अगं लक्ष कुठाय तुझं?, चल ना” निनादच्या आवाजाने मी पुढे बघितलं, तो प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत दार उघडून उभा होता. मी झटकन पुढे झाले.
कोण असेल तो?
सिनीअर असेल कोणीतरी. त्याची ती थेट नजर आठवली.
तो विचार बाजूला सारून मी प्रोग्रॅम करायला घेतला, मला लवकरात लवकर काम संपवून निघायला हवं होतं नाहीतर जसा उशीर होईल तसं बसची वाट बघणं मला कंटाळवाणं वाटायचं. भीती वगैरेचा प्रश्न नव्हता पण उगाच आई बाबा काळजी करत बसायचे त्यामुळे मी नेहमीच वेळेत जायचा प्रयत्न करायचे घरी. मी कोडिंग उरकलं आणि निनादला टेस्ट करून कोड सेंड केला. त्याचा program हि नीट रन होतोय हे चेक केल्यावर आम्ही निघायचं ठरवलं. निनादला बाय म्हणून मी निघणार इतक्यात तोच म्हणाला, “मीरा, उशीर झालाय ग, मी सोडू का तुला घरी?”
मी हसून त्याच्याकडे पाहिलं. तो ऐकणार नाही हे एव्हाना मला कळून चुकलं होत तरीही मी म्हणाले,
“जाईन रे मी बसने. मला सवय आहे”
“अगं पण खूप उशीर झालाय. मी येतो तुला सोडायला. इतक्या उशिरा तुला एकटीला जाऊ देणं मला बरोबर वाटत नाहीये. मी घरी येऊन काका काकूंना भेटून मगच जाईन.”
मी किती नाही म्हटलं पण ऐकेल तो निनाद कसला.
”आता पुरे हं मीरा, तू माझ्या बरोबर येतेयस. मला माहित आहेत तुझी तत्व, स्वावलंबी मुली! पण आत्ता माझं ऐक” असं म्हणून तो लिफ्टकडे निघालासुद्धा. आम्ही पार्किंगमध्ये गेलो आणि मी त्याला आधीच बजावलं,
“ए, नीट चालव बाईक, असाही तुझ्या बाईक चा स्पीड खूप असतो.”
“तू कधी बघितलास ग माझ्या बाईकचा स्पीड?” न समजून निनाद.
“अरे आपल्या induction च्या पहिल्या दिवशी नाही का तू मला विचारलं होतास, डू यू वॉन्ट लिफ्ट? तेंव्हा पाहिलं होत मी”
“फार लक्षात असतं ग तुझ्या, पण काळजी करू नकोस, तुला नीट सोडेन घरी” निनाद म्हणाला आणि खरच त्याने मला घरी छान आणून सोडलं. घरी पोहोचलो तर आई बाबा माझी वाटच पाहत होते.
“काय ग आज इतका उशीर?” इति आई.
“अग हो आई, आज खूप काम होत त्यामुळे वेळ झाला, अजून उशीर झाला असता पण ऑफिस मधल्या मित्राने सोडलं मला घरी”
“मीच तो मित्र. नमस्कार काका, नमस्कार काकू” निनाद हसत आत येत म्हणाला.
“तुम्हाला मी थोडा आगाऊ वाटण्याची शक्यता आहे, की असा कसा डायरेक्ट घरी सोडायला आला आमच्या मुलीला? पण इतक्या उशिरा तिला एकटीला बसने येऊन देणं मला बरोबर वाटलं नाही. म्हटलं तुमचीही भेट होईल, आणि असंही मीराने कधी मला स्वत:हून घरी बोलावलच नसतं. सो काकू आता जेवूनच जातो, घरी आईला सांगितलंय मी तसं”
निनाद म्हणजे ना.. इतकं मनमोकळं कसं काय असू शकत कोणी? मला हे सात जन्मात जमलं नसतं.
निनाद जेवण करून गेला आणि मी अभ्यास करत बसायचं ठरवलं. आई मागे लागली होती झोप म्हणून पण पुढच्या आठवड्यातल्या टेस्ट ची तयारी तर करायला हवी ना.
सो मी तीचं न ऐकता वाचत बसले. एक तासभर वाचलं असेल नसेल तोवर अचानक मला असं वाटलं कि कोणीतरी पहातंय माझ्याकडे, एकटक. आणि मी झटकन मागे पाहिलं... मागे तो होता... तसाच थेट बघत उभा.. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू होत. मी स्वप्न बघतेय का?? हा माझ्या घरात काय करतोय??? दोन मिनिटं मला काही कळायचंच बंद झालं. अचानक कसलातरी आवाज आला म्हणून मी इकडे तिकडे पाहिलं तर तो नव्हताच! अरे देवा! काय आहे हे? मला तो घरी आल्याचा भास झाला होता... चला मीरा मॅडम खूप झोप आलीये तुम्हाला Happy असं म्हणत मी स्वतःशीच खिदळले आणि झोपी गेले.
टेस्ट्स च्या तयारीत आणि टेस्ट्स देण्यात १५ दिवस कसे गेले ते आम्हा चौघांनाही कळलंच नाही. शेवटची टेस्ट झाल्यावर चौघेही कॅफेटेरियात जमलो.
“मला एकदम भारी वाटतंय, झाल्या एकदाच्या टेस्ट्स..” निनाद खुश होता.
“ए पण रिझल्टचं काय? मला खूप टेन्शन आलंय आत्तापासूनच” आमच्या एस क्यूबची चिंता....
“अग रिझल्टचं काय tension घेतेस? तुझे रिझल्ट छान असणार नाहीत तर कोणाचे असणार?” इति मोहित.
यावर मी हळूच एका डोळ्याने निनादकडे पाहून घेतलं, त्याला ते लक्षात आल्यावर लगेच त्याने डोळ्यांनीच मला काय चाललंय म्हणून दटावलं.
“चलो, निघते मी, उद्या भेटू” म्हणून मी निघाले. कॉरिडॉर मध्ये रागिणी भेटली.
“हाय, कशा झाल्या टेस्ट्स?”
“चांगल्या होत्या” माझं सावधपणाचं उत्तर.
“ग्रेट! आता नेक्स्ट वीक मध्ये प्रॅक्टिसेस assign होतील तुम्हाला. ऑल द बेस्ट”
“रा... कॉफी?”
हा कोणाचा आवाज म्हणून मी मागे बघितलं तर तो! रागिणीला कॉफी घ्यायला येतेस का म्हणून विचारत उभा. हा “रा” म्हणतो हिला? माझ्या मनाचे प्रश्न.
ती हो म्हणाली आणि ते दोघे निघाले. मीही निघाले घरी.
अचानक रागिणीला काय आठवलं कोणास ठाऊक, तिने मला हाक मारून पुन्हा बोलावलं,
मीरा, meet अनिरुद्ध. हा आपल्या कंपनीच्या core प्रॅक्टिसेस पैकी एका practice चा manager आहे. कुठली ते तुला उद्या कळेलच. आणि if you are the lucky one तर तो तुझा मॅनेजर ही असू शकेल”
“रा..” त्याने रागिणीकडे किती बोलतेस अस पाहिलं.
“अनिरुद्ध, ही मीरा” रागिणीने ओळख करून दिली.
“हाय. अनिरुद्ध” म्हणत त्याने हात पुढे केला. तसाच थेट बघत आणि काल रात्रीसारखं हसत.
“हॅलो, मी मीरा” म्हणून मी त्याच्या हातात हात दिला. आणखी काहीतरी बोलायला हवं हे मला कळत होतं पण शब्दच सुचत नव्हते. एक क्षण आमची नजरानजर झाली आणि पुढच्याच क्षणी रागिणी म्हणाली,
“चल, कॉफी घ्यायला जायचंय ना? बाय मीरा.”
“Bye. See you tomorrow”. असं म्हणून तोही वळला.
“बाय” म्हणून मीही निघाले.
सगळ्या प्रॅक्टिसेस च्या मॅनेजर्स नि आपापल्या ओळखी करून दिल्या. मग आले भागवत सर. पन्नाशी सहज ओलांडली असेल त्यांनी. इतका experienced माणूस, आमच्या ऑफिस चा डायरेक्टर, पण अगदी down to earth! भागवत सर त्यांच्या मृदू बोलण्याने, knowledge ने सर्वांच्यात उठून दिसायचे. आमच्या induction नंतर एक दिवस ते आमच्याशी बोलले होते. ते म्हणाले होते, We are investing in you. Work hard and make us proud. You are the first batch of trainees we are hiring”.
मग त्यांनी त्याची, सर्वात यंग आणि bright मॅनेजर म्हणून ओळख करून दिली. ते म्हणाले, “अभि कल कि हि बात लगती है जब मैने अनिरुद्ध को hire किया था. Now he is hiring his own people. I wish him to get the best, as I got”.
मग तो उठला, आपली ओळख करून दिली आणि वर हेही सांगितलं की त्याच्या प्रॅक्टिस मध्ये एकच जागा आहे. तो म्हणाला “आम्ही फ्रेशर्स ना आजपर्यंत घेततेलं नाही आमच्या टीम मध्ये, but you never know”. Maybe तुमच्यापैकी कोणी एक माझ्या टीम मध्ये असू शकतं”. त्याच्या प्रॅक्टिस मध्ये असलेले सगळे core developers होते. ती टीम सगळ्या teams चा अर्क होती. मी मनात म्हटलं छे, या टीम मध्ये कसलं होतंय आपल्या कोणाचं selection.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच धाकधूक होती, कुठली प्रॅक्टिस मिळतेय याची. शर्वरी आणि मोहितला एकच प्रॅक्टिस मिळाली होती. त्यामुळे निनादला हवी ती प्रॅक्टिस मिळूनही फार काही आनंद झाला नव्हता. आणि माझ्या इनबॉक्स मध्ये नवीन मेलचा पॉपअप आला.
मला त्याची practice assign झाली होती.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle