हंपी: उध्वस्त तरीही पाय घट्ट रोवून उभे असलेले

हंपी कसं आहे? सुरेख, अचंबीत करणारं पण भग्न, उध्वस्त, बेचिराख, केवळ अवशेषांच्या रुपात शिल्लक राहीलेलं? Group of monuments, archeological ruins, burnt city? हो आहे. पण ते युद्धात प्राणपणाने लढून त्याच्या जखमा किंवा त्यात मिळालेले कायमचे अपंगत्व अभिमानाने मिरवणाऱ्या एखादा सैनिकासारखं ही आहे.. कुठलेही रंग, सोन्या चांदीचे पत्रे न पांघरलेलं तरीही श्रीमंत.. दागदागिने, भरजरी वस्त्रं त्यागून पांढरी वस्त्रे आणि फुलांच्या माळा ल्यायलेल्या कैलासाच्या पार्वतीसारखं आहे! त्याच्या सौंदर्याचं वर्णन करताना शब्द पुरत नाहीत, ते निव्वळ पहायला डोळे आणि साठवण्यासाठी स्मृती पुरत नाहीत. कोणतीही बेगडी पुटं न चढवलेल्या, कोणत्याही कोनातून टिपला तरी सुंदरच दिसणाऱ्या प्रतिमापूरक चेहऱ्यासारखं किंबहुना त्याहीपेक्षा शतपटींनी अधिक सुरेख, अशा इथल्या वास्तूंना कुठूनही बघा, नक्की कसं पाहीलं, टिपलं तर त्या अधिक आकर्षक दिसतील हे अजिबात ठरवता येऊ नये इतकया त्या प्रमाणबद्ध आहेत. त्यांच्यातल्या भग्नतेला हरवून त्यांची भव्यता, प्रमाणबद्धता, त्यातल्या देवादिकांच्या, सैन्याच्या, प्रेमींच्या कोरीव आकृत्यांतली कमनियता उठून दिसते.
रचना अशा एकाचढ एक की नंतर नंतर त्याची सवय होऊन पूर्वीचा अचंबा कमी होतो आणि त्याबद्दल मग स्वतःचीच लाज वाटू लागते. ह्यांचे आराखडे कागदावर बनवणारे स्थापत्यकार आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खपलेले कारागीर आणि त्याच्याही आधी यांना उभे करण्याचे स्वप्न पाहणारे इथले मांडलिक यांना दैवी प्रेरणाच असावी. यांना उभे करणाऱ्यांइतकेच श्रेयपात्र आहेत कालपरत्वे भूमीत गडप झालेल्या यांच्या अवशेषांना वर आणून त्यांना पुनर्जन्म देणारे पुरातत्व विशेषज्ञ. त्यासाठी इतिहासाबद्दल आतून तळमळच हवी.
इथल्या रचना फक्त डोळ्यांनी न बघता त्यांच्या खांबांना, भिंतींना हाताने स्पर्श करावा, अंगावर शहारा येतो. पण तो थंडाव्यामुळे नव्हे. या दगडांनी सुवर्णकाळ पाहीला आहे, समृद्धता पाहीली आहे, ते आणणारे आणि त्याला जपण्यासाठी प्राणपणाने लढणारे पराक्रमी राजे आणि त्यांचे शूर शिपाई पाहीले आहेत. त्याच राजाधिराजांना या मंदिरांपुढे नतमस्तक होताना पाहीले आहे. शत्रूंची आक्रमणं, त्यात स्वतःला उभं जळताना, उध्वस्त होतानाही पाहीलं आहे.. तर या सगळ्या घडामोडींची अंधुक, असंबंध चित्रे डोळ्यासमोर सर्रकन तरळून जातात त्यामुळे!
हंपी ही केवळ गतवैभवाची साक्ष देणारी पराभूत , प्रमाणबद्ध, रेखीव अशा भग्न अवशेषांची भूमी नाही. जे घडलं ते नक्कीच दुर्दैवी आहे, अस्वस्थ करणारं, चीड आणणारं आहे. पण हंपी पाहताना या भावना फार काळ टिकत नाहीत. नंतर उरतो तो फक्त अभिमान! पंपा या 'स्त्री' देवतेच्या नावावरून शहर वसवणाऱ्या संस्कृतीचा, त्याला बेचिराख, उध्वस्त करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून आजही घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या तितक्याच श्रीमंत, समृद्ध वाटणाऱ्या कलाकृतींचा आणि गौरवशाली इतिहासाचा!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle