नमस्कार,
ई प्रतिष्ठान तर्फे "जंगलसफारी - बांधवगड" हे मी लिहिलेलं ईपुस्तक आज प्रकाशित होत आहे.
आज दुपारी माझ्या आईच्या हस्ते या ई पुस्तकाचे प्रकाशन एका कौटुंबिक कार्यक्रमात करीत आहे.
ई पुस्तक प्रकाशित करण्याचा हा अनुभव खूप छान होता. सुनिल सामंत, सचिन काकडे यांनी अतिशय सुंदर पुस्तक तयार केले. त्यांचे आणि ईसाहित्य प्रतिष्ठानचे मन:पूर्वक आभार.
पुस्तक इथे बघता येईल : http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/js_bandhavagad_aratikhopka... इथून हे पुस्तक डाऊनलोड करून घ्या आणि जंगलाचा अनुभव सलग घ्या.हे पुस्तक सर्वांसाठी मोफत आहे.
--------
जंगलसफारी - बांधवगड
मनोगत
माझ्या अनेक प्रेमांपैकी एक, जंगल प्रेम. जंगल, मग त्यातले वृक्ष, वल्लरी, पक्षी, प्राणी, ओहोळ, माती, अगदी तिथला वासही मला भारून टाकतो. त्याच प्रेमापोटी कान्हा, बांधवगड, रणथंबोर अशी जंगल भटकंती केली. त्यातलेच हे एक, बांधवगडचे व्याघ्रदर्शन.
अनेक लोक जंगल बघण्यापेक्षा फक्त वाघच बघायला जातात. पण फक्त वाघ म्हणजे जंगल नव्हे. तो सारा अनुभव घेणं हाच एक सोहळा. निसर्गाच्या सानिध्यात असणं, तिथला शांतपणा अनुभवणं, निसर्गातली विविधता टिपणं, प्राण्यापक्षांचे आवाज एेकणे, त्यांचा संवाद समजून घेणे, हे सगळेच किती वेगळे, किती आनंदाचे. आमच्या बांधवगड जंगल सफारीत जोडीने व्याघ्रदर्शनही भरपूर झाले. हा सगळा अनुभव शब्दात अन प्रकाशचित्रात पकडण्याचा हा माझा प्रयत्न.
बांधवगडला जाऊन आल्या नंतर तिथले फोटो मी मायबोली (maayboli.com) इथे टाकले. तेथील रसिकांनी त्याचे कौतुक केले. त्यामुळे त्या संपूर्ण अनुभवाबद्दल काही लिहिले अन तेही मायबोलीवर टाकले. तिथल्या अनेक रसिक मित्रमैत्रिणींना खूप आवडले ते लिखाण. अन मग या सर्व लिखाणाची तिथे लेखमालिका झाली. या लिखाणाचे पहिले वाचक मायबोलीवरील सर्व रसिक ! त्यांनाच हे माझे पुस्तक समर्पित ! अशा मित्रमैत्रिणींमुळेच मी माझे चार शब्द लिहित गेले, मनापासून आभार मायबोली आणि मायबोलीकर :-)
माझे हे लिखाण ईसाहित्यने प्रकाशित करायचे मान्य केल्यामुळे आता हे लेखन, पुस्तक रुपामधे रसिकांपर्यंत पोहचत आहे. ईसाहित्य टीम आणि सुनिल सामंत यांचे मी मनापासून आभार मानते. ईसाहित्याची एक नवी चळवळ त्यांनी उभी केली आहे, माझा त्यात हा खारीचा वाटा.
बांधवगडची सफर इतकी छान होण्यात महत्वाची भूमिका होती , ती फोलिएज या कंपनीची. त्यांची अतिशय आखीव रेखीव, पूर्णतयारीची अशी ही सफर. त्यांचेही विशेष आभार. फोलिएजच्या सर्व सहकाऱ्यांचेही आभार.
माझे पती श्री. चारुहास आणि मुलगा निखिल या दोघांमुळे ही सफर अजूनच आनंददायी झाली. माझे खूप वर्षांचे स्वप्न, मोठा कॅमेरा घेणे हेही त्या दोघांमुळेच शक्य झाले. निखिलने आग्रह धरला म्हणूनच इतका मोठा कॅमेरा मी घेतला :-)
सर्वात शेवटी आपणा सर्व रसिक वाचकांचेही आभार, तुम्ही सर्व वाचता म्हणून काही लिहिण्याचा उत्साह वाढतो. हे पुस्तक वाचल्यावर तुमच्यातील काही जणांनी जरी जंगल सफारी केली, जंगलाचा अनुभव घेतलात, तरी या पुस्तकाचे चिज झाले असे म्हणेन.
खरच एकदा तरी अनुभवाव जंगल ___/\___
- प्रा. सौ. आरती खोपकर (अवल)