ही माझ्या आजीची रेसीपी आहे. या आजीला मी दुर्दैवाने पाहू शकले नाही, माझ्या जन्माच्या आधीच ती गेली. पण तिच्या अशा अनेक रेसिपीज आई अजूनही आजीच्या म्हणून तशाच्या तशा करते. त्यातलीच ही एक.
साहित्य
२ मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो बारीक चिरून
२-३ हिरव्या मिरच्या
थोडासा कढिलिंब
फोडणीचे सामान (हिंग,मोहोरी,हळद, तेल)
तीळ २ टीस्पून
भाजलेले शेंगदाणे १/२ टेबलस्पून
चवीप्रमाणे मीठ आणि थोडा गूळ किंवा साखर
कृती
एका पॅनमधे फोडणी करून हिंग,मोहोरी,अगदी थोडीशी हळद आणि कढीलिंब यांची फोडणी करून घ्यायची.
त्यात भाजलेले दाणे घालून फोडणीत जरा खरपूस परतून घ्यायचे.
तीळ भाजलेले नसतील तर या फोडणीतच घालून हलके परतून घ्यायचे.
आता यामधे बारीक चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ आणायची.टोमॅटो जरा शिजले पाहिजेत.
मग मीठ आणि गूळ घालून मिश्रण गार करत ठेवायचे
गार झाल्यावर कढिलिंब बाजूला काढून मिक्सरमधून बारीक करायचे. हवी तर वरून परत फोडणी घालू शकता पण अजिबात गरज नाही.
करायला अगदी सोपी आहे आणि आंबट-गोड-तिखट अशी चव खूप मस्त लागते.
चटणी, स्प्रेड, डिप यापैकी काहीही म्हणून खपते.
मिरच्या जरा कमी केल्या तर अभारतीय लोक पण आवडीने खातात.