काळाकभिन्न अंधार...
काळाकभिन्न अंधार होतो का कधी कुठे?
अंधारात उजेड आणि उजेडात अंधार उधळतो, सगळीकडे.
रात्रीच्या अवकाशात, चांदण्यांसारखेच
उंच इमारतीत तरंगणारे दिवे;
त्या दिव्यामागची माणसं,
दिसणार नसतात रस्त्यावरच्या कुणालाच.
काळ्या रस्त्यावरून पुढे पुढे सरकणारी,
वाहनं आणि फ्लोरोसेंट परीधानांचे ठिपके वगळता
मनोर्यातल्या माणसांना दिसणार नसतात रस्त्यावरची माणसं.
पण एकमेकांना न बघता, न ओळखता,
जाणीव असतेच की विरुद्ध किनार्यांची.
वर-खाली, उंच- ठेंगणा, खोल सपाट
एकाच्या विरून जाण्याने दुसर्याचा कणा उध्वस्त,
एकाच्या ध्यासातून दुसरा होत नाही मुक्त.
आपआपल्या बेटावर,
अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या सगळ्यांनी,
अनुभवलेलं असतं सूर्यप्रकाशात चकाकणारं
कोळ्याचं नाजूक, इवलं, रेशमी जाळं.
म्हणूनच तर आस लागते,
अंधार भेदून येणाऱ्या प्रकाशाची तिरीप,
आणि त्यात मुक्त बागडणाऱ्या धूळकणांची!
आनंदात आश्रू, जन्मात कळा, मृत्यूत सुटका.......
अंधारात उजेड, उजेडात अंधार,
पूर्ण काळाकभिन्न अंधार खरच होतो का कधी कुठे?