आता तो माझा बॉस असणार होता. अनिरुद्ध.
थोड्याच वेळात दुसरा मेल आला. ती meeting request होती. त्याने टाकलेली. one on one. संध्याकाळी ४ ला meeting होती. निनाद आणि मी कॉफी घ्यायला लवकरच गेलो.
“काय मग खुश ना? तुला हवी ती प्रॅक्टिस मिळाली.” मी निनादला विचारलं.
“हम्म” निनाद कसल्यातरी विचारात होता.
“काय झालं निनाद? लक्ष कुठाय तुझं?”
“काही नाही गं.”अजूनही त्याचं लक्ष नव्हतं.
“मला माहित आहे काय झालंय ते. तू तुझ्या आवडत्या प्रॅक्टिसमध्ये पण तुझा जीव मात्र दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये अडकलाय. मग कसा असणार तू खुश!” मी त्याला उगाच डिवचलं.
त्याला ते काही जास्त आवडलं नाही. खरंच त्याला वाईट वाटलं होतं. आमची एस-क्यूब मोहितला जास्तच भाव देत होती आणि मोहितचा स्वभाव हे attention नक्कीच encash करणारा होता. मला जाणवलं कि निनाद शर्वरीकडे ओढला गेलाय. तो हे मान्य करत नसला तरी त्याला तिच्या प्रत्येक शब्दाचा फरक पडायचा.
मी कॉफी संपवून जागेवर आले. पावणेचारलाच मी meeting रूम मध्ये जायचं ठरवलं. उगाच उशीर नको.
मी एका हातात लॅपटॉप आणि एका हातात माझी नोटबुक घेऊन मीटिंग रूमचा दार उघडलं आणि माझ्या लक्षात आलं, आधीच आत कोणीतरी आहे. मी न बघताच sorry sorry म्हणत परत दार लावणार इतक्यात ती व्यक्ती म्हणाली,
“हाय मीरा, प्लीज कम इन” आणि मी पाहिलं, तो अनिरुद्ध होता.
“ओह्ह... आय ॲम सॉरी.. May I come in?” मी पुन्हा मूर्खासारखं विचारलं.
त्यावर तो हसला, म्हणाला, “Yes please.”
मी आत गेले. त्याने समोरच्या खुर्चीकडे हात दाखवून बैस म्हणून सांगितलं.
मला खूप टेन्शन आलं होतं. आजपर्यंत ऑफिसचं काम म्हणजे जणू कॉलेजचं extension होतं. ऑफिसला येऊन आम्ही फक्त टेस्ट्सचा अभ्यास करायचो आणि घरी जायचो. किरकोळ कोडिंग करायचो. आता आम्हाला बॉसेस असणार होते, आमचं काम खऱ्या अर्थाने सुरु होणार होतं.
“Thank you sir “ म्हणत मी बसले.
“अनिरुद्ध. Call me अनिरुद्ध. Ok, First thing is, here, in our company, we all call each other by their first name only.” मग त्याने टीमचं working समजावून सांगितलं. टीम मध्ये मी सोडून पाच जण होते. सगळे माझ्यापेक्षा experienced आणि core developers होते. मी त्यांच्यासमोर अगदीच लिंबूटिंबू होते. आणि दुसरं म्हणजे टीम मध्ये मी एकटीच मुलगी असणार होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझं डेस्क चेंज झालं. मी माझ्या टीम मध्ये बसायला जाणार होते. या आधी आम्ही चौघे एकाच क्युबिकल मध्ये बसायचो, आता मात्र आम्ही चार दिशांना असणार होतो. अर्थात मोहित आणि शर्वरी एकत्रच असणार होते. पण मला मात्र निनाद बरोबर हाकेसरशी बोलता येणार नाही याचं वाईट वाटलं. मग टीम मधल्या सर्वांशी formal ओळख झाली. रवी आणि कुमार दोघे साऊथ इंडियन होते. विराज आणि शेखर दोघे नॉर्थ इंडियन.
“चलो, आता अनिरुद्धला पार्टनर मिळाला” कुमार म्हणाला.
“मिळाला नाही रे, मिळाली” रवीने त्याची चूक दुरुस्त करत म्हटलं “आधी तो एकटाच मराठी होता ना टीम मध्ये” मला उगाचंच धडधडल्यासारखं झालं.
आमचं काम सुरु झालं. एक नवीन प्रोजेक्ट सुरु होणार होता. त्यात रवी आणि मी काम करणार होतो. रवीने मला बऱ्यापैकी बेसिक गोष्टी समजावून सांगितल्या आणि वर हेही सांगितलं की, कोणालाही विचार काही प्रश्न असतील तर, सगळे मदत करणारे आहेत.
मी नवीन गोष्टी शिकत होते, त्या apply करत होते. मस्त होतं हे सगळं. आपण कॉलेजमध्ये शिकतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं. शिकणे आणि प्रॅक्टिकल कोडींग करणे यात खरंच खूप अंतर आहे हे मला कळायला लागलं होतं.
मी टीम जॉईन करून दोन महिने होऊन गेले होते. आताशा आम्ही चौघे एकत्र खूप कमी वेळा भेटायचो. निनाद आणि मीच एकमेकांना फोन करून coffee घ्यायला जायचो इतकंच.
त्या दिवशी मी निनाद आणि मी कॉफी घेत होतो, मला जाणवलं ह्याचं काहीतरी बिनसलंय. मी काही विचारणार इतक्यात त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली.
“मीरा, मला असं वाटतंय कि मी शर्वरीच्या प्रेमात पडलोय”
“क्काय?” मला जे इतके दिवस त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत ते निनादने finally मान्य केलं होतं.
“हो. मी खूप विचार केला या गोष्टीवर.”
“हो का? काय पण विचार करणारा! मित्रा, तुझ्या चेहऱ्यावर ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून लिहिलेलं होत कि ती तुला आवडते. तुला ते कळायला वेळ लागलाय इतकंच”
मी उगाचच त्याला पिडत म्हटलं.
“मग काय? शेहनाईयाँ कब सुनवा रहे हो?”
“ए गप्पे... शेहनाईयाँ काय लगेच? मी अजून तिला सांगितलेलं नाहीये. तिलाही माझ्याबद्दल तसंच वाटतं का हे मला माहित नाहीये अजून. तू उगाच सूतावरून स्वर्ग गाठू नकोस” आणि आम्ही खिदळलो.
म्हटलं चला, मला अगदी पहिल्यापासून तो मोहित शर्वरीच्या मागेपुढे करायचा ते अज्जीबात आवडलं नव्हतं. त्याचा स्वभावच थोडा क्लिष्ट होता. शर्वरीसारख्या गोड मुलीसाठी मनमोकळा निनादच योग्य होता.
मी आनंदातच डेस्कवर परत आले. तेव्हढ्यात रवी आला. त्याला विचारलं तर तो म्हणाला मी स्टेटस द्यायला चाललोय. मी म्हटलं इतक्यात? आम्ही रोज संध्याकाळी स्टेटस मेल्स पाठवायचो. आज अजून चारही वाजले नव्हते.
“अगं ऑनसाईट नाही. अनिरुद्धला स्टेटस द्यायचंय” रवी म्हणाला.
पण मेल्स मध्ये अनिरुद्धही cc त असायचाच की.
मी असा विचार करतेय हे बहुतेक त्याला कळलं असावं.
“कामाचं नाही. काम करणारे कसे काम करतायत त्याचं स्टेटस देतो मी त्याला” असं म्हणून हसून रवी निघून गेला.
काम करणाऱ्यांचं स्टेटस? मी आणि रवी एकत्र काम करत होतो. रवीच्या कामाबद्दल काही प्रश्नच नव्हता. तो आणि अनिरुद्ध दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. त्या दोघांनीच हि टीम सुरु केली होती. मग कोणाचं स्टेटस देतो हा? माझ्या कामाचं? अरे देवा! मी हा विचारच केला नव्हता. रवीचा स्वभाव खूप चांगला होता. मला आलेल्या असंख्य शंकांना तो नेहमीच उत्तर द्यायचा. आणि त्याच्या वागण्यात कुठेही मी इतका experienced आहे आणि हि काल आलेली मुलगी असा अविर्भाव नसायचा.
गेल्या दोन महिन्यात माझं आणि अनिरुद्धचं एकदाही हाय हॅलो पलिकडे बोलणं झालं नव्हतं. पण ज्या अर्थी रवी असं म्हणाला त्या अर्थी माझ्या कामाबद्दल त्याला सगळं कळत होतं.
एखादि कोडिंगची शंका असली, काही वर्क होत नसलं तर सगळे आधी एकमेकांना विचारायचे. काही नवीन functions असली तर ती discuss व्हायची. टीम मधले सगळे जण आपापले certifications up to date ठेवायचे. पण काहीही सुटत नसलं, समजत नसलं तर सर्वांचा ultimate उपाय असायचा अनिरुद्ध. त्याच्याकडे एखादी गोष्ट गेली आणि त्याच सोल्युशन मिळालं नाही असं कधीच व्हायचं नाही. सगळ्या टीमचा अर्क होता तो जणू. आम्ही सगळे यायच्या आधी तो ऑफिसला आलेला असायचा आणि आम्ही सगळे निघाल्यावरच निघायचा. त्याला टीमचा खूप अभिमान होता. असा कुठलाच कोड नाही जो माझी टीम करू शकत नाही असं म्हणायचं तो. तो नुसता विंगमध्ये असला तरी आम्हाला सगळ्यांना सगळं under control आहे असं वाटायचं.
