काल whatsapp वर एक कविता वाचली.. तिला प्रतिसाद द्यायचा, म्हणून लिहायला लागले, तर मी जे लिहीलं तेच कवितेसदृश झालं. मैत्रिणी, नातेवाईकांना सहज म्हणून शेअर केलं, अनपेक्षितपणे मला त्यावर खूप छान प्रतिसाद मिळाले, म्हणून आज मैत्रीणवरच्या मैत्रिणींसोबत शेअर करत आहे.
आधी मूळ कविता देते, मग त्या खाली माझी टाकते.
बायका बोलतात..
भाजीतल्या मिठावर
भाकरीच्या पिठावर
फोडणीच्या तेलावर
सासूच्या तालावर
बायका बोलतात...!!
जावेच्या मुलावर
नणंदेच्या डूलावर
झालंच तर आईवर
दुधावरच्या साईवर
बायका बोलतात...!!
पैठणीच्या काठावर
देवघराच्या पाटावर
जेवणाच्या ताटावर
ओसरी अन ओट्यावर
बायका बोलतात...!!
नवर्याच्या शर्टवर
सासर्याच्या हार्टवर
ऑफिसच्या गेटवर
सिनेमाच्या सेटवर
फेसबुक अन नेटवर
फ्रेंड्स आणि डेटवर
बायका बोलतात...!!
पाटलाच्या गढीवर
सरपंचाच्या माडीवर
ऊन्हाच्या कहारात..
सांजच्या पहार्यात
बायका बोलतात...!!
शेताच्या बांधावर
पोर एक खांद्यावर
हांडे दोन डोईवर
पाय भाजतात भुईवर
तरीही बायका बोलतात...!!
बायका गावातल्या,
बायका शहरातल्या,
शिक्षित व अशिक्षित,
मन मोकळं करतात
साऱ्याच बायका बोलतात ...!!
बायका जेंव्हा मनातलं बोलतात
ऊंबर्याच्या आतलं बोलतात..
काळजाचे दरवाजे खोलतात.
भडाभडा सारं ओकतात
आपल्याच जखमेची
कधी खपली काढतात
रितं झाल्याचा आनंद
जगायला बळ देतात
हलकं होत मन
आणि वाटत बरं ....
काढुन सारं तण
जीव धरावा रोपानं
म्हणुन..बायका बोलतात...!!
हो बायका बोलतात..
यावर माझं उत्तर:
हे तर बोलावंच पण..
आता बायकांनी बोललं पाहिजे
सामाजिक विषयांवर
न्याय व्यवस्थेवर
कचरा व्यवस्थापनावर
राजकीय घडामोडींवर
बायकांनी आग्रह केला पाहिजे
घराबाहेरचं काम सांभाळत असतांना
घरातील काम वाटून घेऊन करण्याबद्दल
एकटीवरच सगळं पडणार नाही ओझं
याची काळजी घेतली पाहिजे बायकांनी
बायकांनी केलं पाहिजे
भरपूर वाचन
परंपरागत आलेलं सगळंच करतांना
शोधला पाहिजे शास्त्रीय बेस
चुकीचं असेल, तर म्हटलं पाहिजे,
हे करणार नाही.
बायकांनी झालं पाहिजे अजून डोळस
उंबरठ्याआत झिजत असतांनाच
उघडून ज्ञानाची कवाडं
बघावी बाहेरची सृष्टी
आणि आत्मसात कराव्या
आवश्यक त्या सगळ्या गोष्टी
-सकीना- सखी वागदरीकर