काम काढलंत? ही माझी कामाची वेळ आहे," असे म्हणत शेखरने त्यांना वाटेला लावण्याचा क्षीण प्रयत्न केला. मुळे सभेचं प्रयोजन सांगते झाले. आधीची झालेली सभा, त्यात मांडलेले ठराव असं काहीबाही बोलणं वाढवत, बोलताना इकडे तिकडे कटाक्ष टाकत मुळे अंदाज घेत होते. शेखरच्या सहनशीलतेचा कडेलोट होऊ लागला. त्याला असे वायफळ बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय वाटे. त्यात त्या मुळ्याची शोधक नजर. न जाणो याने मेधाला पाहिले तर? त्याने मुळ्यांचे बोलणे मध्येच थांबवून, “मला असल्या क्षुल्लक सभांना हजर राहणे गरजेचे वाटत नाही. यापुढे असल्या कार्यक्रमांना मला बोलावत जाऊ नका”, असे स्पष्ट सांगत मुळ्यांना वाटेस लावले. मुळेदेहील काय उद्धट माणूस आहे? आलेल्या पाहुण्यांशी वागायची ही पद्धत झाली का? असे तावातावाने बोलत घराबाहेर गेले.
शेखरही या प्रसंगानंतर खूप काळजीपूर्वक वागू लागला. त्याला कोणत्याही परिस्थितीत मेधा कोणाच्या दॄष्टीस पडायला नको होती. योग्य वेळ येताच तो स्वतःच तिला सन्मानाने जगासमोर आणणार होता. पण ती वेळ येईपर्यंत मुळीच नाही. कधी बाहेर जायची वेळ आली तर तो घराला चक्क कुलुप लावून बाहेर जात असे. घराच्या खिडक्या, बाल्कनीचे दार चुकुनही उघडे राहणार नाही व मेधा कुणाला दिसणार नाही याची तो प्रत्येक क्षणी काळजी घेत होता. मेधा तर त्याच्या हुकुमाची ताबेदार. त्याच्या इशार्यावर नाचणारी बाहुलीच जणू. शेखरच्या सुचनांचं तंतोतंत पालन ती करत होती. मुळ्यांनीसुद्धा मग तो नाद सोडून दिला. जोपर्यंत आपणास किंवा इतर शेजार्यांस काही त्रास होत नाही तोपर्यंत आहे ते चालू द्यावे असे त्यांनी ठरवले आणि माळीबुवांनाही तशा सुचना दिल्या. शेजारच्या बंगल्यात तर कुणी नव्हतेच त्यामुळे विशेष अडचण आली नाही. येता जाता डॉक्टरांकडे मात्र माळीबुवा संशयी नजरेने बघत इतकंच.
दिवसांमागून दिवस जात होते. बघता बघता दोनेक महिने होऊन गेले. एव्हाना डॉ. शेखर बर्वे- एक विक्षिप्त, माणूसघाणा डॉक्टर हा शिक्का त्याच्या माथी बसला होता. शेखरला त्याची पर्वा नव्हती, किंबहुना त्याला हेच हवे होते आणि एकदाचा तो दिवस उजाडलाच.कुरियरने एक पत्र आले. पाकिटावरील संस्थेचे नाव वाचतांच उत्सुकतेने शेखरने ते भरभर उघडून वाचण्यास सुरुवात केली. प्रत्येक शब्दागणिक शेखरचा चेहरा आनंदाने फुलत होता. पत्र वाचून संपताच शेखर ते हातात नाचवत "मेधा, मेधा" करत मेधाला शोधत घरात फिरु लागला. त्याची हाक ऐकताच ती त्याच्या सामोरी आली आणि त्याने आनंदातिशयाने तिला मिठीच मारली. "मेधा, माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचे आज चीज झाले. शेवटी त्यांनी स्वीकारलाच माझा शोधनिबंध, कोणत्याही शंका-खुलाशाशिवाय. मला आमंत्रण दिलंय अगं संस्थेच्या सेमिनारमध्ये सहभागी होण्याचं. तिथेच मला गौरविले जाईल, माझा सन्मान होईल आणि अर्थात तुझाही. तुझ्यामुळेच हे होऊ शकलं. इतकी छान साथ दिलीस तू मला त्यामुळेच मी माझे ध्येय गाठू शकलो मेधा, थँक्यु सो मच. लव्ह यू डीअर”. शेखर बोलतच होता. मेधाचा प्रतिसाद न पाहता, न ऐकता. “आणि बरं का आपल्याला दोघांनाही जायचंय समारंभासाठी. तुलाही आमंत्रण आहे, किंबहुना तुलाच बघायला, भेटायला सारे आतुर आहेत. मी घेऊन जाणार तुला. आता वेळ आलीये तुला जगासमोर आणण्याची, तेही सन्मानाने”. बोलता बोलता शेखरने सुटकेस काढली. भराभर आपले कपडे, इतर महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप भरण्यास सुरुवातही केली. तो कार्यक्रम, ते सेमिनार जणू आत्ता त्याच्यासमोर घडत होते. एकेक करत पॅकिंग झाले आणि “ चला आपल्याला निघायला हवं मेधा” असे म्हणत त्याने आपल्या दोन्ही हातात मेधाला अलगद उचलले आणि........
आणि खास तिच्यासाठी असलेल्या बॅगेत व्यवस्थित ठेवत बॅग लॉक केली.
‘कॄत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील आपला शोधनिबंध सादर करण्यासाठी डॉ. शेखर बर्वे मार्गस्थ झाले - मॉडेल - मेधासह.
समाप्त