दोन दिवसात project release होती त्यामुळे कामातून डोकं वर काढायलासुद्धा वेळ झाला नाही. अखेर release च्या दिवशी काम उरकेपर्यंत खूपच उशीर झाला. मी आणि रवी सोडलो तर आमच्या विंगमध्ये सगळे घरी गेले होते. निनादने सुद्धा दोनदा फोन करून अखेर मला घरी सोडायचा विचार सोडून दिला होता. अर्ध्या तासापूर्वीच तो घरी निघून गेला होता.
Finally सगळं काम उरकल्यावर रवीने मला विचारलं
“मीरा, तू घरी कशी जातेस?”
“मी? बसने.” मी उत्तर दिलं.
“अरे बापरे. मी तुला आधीच जा म्हणून सांगायला हवं होतं मग. मी सोडतो असंही नाही म्हणू शकत कारण मीच आज गाडी घेऊन नाही आलो, गाडीचा काहीतरी घोटाळा झालाय. मी चालत आलोय आज. तुला रिक्षाने सोडायला येऊ का?” रवीच्या आवाजात काळजी होती.
“नाही मी जाईन बसने, don't worry “ असं मी त्याला म्हणाले खरं पण आता बस मिळणं अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना होती.
“Great job guys! pack your bags... चला मी सोडतो तुम्हाला दोघांना घरी” अचानक अनिरुद्ध आला होता. तो ऑफिसमध्ये आहे? इतका उशीर झाला तरी? Maybe meeting room मध्ये असेल, मी मनाशीच म्हटलं.
“मी जाईन बसने” मी पुटपुटले. मला का काय माहित त्याच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती वाटायची कधी कधी.
“चल. मी सोडतोय तुला” त्याने माझ्याकडे पाहत म्हटलं आणि मी पटकन bag पाठीला अडकवली, जणू नाही म्हणणं हा माझ्यासाठी option च नव्हता.
रवीच घर जास्त लांब नव्हतं. रवी उतरला.
“बाय मीरा. बाय अनिरुद्ध, भेटू उद्या” म्हणून रवी गेला. रवी जाऊन दोन-तीन मिनिट झाले तरी अनिरुद्ध गाडीच चालू करेना. काही प्रॉब्लेम आहे का असं मी विचारणार इतक्यातच त्याने मागे पाहिलं.
“मीरा, प्लीज पुढे येऊन बैस. मी driver नाहीये.” रवी उतरल्यावर पुढची सीट रिकामी झाली होती. मला कळालंच नाही, हो म्हणू कि नाही. हो म्हणावं तर तो मलाच आगाऊपणा वाटत होता आणि नाही म्हणावं तर आढ्यता.
त्याने पुन्हा मागे पाहिलं आरशातून. आणि यावेळी त्याने आपली नजर हटवली नाही. मला उतरावंच लागलं. मी पुढे जाऊन बसले. मनात कसंतरी वाटत होतं. मी आजतागायत कोणाच्याही कारमध्ये front seat वर बसले नव्हते. त्याने माझा पत्ता आधीच विचारला होता त्यामुळे घरी जाईपर्यंतचा वेळ आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोललो नाही. घराजवळ उतरल्यानंतर त्याला कसबसं बाय म्हणून मी घरात गेले.
घरी गेल्यावर पाहिलं तर आई बाबा जेवायचे थांबले होते. मग जेवून आई बाबांना गुड नाईट म्हणून माझ्या खोलीत आले. अचानक माझा फोन वाजायला लागला. इतक्या उशिरा फोन? कोणाचा म्हणून बघितला तर स्क्रीनवर नाव होतं अनिरुद्ध. मी जॉईन झाल्यावर त्यानेच सगळ्यांचे पर्सनल नंबर्स मला दिले होते, long work hours मध्ये लागतील म्हणून. माझं काही विसरलं का काय त्याच्या कारमध्ये म्हणून मी थोडं घाबरतच फोन उचलला.
“हॅलो”
“हॅलो मीरा, अनिरुद्ध बोलतोय”
“हो. बोला” अचानक माझ्या तोंडातून आदरार्थी शब्द गेले.
तो हसला, म्हणाला, “पोहोचलीस ना नीट?”
मला काही कळेचना. यानेच मगाशी सोडलं ना मला घरी?! मग आता असं का विचारतोय?
“हो.. मगाशीच” मी म्हटलं.
“ओके. मी निघतो मग. see you tomorrow. Bye.” असं म्हणून त्याने फोन ठेवला.
म्हणजे तो आत्तापर्यंत घराबाहेर थांबलाय? मी धावतच खिडकीपाशी गेले. खाली रस्त्यावर त्याची गाडी निघून जात होती.
- क्रमश: