आपण माणसं आनंदी होतो, दुःखी होतो, जेलस, पझेसिव्ह, भित्रे, दुष्ट, अहंकारी, प्रेमळ असतो. पण ह्याच सगळ्या भावना जर खेळण्यांमध्ये आल्या तर? हीच पार्श्वभूमी आहे टॉय स्टोरी ची!
माणसं आजूबाजूला नसली की यातल्या खेळण्या जिवंत होतात आणि चक्क माणसांसारख्या वागू लागतात. त्यांच्यात सगळ्या स्वभावाचे नमुने आहेत. शांत, कटकटे, हुशार, भित्रे, कन्फ्युज! एका वुडी नावाच्या काऊबॉय शेरीफ ला यांच्यात सगळ्यात उच्च स्थान आहे. पदानुसार आणि अक्षरशः सुद्धा. ते कसं तर हा सगळ्या खेळण्यांचा लीडर आहेच पण सिनेमातला मुलगा अँडी, ज्या लहानग्याच्या ह्या सगळ्या खेळण्या आहेत, त्याचा हा सगळ्यात आवडता आहे. बाकी खेळण्या एरव्ही खोक्यात, टेबल, शेल्फवर असतात पण वुडीला रात्री त्याच्या बेडवर जागा आहे. तो छोटा याला रोज जवळ घेऊन झोपतो, त्याच्या प्रत्येक बनावटी खेळात हा कायम हिरो असतो आणि कायम जिंकतोही. लीडर वुडी ह्या खेळण्यांच्या मिटिंग्ज घेतो, सगळ्यांच्या भल्याचे निर्णयही घेतो.
ह्या खेळण्यांच्या आयुष्यातले दोन दिवस फार महत्वाचे आणि काळजीचे असतात. एक म्हणजे ख्रिसमस आणि दुसरा अँडी चा वाढदिवस! का ? तर या दिवशी अँडीला खूप साऱ्या भेटवस्तू मिळतात. त्यात खूपदा खेळण्या असतात. आता नवीन खेळण्या आल्या की जुन्या कोणकोणाची हकालपट्टी भंगारात होणार याची त्या दिवशी सगळ्यांना चिंता असते. अशाच एका ख्रिसमस ला बझ लाईटइयर हे त्यांच्या सगळ्यात अत्याधुनिक आणि कुल खेळणं त्यांच्यात येतं आणि वुडी च्या स्थानाला आणि मानाला धक्का पोहचू लागतो. या सगळ्याची परिणीती म्हणून बझ आणि वुडी चांगलेच गोत्यात येतात.
डिस्ने आणि पिक्सार चे एकत्रित प्रोडक्शन असलेला हा सिनेमा आहे. सहसा अनिमेटेड सिनेमात एरव्ही असतात तसे पात्रांच्या तोंडी असणारे स्मार्ट जोक्स, यांच्या प्रेमकहाण्या आणि प्रेक्षकांसाठी संदेश हा सगळा नेहमीचा मसाला यात आहेच. सिनेमाची काही दृश्यं मनाला स्पर्शून, अगदी भेदून जातात. खेळण्या म्हणलं की मुलं त्यांना कसही, कुठंही टाकतात, फेकतात, एखाद्या बॉक्समध्ये कोंबतात. ते पाहून उगाचच कसंतरी वाटतं. यातल्या सिद नावाच्या महाखोडेल आणि खेळण्यांना टॉर्चर करणाऱ्या पोराचा तर प्रचंड राग येतो. मैत्री, भांडणं, विश्वासघात, संकटं, त्यातून सुटका, उपरती आणि पुन्हा मैत्री या सगळ्या वळणांतून सिनेमा तुम्हाला नेतो. सिनेमाचा हा पहीला भाग आहे आणि आत्तापर्यंत त्याचे एकूण 3 भाग प्रदर्शित झाले आहेत. तिन्ही भागात वुडी चा आवाज माझा खूप आवडता आणि अत्यंत गोड माणूस टॉम हँक्स चा आहे. चौथा येत्या जून मध्ये येतोय, त्यातही वुडी तोच असेल. तसेच एका नव्या, अजून नक्की न झालेल्या पात्रासाठी कियानु चा आवाज असणार आहे(कियानुयन पब्लिक साठी विशेष माहीती!!) तो येईपर्यंत उरलेले बॅकलॉग्स भरून काढायचेत.
पहीला भाग 95 साली आला होता. कदाचित बऱ्याच जणांनी हा आणि इतर भाग पाहीलेही असतील. ज्यांनी पाहीला नसेल आणि घरात लहान मुलं असतील तर हा सिनेमा मुद्दाम त्यांना घेऊन बघा. खेळण्या या आवडत्या विषयातून त्यांना भावनिक पातळीवर एक वेगळा दृष्टिकोन मिळेल. पण या सिनेमाला वयाचं बंधन अजिबात नाही बरं! तुम्ही अनिमेटेड सिनेमांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी सुट्टीच्या दिवशी बघायला हा हलकफूलका, मजेदार आणि तेवढाच भावनिक सिनेमा एक उत्तम पर्याय आहे!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle