कोकणातले दळणवळण..कालचे आणि आजचे:
माहेरी गेलं की स्वागताला डांबरी रस्ता आणि जवळपास प्रत्येक घराशी एखादी तरी दोन चाकी, चार चाकी दिसतेच! आयुष्य सुखकर होण्यासाठी या गोष्टी लागतातच, त्याबद्दल मुळीच दुमत नाही.त्याचवेळी घराकडे वळताना दिसणारी ढोलाची घाटी अनेक आठवणी जागवते... सुरंगीची फुलं केसात माळली की जसा त्याचा पिवळा रंग केसांवर उतरतो आणि सुगंध सर्वदूर पसरतो तसा अनेक आठवणींचा रंग आणि गंध अलगद मनात उतरतो!
माझ्या लहानपणी नदीवर कामट्यांचे साकव होते जे एकदा जोरदार पाऊस आला की वाहून येणाऱ्या झाडा सोबत जायचेच! गावात एखादाच पक्का पूल होता. मराठी शाळेत तसं बऱ्यापैकी चालत जावं लागे, त्यामुळे पाणी भरलं.. नदीला हौर आला की सुटली शाळा! जायला असलेला लाल मातीचा रस्ता म्हणजे त्यातून गाडी आणणाऱ्या लाल परीच्या चालकाच्या कौशल्याला तोड नाही. तरी अचानक कुठल्याही ठिकाणी रस्ता खचला की वाहतूक ठप्प!
आठवीला शाळेसाठी पावसला चालतच जावं लागे.. कारण तेव्हा गाडी गावात येणं कठिण ...पूर्णगडहून जी बस यायची ती मधल्या स्टॉपना थांबायचीच नाही. ढोलाची घाटी चढून वर आल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
संध्याकाळी चालत येताना मोठ्या दांड्याची छत्री सुद्धा बंदच करावी लागे कातळावर...आताच्या तकलादू छत्र्या तर एक दिवस पण टिकत नसत. रेनकोट फारसे नव्हतेच. येताना रमतगमत चालत आलं की कधी तरी चिंचा, पेरूच्या बदल्यात तात्या गोठणकर कडून वडापाव आणायचा आणि कुंभारदेवीच्या पुढच्या चढावात पडणाऱ्या धबधब्यात पाय सोडून तो खायचा! कधीतरी चणे, किंवा लाल वाटाणे चिंदाणे कडून किंवा चौकातल्या कोपऱ्यावर पंचवीस पैशांना मिळणारी गोड बुंदी!
बहुतेक चार महिने पावसाचे गाड्या बंदच... दिवाळीनंतर चालू व्हायच्या. शाळेचा पास काढायला गेलं की तिथले एक कंट्रोलर एकोणतीसचा पाढा म्हणायला लावायचे..
कॉलेजला येइपर्यंत रस्ते सुधारले, गावातून येणाऱ्या गाड्या पण वाढल्या. तरीही बरेचदा आधीच्या गावाहून आलेली गाडी उशिरा आली म्हणून आमची फेरी रद्द केली जायची. मुळात कुर्ध्याची लोकसंख्या कमी त्यात रत्नागिरी पासून जाणारे लोक कमी! अशावेळी तिकडे कितीतरी लोक थांबलेत असं भांडून अनेकदा गाडी सोडायला भाग पाडल्याचे आठवतेय. एकदा गाडी लागली की पावस पर्यंत जाणारे बरेच लोक असायचे!
एसटी शिवाय दुसऱ्या वाहनाने प्रवास करणं परवडणारे नव्हते आणि तशी सोयही नव्हती.या लाल परीने अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची जादूची कांडी फिरवली.
अकरावी बारावीची दोन वर्ष तर दुपारी पाऊण वाजता पूर्णगड गाडीने एकटी कातळावर उतरायचे! दहा मिनिटं तरी एकही घर नाही.. दुपारची वेळ..मी जोरात शिट्टी वाजवत जायचे घराकडे! अशावेळी कोणी कोणी सांगितलेल्या सगळ्या भुतांच्या, भुलीच्या झाडाच्या कथा आठवायच्या पण मला त्यातलं कधी काही दिसलं नाही. बाबांनी एक गोष्ट सांगीतली होती... कायम लक्षात ठेव.. कोणताही प्राणी अगदी वाघ, साप जरी आला तरी तू त्याला डीवचलं नाहीस तर तो काहीही करणार नाही. फक्त एका प्राण्या पासून नेहमी सावध रहा.... तो म्हणजे मनुष्य प्राणी... ज्याच्या बद्दल काहीही भरवसा नाही.
आज खेड्यातील सर्वसामान्य लोकांना अनेक पर्याय उपलब्ध झालेत त्यामुळे गावं शहरांच्या जवळ आलीत! या सुखसोयींमुळे आयुष्याचा प्रवास कितपत सोपा झालाय ते मात्र माहीत नाही. नद्यांवरचे पूल, गावातले रस्ते पक्के होत गेले पण माणसांच्या मनातले नात्यांचे, प्रेमाचे पूल मात्र कधीचे वाहून गेलेत.. कदाचित कधीच न सांधण्यासाठी!
मिनल सरदेशपांडे