क्रिसमस-बीस्मस
“ जिंगल बेल जिंगल बेल ...” म्हणणारा लाल पोशाखातला बाबा, अमेरिकेतल्या आमच्या घरी आत्तापर्यंत डोकावला नव्हता. पण आता इराला कळायला लागलय... चांगलंच... आणि त्यामुळे पहिल्यांदाच आमच्याकडे पण मध्यरात्री सॅन्टा गिफ्ट्स देऊन जाणार आहे.
माझ्या लहानपणीच्या आठवणीत सुद्धा पुण्यात क्रिसमस सेलिब्रेशन वगैरे काही असल्याचं आठवत नाही. नाताळच्या सुट्टीला कॅम्पमध्ये विशेष काहीतरी ‘घडतं’, असं आम्ही रस्तापेठेत राहत असल्यामुळे ऐकिवात होतं आणि एका वर्षी आई बाबांबरोबर कॅम्प मध्ये गेले असतांना मार्झोरीनला sandwich खाऊन घरी परत गेल्याचं आठवतंय. कर्नाटक हायस्कूल मध्ये कुणीतरी क्रीस्मसला रम बाॅल आणल्याचं आणि ते अनेक मित्र मैत्रिणींनी वाटून खालल्याचं आठवतंय. (कुणालाही रम चढली नव्हती हे आठवतंय.) जंगली महाराज रोडला पिझ्झा हट आणि मॅक डोनाल्ड्स आल्यावर, आम्ही लाॅच्या शेवटच्या वर्षाला असताना क्रिसमस डेकोरेशन , लाल टोपी घातलेले सर्वर हे मी अनुभवलेलं पाहिलं क्रिसमस असावं. म्हणजे २००४-५ साली. आता भारतातसुद्धा माॅल, हाटेल,पब मध्ये सॅन्टाच्या बरोबर फोटो, क्रिसमस डेकोरेशन, लायटिंग, सेलिब्रेशन सगळंच आहे की! तरीही भारतात काय किंवा अमेरिकेत काय आम्हाला क्रिसमस फिव्हर चढला नव्हता.
गेला महिनाभर इराच्या शाळेत क्रिसमसशी संबंधीत अनेक क्राफ्ट प्रोजेक्ट्स चालू होते. घरीसुद्धा दिवाळीत आम्ही आकाशकंदील केले, पणत्या रंगवल्या तसे आम्ही क्रिसमस प्रोजेक्ट्स करत होतो. इराने मात्र ठामपणे तिला सॅन्टा आवडत नाही असं सांगितलं होतं. तिला तो आवडू वगैरे नाही असं तिला त्याच्या बद्दल माहितीच काय होतं? एरवी आम्ही आणि शाळेतसुद्धा त्या त्या सणाविषयी गोष्टीची पुस्तकं वाचलेली असतात. क्रिसमसच्या बाबतीत आम्ही काहीही वाचलेलं नव्हतं, सिनेमा/ Tv वर क्रिसमस बद्दल इराने काही पाहिलेलं नव्हतं. कदाचित शाळेत वाचलेल्या पुस्तकात आणि इतर मुलांच्या बोलण्यावरून हा निष्कर्ष निघाला असेल असं मला वाटलं. मग भरपूरवेळा ह्या बद्दल छोटे मोठे संवाद झाले.
उदा:१” तुला सॅन्टा का आवडत नाही?”
“ तो आपल्या घरात येतो.”
“ गिफ्ट द्यायला येतो..”
“ मला घरात नकोय सॅन्टा...”
“ तू त्याला कधी पाहिलं आहेस का ? घाबरू नकोस...”
“ मला गिफ्ट नकोय..”
उदा २: “ आपण घरात असताना सॅन्टा येतो?”
“ हो. आपण झोपल्यावर..”
“का?”
“ सरप्राईझ गिफ्ट द्यायला..”
“ आपल्याकडे चिमनी(chimney) नाहीये, मग सॅन्टा कुठून आत येणार?”
“ तुला हवा आहे का यायला?”
“ मला गिफ्ट नकोय....”
इराचे तर्कसंगत प्रश्न ऐकून मला प्रचंड अभिमान वाटत होता.
Thanksgiving उलटून गेल्यावर आमच्या आसपासच्या घरांमध्ये लायटिंग डेकोरेशन दिसायला लागलं, खिडक्यांमधून घरातल्या क्रिसमस ट्री वर लुकलुकणारे दिवे दिसायला लागले, सॅन्टा आणि त्याच्या रेन्दीअर्स चे देखावे दिसायला लागले. आमच्या घरी अशी कुठल्याही प्रकारची तयारी नाही, क्रिसमस बद्दल चर्चा नाही म्हणून इराला सगळे प्रश्न पडले आहेत का? भारतातली दिवाळी तिने अनुभवलेली नाही; पण दिवाळीच्या आधी होणारी तयारी, फराळ, रांगोळी, अभ्यंग स्नान, छान तयार होणं, ओवाळणं हे तिने तिच्या मावस भावडांबरोबर गेले तीनही वर्ष अनुभवलं आहे. दिवाळी म्हणजे आई, मावशी, बाबा, काका मिळून फराळ बनवतात, आई वडिलांचे मित्र मैत्रिणी एकत्र जमतात; सण साजरा करण्याची तिची कल्पना, sensibilities घडतायत त्या ह्या अनुभवांमधून. त्यामुळे सॅन्टा बद्दलची संशयी भूमिका आमच्या त्याच्या बद्दलच्या निरुत्साहातून जन्मली असेल का? माहित नाही. एक प्रयत्न म्हणून मी एक दोनदा क्रिसमस कुकीज वगैरे केल्या तिच्याबरोबर. पण इराची भूमिका ठाम होती. शाळेत केलीली tree ornaments तिने bracelets आहेत म्हणून मला हातात घालायला लावली. शाळेत सिरीअल वापरून करायला दिलेल्या माळेत तिने सिरीअल चिकटवलं आणि मग खाऊन टाकलं. इतर मुलं घरी माळा घेऊन गेली आणि इरा घरी सुतळी घेऊन आली..
इराच्या मैत्रिणीच्या आईने मला विचारलं, “ Do you celebrate Christmas?Put up a tree and stuff?” मी म्हटलं, “No, we don't celebrate Christmas.” त्यावेळेला ती हसली आणि म्हणाली, “ We don't do it for the religious reasons of course. But I love the smell of pine and its time for family you know..” मी of course म्हणून मान हलवली, पण मला आई म्हणून थोडासा कॉम्पलेक्स यायला लागला होता. आपल्याकडून काहीतरी करायचं राहून गेलंय असं जरा उशीराच मला वाटायला लागलं होतं...
मग एक दिवस काय घडलं माहित नाही, इरा म्हणाली, “ I am going to get one gift from Santa. Because Santa has to give gifts to many kids.” गिफ्ट नकोय ते एक गिफ्ट हा प्रवास कसा घडला ते कळलं नाही. पण अजूनही सॅन्टाने घरात यायचंच नव्हतं.
एक compromise म्हणून, आम्ही असं ठरवलं की घरापुढच्या अंगणात मोठं spruce चं झाड आहे त्यावर सॅन्टाने गिफ्ट ठेवायचं.
“ what if someone else takes it ?”
“नाही घेणार, चिठी ठेऊ आपण.”
“ नको, दाराबाहेर ठेऊ दे...”
मग घरात TV बघताना क्रिसमस शो बघणं सुरु झालं. एका गिफ्टच्या रुळावर वर गाडी चालायला लागली असल्यामुळे घरात एक नवीन खेळ सुरु झाला.
“ ho ho ho ! little girl were you good or were you naughty?”
“ I was very very naughty...”
“ Then you will get no gift, only a lump of coal.”
“ oh! I love a lump of coal. I will light it and bake a potato..”( हे improvisation माझं अर्थात)
“ No, Mommy be sad. Say,I want a gift, I will be good...”
मग ह्या संवादाची कितीही improvisations केली तरी त्याचा शेवट हाच की खट्याळ मुलाला गिफ्ट मिळत नाही, तो दुखी झाला तरीही त्याला गिफ्ट मिळत नाही, फक्त कोळसाच मिळतो. शहाण्यामुलाला मात्र गिफ्ट मिळतच मिळतं आणि शाबासकी ही! तर्कसंगत मुलीने बरोबर मुद्दा पकडला होता..
कुठलातरी अनोळखी माणूस, आपण झोपलेले असताना घरात येणार, दूध पिणार, कुकीज खाणार आणि मग गिफ्ट देणार ही कल्पनाच तिला पचलेली नाही.
तिच्या लेखी क्रिसमस म्हणजे गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट. त्या गिफ्टसाठी Santa,reindeer,sleigh ह्या सगळ्या bells and whistles ची गरज काय?
ही क्रिसमस आमच्या कायम लक्षात राहील ती इराच्या ह्या प्रश्नांमुळे. आत्ता रात्री वाट पाहून झोपताना, तिचा उत्साह उतू चालला होता. तिचा बाबा तिच्या rationalizationवर फिदा होऊन एक नाही, चार gifts wrap करत बसला होता. मी सुखावले होते, निदान ह्या क्रिसमस बिस्मसच्या बाबतीत तरी आई म्हणून माझं काहीही चुकलं नव्हतं....