कोनाडा

#कोनाडा

आजीला देवाचा तसा नाद होताच. पण तिन्ही सांजेला दिवा लावणं तिला विशेष प्रिय असायचं. संध्याकाळचे 7 वाजायला काही मिनिटं बाकी असताना देवघरासमोर बसायचं, दिव्यातली वात वर काढायची, तेल घालायचं, दिवा लावायचा, डोळे मिटून हात जोडून मनातल्या मनात काहीतरी म्हणायचं. शुभंकरोती म्हणायची की अजून काही, तीचं तीच जाणो. देवघर तिच्याच खोलीत होतं. तिथलं झालं की हातात तेलाचा कावळा आणि काडेपेटी घेऊन ती निघायची. वाड्याला दोन दारं. मागच्या दाराकडं जायला मधला चौक ओलांडून जावा लागे. मग दोन उंच पायऱ्या भिंतीचा आधार घेत हळूहळू ती चढे. तिथं एक दरवाजा होता. रात्री तिथेही कडी कुलूप लागे. त्या दरवाज्यातून आत गेलं की मागच्या मुख्य दरवाज्याकडे जायला अरुंद वाट होती. तिथंच डाव्या बाजूला एक पत्र्याची लहानशी खोली होती.सहसा न लागणारं सामान तिथे ठेवलं जाई. तिला सगळे अडगळ किंवा नुसतच खोली म्हणत. खोली च्या पुढं गेलं की उजव्या भिंतीत एक मध्यम आकाराचा कोनाडा आणि अजून थोडं पुढं दार. त्या अरुंद भागात दिवसाउजेडी ही बऱ्यापैकी अंधार असे. तिथं एक विजेचा दिवा ही बसवलेला होता. सकाळी विशेष गरज नसायची पण मावळती नंतर अंधार पडल्यावरही तो कोणी लावत नसे. कारण आजी रोज संध्याकाळी तिथल्या त्या कोनाड्यातही दिवा लावे. तिथं ठेवलेला दिवा मधल्या वातीचा होता. घरात तेवढाच दिवा तसा. तिथंही मनातल्या मनात काहीतरी म्हणून मनोभावे नमस्कार करून ती मागे फिरे.त्या दिव्याचा प्रकाश हळूहळू भरपूर पसरत असे. मागचं दार सहसा बंद असे. ते मागच्या गल्लीत उघडत असल्याने तिकडची माणसं त्याची आडवी कडी दाराच्या फटीत हात घालून काढत आणि वाडयात येत. दिवा बऱ्याच वेळा तेवत राही, किमान तिथल्या दारांना कडीकुलुप करण्यापर्यंत तर असेच. मागच्या दारातून आता येणाऱ्यांना ही त्या दिव्याची सवय झालेली. आजीची दोन्ही दिवे लावण्याची वेळ पूर्वीपासून एवढी अचूक असे की त्यावेळी लोकांना घड्याळाकडे पाहण्याची गरजच नसे. घरातल्या बैठकीत शेजारीपाजारी गप्पा टाकत असले आणि आजी दिवा लावायला निघाली की 'चला , बाई निघाल्या म्हणजे 7 वाजलेच, निघतो आता आम्हीपण' असे म्हणत' आजीने मात्र घड्याळ पाहून कधीही दिवा लावला नाही. तिचं तिला ती वेळ बरोब्बर कळायची. कशी ते तिलाच ठाऊक. पूर्वी घड्याळं तरी कुठं असायची...
वाडा बाकी दोन मुलं, दोन सुना, मोठ्या मुलाची दोन पोरं, धाकट्याचं एक यांचाही होता. आजोबांना जाऊन 10 वर्षे तरी होतील. ते शाळेत मास्तर होते म्हणून आजी आपोआप 'बाई' झाली.आजी बडबडी नसली तरी तिच्या प्रेमळ स्वभावामुळे गावात सगळे तिला ओळखत. घरी आलेल्या माणसाजवळ आजी त्याच्या अख्ख्या गोतावळ्याची चौकशी करे.
घरात दोन सुना असल्याने आजीला स्वयंपाकघरात फारशी कामं नसत. बसल्या बसल्या भाज्या निवडणं, धान्य निवडणं, डाळ तांदळाला किडा, जाळी झाली की ती चौकात तिचंच जुनं लुगडं अंथरूण त्यांना ऊन देणं अशी काही कामं ती स्वतः अंगावर घेत. पण दोन कामं ती दुसऱ्या कोणालाही करू देत नसे, ती म्हणजे 2- 3 दिवसाआड ते दोन पितळी दिवे लिंबू मिठाने मन लावून घासून पुसून वाळवून पुन्हा त्यात वात करून ठेवणे आणि रोज संध्याकाळी ठरलेल्या वेळेत ते लावणे. सुना कितीही राहुद्या, आम्ही करू म्हणाल्या तरी ती ते त्यांना करू देत नसे. आजीचा दिव्यांबद्दलचा जिव्हाळा घरात सगळ्यांना ठाऊक होता.
आजीच्या तब्येतीची तशी फारशी तक्रार नसे. ऋतुबदला मुळे किरकोळ सर्दी कणकण खोकला व्हायचा इतकंच. अजून एकही शस्त्रक्रिया नाही की रोज नेमाने घ्यावीच लागेल अशी एकही गोळी नाही.
एक दिवस काय बिघडलं कुणास ठाऊक. एकाएकी ताप भरला आणि आजी बिछान्याला खिळली.

आजीला आता आधाराशिवाय कॉटवरून उठता येईना. ताप आटोक्यात आला पण मागे अशक्तपणा ठेऊन गेला. जशी आजारी पडली तसे गावचे, तालुक्याचे डॉक्टर करून झाले. कुणाचाही 100% गुण येईना. नक्की काय बिनसलं हेही नीट कळेना. आजी आता दिवसाचा जास्तीतजास्त वेळ पडून असे. तिचे वैयक्तिक कार्यक्रम तेवढे कोणाच्या तरी आधाराने ती हळूहळू उरके आणि पडून राही. तिला आता अन्न ही जास्त जात नव्हते. खाल्लं की उलटून जाई. एवढंसं काहीबाही पातळ खात असे, दोन वेळेला चहा घेई बास. घरातले तिच्या सेवेत काही कमी करत नव्हते, पण शरीर च साथ देईना! ती आता फार कोणाशी बोलत नसे. कोणी विचारपूस केली तर तेव्हढ्याची उत्तरं देत. एकाच गोष्टीची फक्त तिला रुखरुख लागे. संध्याकाळी दिवेलागणी ची वेळ झाली की धाकटी सून तिच्या खोलीत येई, देवघरासमोर दिवा लावे पण तसेच पुन्हा स्वयंपाकघराच्या दिशेने निघून जाई, मागच्या दाराकडे तिची पावलं वळत नसे. आजी आजारी पडली तसा कोनाड्यातला दिवा पोरका झाला. आजीने एका शब्दाने कोणाला बोलून दाखवले नाही. आपल्या गोष्टी आतापर्यँत तिने इतरांवर कधीच लादल्या नाहीत. तिच्याइतकी अचूक वेळ कोणाच्यानेही पाळली जात नसेच, त्याबद्दल तिची हरकत नसे पण आता कोनाड्यातला दिवा लागेल ही आशा ही तिने सोडून दिली. त्या बोळातल्या विजेच्या दिव्याचा वापर कधीच सुरू झाला होता. आधीच्या लहान दिव्याची जागा आता जास्त क्षमतेच्या दिव्याने घेतली. मागच्या दाराने येणाऱ्या लोकांनी कोनाड्यातल्या दिव्याची एकदोनदा आठवण काढली पण विजेच्या दिव्याच्या उजेडापुढे पुढेपुढे त्यांनाही विसर पडला.
आजी आता अजूनच कृश झाली होती. कदाचित काळदेवतेची चाहूलही लागली असावी तिला. आजी पहिल्यापासून समाधानी वृत्तीची. त्यासाठीही ती मनाने तयार होती.
एके दिवशी घरातले दिवे, सणावाराला लावल्या जातात त्या समया, नवरात्रीत अखंड नंदादीप ज्यात तेवत असे तो दिवा, वापरात नसलेले कंदील, टेम्बे, चिमण्या सगळे बाहेर निघाले. त्यांना घासून पुसून लख्ख करून देवघराशेजारी पाटावर मांडण्यात आले. गंधफुल वाहण्यात आले. कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
कोनाड्यातल्या दिव्याची आठवण कोणालाच झाली नाही.
मोठ्याचा आठवी इयत्तेतला मुलगा लहान भावंडांच्या दंग्याचा त्रास होऊ नये म्हणून बऱ्याचदा आजीच्या खोलीत अभ्यासाला बसे. देवघर, आजीचा कॉट, एक मध्यम आकाराचे लाकडी कपाट, दोन तीन धान्याच्या कोठ्या एवढ्या सामानाच्या मानाने खोली पुष्कळ मोठी होती, हवेशीर होती. देवघरामुळे त्या खोलीला अजूनच प्रसन्नता येई. मध्ये असलेल्या मोठ्या चौकामुळे ही खोली बैठक, स्वयंपाकघर आणि बाकी खोल्यांपेक्षा जरा बाजूला पडे.
त्या दिवशीही संध्याकाळी नातू तिथेच वहीत अभ्यासाचं लिहीत बसला होता. आजीने क्षीण आवाजात त्याला हाक मारली.
"सोन्या, एक काम करशील का?" आजीचा आवाज आला तसा तो वही खाली ठेऊन लागलीच तिच्या कॉटजवळ गेला.
"काय पाहिजे आजी?"
" तेवढं काडेपेटी आणि तेल घे, आणि मला त्या मागच्या कोनाड्याकडं घेऊन जा" नातवाला उगाच काहीतरी जाणवले. कुठलाही प्रतिप्रश्न न करता त्याने देवघरासमोर ठेवलेली काडेपेटी आणि तेलाचा कावळा उचलला आणि पळत जाऊन कोनाड्यात ठेवून परत आजीच्या खोलीत आला. आजीला आधार देऊन उठवले. 2थी- 3रीतल्या पोराचा दंड धरावा तसे त्याला वाटले. तिच्या खोलीच्या तीन पायऱ्या, चौक, पुन्हा मागच्या बोळाच्या आधी लागतात त्या दोन पायऱ्या एवढ्या सगळ्यावरून हळूहळू आधार देत तिला चालवत नेऊ लागला. तेवढ्या वाटेत आजी दोन वेळा मटकन खाली बसली. बोळातला विजेचा दिवा आधीच कोणीतरी लावून ठेवला होता. कशीबशी ती कोनाड्यापर्यंत आली. थरथरत्या हाताने तिने त्यात अगदी थोडेसे तेल घातले. पण काडी ओढण्याचे त्राण कुठले आलेत हातात! नातवाने काडी पेटवून हातात दिली. बरेच दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे तो मधल्या वातीचा दिवा पार हिरवट पडला होता. सुदैवाने वात शिल्लक होती. दिवा लागला.. आजीने हात जोडले. तसेच जोडलेले हात घेऊन मागच्या मुख्य दाराकडे नजर टाकली. नातू तिच्याकडे टकमका पाहात राहिला. पुन्हा त्याने आजीला हळूहळू चालवत तिच्या कॉटपर्यंत नेले. यावेळी आजी एकदाही वाटेत बसली नाही. तिने पाठ टेकवली. नातवाच्या डोक्यावरून,तोंडावरून मायेने हात फिरवला. त्याला तो दुधाच्या सायीपेक्षाही मऊ लागला...
तो दिवस दिव्यांच्या अमावास्येचा होता!!

कोनाड्यातल्या दिव्यातलं थोडंसं तेल काही वेळातच आटलं. बऱ्याच दिवसांनी तेवून तो पुन्हा शांत झाला.!!
त्या रात्री उशिरापर्यंत आजीचं शेवटचं दर्शन घ्यायला गावातल्या लोकांची रीघ लागली. वाडा हुंदक्यांनी भरून गेला. मोठ्या माणसांना रडताना पाहून लहान पोरं आधी बावरली, मग त्यांनीही धोसरा काढला. आजीची तब्येत नाजूक होती हे प्रत्येकाला माहीत होतं तरी रोजच्या पाहण्यातलं माणूस इतक्या अनपेक्षितपणे जाईल असं थोडंच कोणाला वाटतं! संध्याकाळ उलटल्यानंतर मोठी सून खायला काय करायचं म्हणून विचारायला आजीच्या खोलीत आली तर आजीला शांत झोप लागलेली दिसली. काही न खाता झोपू द्यायला नको म्हणून तिने आधी हाक मारून पाहिली, मग खांद्याला हलकेच हलवून पाहिले. आजीकडून काहीच प्रतिक्रिया नाही. तरीही तिच्या डोक्यात तसे काही आले नाही. अशक्तपणा मुळे लागली असेल झोप! तिने पुन्हा दोन तीनदा हलवले. मग ती घाबरली, ओरडून सगळ्यांना बोलवून घेतले. मुलाने डॉक्टरांना लगेच बोलवून घेतले. डॉक्टरांनी आजी गेल्याचं घोषित केलं. आजी मात्र शांत, गाढ झोपल्यासारखी दिसत होती. घरातल्यांबरोबर अख्खा गाव हळहळला. आजीशी शेवटचं काय बोलणं झालं होतं, हे जो तो इतरांना सांगत होता. आजीच्याच वयाच्या काही बायका होत्या गावात. बरोबरीचं कोणी गेल्याच दुःख तर अजूनच वेगळं. त्या वयात माणूस त्यात स्वतःच भविष्य पहात असावा का अशा वेळी?

आजीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंडदानाच्या दिवशी पिंड ठेवण्याचा उशीर, कावळा चटकन एक शित उचलून उडालाही. सगळ्यांना वाटलं होतं तसंच झालं!
पुढचे विधी पार पडले. आजीच्या खोलीत तीचा हार चढवलेला फोटो टांगला गेला. कितीही जवळची व्यक्ती असली तरी माणूस फार काळ गेलेल्यात अडकून राहत नाही. कधीतरी आठवण झाली की हुरहूर लागते ती तेवढीच. वाड्यातली माणसंही पुन्हा आपापल्या व्यापात गुंतली.
एका संध्याकाळी धाकटी सून आजीच्या खोलीत गेली. आजी गेली तरी खोली अजूनही आजीचीच म्हणली जाई. नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा लावला आणि स्वयंपाकघराच्या दिशेने वळाली. तेवढ्यात मागच्या दाराच्या दिशेने तिला कसलीशी चाहूल लागली. मागच्या दारातून नेहमी माणसं येत जात असली तरी खात्री करावी म्हणून ती मधल्या दारापाशी गेली....
पाहते तर काय ..तो अरुंद भाग लख्ख प्रकाशाने पार उजळून निघालेला... तिचे डोळे दिपले..तिथल्या विजेच्या दिव्याचं बटण तर बंद! मागचे दार ही कडी कुलूप घालून बंद केलेले. छे एवढ्या लवकर आपण कधीच कुठल्याच दाराला कुलूप घालत नाही!! काही कळतंय न कळतंय तोच हळूहळू त्या उजेडातून एक मानवी आकृती दिसू लागली. कोणीतरी बाई होती. ही कोण? आजवर आपण तर हिला कधीच पाहिले नाही.. गव्हाळ-निमगोरा वर्ण, अंगावर हळदीच्या पिवळ्या रंगाचं, सोनेरी बुट्टे असलेलं, रुंद हिरव्या काठाचं आणि त्याच रंगाच्या जमिनीवर आडव्या सोनेरी जरीच्या रेघा असलेल्या पदराचं रेशमी नऊवारी लुगडं, गळ्यात दोन पदरी काळ्या मण्यांच्या सरीत दोन ठसठशीत सोन्याच्या वाट्या आणि बाजूला चार मणी ओवलेलं आखूड मंगळसूत्र, कपाळावर आठाण्याच्या आकाराएव्हढं कुंकू, मानेवर केसांचा अंबाडा असावा कदाचित, दरेक हातात डझनभर वाटतील एवढ्या हिरव्या बांगड्या आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू.. वहिणींच्या ओळखीची असावी.. पण मग मागच्या दाराने कशी आली आणि तेही कुलूप असताना.. किमान कोण आहे हे तरी तिला विचारावं म्हणून जरा संभ्रमावस्थेतच ती बोळाच्या पायऱ्या चढू लागली . आता समोर जे काही दिसलं त्याने तिला भोवळच यायची बाकी राहिली!!
आई इथे कशा? त्या बाईला हात जोडून नमस्कार का करतायेत? पण त्या तर जग सोडून.. आणि ते कोनाड्यात काय आहे? दिवा? मी तर नाही लावला तो.. किती हिरवट पडलाय? एवढे दिवस आपलं लक्ष का नाही गेलं तिथे?? ही बोळ एवढी उजळलीये ती कशाने? दिव्याने की ? की?
धाकट्या सुनेने डोळे उघडले तेव्हा नुकतंच उजाडू लागलं होतं. हृदयाचे ठोके आगगाडीच्या धडधडीशी सहज स्पर्धा करू शकले असते.
काय समजायचं ते ती समजली होती.
आता तिला पडून राहवेना. ती तडक उठली, सरळ मागच्या बोळाच्या दिशेने गेली. वाड्यावर अजून झोपेचे साम्राज्य होते. मधल्या दाराला कुलूप होते. बैठकीतून किल्ल्यांचा जुडगा आणून तिने ते उघडले. मागच्या दाराला कुलूप. कोनाड्याकडे पाहिले, दिवा पूर्वी पितळाचा असेल यावर विश्वास बसणार नाही एवढा हिरवा पडला होता. तिने तो उचलला. थेट चौकात जाऊन बसली. लिंबू मिठाने त्याला जीव लावून घासला. सोन्यालाही लाजवेल एवढा तो झळाळू लागला. तोपर्यंत वाड्याला जाग आली होती.
झाला प्रकार आत्ताच कोणाला सांगायला नको असे तिला वाटले.
दुपारी निवांत झाल्यावर धाकटी सून स्वतःशीच विचार करू लागली.
" हे कोणाला सांगायला पाहिजे का? वहिनींना तरी? काही दिवसांपूर्वी घरावर जो प्रसंग ओढवला त्याचा परिणाम म्हणून स्वप्न पडले म्हणत सगळ्यांनी उडवुन लावले तर? पण मी जे पाहिलंय त्याहीपेक्षा जे अनुभवलंय ते फक्त स्वप्न नव्हतंच. अगदी शंभर टक्के. ते पवित्र रूप, ते तेज, ते हास्य, ते अस्तित्व, तो डोळे दिपावणारा उजेड सगळं सगळं खरं होतं.. अगदी समोर असलेल्या चालत्या फिरत्या माणसाइतकं!! हे सगळं कोणालाही शब्दांत समजावून सांगणं कठीण आहे. स्वप्नापेक्षा अधिक काहीतरी होतं ते! तो माझ्यासाठी एक निरोप होता, त्या कोनाड्यातल्या दिव्याबद्दल!! मग आईंनी तेव्हाच का सांगितलं नाही हे, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून? लोक मनातून त्याची चेष्टा करतील म्हणून? नाही आपणही तसं होऊ द्यायला नकोय. कित्येक दिवस तो दिवा कोनाड्यात तसाच पडून राहिला!! छे! आईंची दोन्ही दिवे लावण्याची अचूक वेळ, त्यातल्या त्यात कोनाड्यातला दिव्याचा नेम... सारे सारे आता समजू लागलेय!!" सुनेच्या अंगावर शहारे आले.
त्या दिवशी संध्याकाळी आजीच्या ठरलेल्या वेळेत देवघराबरोबरच कोनाड्यातला दिवा लागला. बोळातला विजेचा दिवा पुन्हा बंद झाला. नंतर मागच्या दारातून आलेले एकजण बैठकीत गेल्या गेल्या म्हणाले " बाई नुकत्याच त्या मागच्या कोनाड्यातला दिवा लावून गेल्यात असं वाटलं" !! स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाच्या तयारीत असलेली सून स्वतःशीच हसली.
दिवा पाहून लक्ष्मी येते असं आजवर तिने केवळ प्रार्थनेत ऐकलं होतं!!!

.....
- वृषाली कुलकर्णी -खिस्ती

–-------------------------------------------------------

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle