मनाचीये गुंती, कच्छ आठवणी

या दोन वेगवेगळ्या पोस्ट लिहील्या होत्या फेसबूकवर. इथे एकत्र जोडतेय. जरा विस्कळीत वाटेल त्यामुळे, पण ठीक आहे.
सफ़ेद रण-
इथे जेंव्हा सूर्यास्त होतो ना जादू पसरते पांढऱ्या प्रतलावर. दोन समांतर प्रतलं -एक आकाशाचं सूर्याच्या रंगाने माखलेलं क्षणात भाव बदलणारं आणि एक जमिनीचं, मीठ ल्यायलेलं शुभ्र शांत पसरलेलं. दूरवर अगदी दिसेनाशी क्षितिजरेष. आपल्या आजूबाजूचा गर्दीचा कोलाहल धूसर होत जातो. Selfy, photo, costume , नाचगाणे वजा होत जातात आकलनातनं. एक आपली एकट्याची स्पेस तयार होते तिथेच. त्या पोकळीची आवाज नसलेली विरक्त शांतता दिसतेच लख्खं. कानात काही आवाज पोहचत नाहीतच पण मनातही काही वाजत नाही. शून्य अवस्था म्हणावी तर समोर कणाकणाने सूर्य झीजत जातोय की काय वाटत असतं. मग तो क्षण गच्च पकडून ठेवते मी मनात. स्थीर स्तब्ध उभी राहते.
कच्छ काय आहे महितीये?
अथांग समुद्रा सारखं पसरलेलं खारं शुभ्र वाळवंट? दुरून येणाऱ्या वाटसरुला दिशा दाखवायला उभा असलेला काळा बोडका कालो डुंगर? देश विदेशातनं येणारे पर्यटक?
अहं! कच्छ आहे या अफाट तरी भकास कॅनव्हासला मनाला येईल त्या रंगाने, आरसे , टीकल्या कारागिरीने vibrant बनवणारा इथला माणूस!
हा उडून गेलेला समुद्र आहे. माहीत्ये? होच! खूप पूर्वी समुद्र होता इथे. मग कोणत्याश्या भुकंपात Tectonic plates सरकल्याने मधला भाग उंचावला गेला. कालांतराने समुद्राचं खारं सरोवर झालं जे ‘अलक्षेंद्र’ चढाई करुन आला त्या दरम्यानही अस्तित्वात होतं!
मग तेही पाणी कण कण उडालं आता इथे थंडीचे चार महिने मीठाचे वाळवंट असतं इतर वेळी पूर्ण दलदल! ही दलदल व्हायला नदी तर नाहीच वाहत इथे पाऊसही नसतो, मग पाणी येतं कुठून? कमी दाबाचे खारे वारे स्वतः बरोबर पाणीही वाहुन आणतात इथे. म्हणून असं म्हणतात की हे रण दर वर्षी नव्याने तयार होतं . काय एकएक मजा ना!
अमावसे पुनवेला इथनं उड़ून गेलेल्या समुद्राला भरती आहोटी येत असेल का?
असणारचं त्या शिवाय का ही जागा ओढ लावते आपल्याला! मन जादू जादू होतं वेध लागतात आत खचत जायचे. पाणी नाहीये तिथे आत्ता पण होतं ना ते तिथेच , त्या जुन्या समुद्राच्या आठवणींना ओहोटी लागते मग ते खेचून घेतं तिथे आलेल्यांना.
मग परतायचं कसं पुन्हा या समुद्राच्या आठवणींच्या पांढऱ्या काळ्या जादूतनं???
आपणही झिजून जावं , वाफ होऊन फक्त अश्रूंमधलं मीठ उरावं ते ही या पाया खालच्या सफ़ेद मीठात मिसळून जावं. कोणं कधी कुठे उभं होतं , कोण कुठनं आलं होतं ओळख पटण्या इतकंही शिल्लक राहू नये... असली आवर्तनं मनात भरती आहोटीचा खेळ मांडतात .
आणि मग समोर हे चमचमते रंग उधळतं कच्छी लोकं येतात , रंगीत ओढणी घ्या , फ़ोटो काढ़ा, सुंदर आठवणी तयार करा सांगत!
इतक्या ढिगाने माणसाची जगायची रंगीत असोशी पांघरतात ते!
मग तो उडून गेलेला समुद्रही आपली जादू आवरुन ठेवतो, पुन्हा वाट पाहतो हा टुरीस्ट सिझन संपेल, हे रंग गायब होतील, माझ्या उडून गेलेल्या पाण्याला मीठाची सय येईल नि पुन्हा इथे लाटा नाही उठल्या तरी किमान दलदल होईल!
मी आपली बावचळून तशीच उभी...
कधी तरी मुली हाक मारतात अंगाशी झट्या घेतात.
तंद्री तुटते.
ट्रिप संपते.
Routine सुरू होतं. मग अशाच कोणत्याश्या निवांत दुपारी फ़ोटो चाळताना हे फ़ोटो दिसतात.
Odhani_0.jpg
IMG_8236.JPG
मी तो मनात घट्ट पकडलेला क्षण शोधते.
काय बरं सांगत होता तिथला माणूस. दरवर्षी नव्याने बनतं हे रण. मागचं विरतं कुठेसं ,नवं पाणी बाहेर पडतं जमिनीच्या पोटातनं. नव्यानं तळपतो सूर्य. पुन्हा नवा स्वच्छ कॅनव्हास तयार होतो कणाकणानं. मी मात्र सगळं जूनं पानं सांभाळलय मनाच्या अडगळीत.उचकतेय कधीची. मग कधी तरी मन किलकिलं होतं आणि तो क्षण सटकून इथे समोर उभा राहतो. पुन्हा शुभ्र नवा होतो!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle