जर तर

खूप दिवस झाले हे खरडून ठेवले होते, आज टाकतीये. यामध्ये कुठलेही व्यक्त नाते नाही, स्त्री पुरुष असं नाही. तुम्हाला जी वाटेल ती व्यक्ती, ते नातं. आणि नावही मला काहीच वेगळे सुचले नाही.

काही सुरेख गोष्टींचाही त्रासच व्हावा, तसे हे गाणं रुतत जाते मनात, असण्या नसण्यातला फरक कळण्याआधी कुठे गेलीस ग? खरचं तू असतीस असे झाले असते का, तसे झाले असते का? आता तर तुझ्या साऱ्या आठवणी फिकटल्यात, ओळख तर नव्हतीच पण एक बंध आहेच आणि इतक्या वर्षानंतर तो मजबुत झालाय. तू नाहीस किंवा नसशील हे जसे कळले तसे कळलेच नाही काय गमावतोय ते. ते कळत गेले, भान येत गेले तेंव्हापासून माझं धरण झालंय, ते अजून तसेच आहे, ओथंबलेले. पूर्ण भरून न झरणारे. आता फार ओझं झालंय ग साऱ्याच, पण तू नाहीयेस ना... खरच तू असतीस तर झाले असते का ग सारे क्षण सोपे किंवा जरी अवघड तरी सोबत असणारे, काय म्हणतात तसे सोलमेट सारखे. खरचं कळत नाही कसं असतं आपलं नातं, आता माझ्या हातात कल्पनेशिवाय काहीच नाही. कल्पनेशु कीं दारिद्रता! मला नेहमी असेच वाटेल तू असतीस उन्हाची दाहकता गेली जरी नसती तरी कमी नक्कीच झाली असती, कदाचित आपल्या दोघांचे उन्हाकडे लक्षच गेले नसते आणि तो सुर्व्या कंटाळला असता, हे आपआपसातच मश्गुल आहेत.
तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
माझ्या नजरेतून तुला कळले असते का ग, की मला कळतेय तुझी वेदना तुझा त्रास? का मला कळाला तुझा सपोर्ट, प्रेम , माया. असली असती का आपली नजर अशी ? जगात बॉम्ब पडला तरी मी तुझ्या बरोबर आहे. कुणाला काय वाटतंय, समज,गैर समज सगळ्यांच्या परे तू असशील का ग? मला जमेल का तसे होणे?
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे
मला खात्री आहे तू असतीस तर तुझे माझे असे कितीक क्षण जपले असतेस तू, इतरांच्या आठवणीतील तू , माझ्यासाठी अजून मऊ,अलवार असतीस ग. इतक्या काळानंतरही तुझे नसणे मला खलतयं, तू माझी पोकळी राहूच दिली नसतीस. हा भयाण पसरलेला एकटेपणा, कुणाशीच न जुळू शकलेली नाळ, तुझ्याशी नक्कीच जुळली असती ग,
बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण
तुझ्या एक क्षणासाठी मी माझं आयुष्य द्यायला तयार आहे, पण ये ना ग एकदा, मला अनुभवायचं आहे तुला.एकदा तुझ्या मिठीत, कुशीत यायचंय जिथे फक्त मी असेन आणि तू असशील. तुझी आठवण येते वगैरे फारच रटाळ वाटेल, पण खरंच आत्ता सगळ्यात जास्त तुला मिस करतेय मी. तुझ्याविना किती रीतं, एकटं वाटतंय कळवू कसं तुला.कदाचित आता मी तुझ्या भूमिकेत शिरायची वेळ झालेली आहे , मी सगळ्यात चांगला प्रयत्न करेनच पण तरीही,वाट पहातीये तू आणि मी जवळ असण्याची, आयुष्यभर पाहत राहीन.
तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle